आजच्या सुधारकच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या अंकातील संपादकीयात म्हटले आहे की “आगरकरांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य करावयास आरंभ केला ते दुर्दैवाने अजून मोठ्या अंशाने अपुरेच राहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रात विवेकवादी सर्वांगीण सुधारणावादाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी केलेले काम छिन्नभिन्न होऊन गेले. ते गेल्यानंतर लवकरच महाराष्ट्राची स्थिती जवळपास पूर्वीसारखी झाली. आणि आज शंभर वर्षानंतरही ती तशीच आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इत्यादी गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. शनिवार, सोमवार, एकादशी, चतुर्थी इत्यादी उपासतापासांदना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होत आहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग हे अव्याहत चालू आहेत. फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, इ. सर्रास आणि निःसंकोच सुरू आहेत. जातिभेद अद्याप पूर्वीइतकाच तळ ठोकून आहे, आणि राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघड आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती असे म्हणण्याची पाळी आली आहे.”
आजचा सुधारक आता दोन वर्षांचा होऊन तिसर्या वर्षात पदार्पण करीत आहे. परंतु दोन वर्षात प्रबोधन होण्याऐवजी सर्वच क्षेत्रात घसरगुंडी चालू आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश आमदानीत जे थोडेफार प्रबोधन झाले होते त्यावर बोळा फिरवण्याचा उपक्रम स्वातंत्र्योत्तर काळात इमानेइतबारे राबविण्यात आला. अडाणी धार्मिकता व धार्मिक अडाणीपणा जोपासण्याचे काम अट्टाहासाने करण्यात आले. सत्ताधार्यांना अबोधनाचे वावडे असते. मोठमोठ्या पदांवर आरूढ झालेल्या सत्ताधार्यांची वक्तव्ये ऐकताना आणि वाचताना आपण धर्मगुरूं चीच वक्तव्ये ऐकत आहोत व वाचत आहोत असे वाटते.
सत्ताधार्यांचे जाऊ द्या. पण समाजसेवक व समाजसेविका तरी खर्याच अर्थाने प्रबोधन करतात का? काही महिन्यांपूर्वी धुळे जिल्ह्यातील दोंडाइचे गावी स्त्रियांचे एक शिबिर भरले होते. त्या शिबिरातील स्त्रियांना धुळ्याच्या एका प्राध्यापकबाईंनी मार्गदर्शन केले. कोणते मार्गदर्शन केले? त्या म्हणाल्या, “बायांनो, तुम्ही वटसावित्रीला वडाला सूत गुंडाळता व देवाची (प्रा. बाईना बहुधा देवाचा घर नं. गल्ली नं. माहीत असावा) प्रार्थना करता की मला जन्मोजन्मी हाच पती मिळू दे. त्याऐवजी तुम्ही अशी प्रार्थना करीत जा की पुढच्या जन्मापासून मला पुरुषाचा जन्म मिळू दे व नवर्याला स्त्रीचा जन्म मिळू दे. असा आमचा जोडा जन्मोजन्मी टिकू दे.”
महंमद पैगंबर म्हणतात, “स्त्रियांना केस लांब असतात पण अक्कल आखूड असते.” आर्य चाणक्य यांनी सुद्धा चाणक्य सूत्रात स्त्रियांच्या वैगुण्यांवर बोट ठेवले आहे.
प्राध्यापकबाईंचे दिव्य मार्गदर्शन पाहिल्याबरोबर महिलांबाबत, वेगवेगळ्या धर्मानी व तत्त्ववेत्यांनी म्हटले आहे ते यथार्थ आहे असे वाटायला लागते.
सगळ्यांत चिंतेची बाब म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण व बुद्धिवाद यांचा अवलंब केलेल्यांची टक्केवारी पन्नाशी उलटलेल्या लोकांत बरीच आढळते. पन्नाशीच्या आतील लोकात नगण्य स्वरूपात!
शहरातून व ग्रामीण भागातसुद्धा, हरिनाम सप्ताह, कथा, कीर्तने, प्रवचने, पारायणे, सामुदायिक जपजाप्य असल्या कार्यक्रमांत हल्ली वयाने तरुण (पण बौद्धिक दृष्ट्या बाल) असलेल्यांचा फार मोठा सहभाग असतो.
सॉक्रेटिस यांनी म्हटले आहे की, “सारासार विचार करून, समजून उमजून घेतलेले निर्णय म्हणजे चारित्र्य. गतानुगतिक कर्म म्हणजे क्रिया. चारित्र्य नाही. आजच्या तरुणांचा सहभाग गतानुगतिक क्रियांत असतो. म्हणून त्यांच्यात चारित्र्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. ही खरी चिंता करण्यासारखी बाब आहे.