प्लेटोचा Republic हा ग्रंथ न्याय या विषयावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांपैकी सर्वांत काळजीपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात न्यायाविषयीच्या अनेक मतांचे परीक्षण आले असून, ते अशा थाटात केले गेले आहे की त्यात प्लेटोने त्याला माहीत असलेल्या सर्व उपपत्तींचा समावेश केला आहे असे वाटावे. … परंतु अस्तित्वात असलेल्या उपपत्तींची चर्चा आणि चिकित्सा करताना न्याय म्हणजे कायद्यासमोर समानता ह्या मताचा तो कोठेही उल्लेख करीत नाही. याची दोन स्पष्टीकरणे शक्य आहेत. एक तर त्याचे त्या उपपत्तीकडे दुर्लक्ष झाले, किंवा त्याने ती मुद्दाम टाळली. पहिली शक्यता असंभव आहे. कारण … Republic मध्ये जिथे न्याय चर्चेचा विषय नव्हता अशा ठिकाणी त्या मताचा लोकप्रिय लोकशाही समजूत म्हणून तो उल्लेख करतो, परंतु त्या ठिकाणी उपहास आणि कोपरखळ्या यांच्या साह्याने ती कशी तिरस्करणीय आहे हे तो दाखवितो…. यावरून सर्व महत्त्वाच्या उपपत्तींचा आपण विचार केला आहे असा वाचकाचा ग्रह करून देण्याचा प्रयत्न बौद्धिक प्रामाणिकपणाशी सुसंगत नाही असे म्हणावे लागते.