चर्चा – अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म

(१)
मा. संपादक “आजचा सुधारक
स.न.वि.वि.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म” या आपल्या जुलैच्या अंकातील लेखानिमित्ताने हे पत्र. (याच विषयी मी आपल्याला पूर्वीही एक पत्र लिहिले होते जे प्रसिद्धीसाठी नव्हते.) मी आजचा सुधारकचा नियमित वाचकव उत्साही प्रचारक आहे हे आपल्याला ठाऊकआहेच. आपल्याविषयी संपादक म्हणून माझ्या मनात आदराची भावना आहे. परंतु आपला हा लेख वाचून मात्र प्रथमच आपल्या विवेकवादाविषयी शंका आली. या लेखाच्या निमित्ताने शिक्षण, पर्यावरण व एकूणच सुधारकच्या अलीकडील अंकांबाबत माझे मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी लिखाणाची शैली थोडी पसरट आहे, माफी असावी.
– डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सा. साधनेतील लेखाविषयी लिहिताना तुम्ही त्या लेखात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे हे म्हटले याचे समाधान वाटले.
– श्री. नानासाहेब गोरे यांचे धर्मविरोधी मार्गदर्शन ज्यांना प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटते त्यापैकी एक कार्यकर्ता मीही आहे. समाजपरिवर्तनाच्या कामात असलेले वीस एक कार्यकर्ते मित्र असे प्रश्न विचारीत आहेत.
– तुम्ही धर्म कशाला म्हणता याविषयी स्पष्ट व सविस्तर लिखाण करण्याची गरज आहे असे वाटते. कारण आपल्या लेखात काही सरधोपट विधाने आढळतात.
– तुम्ही म्हणता की धर्म हा पशूसारखा आहे, म्हणजे धार्मिक माणूस हा कोणत्या तरी एका विशिष्ट धर्माचाच असू शकतो : हिंदू, मुसलमान इ. पुढे त्याचे स्पष्टीकरण देत तुम्ही म्हणता की जो वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत मानीत नाही तो हिंदू नाही.
– मला प्रश्न पडतो की तुम्ही कबीराला कोणत्या धर्माचा मानता?का तो अधार्मिक समजता?सूफी संतांचे काय?कर्नाटकात शिशुनाळ शरीफ नावाचा एक संत लोककवी होऊन गेला. कुराण व वीरशैव परंपरेवर आधारित लोकगीते गात खेडोपाडी त्याने लोकजागृती केली. त्याचे काय? माझे अनेक कामगार व खेड्यातील कष्टकरी मित्र स्वतःला हिंदू/मुसलमान व धार्मिक समजतात. पण ना त्यांना सीतेवर (शूर्पणखा, शंबूकावरही) अन्याय करणार्याा रामावर प्रेम आहे ना ते म. पैगंबरांचा शब्द अखेरचा मानतात. या मंडळींना कोणत्या धर्माचे म्हणून तुम्ही ओळखता?का अशा सामान्यांचा विचार तुमच्या दृष्टीनी गैरलागू आहे?
– डॉ. दाभोळकरांना तुम्ही वकिली प्रश्न विचारलाय की मानवतावाद अलीकडची संकल्पना आहे ती प्राचीन धर्मात कोठून येणार? मला प्रश्न पडतो “हिंदू धर्म” ही संकल्पना किती जुनी आहे?वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत या (तुमच्या मताप्रमाणे) हिंदू धर्म ग्रंथात हिंदू शब्द आहे का?मग त्या वेळचे धार्मिक लोक कोणत्या विशिष्ट धर्माचे होते?
– धर्म म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर देव, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक हे येतात. पण माझ्या माहितीप्रमाणे बौद्ध धर्मात या गोष्टींना थारा नाही. बौद्धधर्म हा एक धर्म असल्याचे तुम्ही कबूल करता. मग याचा ताळमेळ कसा घालायचा?
– तुम्ही लिहिता, “बहुधा प्रारंभी नीती आणि धर्म एकत्रच होते. नैतिक कल्पनांचा उगम कदाचित धार्मिक जीवनातच झाला असेल. पण असे असले तरी धार्मिक प्रेरणा वेगळी आणि नैतिक प्रेरणा वेगळी…” पुढे तुम्ही लिहिता, “खरी धार्मिकता (अधोरेखित पत्रलेखकाचे) म्हणजे धर्मविधींचे पालन, मूल्यविवेकाचा अभाव आणि हिंसक आक्रमकता- निदान परधर्माच्या आक्रमणाविरुद्ध सदैव जागरूकता- ह्यातच सामावलेली आहे.”
आता माझ्या मनात प्रश्न येतात :
१. नैतिक व धार्मिक ही फाटाफूट केंव्हा व का झाली?म. ज्योतिबा फुले, म. गांधी, डॉ. आंबेडकर, डॉ. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यापासून ते आजच्या कष्टकरी सामान्य माणसात दिसणारी, वेगळी न करता येणारी धार्मिकता व नैतिकता पाहता अशी फाटाफूट करणे सयुक्तिक ठरते का?
२. खरी धार्मिकता म्हणजे तुम्ही म्हणता तीच कशी काय बरे. कोणताही संदर्भ न देता केवळ तुम्ही म्हणता म्हणून वाचकांनी ते स्वीकारावे अशी तुमची अपेक्षा आहे की काय?
– अंधश्रद्धा व धर्म याबाबत आपले विचार अगदीच प्राथमिक स्वरूपाचे एका पठडीतील वाटतात. आपण आदिवासी व बालक यांची बुद्धी अप्रगल्भ असल्याचे लिहिता त्यावेळी मती गुंग होते. (या संदर्भात बड रसेल यांचा एक गमतीदार किस्सा आठवतो : एकदा त्यानी लिहिले की अमीबा ते तत्त्वज्ञ ही प्रगती अद्भुत आहे. आणि लगेच मल्लीनाथी केली की असे अर्थात तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. अमीबाचे म्हणणे काय आहे कल्पना नाही! असो.)
– शिकलेल्या माणसाना सामान्यतः वाटतं की अशिक्षित माणसं अडाणी, धार्मिक व अंधश्रद्धाळू असतात. विज्ञानाचा स्पर्श झालेल्या सुशिक्षितांना तर विचारूच नये. तुमच्या लिखाणातून अलीकडे बरयाचदा याच प्रकारचा सूर सारखा उमटताना दिसतो. (याच कारणांनी मी आपल्याला एका ठराविक पठडीतले असे म्हटले.) पण माझा अनुभव वेगळा आहे. शिक्षणाचा व अंधश्रद्धेचा मला तसा संबंध दिसत नाही. गरीबी, लोकसंख्या, पर्यावरण, औद्योगिकीकरण, अर्थकारण या विषयी चर्चा करताना सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा प्रकर्षाने जाणवतात.
– उदाहरणार्थ खेड्यात काम करतानाचा एक नेहमीचा अनुभव मी दाखला म्हणून देत आहे. शेती कशी करावी या माझ्या प्रश्नाला सुशिक्षित मंडळींचे उत्तर आधुनिक पद्धतीने असे असते. आधुनिक म्हणजे वैज्ञानिक असे स्पष्टीकरण मिळते. वैज्ञानिक शेती म्हणजे काय असे विचारता ही मंडळी सांगतात की सुधारित बी-बियाणे, यंत्रसामुग्री, कृत्रिम पाणीपुरवठा, रासायनिक खते व कीटनाशकांच्या उपयोगाने केली जाणारी शेती ही वैज्ञानिक पद्धतीची उत्तम शेती. मग माझा प्रश्न असतो की या वैज्ञानिक शेतीने (१) सातत्याने उत्पादन वाढ होतीय का?(२) मातीचा कस वाढतोय/टिकतोय का?(३) आर्थिकदृष्ट्या ती किफायतशीर आहे का?(४) गांडूळ व अन्य सूक्ष्म जीवाणूंची वाढ होतीय का?या साच्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच नकारात्मक मिळतात. अशा रीतीने ही तथाकथित वैज्ञानिक शेती चिरंजीवी नसल्याचे लोकांच्या लक्षात येते. परंतु विज्ञानाच्या प्रचंड सामर्थ्यावर (अंधश्रध्दा असलेली सुशिक्षित मंडळी शेती ‘वैज्ञानिक पद्धतीनी करावी असे बिनधास्तपणे सांगून मोकळे होतात.
– अशा प्रकारच्या शिक्षितांच्या अंधश्रद्धांबाबत (याना वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणण्याचा मला मोह होतो) तुम्ही तक्रार केल्याचे आठवत नाही. असे का बरे असावे?
– या उलट तुम्ही जूनच्या मुखपृष्ठावर रसेल यांचा एक परिच्छेद ‘निसर्गाकडे परतचला!’ उद्धृत करून तुमचीही यंत्रांच्या साम्राज्यावर अंधश्रद्धा असल्याचे सूचित केलंय की काय असे वाटते.
– विज्ञान तंत्रज्ञानाची जी प्रगती गेल्या दोन दशकात झाली ती पाश्चिमात्य पद्धतीच्या हिंसक व निसर्गावर कुरघोडी करणार्यान विज्ञान तंत्रज्ञानाची झाली. यामुळे पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात नाश घडून येऊन जगातील गरीबी, बेकारी व विषमता यांची प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसते.
– विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपयोगात विवेकवाद न वापरल्याने जीवसृष्टीच्या शारीरिक व्यवस्थेबरोबरच मानवाच्या सांस्कृतिक, सामाजिक व्यवस्थेवरही अत्यंत विपरीत परिणाम झालेले स्पष्टपणे जाणवते. जगात सर्वत्र शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार होत असताना विवेकवाद मात्र वृद्धिंगत होताना दिसत नाही. उलट संकुचितता, धार्मिक असहिष्णुता, अलगतावाद, प्रादेशिकवाद, वंशभेद, जातीयता व फंडामेंटालिझम यांची वाढच झालेली दिसते. असे का झाले याचा विचार केला पाहिजे असे म्हणणार्यांेना तुम्ही म्हणता :- “… त्यांचा विवेकवादच कमी पडतो आहे …” वगैरे. हे आपले म्हणणे धार्मिक मंडळी देवाच्या अस्तित्वाबाबत सांगताना “तुम्ही पंचेंद्रियांच्या मर्यादेत अडकल्यामुळे तुम्हाला हे अतीत समजूच शकणार नाही” या चालीचे वाटते.
– शूमाकर, एरिक फ्रॉम, फ्रिजॉफ काप्रा सारखी वेगवेगळ्या क्षेत्रातील विवेकवादी विचारवंत मंडळी एकीकडे व दाभोलकर व माझ्यासारखी कार्यकर्ते मंडळी दुसरीकडे म्हणत आहेत की “औद्योगिक क्रांतीतून सार्वत्रिक समृद्धी” हा जुना मंत्र आता खोटा ठरला असल्याने आपण दुसर्याऔ पर्यायांचा विचार केला पाहिजे.
– व्यापक जनतेचा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक सहभाग असलेली समाजव्यवस्था, माणसावर हुकूमत गाजवणारी नव्हे तर त्याचे काबाडकष्ट कमी करणारी यंत्रसामुग्री, निसर्गाचे शोषण करणारी नव्हे तर पर्यावरणाशी दोस्तीचे नाते बांधणारी तंत्रज्ञानपद्धत यांचा शोध घेण्याची गरज आहे. (रसेल, मार्क्स ही मंडळी थोर दृष्टे होते खरे, पण त्यांच्या मर्यादाही तीव्रतेने उघड होताहेत त्या स्वीकारणे विवेकवाद्यांना मुळीच जड जाऊ नये!)
– सार्या्च गोष्टींचे व्यापारीकरण झालेल्या आजच्या काळात नीतिमूल्यविचार समृद्ध करणार्या! संस्कृतीची जोपासना करण्याची गरज आहे. या संदर्भात चक्क आदिवासींच्या पासूनसुद्धा आपल्याला बरेच शिकता येण्यासारखे आहे.
– अणुविकिरणाची भयानकता व अणुभट्टीच्या अपघातातून संभाव्य असा सृष्टीचा नाश स्पष्टपणे दिसत असताना अणुशक्तीला पर्याय नाही, तीच स्वच्छ व स्वस्त आहे असे सांगणाच्या विज्ञान्यापेक्षा पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या पंचमहाभूतांमुळे मी आहे तेव्हा त्यांच्याविषयी मी कृतज्ञ राहिले पाहिजे म्हणणारा व पर्यावरणाचा भाग होऊन जीवन जगणारा आदिवासी मला जास्त नीतिमान व विवेकी वाटतो.
– पत्र फारच लांबले तेव्हा शिक्षणाविषयी पुन्हा केव्हातरी लिहीन. परंतु डॉ. नरेन्द्र तांबेंच्या अमेरिकन शिक्षणाविषयीच्या लेखासंदर्भात (ते लिहितात “आज जगाला अमेरिकेच्या उच्च शिक्षणाचे आकर्षण वाटते ते योग्य आहे”) एक किस्सा सांगण्याचा मोह अनावर होतोय : एका थोर शिक्षणतज्ज्ञाने खेड्यातील गरीबांसाठी एक शाळा काढली. शेतकरी आपल्या मुलांना शाळेत पाठवेनात. शिक्षण तज्ज्ञाने एका शेतकर्याीला गाठून विचारले, ‘का रे बाबा, तू मुलाला शाळेत का पाठवत नाहीस?’ शेतकर्यारने जबाब दिला “साहब, सच कहूं? आज की शिक्षा भी क्यों शिक्षा है! आज की शिक्षा लेनेसे : थोडा पढा, काम छोड़ा। जादा पढा, गाँव छोडा। बहोत पढा देश छोडा। ऐसा होता है। इसलिये मैं मेरे बच्चों को स्कूल नही भेजता हूँ ।”
-“बालादपि सुभाषितं ग्राह्य” असे मोकळे मन ठेवणे ही विवेकवादाची सुरूवात आहे असे मी मानतो. कळावे, प्रेम असावे ही विनंती.
आपला
दिलीप कामत
भातकांडे चाळ म. गांधी मार्ग, वाढीव टिळकवाडी बेळगाव ५९० ००६

(२)
श्री. रा. दि. य. देशपांडे ह्यांस,
आजचा सुधारकच्या जुलै ९४ च्या अंकात तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म ह्या शीर्षकाच्या लेखात श्री नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या साधनेतील काही विचारांवर जे भाष्य केले आहे त्याने आमच्यासारख्या वाचकांचा गोंधळ आणखीनच वाढला. साधना साप्ताहिक पाहण्याचा मला योग फारसा येत नाही त्यामुळे श्री. दाभोलकरांचा लेख मी पाहिलेला नाही. पण मला पडलेले प्रश्न तुमच्या मांडणीविषयी आहेत म्हणून हे पत्र लिहिण्याचे धारिष्ट्य
करीत आहे.
(१) डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे असा तुमचा पक्ष दिसतो. लोकांकडे नवा विचार घेऊन जायला हवा, घेऊन जाता येते हीही श्रद्धाच आहे. ती “डोळस श्रद्धा” नसती तर आपण सगळे निरनिराळ्या प्रपंचांत गुंतलो नसतो. कारण माणूस आधुनिक होणे शक्य नाही आणि मरीआईला बोकड देणारा “अंधश्रद्ध” आणि तथाकथित विवेकवादी ह्यात फरक करणेच गफलतीचे आहे असं गंभीरपणे मांडणारी मंडळी सहज सापडतील.आपली “डोळस श्रद्धा असल्या निहिलिझम् चा बंदोबस्त करण्यात उपयुक्त ठरते.
हुतात्मा फाशी जातो, आनंदाने जातो हेही डोळस श्रद्धेचेच लक्षण आहे. नाहीतर आपला जन्म कोण कशाला वाया घालवील? त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे की गोडसेही आपले आयुष्य फेकून देतो, बाबू गेनूही तेच करतो. दोघेही श्रद्धेपायी आयुष्याच्या त्यागाला तयार होतात. पण गोडशाचा त्याग डोळस श्रद्धेत बसणारा नाही, बाबू गेनूचा आहे. अशा प्रकारे फरक आपण करीत असतो तेव्हाच आपण “डोळस श्रद्धा” ही कोटी आकलनीय व स्वीकार्य मानलेली असते.
(२) पृ. १०० वर ईश्वर ते पुनर्जन्म अशी मोठी यादी तुम्ही दिलेली आहे, ह्या कल्पनांना कसलाही पुरावा नाही असे तुम्ही म्हटले आहेत. त्याविषयी मतभेद होण्याचे कारण नाही. पण धर्म/दर्शने हे बघू शकत नाहीत असे मानण्याचे काय कारण आहे?सेमिटिक धर्माचे मला निश्चितपणे सांगता यायचे नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ‘स्याद्वादमंजरी’ ह्या जैनदर्शनातील ग्रंथात जगन्निर्मात्या व जगन्नियंत्या ईश्वराची संकल्पना नाकारलेली आहे. (टॉमस ह्यांनी केलेले भाषांतर, १९६०, पृ. २९-३६. ह्याचा उल्लेख पद्मनाथ जैनी ह्यांच्या ‘जैन पाथ ऑफ प्यूरिफिकेशन ह्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत पृ. ८९ वर आला आहे.) जैन हा धर्म आहे हे तुम्ही मान्य कराल.‘धर्म, किमानपक्षी भारतीय धर्म, काही दर्शने तरी ईश्वरादि अवडंबर मानीत नव्हते. आधुनिक विवेकवाद्यांनी भारतीय दर्शनांचा पुरेशा काळजीपूर्वक (रिगरसली) अभ्यास व समाचार केलेला/घेतलेला नाही व आजही त्यांना ती गरज भासमान होताना दिसतनाही. परिणामी अंधश्रद्धावाद्यांना धर्माचे पीठ रिकामे राहते हे नाकारणे कठीण दिसते. .
(३) पृ. १०१ वर “जो वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत मानीत नाही तो हिंदु नाही” असे तुम्ही विधान केले आहे. त्याला काय आधार आहे?पुनः मध्यपूर्वेतील धर्माचे मला काही सांगता येणार नाही, पण ‘हिंदूची व्याख्या आपल्या शास्त्रांनी केलेली आहे असे वाटत नाही. तो प्रपंच अलिकडला आहे. त्यातही टिळकांची व्याख्या व ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त त्याज्य मानणाच्या सावरकरांची व्याख्या निराळी आहे. सारांश धार्मिकतेवर हल्ला करताना तुमचा दृष्टांत वापरायचा तर तुम्ही सगळे पशू एकच मानले आहेत. प्रत्यक्षात ते निराळे आहेत. हिंदू समाजात माणूस जातिबाह्य ठरतो, धर्मबाह्य ठरतो असे वाटत नाही व हा फरक महत्त्वाचा आहे.
(४) धार्मिकतेची सांगड फक्त अंधश्रद्धेशी घालणे खरोखरच रास्त आहे काय?कला साहित्यादि उन्मेषही धार्मिकतेने सिद्ध केले होते. ते नाकारण्याने शेवटी नाकारणान्याला धार्मिकता खाऊन टाकते हा पूर्व युरोप व स्तालिनवादी राजवटींचा अनुभव आहे. आपले विवेकवादी धार्मिकतेच्या बाबतीत स्तालिनच्या मार्गाने चालले आहेत. ह्याचा अर्थधर्माला शरण जावे” असा होत नाही. धर्मभावनेची अनित्यता किंवा तिचे द्वंद्वात्मक स्वरूप ध्यानात घेणे जास्त महत्त्वाचे आहे व ते झालेले नाही हे खेदाने म्हणावे लागते.
(५) हा प्रतिवाद काहीसा ‘काय म्यांरें पामरे बोललावीं उत्तरे’ असा आहे ह्याची कल्पना आहे. सबब क्षम्यताम् मे ही विनंती.
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
१५, उत्तराखण्ड जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
नवी दिल्ली – ११० ०६७.

चर्चा
अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म
दि. य. देशपांडे
आजचा सुधारक निघाल्यापासून गेली चार-साडेचार वर्षे मी विवेकवादाची जी मांडणी केली आहे तिच्यावर अनेक आक्षेपकांनी टीका केली आहे. ही टीका करणारे सर्व लोक विवेकवादाचे विरोधक होते. पण या अंकात प्रसिद्ध झालेला एक हल्ला-श्री दिलीप कामत यांचा – विवेकवादी गोटातूनच झाला आहे. आजचा सुधारकमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेल्या काही लेखांमुळे, आणि विशेषतः जुलै अंकातील अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म यामुळे त्यांना माझ्या विवेकवादाविषयी शंका वाटू लागली आहे, आणि ती त्यांनी निर्भीडपणे स्वच्छ आणि रोखठोक शब्दांत व्यक्त केली आहे. माझ्यावर होणार्याव वैचारिक हल्ल्यांचे मी नेहमी स्वागतच करतो, कारण त्यांना उत्तरे देण्याच्या निमित्ताने मला माझे विचार तपासता येतात आणि विवेकवादाची मांडणी अधिक निर्दोष आणि निर्विवाद करण्याची संधी मिळते. म्हणून मी श्री दिलीप कामत यांच्या टीकेचे स्वागत करतो, एवढेच नव्हे तर त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
आजचा सुधारकच्या अलीकडील काही अंकांमुळे श्री कामत यांना माझा विवेकवाद शंकास्पद वाटू लागला आहे असे ते म्हणतात. आजचा सुधारकातील जी प्रतिपादने त्यांना आक्षेपार्ह वाटली त्यांची त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. त्यांच्याकडे आता वळतो.
त्यांनी दिलेले पहिलेच उदाहरण म्हणजे माझी धर्माची व्याख्या. ती व्याख्या सरधोपट आहे असे ते म्हणतात. धर्माचे स्वरूप स्पष्ट करताना मी असे म्हटले आहे की धर्माचे अपरिहार्य अंग म्हणजे ईश्वर, आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत, पापपुण्य, मोक्षर्यांतपैकी सर्वांवर किंवा निदान बहुतेकांवर अढळ श्रद्धा. हे प्रतिपादन त्यांनाबरोबर वाटत नाही, आणि त्याला अपवाद म्हणून ते बौद्ध धर्माचा उल्लेख करतात. बौद्ध धर्मात ईश्वर आणि आत्मा यांना स्थान नाही असे मानले जाते. पण त्या धर्माला पुनर्जन्म आणि या जन्मातील कर्माची फळे भोगण्याकरिता तो मिळतो या गोष्टी मान्य आहेत. याच्यापुढे जाऊन मी असेही म्हणू शकतो की ज्याअर्थी बौद्ध धर्मात कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म यांना मान्यता आहे त्याअर्थी या विश्वाचे नैतिक नियमन होते असे तो मानतो असे म्हणावे लागते, कारण एरव्ही आपल्या बर्यायवाईट कर्माची योग्य (म्हणजे गोड किंवा कटू) फळे आपल्याला मिळतात असे म्हणता आले नसते. आता हे विश्वाचे नियमन ईश्वर करतो असे मानले काय किंवा ते स्वभावतःच, नैसर्गिक नियमांनीच होते असे म्हटले काय, त्यातील श्रद्धा एकच आहे. आणि आत्मा मानला नाही तर पुनर्जन्म कोणाचा होतो हेही एक कोडे आहे. तेव्हा बौद्ध धर्म माझ्या व्याख्येत बसत नाही असे जे म्हटले जाते ते बरोबर नाही हे मान्य करावे लागेल.
मी माझ्या लेखात असे म्हणालो आहे की अस्तित्वात असणारा धर्म कोणता तरी विशिष्ट धर्म असतो, केवळ सामान्य धर्म नसतो. त्यावर श्री कामत विचारतात की तुम्ही कबीराला कोणत्या धर्माचा मानता?माझे उत्तर असे आहे की कबीर हा एका नव्या समन्वयवादी धर्माचा प्रवर्तक होता, जसा अकबरही असाच एका नव्या धर्माचा- ‘दीन ए इलाही या धर्माचा प्रवर्तक होता. या दोन्ही धर्मांना फारसे अनुयायी मिळाले नाहीत आणि ते लवकरच नामशेष झाले ही गोष्ट निराळी. गांधीजींबद्दलही असेच म्हणता येईल. ईश्वरादि गोष्टींवरील श्रद्धा वरील तिन्ही धर्मात मान्य होती.
मी आपल्या लेखात असे म्हटले आहे की प्रारंभी धर्म आणि नीती यांची मुळे एकमेकांत गुंतलेली होती. परंतु पुढे नीतीची प्रेरणा आणि धर्माची प्रेरणा यांचे स्वरूप हळूहळू स्पष्ट झाल्यानंतर ह्या प्रेरणा अगदी स्वतंत्र आहेत हे लक्षात आले. या दोन प्रेरणांचे स्वरूपआणि त्यांच्यातील भेद माझ्या ‘विवेकवाद या लेखमालेतील ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’ या लेखात (आ. सु. जानेवारी १९९१) विस्ताराने मांडला आहे. तो लेख श्री कामतांनी पाहावा अशी त्यांना विनंती आहे. त्या विवेचनाचा सारांश सांगायचा तर धर्मपालनाचा हेतू ईश्वरप्राप्ती, मोक्ष, जन्म-मरणाच्या फेर्याचतून सुटका किंवा सद्गती हा असतो, परंतु नीतीची प्रेरणा कर्तव्याची, म्हणजे एखादे कर्म आपले कर्तव्य आहे म्हणून, अन्य कोणत्याही हेतूने नव्हे, करण्याची. धर्माने सांगितलेली कर्मे आणि नीतीने सांगितलेली कमें ही क्वचित् एकच असतात. उदा. खरे बोलावे, अहिंसा पाळावी, इ. परंतु एकच कर्म धर्माने आणि नीतीने सांगितलेले असले तरी ते करण्याचे हेतू वेगळे असतात. धर्मकृत्य करायचे कारण ते धर्मग्रंथाने सांगितलेले असते म्हणून, आणि शिवाय ते केल्याने पुण्य लागते आणि मरणोत्तर सद्गती मिळते. म्हणजे धर्माचे आवाहन स्वार्थाला असते. परंतु नीती नीतीकरताच पाळावयाची असते, आपल्याला (स्वतःला) काही लाभ मिळेल म्हणून नव्हे. सदाचार हेच सदाचाराचे पारितोषिक असते (Virtue is its own reward). हा सर्व विचार वर उल्लेखिलेल्या लेखात, आणि शिवाय ‘उपयोगितावाद – १ व २ (आ. सु. मे व जून १९९१), व ‘नैतिक मूल्याविषयी आणखी थोडेसे (डिसेंबर १९९१) या तीन लेखांत आला आहे. त्यांकडे मी वाचकांचे लक्ष आकृष्ट करतो.
जुलै १९९४ च्या अंकातील लेखात मी असे म्हटले आहे की ‘खरी धार्मिकता म्हणजे धर्मविधींचे पालन, मूल्यविवेकाचा अभाव आणि हिंसक आक्रमकता-निदान परधर्माच्या आक्रमणाविरुद्ध सदैव जागरूकता-ह्यातच सामावलेली आहे. या संबंधात श्री कामत विचारतात की ही खरी धार्मिकता हे आम्ही का मानावे?त्याचे उत्तर सोपे आहे. धर्मसंस्थापकांचे, धर्मग्रंथांचे, धर्माधिकार्यांाचे म्हणणे तसे आहे म्हणून. धर्मविधींचे पालन बिनतक्रार, कोणताही प्रश्न न विचारता केले पाहिजे; धर्मग्रंथात सांगितलेले तेच मूल्य, बाकीचे सगळे त्याज्य, आणि जमेल तितका भल्याबुच्या मार्गांनी धर्मविस्तार-हेच ख्रिश्चन, इस्लाम (आणि धर्मविस्तार वगळता) हिंदू या धर्माच्या शेकडो, हजारो वर्षांच्या इतिहासाचे सार नाही काय?
श्री कामत यांची एक तक्रार अशी आहे की माझ्या अलीकडील लिखाणात अशिक्षित किंवा आदिवासी लोकांबद्दल अनुदार दृष्टिकोन व्यक्त होताना दिसतो. उदा. आदिवासीआणि बालके यांची बुद्धि अप्रगल्भ असते असे मी लिहिलेले वाचून ‘मती गुंग होते असे ते लिहितात. परंतु ते लिहिताना मला काय अभिप्रेत होते ते स्पष्ट करतो. मनुष्याच्या बुद्धीचे सामर्थ्य, त्याचा IQ, त्याच्या शिक्षणाने वाढत नाही असे म्हणतात ते खरे आहे. पण कुणाही मनुष्याची जी मूळ बौद्धिक ताकद असते ती पूर्णपणे व्यक्त होण्याकरिता, capacity चे ability त रूपांतर होण्याकरिता, तिला उत्तरोत्तर अधिकाधिक कठीण कामे करण्याच्या संधी मिळाव्या लागतात. आइन्स्टाइन किंवा रामानुजन जर एखाद्या आदिवासी कुटुंबात जन्मले असते आणि गुरे वळण्यात त्यांचे जीवन व्यतीत झाले असते तर त्यांची प्रतिभा अव्यक्तच राहिली असती. आदिवासी आणि बालके यांची बुद्धी अप्रगल्भ असते असे मी म्हणालो ते या अर्थाने.
श्री कामत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता मी वर केलेल्या अशिक्षित आणि शिक्षित बुद्धींमधील भेदाचा उपयोग करतो. ते विचारतात की आरंभी परस्परांत गुंतलेल्या धार्मिक आणि नैतिक प्रेरणांची फाटाफूट केव्हा व का झाली?त्याला उत्तर असे आहे की जेव्हा हे लक्षात आले की देवधर्म न मानताही मनुष्य नीतिमान असू । शकतो, तेव्हा ही फाटाफूट झाली, आणि ती झाली याचे कारण त्या प्रेरणा वेगळ्या आहेत हे काही बुद्धिमंतांच्या लक्षात आले. ‘कष्टकरी सामान्य माणसांत दिसणारी व वेगळी करता न येणारी धार्मिकता व नैतिकता पाहता अशी फाटाफूट करणे सयुक्तिक ठरते काय?’ असाप्रश्न ते विचारतात. त्याला माझे उत्तर असे आहे की या प्रेरणा नुसत्याच भिन्न आहेत असे नाही. त्यांपैकी एक पूर्णपणे निराधार अशा केवळ मानीव गोष्टींवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे अंधश्रद्धा आहे, आणि ती एक हिणकस, सुबुद्ध मनुष्याला न शोभणारी गोष्ट आहे. ती तशी आहे हे जर आपल्या लक्षात आले असेल तर तिच्यापासून मुक्त होणे ही निश्चितच फायद्याची गोष्ट होईल. त्या प्रेरणा वेगळ्या आहेत, एवढेच नव्हे तर त्या स्वतंत्रआहेत ही गोष्ट बुद्धिवंतांच्याही लक्षात यावयास शतके नव्हे सहस्त्रके लागली, कारण त्या विचारात बरीच सूक्ष्मता आहे आणि ती बालके आणि आदिवासी माणसे यांच्या अशिक्षित बुद्धीस, आकलनास दुष्कर वाटणार अशी माझी समजूत आहे. पण असे म्हणण्यात अशिक्षित आणि आदिवासी माणसे यांचा अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता.
श्री नानासाहेब गोरे यांचे धर्मविरोधी मार्गदर्शन प्रश्नचिन्हांकित करावेसे वाटते असे म्हणणार्यात लोकांना उत्तर म्हणून मी जुलै अंकातील लेख लिहिला. त्या लेखात मी मांडलेला विचार प्रामुख्याने हा होता की अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल, त्यातून त्यांना सुटका नाही. या माझ्या लेखातील काही प्रतिपादनावर श्री कामत यांनी टीका केली आहे, आणि त्या टीकेला मी आतापर्यंत माझ्या समजुतीनुसार उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी त्या लेखात किंवा अन्यत्रही व्यक्त न केलेली अनेक मते माझ्या माथी मारून त्याबद्दल श्री कामतांनी आपल्या लेखाच्या उत्तरार्धात मला दोष दिला आहे. उदा.‘वैज्ञानिक’ शेतीवर मी कोठेही लिहिलेले नसतानाही मी तिचा समर्थक आहे असे गृहीत धरून श्री कामतांनी माझ्यावर झोड उठविली आहे. तसेच आजचा सुधारकच्या जून अंकाच्या मुखपृष्ठावर आम्ही रसेल यांचा जो उतारा छापला आहे त्यावरून माझी ‘यंत्रांच्या साम्राज्यावर श्रद्धा आहे असे सूचित होते असे ते म्हणतात. माझ्या लेखातील ‘अंधश्रद्धानिर्मूलनवाद्यांचा विवेकवादच कमी पडतो आहे हे वाक्य मी कशाला उद्देशून लिहिले त्या संदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष करून ते लिहितात : ‘तंत्रज्ञानाच्या उपयोगात विवेकवाद न वापरल्याने मानवाच्या सामाजिक व्यवस्थेवरही अत्यंत विपरीत परिणाम झालेले दिसतात. . . . संकुचितता, धार्मिक असहिष्णुता, अलगतावाद, प्रादेशिकतावाद, वंशभेद, जातीयता आणि फंडामेंटलिझम यांची वाढच झालेली दिसते. असे का झाले याचा विचार केला पाहिजे असे म्हणणार्यांदना तुम्ही म्हणता की “त्यांचा विवेकवादच कमी पडतो आहे.” हे। म्हणणे वाचकांचा गैरसमज निर्माण करणारे आहे.’
अनिर्बध औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा झालेला आणि होत असलेला प्रचंड नाश, वैज्ञानिक शेतीच्या प्रयोगातील वर्तमान लाभासाठी भविष्यातील अनिवार्य मोठ्या हानीकडे होत असलेले दुर्लक्ष, इत्यादि गोष्टी चिंताजनक नाहीत असे मी समजतो असे त्यांनी गृहीत धरले आहे आणि त्या गोष्टी ध्यानात घेण्याचा उपदेश केला आहे. मनुष्य सुशिक्षित झाला की विवेकवादी होतो अशी माझी समजूत असल्याचेही ते गृहीत धरतात. पण मी तसे मानीत नाही. आपल्या शाळा-कॉलेजांतून विवेकवाद शिकविला जात नाही, आणि आपल्या समाजावरील श्रद्धावादी विचाराच्या पगड्यामुळे शिक्षित आणि अशिक्षित यात विवेकवादाच्या दृष्टीने फारसा भेद नसतो हे खरेच आहे. विज्ञानाचे प्राध्यापकही श्रद्धाळू असतात असे आढळून येते. सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेबद्दल मी लिहीत नाही अशी श्री कामतांची तक्रार आहे. त्याबद्दल लिहिण्याचा प्रसंग आला नाही हे खरे आहे. पण सुशिक्षित विवेकवादी असतात असेही मी कोठे लिहिलेले नाही हे ते मान्य करतील.
लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘अणुविकिरणाची भयानकता व अणुभट्टीच्या अपघातातून संभाव्य असा सृष्टीचा नाश स्पष्टपणे दिसत असताना अणुशक्तीला पर्याय नाही… असे सांगणाच्या विज्ञानापेक्षा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांमुळे मी आहे, तेव्हा त्यांच्याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे म्हणणारा व पर्यावरणाचा भाग होऊन जीवन जगणारा आदिवासी मला जास्त नीतिमान व विवेकी वाटतो.’ सृष्टीचा नाश स्पष्टपणे दिसत असताना अणुशक्तीला पर्याय नाही असे म्हणणारे कोण वैज्ञानिक आहेत याची मला कल्पना नाही. असे कोणी असतील तर उघडच ठार वेडे असले पाहिजेत हे मान्य करण्यास मला हरकत वाटत नाही. पण पंचमहाभूतांविषयी मी कृतज्ञ राहिले पाहिजे असे मानणारा आदिवासी श्री कामतांना जास्त विवेकी व नीतिमान वाटतो असे ते म्हणतात त्याविषयी मात्र मतभेद नोंदविणे भाग आहे. पंचमहाभूते कोणी चेतन पदार्थ आहेत आणि त्यांनी मला निर्माण केले असे असते तर त्यांच्याविषयी कृतज्ञताबुद्धी बाळगणे समजू शकले असते. पण निर्जीव, अचेतन पंचमहाभूतांविषयी कृतज्ञताबुद्धी बाळगायची म्हणजे काय करायचे?माझी अशी समजूत आहे की कृतज्ञता ही केवळ उपकारकर्याविषयी बाळगायची भावना आहे, आणि उपकारकर्ता हा नेहमी चेतन पदार्थ असतो आणि त्याने हेतुतः उपकार केलेला असतो. त्यामुळे पंचमहाभूतांविषयी कृतज्ञताबुद्धी ठेवणे ही सर्वथा निरर्थक गोष्ट होईल. ती विवेकी आणि नीतिमान असणे तर फारच दूर राहिले.
माझ्या ‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखावर आणखी एक प्रतिक्रिया आली आहे – प्रा. गो. पु. देशपांडे यांची. त्यांनी माझ्या लेखाची दखल घेतली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
(१) श्रद्धा नेहमी अंधच असते या माझ्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करीत प्रा. देशपांडे म्हणतात की श्रद्धा डोळस असू शकते, आणि आपण लोकांकडे नवीन विचार घेऊन जातो यात ती व्यक्त होते. मला वाटते की असे म्हणताना प्रा. देशपांडे ‘श्रद्धा हा शब्द फारच शिथिल अर्थाने वापरतात. स्थूलमानाने बोलायचे तर ‘श्रद्धा’ हा शब्द इंग्लिश faith या शब्दाचा प्रतिशब्द आहे, आणि त्याची व्याप्ती ‘faith’ च्या व्याप्तीइतकीच आहे. ‘faith’ हा शब्द सामान्यपणे जे अतींद्रिय आहे, ज्याच्या सत्यत्वाचा पुरावा सापडत नाही,अशा गोष्टीवरील अढळ विश्वासाला लावतात. या अर्थी श्रद्धा डोळस कशी असू शकेल ते मला कळत नाही.
आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ‘श्रद्धा’ या शब्दाचा दोन भिन्न क्षेत्रांत उपयोग होतो, आणि त्या दोन ठिकाणी त्यांचे अर्थही भिन्न असतात. त्या श्रद्धेचे एक क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र. हे क्षेत्र विधानांचे क्षेत्र आहे, आणि म्हणून या क्षेत्रातील श्रद्धेचा अर्थ एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास. उदा. ‘ईश्वर आहे, किंवा आपल्या कृतकर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात. श्रद्धेचे दुसरे क्षेत्र म्हणजे मूल्यांचे क्षेत्र, उदा.’अहिंसेवर माझी श्रद्धा आहे याचा अर्थ अहिंसा सदैव पाळली पाहिजे, एवढेच नव्हे तर मी ती पाळीन असा निर्धार असा आहे. या दुसर्यार अर्थी श्रद्धाविषय एखादा कर्मप्रकार असतो, म्हणजे तिचे क्षेत्र ज्ञानाचे नव्हे, तर कर्माचे क्षेत्र असते. या दुसर्या‍ अर्थी ‘श्रद्धा शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे इष्ट होईल. ही दुसरी निष्ठा चिकित्सक किंवा डोळस असू शकेल. (ह्या विषयाच्या सविस्तर विवेचनाकरिता आजचा सुधारकच्या मार्च ९१ अंकातील ‘श्रद्धेचे दोन प्रकार – विधानांवरील आणि मूल्यांवरील’ हा लेख पाहावा.) आता मला श्रद्धा या शब्दाने फक्त पहिल्या प्रकारची श्रद्धा अभिप्रेत आहे.
(२) धर्माची लक्षणे म्हणून मी जी एक मोठी यादी दिली आहे तिच्यापैकी ईश्वराचे अस्तित्व न मानणारे अनेक धर्म आहेत, उदा. जैन धर्म, असा आक्षेप प्रा. देशपांडे यांनी घेतला आहे. हा आक्षेप आणि श्री दिलीप कामत यांचा बौद्ध धर्म ईश्वर मानीत नाही या आक्षेपासारखाच आहे, आणि त्याला मी बौद्ध धर्माच्या संदर्भातले उत्तर दिले तेच उत्तर जसेच्या तसे लागू आहे. जैन धर्म आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत मान्य करतो, आणि या गोष्टी मान्य करणे आणि ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे यात फारसा फरक नाही हे वर दाखविले आहे.
(३) प्रा. देशपांडे म्हणतात की आपल्या शास्त्रांनी हिंदू धर्माची व्याख्या केली नाही. ही गोष्ट खरी आहे. परंतु मूठभर चार्वाकवादी सोडले तर बाकीचे प्रचंड बहुसंख्य लोक वेद, उपनिषदे, गीता, निदान रामायण, महाभारत मानणारे होते ही गोष्ट सिद्ध करायची खरोखर गरज आहे काय?अडीच हजार वर्षांपूर्वी जेव्हा जैन आणि बौद्ध धर्माचा उदय झाला तेव्हा ते दोन धर्म आणि पूर्वापार चालत आलेला हिंदू धर्म यात संघर्ष झाला आणि त्यातून वेद मानणारे व वेद न मानणारे असे विभाजन झाले. पुढे जेव्हा आठव्या – नवव्या शतकांत मुसलमान लोक इथे आले तेव्हा त्यांच्या आक्रमणामुळे हिंदूंचे हिंदुत्व आणखी स्पष्ट झाले. या वेळेपर्यंत संस्कृतचे ज्ञान फक्त ब्राह्मणांपुरते मर्यादित राहिलेले असल्यामुळे भारतातील विविध भाषांतील रामायण आणि महाभारत या कथांवरून आणि विविध स्मृतीची धर्माधिकार्यांमकडून जी अंमलबजावणी केली जाई तिच्यातून हिंदू धर्माचे ज्ञान जनतेला होत होते. आजही शिवरात्र, एकादशी इ. च्या प्रसंगी तीर्थक्षेत्रांतून जी लक्षावधी नव्हे कोट्यवधी लोकांची गर्दी होते ती पाहिली की हिंदू मनुष्याचे मी जे वर्णन केले आहे ते बरोबर आहे हे मानावे लागेल.
(४) धार्मिकांनी अनेक प्रकारची कला आणि साहित्य निर्माण केले आहे हे खरेच आहे. ते नाकारण्याचे कारण नाही. अजिंठ्यांतील चित्रे, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पे, यांतील विषय धार्मिकच होते. ज्यावेळी सर्व जगच धार्मिक होते तेव्हा ही गोष्ट जीवनाच्या कला आणि साहित्य या अंगोपांगांत व्यक्त होणे अपरिहार्यच होते. पण त्यामुळे धर्माचा कला व साहित्य यांच्याशी खास संबंध आहे असे सिद्ध होत नाही. कलावंताची शैक्षणिक, सांस्कृतिक जी पाश्र्वभूमि असेल तिच्यातून त्याची कला आकार घेते. त्याची वाढ जर निधर्मी वातावरणात झाली तर त्याची कलाही निधर्मीच निपजेल.
पत्राच्या शेवटी ‘धर्मभावनेची अनित्यता आणि तिचे द्वंद्वात्मक स्वरूप ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे, व ते झालेले नाही असे खेदाने म्हणावे लागते असे जे प्रा. देशपांडे यांनी लिहिले आहे त्याचा अर्थबोध मात्र मला झाला नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.