ऑगस्ट ९४ च्या सुधारकातील “खरी स्त्रीमुक्ती कशात आहे” या लेखाद्वारे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेस सुरुवात केल्याबद्दल दिवाकर मोहनी यांना धन्यवाद.
या लेखात व्यक्त करण्यात आलेली काही मते अधिक स्पष्ट व्हावयास हवी होती, असे वाटते. उदा.
मोहनींनी स्त्रीपुरुष संबंधाच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत –
(अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य असावे,
(ब) एकपतिपत्नीव्रत ही आदर्श व्यवस्था नव्हे; अर्थात् बहुपत्नीक किंवा बहुपतिक कुटुंबे असण्यास हरकत नसावी.
एकाच पतिपत्नीचे कुटुंब असून प्रसंगी त्या स्त्रीपुरुषांनी इतरही पुरुष-स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास हरकत नसावी, ही एक गोष्ट झाली. एकाच कुटुंबात एका पुरुषाच्या अनेक स्त्रिया/एकाच स्त्रीचे अनेक पुरुष/स्त्रीपुरुषांचे अनेक पतिपत्नी, यांनी एकत्र राहणे, ही एक वेगळीच गोष्ट झाली. मूळ लेखातून हे पुरेसे स्पष्ट होत नाही, असे वाटल्यामुळे ही पृच्छा. तत्त्वतः या दोन्ही गोष्टींना विरोध असण्याचे कारण नाही.
भविष्यात उपरोल्लिखित (ब) पद्धतीची कुटुंबे अपवादानेच अस्तित्वात येतील, असे मोहनींना वाटते. परंतु एकदा स्त्रीपुरुषांचे लैंगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात आल्यावर विवाह आणि कुटुंब या संस्था आज आहेत त्या स्थितीत राहू शकणार नाहीत, हे मान्य करायला हवे. विवाहसंस्था निरर्थक ठरेल; आणि कुटुंब असेल तर ते स्त्री व तिची मुले असे, आणि अर्थात् मातृसत्ताक असेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
खर्या स्त्रीमुक्तीसाठी स्त्रियांमधील आपापसांतील भेदभाव नष्ट होणे आवश्यक आहे, असे योग्य प्रतिपादन मोहनी यांनी केले आहे. उदाहरणादाखल ते “कुमारिका, सुवासिनी, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता”, “लेकुरवाळी, वन्ध्या, मुलांची आई, मुलींची आई”, तसेच “कुमारी माता, व्यभिचरिणी सधवा, व्यभिचारिणी विधवा” इ. भेदांचा उल्लेख करतात. हे सर्व भेद विवाह आणि लैंगिक आचार यांच्याशी संबंधित आहेत.
परंतु याहीपलिकडे स्त्रियांमध्ये अनेक अधिक गंभीर स्वरूपाचे भेद आहेत. हे भेद जाति, धर्म, वंश-वर्ण यांवर आधारित आहेत. मोहनींनी उल्लेखिलेले भेद कर्माधिष्ठित आहेत, तर प्रस्तुत भेद जन्माधिष्ठित आहेत, आणि समाजाच्या श्रेणीबद्धतेशी (stratification) त्यांचा संबंध आहे. मोहनी या भेदांची दखल दुर्दैवाने घेत नाहीत. स्त्रीमुक्तीचे ध्येय हे अखिल मानवजातीच्या समानतेच्या तत्त्वाशी संबंधित असेल आणि ते तसे आहे – तर कर्माधिष्ठित भेदांबरोबरच स्त्रियांमधील जन्माधिष्ठित भेदाभेद नष्ट होणे हेही अत्यावश्यक आहे.
शेवटी, मोहनींच्या स्वप्नसृष्टीतील (Utopia) उद्याचा समाज प्रत्यक्षात येण्यापूर्वी वास्तवातील काही ठळक अडचणींवर मात करावी . एक उदाहरण देते. मोहनी म्हणतात, स्त्रीला (लैंगिक संबंधविषयक) नकाराधिकार हवा, आणि सर्व पुरुषांनी त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्यक्षात आज तिचा हा मूलभूत अधिकार पायदळी तुडवला जाऊ शकतो – जातो. बलात्काराची समस्या पुरुषांच्या ‘प्रबोधनातून सुटणारी नाही. आजचा समाज क्लात्कारित स्त्रीकडे गुन्हेगार म्हणून पाहतो. समाजाची सहानुभूति वास्तविक स्त्रीकडे असायला हवी. समाजाचा हा दृष्टिकोण बदलणे ही मूलभूत गरज आहे. स्त्रीवरील अनेक बंधने केवळ या एकाच भीतीपोटी निर्माण होतात. ही भीती जर नष्ट झाली, तर बंधने आपोआप गळून पडतील. मोहनींच्या स्वप्नसृष्टीप्रत जाण्याचे हे पहिले पाऊल आहे, असे मला वाटते.