‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो. नवीन ज्ञानाच्या शोधात संशोधक सातत्याने व्यग्र असतात. त्यांनी शोधून काढलेली नवीन माहिती जरी पारंपरिक कल्पनांना छेद देणारी असली तरी दुर्लक्षिता येत नाही. पण त्या संशोधनामागील हेतू वस्तुनिष्ठ संशोधनाचा असावा. तसा तो असल्याचा दावा उपरोक्त संशोधक करीत असले तरी त्यांनी आपले संशोधन सध्या सुरू असलेल्या धार्मिक व सांस्कृतिक विवाद व संघर्ष यांच्या काळात प्रसिद्ध करावे हा निव्वळ योगायोग वाटत नाही एवढे खास.
डॉ. कोछर यांच्या मते वैदिक वाङ्मयात उल्लेखित शरयू व सरस्वती या नद्या अफगाणिस्थानात ज्यांना होरयू व हेलमंड म्हणतात त्याच असल्या पाहिजेत. त्यांचा युक्तिवाद असा की, ऋग्वेदाशी जोडण्याइतपत यमुनेच्या पूर्वेचा प्रदेश प्राचीन नाही. वैदिक संहिता आणि पुराणे आर्यांच्या मूल स्थानाबद्दल स्पष्ट निवेदन करीत नाहीत. मात्र या विषयावर अवेस्ता मौलिक माहिती देतो. वैदिक आणि अवेस्तन लोकांचे पूर्वज एकत्र राहिले. वैदिक आर्य इ. स. पूर्व १५०० च्या सुमारास अफगाणिस्थानात येऊन पुढे सतलज नदीपर्यंत पोहोचले. इ.स. पूर्व १००० पर्यंत ते सिंधू व यमुना नद्यांच्या दुआबात वास्तव्य करून नंतर यमुनेच्या पूर्वेच्या प्रदेशात गेले. या युक्तिवादातील बराच भाग तर्काधिष्ठित असून त्याला ग्रांथिक आधार तेवढा दिलेला आहे.
डॉ. कोछर यांचा तर्क असाही आहे की, महाभारतीय युद्धाचे स्थळ हे भारताबाहेर असावे. तसे असल्यास हिंदुस्थानातील काही शहरांची व नद्यांची नावे ही देशांतर करून आलेल्या आर्यांनी आपल्या मातृभूमीचा दुवा कायम ठेवण्यासाठी तेथील नावांचा वापर करून ठेवली असावीत.
डॉ. कोछर निवेदन करतात की, पारशी आणि ऋग्वेदी लोक यांच्या पौराणिक कथांत, धार्मिक उत्सवांत आणि शब्दसंग्रहात खूपच साम्य आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास करताना अवेस्ताचा अभ्यास आणि आधार अत्यावश्यक आहे.
डॉ. कोछर म्हणतात त्याप्रमाणे वैदिक काळापासून गौतम बुद्धाच्या काळापर्यंत पुरातत्त्वीय अवशेषांचा अभाव आढळतो. उरतो तो ग्रांथिक आधार. आणि पुराणांच्या रचनेत कालक्रम दुर्लक्षित आहे. साहजिकच डॉ. पाल जेव्हा भगवान बुद्धाच्या भारतीयत्वाला हरताळ फासतात तेव्हा सामान्य वाचक संभ्रमात पडतो.
ऋग्वेदाचा आणि अवेस्ताचा काळ एक असल्याचे गृहीत धरण्यात आपण कालविपर्यास करीत आहोत असे डॉ. कोछर यांना वाटत नाही. ते लिहितात – ‘since Avestan and Vedic people have a common heritage, Vedic people must also have been located in central Asia to begin with.’ म्हणजेच पाश्चात्य संशोधकांनी जे प्रमेय पूर्वी मांडले त्याच्या पुढे जायला ते तयार नाहीत. वास्तविक सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यानंतर ऋग्वेद हा त्या संस्कृतीचा समकालीन म्हणून किमान इ.स. पूर्व ३००० ते २७०० या काळात सिद्ध झाल्याचे मान्य करावे लागेल. म्हणजेच आर्य बाहेरून आले हे गृहीत धरूनही त्यांच्या भारतात येण्याचा काळ हा इ.स. पूर्व ३००० वर्षे हाच मानावा लागेल. झरतुष्ट्राचा रचनाकाल इ.स.पूर्व ६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ४ थ्या शतकाच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचतो. अवेस्ता मध्ये ‘गाथा’ हा सर्वात प्राचीन भाग असून ‘यस्न’ (यज्ञ) व ‘विस्परत’ (विभूती) हे नंतरचे भाग मानले जातात. तरीही अवेस्तामधील संस्कृतसम शब्दांवरून पाश्चात्यांनी हेतुपुरस्सर आर्यांना पारशांच्या जोडीला नेऊन बसवले. त्यांचीच री आम्ही कोठपर्यंत ओढत राहणार? पारशी अग्निपूजक आहेत म्हणून त्याना आर्य समजायचे असेच ना? मुळात-आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचा पुरावाच सापडत नाही.
डॉ. कोछर यांनी बहुधा श्रेडर या पाश्चात्य संशोधकाच्या Pre-Historic Antiquities या ग्रंथाद्वारे आपले प्रमेय मांडलेले दिसते. हा संशोधक म्हणतो – ‘(अवेस्तातील) शरयू व सरस्वती हे नद्यांचे दोन उल्लेख महत्त्वाचे असून ते इराणमधल्या कोणत्या तरी नद्यांचे असावेत.’ डॉ. कोछर यांनी इराणऐवजी अफगाणिस्थानात या नद्यांचा शोध लावला एवढेच. वस्तुतः पाश्चात्य संशोधकांना भारतीय संस्कृतीच्या प्राचीनतत्वावर व श्रेष्ठत्वावर आघात करून आपले व आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व येथील तरुण पिढीच्या मनावर रुजवायच होते. डॉ. कोछर यांना काय साधायचे आहे हे कळायला मार्ग नाही.
आजचे भारतीय इतिहाससंशोधक ज्या युरोपीय विद्वानांच्या प्रमेयांना आणि सिद्धांतांना प्रमाण मानून त्याआधारे नवीन प्रमेये मांडत आहेत, त्यांनी डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या मताचा विचार करणे अगत्याचे आहे. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘आर्य, वंशाबद्दल त्यांनी (युरोपीय विद्वानांनी) जो सिद्धान्त मांडला तो सर्व बाजूंनी कसा लंगडा ठरलाआहे याचे कोणालाही आश्चर्य वाटेल. पाश्चात्त्यांच्या वरील सिद्धान्ताची बारकाईने तपासणी करता असे दिसते की, काही गोष्टी गृहीत धरावयाच्या व त्या गृहीत गोष्टींवरून अनुमाने काढवयाची. ही पद्धती शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संशोधनाच्या कसोटीला उतरत नाही. (शूद्र पूर्वी कोण होते? पृ. १९७) शरयू व सरस्वती नदीचा अफगाणिस्थानात शोध घेण्याचा प्रकार हा अशापैकीच आहे.
असाच प्रकार डॉ. आर.के. पाल यांनी गौतम बुद्धाला पश्चिम आशियाची विभूतीठरविण्यात झालेला दिसतो. त्यांचे प्रतिपादन असे की गौतम बुद्ध हे विभूतिमत्त्व पश्चिम आशियात होऊन गेले आणि त्याची शिकवण व ज्ञान हे नंतरच्या काळी देशांतर करून इकडे आलेल्या लोकांनी भारतात आणले. डॉ. पाल यांनी असे अनुमान करण्यास कारण असे की, पश्चिम आशियातील लोक देशांतरात रुळले आहेत याबद्दल त्यांची खात्री आहे. ख्रिस्ती व इस्लाम संप्रदाय भारतात तिकडच्या लोकांनीच आणले नाही का? शिवाय डॉ. पाल Kern आणि Conzeया ज्या पाश्चात्य इतिहासकारांचा आधार घेऊन विधाने करतात त्यांनी बौद्ध संप्रदायाचा भारतीय इतिहास काल्पनिक म्हणून त्याची वासलात लावलेली असल्याचे ते स्वतःच सांगतात. डॉ. पाल यांच्या मते पश्चिम आशियातील भटक्या टोळ्या (त्यात आर्यही आलेच) तिकडच्या कला व संस्कृती घेऊन भारतात येत राहिल्या. (याचा अर्थ असा की, भारताला त्याची अशी कोणतीच संस्कृती नाही.) भारतीय लोक आपली भाषा व धर्म, कला व संस्कृती घेऊन कधी देशांतराला गेलेच नाहीत. हिंदू धर्माने धर्मप्रसार व धर्मांतर नेहमीच वर्ज्य मानले हे सर्व जगाला ज्ञात आहे. (वैदिक आर्यच येथे पश्चिम आशियातून आले. त्यांचे तेथील वंशज बुद्धोत्तर काळापर्यंत इकडे येत राहिले. गौतम बुद्ध बहुधा इकडे आला नसावा!) मात्र बुद्धाच्या अनुयायांनी धर्मप्रसारावर सातत्याने भर दिलेला आहे.
डॉ. पाल यांनी असे विधान केले आहे की, झरतुष्ट्राच्या धर्मसुधारणेचा परिणाम म्हणजे बौद्धांना त्या प्रदेशातून निष्कासित व्हावे लागले. उलट आधीचे संशोधक असे म्हणतात की बुद्धाने जशी ब्राह्मणशाहीच्या जुलमापासून भारतीय लोकांची सुटका केली तशीच झरतुष्ट्राने पर्शियन लोकांची पुरोहितशाहीतून सुटका केली. म्हणजेच डॉ. पाल यांच्या संशोधनातील हा दुवा बराच क्षीण वाटतो. आश्चर्य असे की भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणार्या आणि त्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिणार्या डॉ. आंबेडकरांनी गौतम बुद्धाच्या अभारतीयत्वाचा कुठे ओझरताही उल्लेख केलेला दिसत नाही. बुद्धधर्म भारतातून निष्कासित व नामशेष झाला तो शंकराचार्यांच्या शिकवणीमुळे, या रूढ समजुतीला डॉ.आंबेडकरानी धक्का देत विधान केले आहे की इस्लामिक आक्रमणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे बुद्धाचा धर्म आणि झरतुष्ट्राची धर्म या दोन्हीवर इस्लामिक आक्रमणाचा परिणाम झाला हे ऐतिहासिक साम्य निश्चितच लक्षणीय आहे. अवेस्ताच्या अनुयायांनी ‘धम्मपदा’च्या अनुयायांना हुसकावून लावल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आहे की काय यावर डॉ. पाल यांनी प्रकाश टाकला आहे की काय न कळे.
एवढे मात्र निश्चित की या दिशेने अधिक संशोधन आवश्यक आहे. हळूहळू जुने सिद्धान्त अमान्य होत आहेत. युरोपीय पुरातत्त्वीय संशोधकांच्या हेतूविषयी नवी माहिती उजेडात येत आहे. तरीही आम्ही त्यांचीच री ओढत राहणार का? आमच्या संशोधकांनी आमचा तेजोभंग करावा का?