विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय? आणि सत्य ओळखायचे कसे? हे प्रश्न ज्ञानक्षेत्रातील आहेत. या आणि अशाच अन्य प्रश्नांची उत्तरे देणे हे विवेकाचे काम आहे असे म्हणता येईल.
‘विवेक’ हा शब्द ‘reason’ इंग्लिश शब्दाला पर्याय म्हणून येथे वापरला आहे. ‘Reason’या अर्थी ‘बुद्धि’ हा शब्दही वापरला जातो, आणि ‘rationalism’ ला ‘बुद्धिवाद’ म्हटले जाते. परंतु हे शब्द गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे येथे ‘विवेक’ आणि ‘विवेकवाद’ हे शब्द पसंत केले आहेत.
आपण कशावर विश्वास ठेवावा? या प्रश्नापासून आपण आरंभ करू या. या प्रश्नाचे पहिले आणि उघड उत्तर आहे ‘अर्थात् सत्यावर’. हे उत्तर कोणालाही मान्य व्हायला हरकत असू नये असे वाटते. आपण असत्यावर विश्वास ठेवावा असे कोणी म्हणेल असे वाटत नाही. आता पुढचा प्रश्न ‘सत्य म्हणजे काय?’ याचे उत्तर ‘यथार्थ विधान’ असे थोडक्यात देता येईल. ‘सत्य’ किंवा ‘असत्य’ ही विशेषणे फक्त विधानांनाच लागू पडतात. विधान म्हणजे स्थूलमानाने निवेदक वाक्य, indicative sentence. सर्वच वाक्ये निवेदक नसतात. काही वाक्ये प्रश्नार्थी असतात, काही आज्ञार्थी असतात, आणखी काही विध्यर्थी असतात, या सर्व प्रकारच्या वाक्यांपैकी सत्य आणि असत्य असू शकतात फक्त निवेदक वाक्ये. प्रश्नार्थक वाक्य सत्य किंवा असत्य असू शकत नाही हे स्पष्ट आहे. तीच गोष्ट आज्ञार्थी आणि विध्यर्थी वाक्यांचीही आहे. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ आणि ‘पृथ्वी सपाट आहे’ ही दोन्ही वाक्ये निवेदक आहेत. त्यापैकी पहिले सत्य आणि दुसरे असत्य आहे याविषयी निदान आज तरी दुमत होऊ नये. परंतु ‘पृथ्वी गोल आहे काय?’ हे वाक्य सत्य की असत्य हा प्रश्न निरर्थक आहे; आणि तसेच ‘उभा राहा’ हे वाक्य सत्य की असत्य हा प्रश्नही निरर्थक आहे. निवेदक वाक्यांना, स्थूलपणे बोलायचे तर, ‘विधाने’ म्हणतात. विधानेच फक्त सत्य किंवा असत्य असतात असे वर म्हटले आहे.
परंतु ‘पृथ्वी गोल आहे’ हे वाक्य सत्य आहे हे जरी सर्वमान्य असले तरी ‘सत्य’ या शब्दाने विधानांचा कोणता गुण व्यक्त होतो हे अजून सांगायचे राहिले आहे. तो गुण म्हणजे यथार्थता. सत्य विधान म्हणजे यथार्थ विधान, यथार्थ म्हणजे यथा (म्हणजे जसा) अर्थ (म्हणजे पदार्थ) असेल तसे. कोणतेही विधान कोणत्यातरी एका किंवा अनेक वस्तूंविषयी असते, आणि त्यात त्या वस्तूचे वर्णन केलेले असते. उदा. वरील उदाहरणात पृथ्वी या वस्तूविषयी तिच्यात गोलपणा नावाचा गुण आहे असे विधान केले आहे. आता पृथ्वीमध्ये खरोखरच गोलपणा नावाचा गुण आहे, म्हणजे वरील विधानातील वर्णन पृथ्वी जशी आहे तसे आहे, म्हणून ते सत्य आहे. उलट ‘पृथ्वी सपाट आहे’ या विधानातील वर्णन पृथ्वीला लागू पडणारे नाही, म्हणून ते यथार्थ नाही, म्हणजे ते सत्य नाही.
याप्रमाणे विधानाच्या विचारात दोन गोष्टींतील अनुरूपतेचा विचार असतो :
(१) एखादी वस्तुस्थिती, आणि (२) तिचे वर्णन. वरील उदाहरणातील वस्तुस्थिती एक भौतिक गोष्ट आहे, पण तिचे वर्णन भाषिक, म्हणजे शब्दमय आहे. वाक्य शब्दांचे बनलेले आहे, परंतु वस्तुस्थिती पृथ्वी आणि तिचा आकार या गोष्टींनी बनलेली आहे. या वस्तुस्थितीला आपण ‘वास्तव’ (fact) हा शब्द वापरू. विधान जेव्हा वास्तवाला अनुरूप असते तेव्हा ते सत्य असते, जेव्हा ते अनुरूप नसते तेव्हा ते असत्य असते. याप्रमाणे सत्य म्हणजे वाक्य आणि वास्तव यांतील अनुरूपतासंबंध असे म्हणता येईल. ‘सत्य’ या शब्दाची फोड करण्यात फार पाल्हाळ झाला असे वाटण्याचा संभव आहे. परंतु हे सर्व विवेचन आवश्यक होते असे वाटते. कारण व्यवहारात आपण ‘सत्य’ हा शब्द अतिशय शिथिल अर्थाने वापरतो. उदाहरणार्थ ‘सत्य’ आणि ‘सत्’ यातील भेदाकडे, म्हणजे ‘true’ आणि ‘real’ यांतील भेदाकडे, वाचकांचे लक्ष आकृष्ट करायचे आहे. ‘सत्’ आणि ‘असत्’ ही वस्तूंची विशेषणे आहेत, तर ‘सत्य’ आणि ‘असत्य’ हे शब्द वर्णनांच्या गुणांचे वाचक आहेत. म्हणून ‘सत्य’ या शब्दाने नेहमी कोणते तरी निवेदक वाक्य, किंवा विधान, किंवा वर्णन निर्दिष्ट होते. आता आपल्या व्यवहारात हा भेद अनेकदा पाळला जात नाही. उदा. गांधीजी म्हणत की ‘God is Truth’ किंवा ‘ईश्वर सत्य आहे’ तसेच कवी म्हणतो की, ‘Beauty is truth, and truth is beauty. परंतु वर आपण ‘सत्य’ या शब्दाचा जो अर्थ निश्चित केला आहे त्यानुसार ‘ईश्वर सत्य आहे’ हे वाक्य निरर्थक आहे, कारण ईश्वर हे काही वाक्य किंवा विधान नव्हे. ‘ईश्वर आहे’ किंवा ‘ईश्वराला अस्तित्व आहे’ ही वाक्ये किंवा विधाने आहेत, आणि म्हणून ती सत्य आहेत की असत्य हा प्रश्न विचारणे उचित आहे. परंतु ईश्वर स्वतः एक वस्तू किंवा पदार्थ आहे आणि म्हणून त्याच्या संबंधाने ‘सत्य’-‘असत्य’ ही विशेषणे वापरणे अनर्थकारक आहे. ‘ईश्वर सत्य आहे’ किंवा ‘ईश्वर म्हणजे सत्य’ असे जेव्हा गांधीजी किंवा अन्य कोणी म्हणतात तेव्हा त्यांना काहीच अर्थ अभिप्रेत नसतो असे येथे सुचवायचे नाही. पण त्यांना अभिप्रेत अर्थ कोणता आहे ते सांगावे लागेल. ज्या अर्थाने ‘पृथ्वी गोल आहे’ हे वाक्य सत्य आहे त्या अर्थाने ईश्वर सत्य आहे असे म्हणता येणार नाही हे स्पष्ट आहे.
तेव्हा सत्य म्हणजे वास्तवाचे यथार्थ वर्णन. एखाद्या वास्तवाविषयीचे सत्य माहीत असणे म्हणजे त्याचे ज्ञान होणे. ज्ञान विधानांत व्यक्त केले जाते. ‘सत्य’, ‘असत्य’ ही जशी विधानांची विशेषणे आहेत, तशीच ती ज्ञानाचीही विशेषणे आहेत. ज्ञान सत्य किंवा असत्य असते. अनेकदा ‘ज्ञान’ या शब्दाचा उपयोग ‘सत्यज्ञान’ या अर्थाने केला जातो. असे जेव्हा करतात तेव्हा ‘असत्य ज्ञान’ ह्या शब्दाने वदतोव्याघात व्यक्त होईल. अशा वेळी ‘असत्य ज्ञान’ असा शब्दप्रयोग न करता ‘भ्रम’ हा शब्द वापरला जातो.
इंद्रियगोचर वस्तूंविषयीच्या विधानांची सत्यासत्यता ऐंद्रिय ज्ञानाने निश्चित होते. ‘हे गवत हिरवे आहे’, किंवा ‘हा आंबा गोड आहे’ इत्यादि विधाने सत्य आहेत की असत्य हे ते गवत किंवा तो आंबा प्रत्यक्ष पाहून किंवा चाखूनच ठरविता येते. परंतु सर्वच वस्तू इंद्रियगोचर नसतात. ज्ञानेंद्रियांचे विषय हे नेहमी ‘हे गवत’, किंवा ‘हा आंबा’, किंवा ‘हा गुलाब’ असे नेहमी विशिष्ट किंवा एकवचनी असतात. परंतु ‘कावळा काळा असतो’ हे वाक्य कोणा एका कावळ्याविषयी नाही; ते कावळा या जातीतील सर्व व्यक्तींविषयी, किंवा कावळा या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयी आहे. हे विधान सत्य आहे की असत्य हे कसे ठरवायचे? कोणी म्हणेल, ते विधान सर्व कावळ्यांविषयी असल्यामुळे त्याची सत्यता निश्चित करण्याकरिता सर्व कावळे डोळ्याखालून घालावे लागतील. पण हे अशक्य आहे. फार तर आज अस्तित्वात असलेले कावळे आपण तपासू शकू; पण भूतकाळात होऊन गेलेले आणि भविष्यात जन्माला येणार असलेले कावळे कसे तपासणार? याचा अर्थ असा की सर्व कावळ्यांविषयीचे विधान आपल्याला काही कावळ्यांच्या अवलोकनाच्या आधारानेच करावे लागणार. आपण अनेक कावळे पाहिले, ते सर्व काळे होते, आणि काळा नसलेला एकही कावळा आपल्या दृष्टिपथात आला नाही, यावरून ‘सर्व कावळे काळे आहेत’ असे अनुमान आपण करणार. पण आपण तपासलेले कावळे काहीच असल्यामुळे आपले अनुमान पुढील प्रकारचे असणार; ‘काही कावळे काळे आहेत, म्हणून सर्व कावळे काळे आहेत.’ पण हे अनुमान चुकीचे आहे. काहींवरून सर्वाविषयी केलेल्या अनुमानाला उद्गामी अनुमान म्हणतात, आणि त्याचा निष्कर्ष कदापि पूर्ण निश्चित असू शकत नाही. परंतु याला उपाय नाही. उद्गामी अनुमानाचा आधार, म्हणजे निरीक्षित उदाहरणे, जितका व्यापक, तितका त्याचा निष्कर्ष अधिकाधिक बळकट होतो. परंतु तो आधार नेहमी अपुराच राहणार. म्हणून उद्गामी निष्कर्ष सर्वदा केवळ संभाव्य (probable) असतात असे म्हणतात. ते कालांतराने कदाचित अतिशय संभाव्य होतील ; परंतु ते पूर्ण निश्चित कधीही होऊ शकत नाहीत.
ज्ञानाच्या क्षेत्रात सत्यतेचा निकष कोणता या प्रश्नाचा निर्णय विज्ञानाने पूर्णावस्थेस नेला आहे. विज्ञानाचे कार्य निसर्गातील नियम किंवा सत्य सात्त्विक विधाने शोधून काढणे हे आहे हे सर्वज्ञात आहे. हे कार्य गेली तीन-चारशे वर्षे हजारो वैज्ञानिक सतत एकजुटीने, सहकार्याने करीत आले आहेत, आणि त्यांनी आतापर्यत मानवाचे ज्ञान जितके निश्चित असणे शक्य आहे तितके निश्चित ज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ठेवले आहे. हे सर्व ज्ञान उद्गमनाने प्राप्त झाले आहे, आणि म्हणून ते सर्वथा निश्चितपणे सत्य आहे असा दावा विज्ञान करीत नाही. परंतु तरीही मानवाला प्राप्य असलेली महत्तम निश्चितता विज्ञानाला लाभली आहे. हे वैज्ञानिक ज्ञान सर्वत्र कोणालाही उपलब्ध असून ते समजण्याकरिता आवश्यक असणारी पात्रता ज्यांच्या अंगी असेल त्या सर्वांना ते सहज मिळू शकते. विज्ञानात कोणाचा एकाधिकार चालत नाही; तसेच त्यात केवळ श्रद्धेने स्वीकारावे लागतात असे सिद्धान्त नाहीत. लहानांत लहान मनुष्यालाही मोठ्यांत मोठ्या वैज्ञानिकाची मते तपासण्याचा अधिकार असतो. त्याने आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ समर्पक पुरावा द्यावा एवढीच एक अट असते. त्यामुळे एखाद्या विषयातील वैज्ञानिक मत म्हणजे त्या क्षणी सर्वमान्य मत असते.
आपण कोणत्या विधानांवर विश्वास ठेवणार? किंवा आपण कोणती विधाने स्वीकारावी? या प्रश्नाचे उत्तर ‘सत्य विधाने’ असे वर दिले आहे. त्यातून नंतर असा प्रश्न उद्भवला की ‘कोणती विधाने सत्य मानावी?’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘ज्या विधानाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल ती विधाने.’ विशिष्ट वस्तूंविषयीची विधाने ऐंद्रिय अनुभवानेच सत्य किंवा असत्य निश्चित करता येतात. परंतु जिथे विधान विशिष्ट वस्तूंविषयी नसते, एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयी असते, तिथे विज्ञानाचा अधिकार मानावा, विज्ञानात उपलब्ध असलेले ज्ञान हजारो वैज्ञानिकांनी कित्येक शतकांच्या सहकार्याने प्राप्त केलेले असते, आणि वैज्ञानिकांकडून त्याची लक्षावधी वेळा खातरजमा झालेली असते. त्यामुळे संशयातीत ज्ञान मानवाला हवे असेल तर ते त्याला विज्ञानातच मिळू शकते. म्हणून जिथे स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाने एखाद्या विधानाची शहानिशा करणे शक्य नसते, तिथे आपण तज्ज्ञांचे मत स्वीकारावे. ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे त्या क्षेत्रातील वैज्ञानिक.
आता अनेक विधानांच्या बाबतीत खुद्द वैज्ञानिकांमध्येच वाद असतो. विज्ञान ही वर्धमान, दर क्षणी वाढणारी गोष्ट आहे. त्यात सतत नवीन ज्ञानाची भर पडत असते. दररोज नवी विधाने सुचविली जातात, आणि त्यांची परीक्षा चालू असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी अशी काही विधाने असणे अपरिहार्य आहे की जी अजून प्रस्थापित झाली नाहीत, जी अजून उपन्यासाच्या (hypothesis) स्वरूपात आहेत. अशा विधानांच्या बाबतीत आपण काय करायचे? याला उत्तर आहे. अशा विधानांच्या बाबतीत विश्वास किंवा अविश्वास दोन्ही बाळगणे चूक आहे. अशा विधानांच्या बाबतीत अनुकूल किंवा प्रतिकूल कसलीही भूमिका अतज्ज्ञांनी, सामान्य लोकांनी स्वीकारणे चूक आहे.
तेव्हा विवेकवादाचे विधानांवरील विश्वासासंबंधीचे सांगणे असे आहे. (१) ज्या विधानांच्या बाबतीत सर्व तज्ज्ञांचे एकमत असेल, त्याच्या विरुद्ध मत सत्य आहे असे मानणे चूक आहे. (२) ज्या विधानाच्या बाबतीत तज्ज्ञांत एकमत नाही ते विधान अतज्ज्ञांनी सत्य मानणे चूक आहे. (३) ज्या विधानाच्या बाबतीत सत्यासत्याचा निर्णय लावण्यास पुरेसा पुरावा उपलब्ध नाही याबद्दल तज्ज्ञांचे एकमत असेल, त्याविषयी अतज्ज्ञाने कसलेच मत बनवू नये.
विवेकवादाचा आपल्या विश्वासाविषयीचा दंडक एका वाक्यात सांगायचा तर असा सांगता येईल. आपण कोणत्याही विधानावर त्याच्या पुराव्याच्या प्रमाणात विश्वास ठेवावा. ज्या विधानाचा साधक पुरावा पुरेसा असेल ते विधान आपण स्वीकारावे. ज्याच्याविरुद्ध पुरावा (किंवा बाधक पुरावा) पुरेसा असेल ते असत्य मानावे आणि त्याचा त्याग करावा. ज्या विधानाचा अनुकूल पुरावा प्रतिकूल पुराव्यापेक्षा अधिक प्रबल असेल, परंतु पुरेसा नसेल, त्यावर पुराव्याच्या प्रमाणात विश्वास ठेवावा, म्हणजे तो विश्वास पक्का असू नये. तो चुकीचा असू शकेल ही जाणीव ठेवून बाळगलेला तो विश्वास असावा. आतापर्यंत आपण सत्य आणि असत्य यांचे स्वरूप पाहिले, आणि आपल्याला जर सत्य हवे असेल तर ते मिळण्याचे मार्ग कोणते याचा विचार केला. आता आपण इष्ट आणि अनिष्ट यांच्याकडे वळू शकतो. इष्ट म्हणजे इच्छिलेले. अमुक गोष्ट माझे इष्ट आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपला अभिप्राय असा असतो की ती गोष्ट मला हवी आहे. पण ‘इष्ट’ या शब्दाचा एक काहीसा वेगळाही अर्थ आहे. ‘इष्ट’ म्हणजे जे आपण इच्छावे, किंवा जे इच्छिणे योग्य आहे ते. या दुसऱ्या अर्थी इष्ट ही नीतिशास्त्रीय कल्पना आहे. पहिल्या अर्थी इष्ट गोष्ट अवलोकनाने किंवा निरीक्षणाने कळू शकणारी गोष्ट आहे. मला किंवा अन्य कोणाला, काय हवे आहे हे आपल्या मनात डोकावून किंवा इतरांना विचारून आपल्याला कळू शकते. पण आपण काय इच्छावे ही मात्र केवळ आपल्या मनाच्या निरीक्षणाने कळणारी गोष्ट नाही. उदा. सत्याविषयी ते इष्ट आहे असे मत कोणी व्यक्त करू शकते. पहिल्या अर्थी याचा अर्थ कोणी तरी सत्याची इच्छा करीत आहे, आणि हे जाणून घेणे सोपे आहे. परंतु दुसऱ्या अर्थी ‘सत्य इष्ट आहे’ असे जर कोणी म्हणाले, तर त्याचा अर्थ आपण ‘सत्य इच्छावे’ असा होईल, आणि त्यावर ‘का?’ असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर देण्याकरिता नीतिशास्त्रात शिरावे लागेल. ‘अमुक विधान सत्य आहे कशावरून?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्या विधानाचा पुरावा देणे; परंतु ‘अमुक गोष्ट इष्ट (म्हणजे इच्छनीय) आहे कशावरून?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता आपल्याला एका कर्माचे नैतिक समर्थन द्यावे लागेल, हे नीतिशास्त्रीय विवेचन बरेच गुंतागुंतीचे आहे; पण त्यातून आपल्याला सुटका नाही. मात्र ते विवेचन आपण तूर्त पुढे ढकलू शकतो. आपण आधी ‘इष्ट’ म्हणजे इच्छिलेले या अर्थी इष्टाचा विचार करू.
सामान्यपणे कोणतीही इष्ट गोष्ट प्राप्त करण्याकरिता एखादे कर्म त्याचे साधन म्हणून करावे लागते. भोजनाची इच्छा झाली की अन्न मिळवावे लागते; तहान लागली की पाणी शोधावे लागते. गाण्याची इच्छा झाली की आपण लगेच गायला लागू शकतो, तशी स्थिती फार थोड्या इच्छांची असते. आता आपले कोणतेही इष्ट आपल्याला प्राप्त करायचे असेल तर कोणत्या तरी साधनाचा उपयोग करावा लागतो. हे साधन इष्ट मिळवून देण्यास समर्थ असले पाहिजे, आणि असे साधन कोणते आहे त्याचे ज्ञानही आपल्याला असले पाहिजे. जर आपण आपले इष्ट प्राप्त करण्याकरिता अननुरूप साधन वापरले तर त्याने इष्ट साध्य होणार नाही, आणि असे करणे इष्टविघातक होईल. असे करणे उघडच अविवेकी होईल हे स्पष्ट आहे. समजा मला उद्या मुंबईला जाणे अवश्य आहे, आणि असेही समजा की विमानाशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नाही. तर मला विमानाने गेले पाहिजे. (अर्थात त्या साधनाचा उपयोग करणे मला शक्य आहे, म्हणजे मला विमानाने प्रवास करणे परवडणारे आहे, असे गृहीत धरले आहे.) अशा स्थितीत जर मी विमानाने जाण्याची कसलीच तयारी केली नाही, आणि नुसताच ‘मला मुंबईला जायचे आहे’ असे म्हणत राहिलो, तर त्यावरून असे सिद्ध होईल की मुंबईला जाणे हे माझे खरोखर उद्दिष्ट नाही; कारण जर ते खरोखर उद्दिष्ट असते तर माझ्या आटोक्यात असलेल्या समर्थ उपायांचा मी अवलंब केला असता. विमानाने प्रवास करण्याचे हे जे समर्थन आहे ते नीतिशास्त्रीय नाही हे स्पष्ट आहे. ते वैज्ञानिक समर्थन आहे असे म्हणता येईल, कारण त्याचे स्वरूप अमुक गोष्टीचे साधन अमुक, किंवा अमुक कार्याचे कारण अमुक असे सांगणाच्या सत्य ज्ञानाच्या स्वरूपाचे आहे. आपले कोणतेही इष्ट आपल्याला त्याच्या पर्याप्त साधनाची सत्य माहिती असल्यावाचून आपण प्राप्त करू शकत नाही.
तेव्हा कार्यक्षेत्रातील विवेकित्वाचा महत्त्वाचा नियम आपल्याला सापडला आहे असे आपण म्हणू शकतो. पण या नियमाचा उपयोग होण्याकरिता आपल्याला निसर्गाच्या अनेक नियमांचे बिनचूक ज्ञान असावे लागेल. कारण हा नियम असे सांगतो की एखाद्या साध्याचा विवेकी स्वीकार करणे म्हणजे त्याच्या पर्याप्त साधनाचाही स्वीकार करणे, परंतु जे आपले साध्य किंवा इष्ट आहे त्याचे पर्याप्त साधन काय आहे ते आपल्याला माहीत नसेल, तर वरील नियमाचे ज्ञान निरुपयोगी होईल. अमुक कार्याचे परिणाम अमुक होतात असे कार्यकारणात्मक ज्ञान कोणत्याही सफल कर्माकरिता आवश्यक आहे. आपण निरोगी रहावे अशी इच्छा करणाऱ्या माणसाने व्यसनाधीन होणे यातील अविवेकित्व दोन प्रकारचे आहे. एकतर त्याला निरोगी होण्याची साधने माहीत नसतील, तो समजत असेल की व्यसनांनी आरोग्य संपादता येते; किंवा साधने माहीत असूनही तो ती वापरण्याचे टाळीत असेल. दोन्ही प्रकरणी त्याचे वागणे अविवेकी होईल, हे उघड आहे. निरोगी राहण्याकरिता वापरावी लागणारी साधने कोणती हे त्याला माहिती नसेल तर त्या माहितीच्या अभावी वापरलेली साधने साध्याला अनुकूल असतीलच असे नाही; किंवा साध्याला बाधक असणाच्या गोष्टी तो साधक आहेत असे समजत असेल, तर काही प्रकरणी साध्य सिद्ध होणार नाही; किंवा त्याला साध्याची अनिवार्य साधने कोणती ते माहीत आहे, पण दुबळेपणामुळे ती न वापरता तो अन्य साधनांचा वापर करीत असेल. या सर्व प्रकरणी त्याचे कर्म अविवेकी होईल हे उघड आहे.
मस्त उदाहरणे व्यवस्थित देऊन पटवून देणे आवश्यक
विवेकवाद याविषयी उपयुक्त माहिती दिली आहे. UGC NET exams मध्ये Logical Reasoning या विषयी अशाच प्रकारच्या माहिती च्या आधारे प्रश्न विचारले जातात… दि.य.देशपांडे यांच्या ग्रंथांचे वाचन करताना ‘विवेकवाद’ या विषयीचे त्यांचे लेखन आमच्या ज्ञानात भर टाकणारे आहेत, खूप खूप धन्यवाद..