२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एखाद्या राजकीय पक्षाने इंटरनेटचा वापर करण्याचे ठरवल्यास इंटरनेटचे परिणाम (वा दुष्परिणाम!) काय होणार आहेत किंवा होणार की नाहीत याचा विचार करताना २०१६ मधील अमेरिकेतील निवडणुकीच्या वेळी ट्रोल्सनी (जल्पकांनी) घातलेल्या धिंगाण्याकडे पाहणे गरजेचे ठरेल. डोनाल्ड ट्रम्पच्या निवडणुकीतील यशाला (वा हिलरी क्लिंटनच्या अपयशाला!) रशियाच्या मदतीने उभी केलेली इंटरनेटवरील ट्रोल्सची फौजच कारणीभूत आहे, असे विश्लेषकांचे मत आहे व अजूनही तो चर्चेचा विषय होत आहे. रतीब घातल्यासारखे चोवीस तास बातम्यांचे प्रसारण करून टीआरपी वाढवण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीव्ही चॅनेल्सना बातमीतील वा एखाद्या विधानातील सत्यासत्यतेची छाननी करणे वा नंतरच प्रसार करणे अनावश्यक वाटत आहे. ही नैतिकतेची चैन परवडणारी नसल्यामुळे व ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ वाटत असल्यामुळे फेसबुक वा ट्वीटरमधून आलेल्या कुठल्याही विधानाला प्रसिद्धी देत सनसनाटी निर्माण करणे यांतच चॅनेल्स धन्यता मानत आहेत. त्यामुळे ट्रोल्सचे जास्त फावत आहे. अशा प्रकारच्या बातम्यांना वा प्रसारित होत असलेल्या विधानांना मोठा प्रेक्षक वर्ग मिळत असतो व हाच प्रेक्षक वर्ग मतदान करत असतो. त्यामुळे इंटरनेटचा परिणाम मतदानावर होऊ शकतो हे नाकारता येत नाही.
शहानिशा न केलेल्या गोष्टी कुणाच्याही तोंडी टाकून मजा बघणाऱ्या या ट्रोल्समुळे मतदारांचे मन पूर्वग्रहदूषित होणार नाही याची खात्री कुणीही देऊ शकणार नाही. अमेरिकेतील निवडणुकीच्या वेळी दलाई लामा यांच्या तोंडी ट्रम्प हा हिटलरपेक्षा क्रूर आहे हे ट्वीट केलेले विधान मुळात खोटे होते. किंवा ट्वीट केलेल्या क्लिंटन फाऊंडेशनने दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केली या विधानाला कुठलाही आधार नव्हता, परंतु या प्रकारच्या ट्वीट्समुळे निवडणुकीच्या यशापयशावर नक्कीच परिणाम झाला असेल. ट्वीट केलेली अनेक विधाने संदर्भविहीन होती हे नंतरच्या विश्लेषणात सिद्धही झाले. परंतु वेळ निघून गेली होती. मी कृष्णवर्णीय असल्यामुळे अमेरिकेत माझा पुतळा उभा केला जाणार नाही हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे म्हणून ट्वीट केलेले विधान निराधार होते.
ट्रोल करणाऱ्यांना आपण कुणावर वार करत आहोत याची कल्पना नसते आणि प्रतिस्पर्ध्यावर होणाऱ्या परिणामाची ते कल्पना करू शकत नाहीत. वा ते याविषयी बेफिकीर असतात. मुळात हात धुऊन एखाद्याच्या विधानाच्या मागे लागत असताना ट्रोल्स बेभान होत असतात की काय असे वाटू वागते. काही तरी असंबद्ध लिहून नामोहरम करण्यात त्यांना आसुरी आनंद मिळत असावा, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. शब्दच्छल करणे, नको त्या गोष्टींचा विदा मागणे, सादर केलेल्या विदांना नाकारणे, असे काही तरी करत मूळ विषयाला बगल देणे हा त्यांचा खेळ असतो. म्हणूनच की काय, कित्येक प्रामाणिक नेटिझन्स अशा वादविवादाच्या भानगडीत पडत नाहीत. आणि माहीत असूनही प्रतिवाद करत नाहीत. यामुळे नुकसान आभासी जगाचे होते.
या ट्रोल्सना सुसंस्कृत समाजाच्या कुठल्याही नीति-नियमांची फिकीर नसते. कारण ते त्यांच्या एका वेगळ्या जगात वावरत असतात. आत्मरत असतात. काही मनोवैज्ञानिकांच्या मते, trolls were found to be more Machiavellian (impulsive and charming manipulators), psychopathic (cold, fearless and antisocial), and especially sadist than the overall population. ट्रोल्सना दुसऱ्यांना दुखवण्यात, टर उडवण्यात, छेडछाड करण्यात आनंद मिळतो. म्हणूनच तज्ञ त्यांना “prototypical everyday sadists” असे ओळखतात. एका प्रकारचे हे cyber bullying असते.
इतर प्रकारच्या संगणकीय संवादाप्रमाणे ट्रोलिंगमध्येसुद्धा आपण कोण आहोत याचा समोरच्याला पत्ता न लागू देता वाटेल ती विधाने करण्याची सोय असल्यामुळे किंचितही विचार न करता उत्स्फुर्तपणे विधाने करत राहण्याला कुठलेही बंधन नसते. त्याचाच फायदा ट्रोल्स घेत असतात. मनोवैज्ञानिक भाषेत याला deindividuation असे म्हटले जाते. आणि हा डिइंडिविज्युएशनचा प्रकार समाजविरोधी कृती करणाऱ्या गर्दीत सहसा आढळतो. तेथेही कुणी दगड मारला, दगड कुणाला लागला हे विचारण्याची सोय नसते. जरी आपण मुळातच सॅडिस्ट नसलो तरी ट्रोलिंग आपल्यातील काळ्या बाजूला नीतिमत्तेच्या वा समाजोपयोगी वर्तनाच्या चौकटीतून बाहेर पडण्यास भाग पाडते.
ट्रोल्सना आपल्या वादविवादातून, जिव्हारी विधानातून आपण इतरांपेक्षा किती मोठे, किती वेगळे वा किती उच्च पातळीवर आहोत हे त्यांना पटवून द्यायचे असते व इतरांची सहानुभूती मिळवायची असते. जग किती क्षुल्लक लोकांनी भरलेले आहे हे दाखवायचे असते. इंटरनेटवरील इतर प्रकारांप्रमाणे ट्रोलिंगसुद्धा नार्सिसी अवस्थेला (narcissistic motives) उत्तेजन देत असते. कारण प्रत्यक्ष व्यावहारिक जगात त्यांचा निभाव लागत नसल्यामुळे आभासी जगातील लोकांची वाहवा मिळवण्याचा हा एक क्षीण प्रयत्न असतो.
आपल्या देशात २८ टक्के लोक इंटरनेट वापरतात व त्यांतील बहुतेक जण मध्यमवर्गीय आहेत. एका सिद्धांतानुसार सुमारे ८ ते १० टक्के लोक ओपिनियन मेकर्स असतात व त्यांच्या आग्रहपूर्वक केलेल्या विधानांना इतर लोक मूक संमती दर्शवतात. त्यामुळे आपल्या येथेही एखाद्या चाणाक्ष राजकीय पक्षांनी इंटरनेटसाठी ट्रोल्सची फौज उभारून फेसबुक वा ट्वीटर्समधून फेकन्यूज प्रसारित करत राहिल्यास २०१९च्या निवडणुका निष्पक्षपाती होतील याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे या असहिष्णु ट्रोल्सच्या टोळधाडीला वेळीच न रोखल्यास उदारमतवादी लोकशाहीचा पायाच उखडून जाईल याची भीती वाटत आहे.