मनोगत

विवेकवादी विचारांची परंपरा लाभलेले ‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक २७ वर्षे सातत्याने प्रकाशित होऊन काही तांत्रिक कारणांमुळे बंद करावे लागले. ‘आजचा सुधारक’चे संस्थापक व प्रथम संपादक प्रा. दि.य.देशपांडे यांच्यापासून ते दिवाकर मोहनी, प्र.ब.कुळकर्णी, नंदा खरे, संजीवनी कुळकर्णी, अनुराधा मोहनी, प्रभाकर नानावटी, रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे संपादकत्व ह्या नियतकालिकाला लाभले.

३० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘आजचा सुधारक’च्या पहिल्या अंकाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करीत असताना प्रा. दि.य.देशपांडे यांनी लिहिले होते,

“धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान यांमागची भाविकता वाढतच आहे आणि जातिभेद अजून पूर्वीइतकाच तळ ठोकून आहे.”

प्रा. दि.य.देशपांडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेले विचार आजही तितकेच खरे ठरत आहेत ही आपल्या लोकशाहीकरिता अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सारेच अत्यंत शोचनीय आहे. ‘आजचा सुधारक’ने घेतलेले विषय व मांडलेले विचार हे जितके त्या काळाला समर्पक होते, आजही ते तितकेच किंबहुना त्याहून अधिक प्रसंगोचित वाटतात. आणि म्हणूनच ‘सुधारक डॉट इन’ हा पोर्टल सुरू करणे व त्या माध्यमातून संवाद सुरू ठेवणे गरजेचे वाटले. सुरुवातीला याचे स्वरूप त्रैमासिकाचे असेल.

‘आजचा सुधारक’च्या मागच्या सगळ्या अंकांचे डिजीटायझेशन करुन ते ह्या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यांपैकी १० वर्षांचे अंक उपलब्ध असून उर्वरित अंक लवकरच येथे दिसतील.

‘सुधारक डॉट इन’ची सुरुवात निवडणुकांच्या ऐन हंगामात होत असल्याने पहिल्या अंकात राजकारण, लोकशाही, निवडणुका यांवरील विविधांगी विचार असणारे लेख समाविष्ट होणे स्वाभाविकच आहे. येत्या निवडणुकीत कोणाचे सरकार निवडून येईल याबद्दलची भाकिते काहीही असोत, आपण आपल्या राजकीय परिस्थितीचे सिंहावलोकन करणार आहोत का? राजकारण, अर्थकारण, समाजकारण या सगळ्यांचा तोल आपल्याला साधता येणार आहे का? जाती आणि धर्म यामुळे दुभंगणारी मने आपण जोडू शकणार आहोत का? आपल्या देशाच्या अगदी शेवटच्या घटकाच्या मूलभूत गरजा आपण पूर्ण करू शकणार आहोत का? आपल्या देशातील आर्थिक असमानतेची दरी आपण बुजवू शकणार आहोत का? निवडून आलेल्या सरकारच्या कामाचा पुढच्या पाच वर्षांचा गोषवारा आम्ही घेणार आहोत का?

ह्या प्रश्नांच्या निमित्ताने राजकारण या विषयावर लेख पाठवण्याच्या केलेल्या आमच्या आवाहनाला अनेक मान्यवरांनी अतिशय उत्स्फूर्ततेने आणि आपुलकीने प्रतिसाद दिला. त्यांचे स्वागत आणि मनःपूर्वक आभार.

पहिल्या अंकावरील आपल्या प्रतिक्रिया, टीका-टिप्पणी खालील ई-मेल वर पाठवाव्यात. ‘सुधारक डॉट इन’वर त्या वेळोवेळी प्रकाशित केल्या जातील.

आभार.

समन्वयक
प्राजक्ता अतुल
aajacha.sudharak@gmail.com

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.