एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो. त्यानी यासंबंधी एक प्रबंधच सादर केला असून त्याच प्रबंधाची पुस्तकी आवृत्ती Disenchanting India या नावाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केली आहे.
त्यांच्या या प्रबंधात प्रामुख्याने भारताच्या रॅशनॅलिस्ट परंपरेचा इतिहास, व आता त्याचे समाजातील स्थान यावर ऊहापोह केला आहे. त्यासाठी लेखकानी देशभर विखुरलेल्या अनेक रॅशनॅलिस्ट संघटनांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा केली आहे. संघटनेचे उद्दिष्ट, त्यांच्या कार्याचे स्वरूप, त्याचे समाजावर होत असलेले परिणाम इत्यादीवर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एक संशोधक म्हणून त्यानी घेतलेले श्रम व माहिती गोळा करण्यासाठी घेतलेली चिकाटी अत्यंत प्रशंसनीय ठरेल.
खरे पाहता लेखकाला रॅशनॅलिझमचे प्रत्यक्ष व्यवहारात होत असलेल्या उपयोगासंबंधी उत्सुकता होती. या रॅशनॅलिस्ट संघटना परंपरावादी समाजाचा सामना कशा प्रकारे करतात, रॅशनॅलिस्ट तत्त्वज्ञान त्यांच्या गळी कशा प्रकारे उतरवतात, त्यामुळे उद्भवलेल्या कठिण प्रसंगाचा सामना कसे करतात, इत्यादीसंबंधी माहिती मिळवण्यात त्याला रुची होती. परंतु आपल्यातील बहुतेक संघटना कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त फार काही करत नाहीत. अनेक संघटना व्यक्ती केंद्रित असल्यामुळे कार्यकर्त्यांची वणवा असते. आठवड्यातून वा महिन्यातून एखादी बैठक, काही निषेध पत्रकं, एखादं मुद्रित नियतकालिक वा संस्थळावर लांबलचक अशी दुर्बोध माहिती यापुरतेच त्यांचे कार्य सीमित असते. त्यामुळे लेखकाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) कार्यावर लक्ष केंद्रित करावेसे वाटले. अंनिसचे उद्दिष्ट, त्याची कार्य पद्धती, धोरणं, त्यांच्या कार्यकर्त्यांची नैतिक बैठक, लेखकाला आवडल्यामुळे त्याचा प्रबंधाचा मोठा हिस्सा अंनिसच्या संबंधी आहे. यासाठी लेखक अंनिसच्या कार्यकर्त्यांबरोबर राहून, खेड्यापाड्यात हिंडून, त्याच्या वरिष्ठ व इतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंनिसला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एका अर्थाने हा प्रबंध अंनिसच्या वाटचालीचा लेखाजोखा आहे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
या पुस्तकात केवळ अंनिससंबंधीच माहिती नसून भारतातील बुद्धीप्रामाण्यवादी, इहवादी, निरीश्वरवादी, मानवतावादी, अज्ञेयवादी व मुक्तविचार करणाऱ्या या क्षेत्रातील बहुतेक विचारवंतांच्या व त्यांच्या संघटनाबद्दल विमर्शात्मकपणे केलेली माहिती आहे. आताची रॅशनॅलिस्ट चळवळ मुख्यत्वेकरून जनमनसातील अंधश्रद्धांना आव्हान देत आहे. त्याचबरोबर अलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्या व अविवेकी विचारांचा प्रचार – प्रसार करणाऱ्या बुवा – बाबांच्यावर आगपाखड करणारी आहे. या प्रकारच्या चमत्कार वा अतींद्रिय शक्तीचा दावा करणाऱ्यांच्या प्रभावातून जनसामान्यांना मुक्त करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची, चिकित्सक विचार करण्याची, कार्यकारण भाव समजून घेण्याची व भावनेच्या आहारी न जाता कृती करण्याची गरज कशी आहे यावर भर दिला जात आहे. आध्यात्मिकतेच्या मृगजळाच्या मागे न धावता ऐहिक सुख, सुख समाधानी जीवन पद्धती व मानवतावादी दृष्टिकोन जनमानसात रुजविण्याचे प्रयत्न आपापल्या कुवतीनुसार करत आहेत, हे लेखकाच्या लक्षात आले. परंतु या गोष्टीतसुद्धा नवीन काही नसून आपल्या देशात चार्वाक, लोकायत, संत कबीर, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, गोरा, आगरकर, अब्राहम कोवूर, इत्यादींनी या गोष्टी यापूर्वीच सांगितल्या आहेत.
या पुस्तकाच्या पहिल्या भागात त्रोटकपणे उपलब्ध असलेल्या लिखित साहित्यातून भेटणाऱ्या भारतीय रॅशनॅलिस्ट्सच्या बद्दलची माहिती दिली आहे. या माहितीवरून लेखक आपल्यातील अंधश्रद्धांचे मूळ आपल्यातील धार्मिकतेत आहे, या निष्कर्षाप्रत पोहोचतो. भारतीयांच्या संदर्भातील रॅशनॅलिटी, रॅशनॅलिझम, व रॅशनलायजेशन या संकल्पना पाश्चिमात्य तत्त्वज्ञांना अभिप्रेत असलेल्या संकल्पनांपेक्षा फार वेगळ्या आहेत हे जाणवते. भारतीय संदर्भात काही वेळा रॅशनॅलिझम म्हणजे न्याय व समता, काही वेळा अहिंसा व सत्यान्वेषण, काही वेळा विचार प्रक्रियेतून दृढ झालेली जीवन पद्धती या अर्थानेसुद्धा वापरला जातो. त्यामुळेच कदाचित भारतीय रॅशनॅलिस्ट्स स्वतःला बुद्धीवादी, युक्तीवादी, तर्कवादी, विवेकवादी, रॅडिकल मानवतावादी इत्यादी नावाने ओळखले जात असावेत. ही नावे त्या त्या व्यक्तीच्या धर्माबद्दलच्या व परमेश्वराचे अस्तित्व मानणे वा न मानणे या आकलनातून आलेले असावेत. त्यामुळे मानवतावाद, विवेकवाद, नीरिश्वरवाद, समाधानी आयुष्य जगण्यासाठी विचारपूर्वक अनुसरलेला मार्ग, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान – तंत्रज्ञानाचा पुरस्कार, पर्यावरणवाद, स्त्रीवाद इत्यादी गोष्टीसुद्धा रॅशनॅलिझमशी जोडलेल्या असतात. रॅशनॅलिझमच्या तात्विक चर्चेसाठी लेखक मॅक्स वेबर व चार्ल्स टेलर यांचा आधार घेतो.
खरे पाहता हे पुस्तक म्हणजे त्याच्या संशोधनावरील प्रबंध आहे. म्हणूनच लेखक स्वतःच्या संशोधनाची वर्गवारी multisited ethnography या सदरात करतो. एखाद्या चळवळीचा एथ्नोग्राफिक म्हणजे वांशिक – सांस्कृतिक गट म्हणून अभ्यास करणं आणि अँथ्रोपॉलॉजिकल म्हणजे मानववंशातील शारीरिक, सांस्कृतिक आणि आचरणात्मक इत्यादी भेदाविषयी अभ्यास करणं. अशा दृष्टिकोनामुळे अभ्यासात बराच फरक पडतो. जॉन यांच संशोधन एथ्नोग्राफिक आहे.
त्याचप्रमाणे सरधोपटपणे केलेल्या संशोधनामध्ये संबंधितांच्या मुलाखती, कागदपत्र-अहवाल व इतर मुद्रित साहित्यांचा अभ्यास, विषयासंबंधीच्या शिबिरांना, अधिवेशनांना हजेरी, ऑडिओ – व्हिडिओ वरून काढलेले मुद्दे इत्यादीवर भर असतो. परंतु हा संशोधक मळलेल्या वाटेने न जाता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन तेथील मुख्य संघटक व इतर कार्यकर्ते यांच्याशी गप्पा मारून व त्यांच्या कार्यात सहभागी होत निष्कर्ष काढत होता. चिकित्सकपणे त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे प्लस व मायनस पॉइंट्स शोधण्यात त्याला रुची होती. एका प्रकारे त्या संघटनेचा तो ‘सोशल ऑडिट’ करत होता.
या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या देशात संघटितपणे केलेल्या रॅशनॅलिझमच्या प्रयत्नांचा आढावा घेतला आहे. चार्वाकापासून सुरुवात झालेली ही परंपरा, वैदिक इहवादात व त्यानंतर भक्ती पंथात स्पष्टपणे दिसून येते. मध्ययुगात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धेवर संत कबीर व संत तुकाराम यांनी मोठ्या प्रमाणावर आघात केला आहे. परंतु पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांना अभिप्रेत असलेले रॅशनॅलिझम ब्रिटिश कालखंडात मूळ धरू लागली. अनेक भारतीय इंग्रजी शिकू लागले. इंगरसॉल, ब्रॅडलॉ, बेझंट यांच्या वैचारिक लेखनाने प्रभावित झाले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आगरकर, फुले, पेरियारसारखे समाजसुधारक रॅशनॅलिझमवर आधारित चळवळी सुरु करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्या मुळातच धार्मिक सुधारणेच्या चळवळी होत्या. जवाहरलाल नेहरू व मानवेंद्र नाथ रॉय यांनी खऱ्या अर्थाने रॅशनॅलिझमचा पाया घातला. गोरा यांनी 1940 साली ऩास्तिक केंद्राची स्थापऩा करून रॅशनॅलिझमच्या व्यावहारिक स्वरूपावर भर देण्याचा प्रयत्न केला. र.धों. कर्वे Reason या इंग्रजी नियतकालिकातून रॅशनॅलिझमच्या विविध पैलूवर चर्चा घडवू लागले. या सर्वांच्या प्रयत्नाने प्रेरित होऊन 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्ली, हैदराबाद, नागपूर, मुंबई, विजयवाडा, भिलाई, रूरकेला, मद्रास, कोईमतूर, कन्याकुमारी, अमृतसर इत्यादी ठिकाणी रॅशनॅलिझमचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संघटनांची स्थापना झाली. पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेले अनेक सुशिक्षित तरुण या कार्यात पुढाकार घेऊ लागले.
या संघटना प्रामुख्याने सत्य साईबाबासारख्या बाबा, बुवा, स्वयंघोषित गुरु, महाराज यांच्या विरोधात जनजागृती करण्याचे प्रयत्न करत होत्या. या संघटना चालवणारे फक्त पेपरमध्ये लेख लिहिणे व भाषण करणे येवढ्याच सीमित अर्थाने काम करत होते. त्या तुलनेने एच नरसिंहय्या व अब्राहम कोवूर यांचे कार्य मात्र सर्वस्वी वेगळे होते. अब्राहम कोवूर समाजाच्या तळागाळात जावून ‘चमत्कारां’च्या प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील विज्ञान समजून देत होते. मोठमोठ्या जनसमुदायासमोरील अशा प्रयोगामुळे लोक प्रभावित होत होते. अब्राहम कोवूर यांची ही गादी बी. प्रेमानंद यांनी चालवली. दक्षिण भारतातील ठिकठिकाणी जाऊन बाबा बुवांचे पर्दाफाश करत होते. तथाकथित चमत्कार करून दाखवत असल्यामुळे बाबा – बुवा अडचणीत येत होते. प्रयोगांना गर्दी होत होती. स्वातंत्र्योत्तर भारतातील तरुण पिढी चांगलीच प्रभावित झाली व रॅशनॅलिस्ट संघटना जोमाने कार्य करू लागल्या.
पुस्तकाचा तिसऱ्या भागात अंनिसची उद्दिष्टे, संघटनात्मक रूपरेषा, कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया, कार्यक्रमातील विविधता, व कार्याचा होत असलेला प्रभाव इत्यादींचा समावेश आहे. लेखकाच्या दृष्टीने ही एक एथ्नोग्राफिक स्टडी केस म्हणून व्यक्त होत आहे. भारतातील विवेकवादाच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी अंनिसचीच निवड का केली हे सांगताना “अंनिसची चळवळ महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पसरलेली आहे. तिचे कार्यकर्ते सर्वात जास्त सक्रीय आहेत. ते सर्व विनावेतन कार्य करणारे स्वयंसेवक आहेत. आणि ते द्रविड कळघम या चळवळीसारखे राजकारणात बिलकुल रस घेत नाहीत.”
प्रत्यक्ष चळवळीचे कार्य चालू असलेले क्षेत्र अभ्यासासाठी निश्चित करणं, त्या कार्यात शिरकाव करणं आणि त्या क्षेत्राशी निगडित राहणं, सुरुवातीस कठिण होतं. परंतु नंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मोकळेपणामुळे आणि मित्रत्वामुळे ते खूप सुकर झालं, असे लेखकानी मुद्दाम नमूद केले आहे. अंनिसने आखून घेतलेले अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लढा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, धर्मचिकित्सा व व्यापक समाजसुधारणेत सक्रीय सहभाग या चतुःसूत्रीने लेखक प्रभावित झाला होता. व यांची अंमलबजावणी कशी होते याबद्दल उत्सुकता होती.
दूरदूरच्या खेड्यात अंनिसचे कार्य कसे चालते? खेड्यातील सामान्य लोकांचा प्रतिसाद कसा असतो? खेड्यातल्यांच्यात भिनलेल्या अंधश्रद्धांच्या विरोधात बोलताना कार्यकर्ते कुठली रणनीती वापरत असतात? खेड्यातल्यांचा खरोखरच भ्रम निरास होतो का? कार्यकर्त्यांच्या विधानांना, प्रयोगाच्या सादरीकरणाला प्रत्यक्ष विरोध होतो का? हुल्लडबाजी होते का? धर्मावरील टीका ते सहन करू शकतात का? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती. त्यासाठी तो चळवळीच्या प्रत्यक्ष कार्यात सहभागी झाला. 2-3 दिवस चालणाऱ्या बैठकींना हजर राहू लागला. प्रसंगी कार्यकर्त्यांच्या घरी राहायचा. अंनिसच्या विज्ञान बोध वाहिनीच्या गाडीतून प्रवासही करायचा. या सर्व प्रत्यक्ष अनुभवातून आणि डॉ. दाभोलकर व इतर अनुभवी कार्यकर्त्यांच्या मुलाखतीतून त्याच्या प्रश्नांना हळू हळू उत्तरं मिळत गेली. जरी ऐकून घेणारे एका दिवसात बदलत नसले तरी कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या मनात संशय नव्हता. कार्यकर्ते स्वतःच्या कुवतीनुसार उत्तर देत होते. समजून सांगत होते. देव – देवस्की, भूत – भानामती, अघोरी प्रथा यांच्या विरोधात भाष्य करण्यास कार्यकर्ते घाबरत नसतं. या सर्व प्रकारामागे लोकांनी विचार करावे, प्रश्न विचारावेत, आर्थिक नुकसान करून घेवू नये, आंधळेपणानी कृती करू नये, असे उद्देश असल्यामुळे लोकसुद्धा आवडो न आवडो, शांतपणे, सहनशीलपणे कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत असतं.
लेखकानी अंनिसच्या कार्यशैलीचा स्वतंत्रपणे अभ्यास करून या संघटनेचे वैशिष्ट्य व मर्यादा यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. अंनिसच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना धर्माला विरोध करणे म्हणजेच विवेकवाद का हा प्रश्न त्याला पडतो. कारण अंनिसची याबद्दलची भूमिका धूसर आहे असे त्याला वाटते. खरे पाहता अंनिस उघड फसवणूक व शोषण करणाऱ्या धार्मिक विधींना व इतर गोष्टींना अंधश्रद्धेइतकेच विरोध करते व बुरसटलेल्या रूढी परंपरेसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा एकमेव उपाय आहे यावर भर देते.
वैयक्तिक आयुष्यात रॅशनॅलिझम कशा प्रकारे आधार देतो याविषयीची भरपूर माहिती लेखकानी कार्यकर्त्यांच्या मुलाखतीतून गोळा केली आहे. विवाह, विवाह सोहळा, कौटुंबिक संबंध, जन्म, मृत्यु, प्रेताची विल्हेवाट इत्यादीसंबंधीची कार्यकर्त्यांची मत तपासली आहेत. अंनिसच्या कार्यकर्त्याच्या मते अन्यायाविरुद्धचा लढा म्हणजे अविवेकीपणाच्या विरोधाचा लढा असतो. लेखकाला फुले यांच्या सत्य शोधकी पद्धतीचा निधर्मी विवाह सोहळा फार आवडलेला होता.
पुस्तकाचा शेवट करताना लेखक भारतातील रॅशनॅलिझमची चळवळ ‘चमत्कार’ व ‘अतींद्रिय शक्ती’च्या समजुतीला कवटाळून बसलेल्या भारतीय समाजाला बाहेर काढणारी आहे, असे नमूद करू इच्छितो. रॅशनॅलिझमच्या चळवळीचा जोर जगभर पसरत असून भारतीय चळवळसुद्धा त्या जागतिक चळवळीचा भाग होण्याच्या प्रक्रियेत आहे, असे लेखकाला वाटते.
भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळींचा सर्वंकश आढावा घेणारे इंग्रजीतील एक चांगले पुस्तक!
Disenchanting India:
Organised Rationalism and Criticism of Religion in India
– Johannes Quack
Oxford University Press, 2012 pp 362, Price: Not Mentioned
pkn.ans@gmail.com