शासनांचे दोन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारचे शासन म्हणजे ज्याचा अंत रक्तपातावाचून करता येतो ते, उदा. सार्वत्रिक निवडणुकांनी. अशा व्यवस्थेत ज्यांच्या साह्याने राज्यकर्त्यांना बडतर्फ करता येईल अशा संस्था असतात, आणि त्या संस्थांचा विध्वंस राज्यकर्ते करू शकणार नाहीत इतक्या मजबूत सामाजिक परंपरा असतात. दुसर्या् प्रकारात शासनाचा शेवट शासित केवळ यशस्वी क्रांतीनेच करू शकतात, म्हणजे अर्थात् बहुधा नाहीच. पहिल्या प्रकारच्या शासनाला ‘लोकशाही आणि दुसर्याक प्रकारच्या शासनाला ‘हुकूमशाही किंवा जुलूमशाही हे शब्द मी सुचवितो. त्या शब्दांच्या पारंपरिक अर्थाशी हा भेद स्थूलमानाने जुळणारा आहे असे मला वाटते.
वरील दोन संज्ञांचा उपयोग मी सुचविल्याप्रमाणे केला तर लोकशाही व्यवहाराचे तत्त्व म्हणजे ज्यांच्या साह्याने जुलूम टाळता येईल अशा संस्था निर्मून त्यांचा विकास व रक्षण करणे. …. या तत्त्वात असे व्यंजित होते की लोकशाहीत स्वीकारलेले सदोष धोरणही व्युत्पन्न आणि शुभकारी जुलूमशाहीपुढे मान तुकविण्यापेक्षा श्रेयस्कर असते.