हल्ली विज्ञानातील संशोधनाचा प्रचंड आवाका आणि वेग जगात सार्वत्रिक क्रांती घडवीत असून, मानवी संस्कृतीच्या ५००० वर्षांच्या ज्ञात इतिहासात एवढी मूलगामी स्थित्यंतरे केवळ अभूतपूर्वच म्हटली पाहिजेत. या वैज्ञानिक संशोधनाचा उगम प्रामुख्याने पाश्चात्त्य प्रगत देशात असला तरी पृथ्वीतलावरील कोणताही मानव समाज या स्थित्यंतरापासून अलिप्त राहू शकत नाही. भौतिक शास्त्रांतील संशोधनामुळे मानवाच्या सुखसोयी वाढल्या व मानवी जीवन अधिक सुसह्य आणि गतिशील (dynamic) झाले. परंतु जीवशास्त्रांतील (Life Sciences) आधुनिक संशोधनामुळे मात्र मानवी जीवनाच्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक परंपरा आणि मान्यता क्षीण होऊ लागलेल्या दिसतात. विशेषतः जैविक तंत्रविद्येच्या (Bio-technology) विकासामुळे तर मानवी जीवनाचे सूर व लय बदलू लागली आहे. या तंत्रविद्येमुळे मानवी जीवनाला लागू असणारे निसर्गनियम बाजूला सारून, मानव आता स्वेच्छेने (आणि काहीसा स्वच्छंदपणे) आपले जीवन बदलण्यास सक्षम होऊ लागला आहे.
केवळ शारीरिक व्यवहारच नव्हे तर मानसिक व्यवहार व मानवा-मानवामधील संबंध यांवरही या नव्या तंत्रविद्येचा प्रभाव जाणवू लागला आहे. प्रत्येक युगात नव्या-जुन्याचा संघर्ष अटळ असतो, तशीच २० व्या शतकाच्या शेवटी या नव्या तंत्रविद्येमुळे जुनी सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये थरारून गेलेली दिसतात. जैनिक शल्यक्रियेसारख्या (Genetic Engineering ही संज्ञा चूक आहे, त्याऐवजी Genetic Surgery अर्थात् जैनिक शल्यक्रिया ही पारिभाषिक संज्ञा अधिक समर्पक आहे.) नव्या जैविक तंत्रविद्येमुळे सामाजिक धारणेच्या मूलभूतं तत्त्वांना शह बसेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे जैविक तंत्रविद्येची कोणती उपांगे आहेत व त्यांचा समाजधारणेवर कोणता प्रभाव संभवतो यासंबंधी विचार होणे आवश्यक आहे. या लेखात याच विषयाचा धावताआढावा घेण्याचा प्रयत्न आहे.
(१) गर्भनिरोधक :- वस्तुतः गर्भधारणेस अवरोध करणे हे काही अत्याधुनिक तंत्र म्हणता येणार नाही. हे तंत्रज्ञान गेलाबाजार ५० वर्षांपासून उपलब्ध आहे व त्याचा अवलंब कौटुंबिक व राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रणासाठी राजरोसपणे करण्यात येतो, व त्यात काहीगैर आहे असे सामान्यतः मानले जात नाही. तरीपण कित्येक मानवसमूह, उदा. कॅथॉलिक ख्रिश्चन व सनातनी मुसलमान, गर्भनिरोधास विरोध करतात व त्याबद्दल त्यांच्यावर टीकाही होते. (नुकत्याच मिस्र देशातील काहिरा येथे पार पडलेल्या जागतिक संमेलनामध्ये काही कट्टर मुसलमान देशांनी भागच घेतला नाही व व्हॅटिकनच्या प्रतिनिधींनी संमेलनाच्या ९ दिवसांपैकी ५ दिवस कठोर विरोध करून आपले हसे करून घेतले हे सर्वश्रुतच आहे.) गर्भधारणेच्या प्रतिबंधाचे तंत्र जुनेच असले तरी त्यामुळे समाजात झालेले बदल दृष्टीआड करता-येत नाहीत. लैंगिक वर्तनासंबंधी सामाजिक शिस्तीच्या कल्पना या तंत्रज्ञानामुळे पार मोडकळीस आल्या आहेत हे विसरून चालणार नाही. विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर पूर्वी असणारी सामाजिक बंधने नाहीशी झाल्यामुळे अशा प्रकारच्या लैंगिक संबंधांचे प्रमाण वाढले आहे व त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे AIDS सारख्या वैद्यकीय समस्यासुद्धा मुक्त लैंगिक संबंधामुळे वाढतात हे ध्यानात घेतले पाहिजे. तेव्हा गर्भनिरोध हे जुनेच तंत्रज्ञान असले तरी ते सामाजिक बदलासाठी एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.
(२) कृत्रिम रेतन :- पाळीव पशूमध्ये कृत्रिम रेतनाची प्रथा बरीच जुनी आहे. अरबी टोळ्यांतील लोक आपल्या घोड्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शत्रूकडील उत्तम घोड्यांचे वीर्य चोरून आणून आपल्या कळपातील मादी घोड्यांचे त्यापासून फलन करीत असल्याचे दाखले आहेत.! आधुनिक प्रगत कृत्रिम रेतनाच्या तंत्रज्ञानाचा विकास सुमारे ४०-५० वर्षांपासून पाळीव पशूच्या प्रजननासाठी करण्यात आला. भारतातच गेल्या १०-२० वर्षांत देशी गाईंच्या बरोबरीने विदेशी वशिंडरहित गाई दिसू लागल्या आहेत त्या कृत्रिम रेतन तंत्रविद्येच्या उपयोजनामुळेच. प्राण्यांप्रमाणेच मानवामध्येही कृत्रिम रेतनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात होतो हे सामान्य जनतेला कळत नाही. पतीच्या वीर्यामध्ये कार्यक्षम शुक्रपेशींची वाण असल्यास अशी जोडपी कृत्रिम रेतनाद्वारे अपत्यप्राप्ती करून घेतात. या प्रकारची वैद्यकीय सेवा अनेक प्रसूतितज्ज्ञ डॉक्टर्स गुप्तपणे उपलब्ध करून देतात. अर्थात् हे सगळे व्यवहार गुप्तपणे पार पडत असल्याने त्यांची नोंद कोठेच नसते!
अशा कृत्रिम रेतनासाठी जे वीर्य वापरले जाते ते कोठून मिळविले जाते याची काहीच खात्री नसते. असे वीर्यदाते समाजातील कोणत्या स्तरातील आहेत, त्यांच्या वर्तनाची पाश्र्वभूमी काय आहे, त्यांना AIDS वा अन्य विकार आहेत काय याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे धनाढ्य खानदानी (?) कुटुंबात सफाई कामगार, वाहन चालक वगैरे व्यवसाय करणाच्या पुरुषांची प्रजा वाढते! यावर उपाय म्हणून काही डॉक्टर्स दर्जेदार (?) पुरुषांच्या वीर्याची हमी देतात व त्यासाठी वीर्य गोठवून ठेवून त्यांचा वीर्यनिधी (sperm bank) सुद्धा स्थापन करू लागले आहेत. या तत्रविद्येमुळे समाजाच्या व कुटुंबाच्या रचनेमध्ये जे काय घडते ते योग्य वा अयोग्य याबद्दल मतभेद असू शकतात. सामाजिक समानतेच्या पुरस्कर्त्यांना त्यात काही गैर वाटणार नाही, परंतु विवाहसंबंधाविषयी सामाजिक स्तरीकरणावर विश्वास ठेवणाच्या लोकांची अस्मिता मात्र या तंत्रज्ञानामुळे निश्चितच दुखावली जाते. घरात जन्मलेले बाळ आपल्या पित्याचे नसून अन्य कोणाचे तरी आहे ही गोष्ट निदान मात्यापित्यांना तर माहीत असतेच, त्यामुळे कुटुंबात कायम तणाव राहू शकतो. पाच एक आविष्कार म्हणजे पुरुषाचे वीर्य एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी पोस्टानेन्या कूरियरद्धारा पाठवून त्यापासून गर्भधारणा घडविता येते! एक चहाटळ विनोद प्रसिद्ध आहे. मिझपूरचा रामलखनप्रसाद मुंबईला वर्षानुवर्षे काम करतो व तो गावी न जाताही दरवर्षी ‘देशमें बिटुवा हुवा’ म्हणून पेढे वाटतो. आता ही चेष्टा राहिलेली नसून प्रत्यक्षात तसे घडू शकते! कॅनडातून आस्ट्रेलियात व इस्रायलमधून अर्जेटिनामध्ये उत्तम गुणवंत वळूचे वीर्य नियमितपणे निर्यात होते. नागपूरच्या फार्मवरील गाई कित्येक वर्षांपासून कर्नालच्या वळूची प्रजा उत्पन्न करीत आहेतच.
(३) परीक्षण-नलिकाजन्य अर्भके :- कृत्रिम रेतनाच्या तंत्रज्ञानाची परिणती परीक्षण-नलिकेत फलन करून प्रजा (test – tube baby) उत्पन्न करण्याच्या तंत्रज्ञानात झाली. स्त्रियांच्या अंडपेशी काही शारीरिक दोषामुळे गर्भाशयापर्यंत पोहचू शकत नसल्यास, अंडपेशी शस्त्रक्रियेने काढून घेऊन, कांचपात्रात पतीच्या वीर्याने त्या अंडपेशीचे फलन करण्यात येते. असे गर्भ थोडे दिवस कांचपात्रातच वाढवून योग्य त्या अवस्थेत मातेच्या गर्भाशयात रोवले जातात. भारतासह अनेक प्रगत देशामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. यामुळे काही अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी मातेच्या शारीरिक दोषाचे कारण जैविक असेल तर अशा दोषांचा प्रजेमध्ये प्रसार संभवतो! सदोष जैनिक गुणधर्माच्या वाढीवर नैसर्गिक निर्बध या तंत्रामुळे मोडतो व त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम नाकारता येत नाहीत.
(४) याच तंत्राचा पुढील टप्पा म्हणजे, एखाद्या महिलेच्या अंडग्रंथी कार्यक्षम असून अंडपेशी तयार होतात परंतु अंडनलिका, गर्भाशय वगैरे अन्य प्रजननाचे अवयव दोषपूर्ण असल्यामुळे अशा महिलेस अपत्यप्राप्ती करून देणे हा आहे. महिलेच्या अंडग्रंथीतून शस्त्रक्रियेद्वारे अंडपेशी मिळवून, कांचपात्रात त्यांचे फलन करून तयार होणारा गर्भ शारीरिकपणे सक्षम असणार्या अन्य महिलेच्या गर्भाशयात रोवून वाढविण्यात येतो. अशी ही तात्पुरती माता (surrogate mother) होणार्या अपत्याची कायदेशीर माता ठरत नाही व ठरलेला मेहनताना घेऊन तिला नवजात बालक त्याच्या नैसर्गिक मातेकडे सोपवावे लागते. या पद्धतीने अपत्यप्राप्तीचे प्रमाण पाश्चात्त्य देशात बरेच आहे व भारतातही हळूहळू हे तंत्र वापरात येऊ लागले आहे. या प्रकारामुळे अनेक वेळा भावनात्मक व कायद्याचेही प्रश्न निर्माण होतात. या तंत्रविद्येचे भविष्यात काय सामाजिक परिणाम होतील हे सांगणे कठीण आहे. वरील दोन तंत्रांमध्ये गर्भ रोवण्यापूर्वी त्याचे लिंगपरीक्षण अगदी प्राथमिकअवस्थेमध्ये करता येते. त्यामुळे हव्या त्या लिंगाचाच गर्भ वाढविण्याची इच्छा अमलात आणता येते हे एक आणखी वैशिष्ट्य!
(५) एखाद्या वृद्ध महिलेच्या (किंवा मृत्यूनंतर तात्काळ) अंडाशयातून अविकसित अंडपेशी मिळवून, प्रयोगशाळेत त्यांचा विकास करून, फलन घडवून असे गर्भ योग्यवेळी अन्य महिलेच्या गर्भाशयात रोवणे शक्य आहे. त्यामुळे वृद्ध निराधार महिलेला अपत्य व वारस प्राप्त करून घेता येऊ शकतो. तसेच अकस्मात मृत्यू झालेल्या स्त्रीपासून तिच्या पश्चात् तिच्या स्वतःच्या अपत्याचा जन्म शक्य झाला आहे. या तंत्रामुळे कोणते सामाजिक व न्यायविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतील याची कल्पनाच केलेली बरी. याच तंत्राचा एक आणखी बारकावा असा की, एका अंडपेशीचे विभाजन करून (cloning) एकाहून अधिक गर्भ तयार करता येतात! १९७६ साली प्रस्तुत लेखकाने भारत सरकारकडे एक योजना पाठविली होती. तिचा उल्लेख करण्याचा मोह येथे होतो! या योजनेमध्ये भरपूर दूध देणार्या जातिवंत वृद्ध व भाकड झालेल्या गाईंच्या अंडग्रंथींतून अविकसित अंडपेशी प्राप्त करून, त्यांचा विकास व फलन प्रयोगशाळेत (त्यावेळी उपलब्ध सुविधेमुळे) करून त्या गर्भाचे अन्य सामान्य गायींमध्ये रोपण करण्याचा मानस होता. परंतु ही योजना फारच प्रगत (too advanced) आहे असा शेरा मारून भारत सरकारने परत केली! या वर्षी मात्र यातंत्राचा वापर दक्षिण कोरियात व अमेरिकेत सुरू झाल्याची बातमी आहे!)
(६) अगदी लहान गर्भाचे (blastocyst) तो गर्भाशयात रोवण्यापूर्वी लिंगपरीक्षण करण्याविषयी वर उल्लेख केला आहेच. परंतु गर्भाशयात वाढणाच्या गर्भाचे लिंगपरीक्षण करण्यासाठी गर्भजलपरीक्षण (amniocentesis) करण्याच्या तंत्राचा सुमारे ३० वर्षांपूर्वी विकास झाला. गर्भाभोवती असणार्या आवरणामध्ये जो द्रव असतो (amniotic fluid) त्याचा नमुना सुईने काढून त्यात तरंगणार्या, गर्भपासून विलग झालेल्या, पेशींचे प्रयोगशाळेत विश्लेषण करून त्यातील गुणसूत्रे तपासण्याचे हे तंत्र आहे. काचपट्टीवर दिसणार्या गुणसूत्रांमध्ये संख्येचे, आकाराचे किंवा तूटफुटीचे काही दोष असल्यास असे गर्भ विकृत ठरतात व ते वाढू देणे इष्ट नसते. म्हणून असे गर्भ प्रारंभिक अवस्थेतच काढून टाकता येतात. पाश्चात्त्य देशांत या तंत्रामध्ये गर्भाच्या लिंगाचाविचारही कोणी करीत नाही. परंतु भारतीयांना हे तंत्र म्हणजे एक मोठी पर्वणीच वाटते. काचपट्टीवरील गुणसूत्रांच्या समूहाकडे पाहिल्याबरोबर त्यात पुरुषलिंगी Y गुणसूत्र आहे की दोन्ही स्त्रीलिंगी XX गुणसूत्रे आहेत हे क्षणार्धात समजते. मग काय, फक्त पुरुषलिंगी गर्भच वाढवावयाचे आणि स्त्रीलिंगी गर्भ पाडून टाकावयाचे हा प्रकार सुरू करून भारतातील कित्येक डॉक्टरांनी अफाट धन मिळविले. आता मात्र शासनाने यावर कायद्याने बंदी घातली आहे. कायदेपुस्तकातील इतर कायद्याप्रमाणेच याही कायद्याचे पालन (?) होणार! गर्भजल परीक्षणाखेरीज हल्ली ध्वनितरंगांद्वारे (ultra-Sonography) बरीच वाढ झालेल्या गर्भाचे लिंग दिसू शकते व अपत्यप्राप्तीपूर्वीच ते मूल कोणत्या लिंगाचे आहे हे कळते.
लिंगपरीक्षणानंतर स्त्रीलिंगी गर्भपात करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे व त्यामुळे लोकसंख्येतील स्त्रीपुरुष प्रमाणही व्यस्त होत चालले आहे. यासंबंधी लोकसंख्याशास्त्रज्ञ (demographers) व आकडेशास्त्रज्ञ (statisticians) यांमध्ये एकमत नाही. परंतु गर्भजलपरीक्षण या तंत्रविद्येमुळे भारतात तरी अनिष्ट सामाजिक प्रभाव होत आहे. हे असेच चालू राहिले तर समाजातील स्त्रियांची संख्या कमी झाल्याने वेश्यावृत्ती व बलात्काराचे प्रमाण वाढू शकते!
(७) आधुनिक जैविक तंत्रविद्येमुळे समावेश करता येईल असे अवयव-रोपणाचे तंत्र १९६७ साली डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी हृदयरोपणाद्वारे विकसित केले. गेल्या २५ वर्षांत या तंत्रामध्ये भरपूर सुधारणा होऊन आता हृदयाप्रमाणे मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, अस्थी, सांधे, डोळ्याचे आवरण (कॉर्निया) इत्यादी अवयवांचे रोपण होऊ लागले आहे. निकामी झालेले अवयव शस्त्रक्रियेने काढून त्याठिकाणी इतर सुदृढ व्यक्तींचे कार्यक्षम अवयव बसविण्याचे हे तंत्र आहे. परंतु मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने अवयवांचा काळाबाजार व चोर्या होऊ लागल्या आहेत. गरीब देशांतील तरुणांना फसवून अवयव मिळवून त्यांची तस्करी (बेकायदा निर्यात) केल्याच्या घटना घडतात. त्यामुळे हे उपयुक्त तंत्रज्ञान आता एक सामाजिक डोकेदुखी ठरू पाहात आहे. अलीकडेच रोपणासाठी उपयुक्त हृदयांचा तुटवडा असल्याने संपूर्णपणे कृत्रिम मानवनिर्मित हृदय विकसित करण्याचे प्रयोग यशस्वी होत असल्याच्या वार्ता आहेत. परंतु इतर अवयवांसंबंधी मात्र नैसर्गिक अवयवांना पर्याय नाही!
(८) पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या अवयवाप्रमाणेच, गर्भपाताद्वारे मिळविलेल्या गर्भाचे अवयव अथवा ऊतीं (tissues) चे रोपणही यशस्वीपणे करता येऊ लागले आहे. मेंदूचे विविध भाग, मज्जापेशी, मॅरो, अंतस्रावी ग्रंथी (endocrine glands), त्वचा, केसांची मुळे इत्यादी ऊती गर्भातून काढून त्या रुग्णाच्या शरीरात घालण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. गर्भपात झालेले गर्भ केवळ आपला जीव गमावतात एवढेच नव्हे तर त्यांची चीरफाड होण्याची वेळही या गर्भाच्या वाट्याला येऊ शकते. जसे एखाद्या वृक्षाचे फळ कापून माणूस त्याचा रस, गर वगैरे खातो व साली, बिया, चोथा फेकून देतो तशीच गर्भाची गत होणे संभवते. अवयवच नव्हे तर गर्भाच्या पेशीतील गुणसूत्र काढून त्यांचे तुकडे करून हवे ते तुकडे जैनिक उपचाराद्वारे (gene therapy) रुग्णाच्या शरीरात टोचण्यात येतात. जैनिक उपचाराविषयी संशोधन झपाट्याने पुढे जात असून येत्या २-४ वर्षांतडझनबर विकारांवर तरी जैनिक उपचार उपलब्ध होतील अशी लक्षणे आहेत. हे उपचार मोठ्या
प्रमाणात पसरले म्हणजे गर्भाच्या चीरफाडीचे प्रमाणही वाढेल!
(९) या जैनिक उपचारपद्धतीप्रमाणेच, पशु व वनस्पतींच्या गुणसूत्रांवर जैनिक शल्यक्रिया (genetic surgery) करून त्यांचे गुणधर्म माणसास हवे तसे बदलण्याचेतंत्रही चांगलेच विकास पावले आहे. अधिक दूध देणारी गुरे, अधिक किफायतशीरपणे उत्तम दर्जाचे मांस देणारे पशु व पक्षी यांची उत्पत्ती सुरू झालीच आहे. कोंबडी १५ महिन्यांची होण्यापूर्वीच तिच्यातून ३०० अंडी मिळविणे, एक महिन्याच्या कोंबड्यापासून १ किलो मांस मिळविणे तर आता शक्य झाले आहेच. तसेच रंगीत कापूस, अधिक उत्पादन देणार्या व दीर्घकाल टिकणार्या भाज्या व फळे, अधिक प्रथिने असणारी मका, गहू, तांदूळ या सारखी धान्ये तर निर्माण होऊ लागली आहेतच, पण हवी ती औषधे निर्माण करणारे जंतूही आता या तंत्रविद्येमुळे निर्माण करता येतात. परंतु हे सर्व करताना नैसर्गिक गुणधर्म असणारे पशु, पक्षी, वनस्पती नष्ट होण्याची भीती उत्पन्न झाली आहे!
(९) जैनिक तंत्रविद्येचाच भाग म्हणता येईल अशा वैद्यकीय शस्त्रक्रिया तंत्रामध्येही विलक्षण प्रगती झाली आहे. मेंदूवरील, हृदयावरील नाजूक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता सामान्य झाल्या आहेत. सूक्ष्म रक्तवाहिन्या व मज्जातंतूवरही सूक्ष्म शस्त्रक्रिया (microsurgery) आता प्रचलित झाल्या आहेत. विशेषतः प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रात तर नाट्यमय प्रगती झाली आहे. या तंत्रामुळे आता उंची वाढविणे, त्वचा बदलणे, टकलावर नव्या केसांचे रोपण करणे, संपूर्ण चेहरा अथवा नाक, गाल, ओठ, कान, दांत यांचे आकार व रूप बदलणे, स्तनांचे आकार इच्छेनुसार कमी जास्त करणे, कंबर व नितंबावरील चरबीचे नियंत्रण करून त्यांना अधिक सुडौल बनविणे हे सर्व काही आता प्लास्टिक सर्जरीमुळे शक्य झाले आहे. माणसास आपले रंग रूप बदलणे शक्य झाल्यामुळे त्याचे सामाजिक परिणाम क्रांतिकारक होऊ शकतात. याचप्रमाणे लिंग बदलण्याची शस्त्रक्रियाही आता होते. तृतीय लिंगी म्हणून ओळखल्या जाणार्या व्यक्तीस शस्त्रक्रियेद्वारे पुरुष अथवा स्त्री म्हणून नवे जीवन आरंभ करण्याच्या संधी आता उपलब्ध आहेत. John ची Jane झाल्याच्या बातम्या आपण अधूनमधून वाचतोच ना!
(१०) मृतप्राय रुग्णांना, ज्यांची जगण्याची आशा पूर्णपणे संपलेली आहे, अशा बेशुद्धावस्थेतील (comatosed) रुग्णांना कृत्रिम उपायांनी जिवंत ठेवण्याचे तंत्र अतिशय विकसित झाले आहे व त्यामुळे अशा रुग्णांना वर्षानुवर्षे जिवंत ठेवता येते. यामुळे व्यर्थ खर्च तर होतोच, परंतु अशा रुग्णाच्या कुटुंबावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. मृत झालेल्या माणसाचे शरीर अतिशीतीकरणाद्वरे (cryogenics) गोठवून ठेवण्याचे तंत्र आता व्यावसायिक पद्धतीवर अमेरिकेत सुरू झाले आहे. भविष्यात मृत व्यक्तीस जिवंत करण्याचे तंत्र उपलब्ध होईल अशा आशेने लोक मृत्यूनंतर आपले शरीर गोठवून ठेवण्याची व्यवस्था करतात. वॉल्ट डिस्नेचे शरीर असेच गोठविण्यात आल्याचे वाचण्यात आलेआहे!
(११) मानवी गुणसूत्रे व गुणधर्म-संचयाविषयी होत असलेल्या प्रचंड संशोधनामुळे अनेक सामाजिक आयाम निर्माण होणार आहेत. समलिंगी संभोगाची प्रेरणा ही जैनिकगुणधर्मावर अवलंबून असते हे तर आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे समलिंगी संभोग ही नैसर्गिक वृत्ती आहे व त्यामध्ये अनैसर्गिक व त्याज्य असे काहीच नाही असे मत आता पाश्चात्त्य देशांत पसरते आहे. त्याचप्रमाणे स्वैर लैंगिक प्रवृत्ती, पतिपत्नीमध्ये एकनिष्ठेचा अभाव, गुन्हेगारी व खुनी प्रवृत्ती यासुद्धा जैनिक कारणामुळेच उद्भवतात असे निदर्शनाला येत आहे. यांमुळे या सर्व अनिष्ट सामाजिक प्रवृत्तींना आता विज्ञानमान्यता मिळू लागली आहे. यापुढे या सर्व दोषांना वैधानिक मान्यता मिळाली तर सारा समाज ढवळून निघणे अशक्य नाही. अशा गुन्हेगारांना दंड देण्याऐवजी त्यांचे पुनर्वसन करावे लागणे क्रमप्राप्तच होईल!
(१२) डीएनए फिंगर प्रिंटिंग अथवा मॅचिंग या तंत्रामध्ये शरीराच्या थोड्या पेशी (उदाहरणार्थ रक्ताचे थेंब, अस्थीचा वा त्वचेचा कण, केस यापासून,) उपलब्ध झाल्या तरी त्यांची गुणसूत्रे व डीएनए विलग करून त्याचे मानचित्र (profile) तयार करता येते व या मानचित्रावरून त्या पेशी कोणत्या व्यक्तीच्या आहेत हे बिनचूकपणे सांगता येते. तद्वतच दोन व्यक्ती रक्ताचे नातेवाईक आहेत अथवा नाहीत हे सुद्धा सिद्ध करता येते. यामुळे गुन्हेगारांची ओळख, वादग्रस्त नातेसंबंधांचा निर्णय संभव झाला आहे. यामुळे पुरावा कायद्यात आमूलाग्र बदल होणे संभवते.
(१३) वेगवेगळी संप्रेरके (hormones) अथवा औषधी द्रव्ये घेऊन मानवी तसे प्राण्यांच्या शारीरिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविता येतात. खेळाडू, कसरती करणारे, तद्वतच रेसचे घोडे वगैरेमध्ये अशा प्रकारची द्रव्ये टोचून, अर्थात अनिष्ट मार्गानी, यश मिळविण्याचे प्रकार वाढीला लागले आहेतच. अशी संप्रेरके व द्रव्ये ओळखता येऊ नयेत म्हणून त्याचे स्वरूप बदलण्याचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे क्रीडाक्षेत्रातील निरागसता संपुष्टात येऊन तेथेही गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
वर वर्णन केलेले सर्व प्रकार आधुनिक जैविक तंत्रविद्येचेच (bio-technology) आविष्कार आहेत. त्यांचे सामाजिक परिणाम किती दूरगामी व सर्वव्यापी होऊ शकतात याचे थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. दररोज नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत असल्याने या विषयाचा अंत होणे शक्यच नाही! लेखाची शब्दमर्यादा ध्यानात ठेवून फक्त धावता आढावाच घेता आला आहे. तसेच संदर्भ देणेही मर्यादेत बसले नाही हे मान्य करूनही या लेखामुळे विचारमंथनास व चर्चेस चालना मिळावी ही अपेक्षा आहे.