गुणग्राहक
आदि शंकराचार्यांनी बादरायण व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. त्या शांकरभाष्यामधले तर्कदोष दाखवून व्यासांतर्फे शंकराचार्यांवर फिर्याद लावणारे केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे एक लोकविलक्षण पुरुष नागपुरात होऊन गेले. हा थोर तत्त्वज्ञ पूर्णतया इहवादी असूनसुद्धा जीवनाच्या ऐहिक बाजूबद्दल अत्यंत उदासीन होता. दप्तरींचे कपडे घालण्याचे काही ठराविक नियम होते. उन्हाळ्यात अमक्या तिथीपासून तमक्या तिथीपर्यंत खादीचा सुती सदरा आणि गांधी टोपी ते घालीत आणि बाकीच्या (हिवाळ्याच्या) दिवसांत घोंगड्याचा उनी सदरा आणि तसल्याच कापडाची काळी टोपी ते वापरीत. मग उन्हाळ्यातल्या किंवा हिवाळ्यातल्या त्या त्या दिवशी हवामान प्रत्यक्षात कितीही थंड किंवा गरम असो. त्यांच्या पोशाखातला कधीही न बदलणारा भाग म्हणजे त्यांचे खादीचे धोतर आणि त्यांच्या टोपीचा कोन. ती टोपी घोंगडीची काळी असो की पांढरी, ती त्यांच्या डोईवर कशीतरी आडवीतिडवी ठेवलेली असे.
धर्मरहस्य, धर्मविवादस्वरूप, उपनिषदर्थव्याख्या, जैमिन्यर्थदीपिका वगैरे धर्मविषयक ग्रंथ लिहिणारे, करणकल्पलता, The Astronomical Method and its Application to the Chronology of Ancient India, पंचांगचंद्रिका, भारतीय युद्धकालनिर्णय अशी पुस्तके ज्योतिषशास्त्रावर लिहिणारे. त्याचप्रमाणे होमिओपॅथींवर रुग्णपरीक्षण, चिकित्सापरीक्षण. Bodily Reaction and Examination of Different System of Therapeutic अशी अभ्यासपूर्ण, मूलगामी पुस्तके लीलया लिहिणारे ऋषितुल्य आचरणाचे व अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे के. ल. दप्तरी भाऊजी म्हणून ओळखले जात. ते त्यांच्या कुशाग्र आणि चतुरस्र बुद्धीसाठी जसे सगळ्यांना ठाऊक होते तसेच किंवा त्याहीपेक्षा जास्त ते विदेहीपणाच्या कोटीला पोचणाऱ्या विरक्तीसाठी आणि गबाळेपणासाठीही प्रसिद्ध होते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनाचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘विद्वद्रत्न’ म्हटले आणि १९४१ साली त्यांना Doctor of Letters ही सन्मान्य पदवी नागपूर विद्यापीठीने दिली.
भाऊजींचे बाळपण आणि तारुण्य बहुशः शिवदास कृष्ण (आण्णासाहेब) बारलिंगे ह्यांच्या सान्निध्यात गेले. वयाच्या अकराबारा वर्षांपासून महाविद्यालयीन किंवा विश्वविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत त्यांना अण्णासाहेबांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत ह्या विषयात सुरुवातीपासून माझेच शिक्षण त्यांना मिळाले आहे व पुढेही गणित आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांत तत्कालीन विश्वविद्यालयीन शिक्षणक्रमाप्रमाणे ते बऱ्याच प्रमाणावर माझे साहाय्य घेत असत’ असे खुद्द आण्णासाहेबांनी लिहून ठेवले आहे. १८८० साली जन्मलेले भाऊजी १९०५ साली B.L. झाले आणि हायस्कूल शिक्षकाची नोकरी सोडून वकिली करू लागले. त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाची हकीकत एका ठिकाणी आण्णासाहेबांनी लिहून ठेवली आहे. ती त्यांच्याच शब्दांत : “वरच्या प्रतीची, सचोटीची व सत्यास धरून वकिली केली असेल तर ती दप्तरींनीच. इतरांची त्याकरिता माय व्यालीच नाही!” चांद्यास वकिली करीत असता त्यांचेकडे एक विष खाऊन विहिरीत उडी घेतलेल्या बाईचा मुकद्दमा येऊन रु.५० फी स्वीकारल्यानंतर त्या बाईने आता आपल्या वकिलाजवळ खरे सांगावे म्हणून “म्यां जीव देल्ला’ असे सांगितल्याबरोबर सबंध फी परत करून बजाविले की, “मी तुमचा खोटा मुकद्दमा चालविण्यास वकील होऊ शकत नाही. नाहीतर फी फस्त करून हजर न राहणारे वकील शेकड्याने नव्हे, हजाराने मोजता येतील.”
“भाऊजींनी पुस्तकात काही विलक्षण वाचले की त्याची प्रचीती घेण्याकरिता ते हात धुऊन त्याच्या मागे लागत असत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी योगासंबंधी वाचले व लागलीच ह्या ब्रह्मांडाचे खरे रहस्य सांगणारा सद्गुरु कोठे सापडेल म्हणून विलंब न करता रात्रीतून घर सोडून गेले, ते दोनअडीच महिन्यांनी आमच्या जाहिरातीमुळे विजापुराहून अतिशय कृश व दाढी वाढविलेले असे परत आले व सद्गुरु मिळणे अशक्य आहे म्हणून सांगू लागले. लागलीच ते विश्वविद्यालयाच्या परीक्षेला बसले व वरचा नंबर घेऊन उत्तीर्ण झाले.”
“कायद्याच्या तत्त्वमीमांसेवरील त्यांचे भाषण श्रवणीय असे. त्यांचे भाषण ऐकून कित्येक न्यायाधीशांनी तोंडात बोटेच घातली. कायद्याच्या तत्त्वांचे त्यांचे ज्ञान इतके उत्तम होते. परंतु पक्षकारावर त्याचा प्रकाश पडत नसे, त्यामुळे त्यांची अर्थप्राप्ती फारच अल्प होत असे.” असेही अण्णासाहेब बारलिंगे ह्यांचे निरीक्षण आहे.
भाऊजी दप्तरींनी १९२१ साली गांधीजींच्या चळवळीत पडून वकिली सोडली ती नित्याकरिताच. त्यानंतर उदरभरणाकरिता ते वैद्यकी (होमिओपॅथी) करीत असत. तीत द्रव्य न मिळाले तरी त्यांची कीर्ती देशांतरी पोचली होती.
दादा धर्माधिकारींनी त्यांच्याविषयी ज्या आठवणी दिल्या आहेत त्याही विलक्षण आहेत. एकदा काकासाहेब कालेलकर आणि त्यांचे सहयोगी नीरा पिऊन कॉलऱ्याने आजारी पडले. काकासाहेबांचा विश्वास भाऊजींवर फार. त्यामुळे त्यांनी भाऊजींना बोलावून घेतले. भाऊजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण काकासाहेबांचा आजार काही दाद देईना. भाऊजी म्हणाले, “आता हे जगू शकत नाहीत. कोणत्याच औषधाचा परिणाम ह्यांच्यावर होत नाही. मला फार वाईट वाटते, पण इलाज नाही.” त्यावर दादा म्हणाले, “भाऊजी, तुमच्याजवळ औषध नसेल पण आयुर्वेदिक वा अॅलोपॅथिक उपचार करून पाहायला काय हरकत आहे?” त्याच्या उत्तरादाखल भाऊजी म्हणाले, “अहो. वैद्य आणि डॉक्टर काय कपाळ करणार? माझ्या औषधाने गुण आला नाही ह्याचा अर्थच असा की आता त्यांच्या प्रकृतीवर कोणत्याच औषधाचा परिणाम होणार नाही.” असे म्हणून भाऊजी निघून गेले. अॅलोपॅथिक उपचार सुरू केल्यामुळे काकासाहेब जगले आणि ९७-९८ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. ह्या संदर्भात आणखीही एक आख्यायिका आहे. एका लहान मुलीला आवरक्ताची हगवण लागली. भाऊजींना बोलावणे गेले. भाऊजी आले आणि त्यांनी उपचार सुरू केले. आजार काही हटेना. तो वाढतच चालला. मुलीच्या आईवडिलांना चिंता वाटू लागली. त्यांनी भाऊजींना विचारले, तर भाऊजी म्हणतात, “हे अंग्रेव्हेशन आहे – ह्याचा अर्थ असा की माझे औषध लागू पडले आहे – तिच्यात व्हायटॅलिटी असेल तर जगेल.” अखेरीस त्या मुलीच्या आईवडिलांनी भाऊजींचा नाद सोडला. डॉ. ना.भा.खऱ्यांना बोलावणे केले. त्यांच्या उपचारामुळे ती मुलगी जगली. भाऊजींच्या हट्टीपणामुळे त्यांच्या काही रोग्यांचे प्राण जाण्याची पाळी आली पण त्यांनी वाचवलेले रोगी अनेक आहेत आणि त्यांच्या घरी मोठ्या आदराने भाऊजींचा फोटो लावलेला आहे.
भाऊजींचे खरे मोठेपण त्यांच्या सुधारकी विचारांत दिसून पडते. १९३६ साली एक जाहीर सहभोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. साठबासष्ट वर्षांपूर्वीच्या त्या काळात स्पृश्यास्पृश्य भावना फार तीव्र होत्या. त्याबद्दल शास्त्रार्थ चालू होता. महात्मा गांधीनाही वैदिक ब्राह्मणांशी वादविवाद घडवून अस्पृश्यतेला शास्त्राधार नाही हे सिद्ध करण्याची गरज वाटत होती. अशा काळी हिंदू समाजात असलेला दुजाभाव आणि विषमता घालवून स्पृश्यास्पृश्यांत सामुदायिक आपलेपणा, प्रेम, ऐक्य, समता आणि संघटन प्रस्थापित करण्याच्या हेतूने भाऊजींच्या अध्यक्षतेखाली हा सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या सहभोजनात भाग घेतल्यामुळे भाऊजींवर आणि त्यांच्यासोबत इतर अनेकांवर घरच्या भटजींनी आणि नातेवाइकांनी बहिष्कार टाकला होता. त्यांच्याकडची नित्यनैमित्तिक धर्मकृत्ये बंद पाडली होती. बहिष्कृतांच्या बायकांनी कुलोपाध्यायांच्या सांगण्यावरून “प्रायश्चित्ते घ्या आणि मोकळे व्हा” असे टुमणे लावले. अशा बहिष्कृत घरी पौरोहित्य करण्यासाठी एक पुरोहितही भाऊजींनी तयार केला होता, परंतु तो पुरोहितदेखील सहभोजन करणाऱ्यांपैकीच असणार म्हणून बायकांना मंजूर नव्हता. हा बहिष्कार काही वर्षे चालला व पुढे त्याची उग्रता कमी होत गेली.
भाऊजींकडे त्यांच्या नातीचे लग्न होते. दुपारी बारा वाजताच्या सुमाराला मंडळी जेवायला आली होती. मांडव घालून, घरासमोरील अर्धी गल्ली अडवून पंगत मांडली होती. रस्त्याच्या रहदारीसाठी खुल्या असलेल्या भागात भिकारी जमले होते. त्यांनी सारखा गलका सुरू ठेवला होता. मंडळी जेवायला बसणार तेवढ्यात एक म्हाताच्या भिकारणीने फारच आक्रोश सुरू केला. भाऊजी समोर होते, ते म्हणाले, “बाई, जरा धीर नाही का धरता येणार?” भिकारीण कशाला हो म्हणते? ती नाही म्हणाली. भाऊजींनी लगेच त्यांच्या प्रतिष्ठित पाहुण्यांच्या पंगतीत तिच्यासाठी पान मांडले, तिला बसविले आणि पोटभर जेवू घातले.
भाऊजींनी शाळेत मास्तरकी केली, वकिली केली, होमिओपॅथीची वैद्यकी केली त्याचप्रमाणे त्यांनी वर्तमानपत्राचे संपादकत्व केले आणि स्वराज्य विद्यालय नावाच्या एका खाजगी महाविद्यालयाचे निर्वेतन प्राचार्यपदही भूषविले. असहकाराच्या चळवळीत कॉलेजमधून बाहेर पडलेल्यांसाठी हे महाविद्यालय नागपूरला चालविले जात होते. स्वराज्य विद्यालयात त्यांना दादा धर्माधिकारी, जगन्नाथ गोपाळ गोखले, हरिकृष्ण मोहनी, भय्याजी डोळके, अण्णाजी वाचासुंदर, एकनाथपंत पटवर्धन वगैरे सहकारी लाभले होते. भाऊजी तेथे धर्मशास्त्र शिकवीत. वेदकालनिर्णय, याज्ञवल्क्यस्मृति यावरही पाठ घेत. पण त्यांच्या सान्निध्यात असताना त्यांच्या विद्वत्तेची, बुद्धिमत्तेची आणि संशोधनाची जाण त्यांच्या विद्यार्थ्यांना नीटशी आली नाही. (भाऊजींनी त्यांचा धर्मरहस्य हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात असताना त्यांच्या विद्यार्थ्यांना समजावून दिला होता.) ती जाण त्यांना धर्मरहस्याच्या दुसऱ्या आवृत्तीला तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी ह्यांनी प्रस्तावना लिहिली ती वाचल्यानंतर आली.
भाऊजी समाजसुधारणेचे कट्टे समर्थक, धर्मनिर्णय मंडळाचे एक कार्यकर्ते. त्यांच्या काळात जे क्वचित होत असे सगोत्र विवाह वा पोटजाती उल्लंघून केलेले विवाह झाले की भाऊजी ‘महाराष्ट्र’ साप्ताहिकातून अशा कुटुंबीयांचे जाहीर अभिनंदन करीत. परिणाम असा होई की नवपरिणीत जोडप्याची जास्त प्रसिद्धी होई आणि त्या जोडप्याला समाजाचा किंवा सनातन्यांचा रोष अधिकच पत्करावा लागे.
डॉ. वामन शिवदास बारलिंगे हे प्रारंभी उल्लेखिलेल्या अण्णासाहेबांचे थोरले पुत्र. त्यांनी भाऊजींना आदरांजली वाहणारा जो श्लोक लिहिला आहे त्यामध्ये भाऊजींचे सर्व गुण एकवटले आहेत.
लक्ष्मीः स्यादनृतानुगाऽपि तरणिः संसावारांनिधौ।
हित्वा मोहमिमं न यो विचलितः सत्यात्पथः सन्मतिः।।
संहर्ताप्यनृतस्य शास्त्रविषये सोऽयं मुनिस्तत्त्ववित्।
साधुः सत्यपरायणो विजयते विद्वन्मणिः केशवः।।
लक्ष्मी असत्याच्या मागे जाते हे ठाऊक असून आणि तीच हा संसारसागर तरण्यासाठी नौकेचे काम करते हे जाणून देखील (तिचा) मोह ज्याने सोडून दिला आणि जो सुबुद्ध (पुरुष) सत्याच्या मार्गापासून ढळला नाही, जो शास्त्रविषयांत जे असत्य वा हीणकस शिरले आहे त्याचा नाश करणारा आहे असा तो मर्मज्ञ मुनि, साधु आणि सत्यपरायण असलेला विद्वद्रत्न केशव, त्याचा जयजयकार असो.