प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे. बाकीचा सगळा खालचा वर्ग आहे. या वर्गात परिवर्तन झाल्याशिवाय पूर्ण चित्र बदलणार नाही. या बायकांना कोणतंही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदे तुम्ही वाटेल ते करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत…. बलात्कारही त्या वर्गात इतकी सामान्य गोष्ट आहे की त्यांना त्यात काही वाटत नाही. होतंच हो बाईचं असं! हे त्या सहज बोलून जातात. स्वतः कष्ट करून मिळवत्या असलेल्या बायकोला नवरा विकतो. कित्येकदा ते लग्नच एवढ्यासाठी करतात की, आपल्याला एक बाई पाहिजे असते धंदे करायला किंवा आयतं पोसायला! हल्ली हल्ली हा कुल मला मध्यमवर्गीयातही दिसायला लागला आहे. नवरे नोकरी सोडून देतात आणि घरी बसतात स्वस्थ. तो घरातल्या कामाला हात नाही लावणार. तिनं घरात करायचं. नोकरी करायची. पोरं सांभाळायची…