आगरकरांनी स्नान, पोषाख इत्यादींवर लिहिल्याचे त्यांच्या साहित्यांतून आढळते. परंतु, सार्वजनिक स्वच्छतेवर लिहिल्याचे आढळले नाही. कदाचित् त्यांच्या काळी या विषयावर लिहिण्याची त्यांना आवश्यकता वाटली नसावी.
सांप्रत सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती इतकी चिंताजनक झाली आहे की, त्यावर न बोललेलेच बरे. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्याला इतकी अनास्था आहे की आपण गेंड्याच्या कातडीचे झालो आहोत. सुरत शहरात प्लेगसारख्या महामारीचा उद्भव झाल्यावर सुद्धा आपल्यावर कसलाही परिणाम झाला नाही. साठलेला कचरा, घाण, दुर्गंधी यामुळे प्लेगचा उद्भव होतो हे कारण समजल्यानंतर, सुरतमध्ये आणि देशातील अन्य शहरांमधे नगरपालिका, महापालिका, यांनी चार दिवस सफाई मोहीम राबविली, शासकीय फतवे निघाले, लोकांनी नाकातोंडाला फडकी बांधून रस्त्याने जाणे सुरू केले आणि कुठे एखादा मेलेला उंदीर सापडला तर तो परीक्षणासाठी कुठल्यातरी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. झाले! संपले! सार्वजनिक स्वच्छतेबद्दल ना कुठे मूलगामी विचार झाला ना लोकांना त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता भासली. इतकेच काय, बाहेरच्या देशांनी आपल्या नागरिकांना भारतात पर्यटनालाही जाऊ नये असे सल्ले दिल्यानंतर सुद्धा आपल्याला जरासेही ओशाळवाणे वाटले नाही.
नोकरीतील कामानिमित्त अथवा सहलीनिमित्त मला आपल्या देशातील चारही ‘मेगा’शहरे, बरीचशी ‘मेट्रो’शहरे, इतर लहान शहरे आणि महाराष्ट्रातील तसेच इतर काही राज्यांतील ग्रामीण भाग पाहण्याचा योग आला. या प्रत्येक शहरातला आणि खेड्यांतला काही अपवादात्मक भाग सोडला तर ही शहरे आणि खेडी अस्वच्छता, कचरा, दुर्गंधी यांची आगरे बनली आहेत. इतकी । की हा देश जगातील सर्वांत गलिच्छ देश वाटावा.
वर उल्लेख केलेल्या प्रत्येक शहरात कमी अधिक प्रमाणात एकच चित्र दिसते. सार्वजनिक रस्त्याच्या बाजूने साचलेले कचर्याीचे ढीग, रस्त्यांच्या कडेला असलेल्या पानाच्या ठेल्याभोवती फेकलेली बिड्या, सिगारेटची थोटके, पानाच्या पिचका-यांची रंगरंगोटी. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवरील खाद्यपेयांचा आस्वाद घेतल्यानंतर उरलेले रस्त्यावर फेकून दिलेले अन्न आणि पाणी, रस्त्यावर फेकलेल्या फळांच्या साली. रस्त्याच्या कडेने अनेकांनी आपला प्रातर्विधी उरकल्याने ओझोन वायूबरोबर मिळणारी प्रातर्विधींची दुर्गंधी; आणि सार्वजनिक संडास आणि मुतान्या यांच्या अवतीभवती विधी करून त्यांचे घाणीच्या बेटांत केलेले रूपांतर. याला विलोभनीय दृश्य म्हणावयाचे की आपल्या संस्कृतीचे अनुपम दर्शन?
यापेक्षाही दसपट घाणीचे साम्राज्य आपल्याला शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक,
सरकारी कार्यालये, सार्वजनिक बागा, सार्वजनिक करमणुकीची स्थाने, उपाहारगृहे इत्यादि ठिकाणी दिसते.
या सर्व स्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निघाला तर लोक स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोष ढकलून मोकळे होतात जणू या संस्थांवर दोष ढकलून त्यांच्या पापांचे क्षालन होते. परंतु. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती समाजाचीच असून त्यांनी केलेल्या चांगल्या आणि वाईट कामाचे श्रेय किंवा दोष शेवटी लोकांनाच जाते, हे ते सोईस्करपणे विसरतात. खरे पाहिले तर आज शहरातील समाजाच्या घटकांची अनास्था आणि उदासीनता आजच्या शोचनीय स्थितीला जबाबदार आहे. कुठलीही जबाबदारी स्वत: न स्वीकारता दुसन्यावर ढकलून देणे ही आज आपली प्रवृत्ती झाली आहे. ही प्रवृत्ती कशी नाहीशी होणार, कोण नाहीशी करणार? हाच खरा यक्ष प्रश्नआहे.
महात्मा गांधींनी आपल्या हयातभर भंगीमुक्ती योजना राबविली. त्यामुळे आज शहरांत सेप्टिक संडास अस्तित्वात आले; आणि भंगी जमात डोक्यावर मैला वाहून नेण्याच्या एका अत्यंत घृणास्पद रूढीतून कायमची मुक्त झाली. हे सर्व झाल्यानंतर तरी सार्वजनिक स्वच्छतेवर काही परिणाम झाला आहे काय? मुळीच नाही! शहरातील रस्त्यांच्या बाजूने सुरू असलेला प्रातर्विधी अजूनही संपलेला नाही. आता तर शहरांतील मोकळ्या जागासुद्धा या पासून सुटलेल्या नाहीत. तसेच, कुणाचे लक्ष नाही असे पाहून रस्त्याच्या कडेने, घरांच्या भिंतींच्या आडोशाने किंवा ‘येथे लघवी करू नये, असा फलक लावलेल्या जागेवर बिनदिक्कतपणे लघुशंका करण्यात आपण आपला पुरुषार्थ मानतो. सार्वजनिक जागेवर बिड्या-सिगारेटची थोटके फेकण्यात, पानाच्या पिचक्राच्या मारण्यांत आपल्याला जराशीही खंत वाटत नाही. नवल हे की यात सुशिक्षित समजली जाणारी मंडळी देखील सामील असतात. याला काय म्हणावे?
तशीच बांब कचर्या ची आहे. घरांतील दुकानांतील, कचरा ताडून तो सार्वजनिक रस्त्यावर लोटून देण्यात येतो. असा कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचर्याीसाठी नियोजित केलेल्या जागेवर टाकण्याचे कष्ट कोणी घेत नाही. हा कचरा उचलला जातो किंवा नाही याचेही आपणाला सोयरसुतक नसते. परिणामी कचरा सर्व रस्ताभर पसरतो. तो तसा पसरला तरी आपल्याला काही वाटत नाही. चार इरसाल शिव्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यांच्या कर्मचा-यांचे नावाने हासडून आपण गप्प बसतो. इथे आपली इतिकर्तव्यता होते.
ही अनास्था, ही उदासीनता हे कशाचे द्योतक आहे. उत्तर एकच! आपण आपल्यामधील सामाजिक जबाबदारीची जाणीव हरविली आहे. आपली इच्छाशक्ति पार नष्ट झाली आहे. आपल्याला विशेषेकरून आवश्यकता आहे ती सामाजिक चळवळीची आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या प्रदीर्घ मोहिमेची. समाजातील प्रत्येक युवा, प्रौढ, वृद्ध या सर्व घटकांचे प्रबोधन झाल्याशिवाय आणि प्रत्येक बालकांवर सार्वजनिक स्वच्छतेविषयी संस्कार झाल्याशिवाय भविष्यात सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. सार्वजनिक स्वच्छतेमधे खरोखरच सुधारणा व्हावी अशी आपली कळकळ असेल, प्रामाणिक इच्छा असेल तर समाजातील सर्व कुप्रवृत्ती समूळ नष्ट कराव्या लागतील. त्याकरिताच समाज प्रबोधन हवे; पण हे करणार कोण?
शहराच्या कायाकल्पावरून एक आठवण झाली. लोकांची इच्छाशक्ती जागृत केली तर स्वच्छतेच्या बाबतीत असा कायाकल्प निश्चितच घडून येऊ शकतो. अशी किमया काही खेड्यांत कै. श्री. कृष्णदास शहा यांनी केली. शहांशी माझा संबंध १९७० मध्ये आला. त्या वेळेला मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे संवर्ग विकास अधिकारी (B.D.0.) होतो. शहा हे ७० च्या दशकांत ग्रामीण स्वच्छतेवर महाराष्ट्र शासनाचे मानद सल्लागार होते. शहांची स्वच्छतेची योजनाही अगदी साधी होती. इतकी साधी की ती शहरास लागू करावी म्हटले तर हास्यास्पद ठरावी.
दुर्दैवाने आपल्या देशात शहरे आणि ग्रामीण विभाग असे दोन स्पष्ट विभाग आहेत. यांत, भौगोलिक विस्तार, लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती या बाबतीत फार मोठी दरी आहे. त्यामुळेच शहराच्या योजना ग्रामीण भागाला लागू होत नाहीत आणि ग्रामीण भागाच्या शहराला. पण दोन्ही विभागांत एक साम्य आहे. सार्वजनिक गलिच्छता. शहरांमधे जेवढ्या म्हणून अस्वच्छ गोष्टी आहेत त्या सर्व खेड्यामध्येही आहेत. खेड्यांमधील रस्ते अरुंद असतात. त्यांतील सांडपाणी रस्त्यावर वाहात असते. पाण्यांच्या विहिरींना कठडे अथवा ओटे अभावानेच आढळतात. असले तरी खचलेल्या अवस्थेत असतात. बर्या्चशा खेड्यांमध्ये अजूनही संडास नाहीतच. बहिर्दिशेला बहुतेक सर्व मंडळी गावांतील शेतांत अथवा मोकळ्या मैदानांत जातात. खेड्यांतील पुरुषांचे ठीक आहे. परंतु महिलांची अतोनात कुचंबणा होते. उत्सर्गासाठी त्यांना गोध्रीत अथवा गावाला लागून असलेल्या मोकळ्या जागेतच जावे लागते. गोध्री हा आपल्या देशांतील तमाम खेड्यांना लागलेला कलंक आहे. गोध्री म्हणजे गावात प्रवेश करण्याचा गाडी रस्ता. गोध्रीतील दुर्गंध आला म्हणजे गाव नजीकच लागून आहे असे निशंकपणे समजावे. या गाडीरस्त्याने खेड्यांतील येणार्याक जाणा-यांची रहदारी नेहमी सुरू असते. प्रत्येक वेळी कुणी आले गेले की महिलांना अब्रूरक्षणार्थ उभे राहावे लागते. अशी सर्कस त्यांना किती वेळा करावी लागते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे त्या महिलाच जाणोत.
कृष्णदास शहांना खेड्यांतील परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. खेड्यांतील जीवनाबाबत त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता. मला एक पत्र लिहून पंचायत समिती मधील एका खेड्याची पंचायतसमिती मार्फत स्वच्छता-शिबिराकरिता निवड करून त्यांना कळवावे अशी विनंती त्यांनी केली होती. गावांच्या निवडीबाबत कळल्यानंतर गावामध्ये गावक-यांच्या सहकार्यानि एक दहा दिवसांचे स्वच्छता शिबिर भरवावयाचे अशी त्यांची योजना होती. गावांची निवड आम्ही कळवताच शिबिराच्या तारखा त्यांनी आम्हाला उलट टपाली कळविल्या, आणि शिबिर सुरू होण्याच्या अगोदर पोहोचतो हे सुद्धा आवर्जून कळविले. त्यांनी पत्रांत कळविल्याप्रमाणेगावकरी, गावचे सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या सल्लामसलतीने गावात आम्ही शिबिराची पूर्ण तयारी केली. कळविल्याप्रमाणे नेमलेल्या तारखेला कृष्णदासजी संध्याकाळी घाटंजीला आले. कार्यालय बंद झाल्याने सरळ माझ्या घरीच आले. खादीचे धोतर, अंगात एक रंगीत हाफशर्ट, डोक्यावर गांधी टोपी, हातात नारळाच्या दोरीने बांधलेली वळकटी आणि एक पिशवी अशी व्यक्ती दारात उभी राहिलेली पाहून मी जरा भांबावून गेलो.“मी कृष्णदास शहा”.माझी भांबावलेली स्थिती ओळखून कृष्णदासजींनी आपली ओळख करून दिली. मी भारावून गेलो. कृष्णदासजीचे व्यक्तिमत्त्व फारसेआकर्षक नसले तरी त्यांचे डोळे विलक्षण तेजस्वी होते. रात्र झाल्यामुळे त्यांनी रात्री माझ्या घरी मुक्काम करावा आणि दुसरे दिवशी सकाळी त्यांनी आणि मी शिबिराच्या गावी जावे ही माझी विनंती त्यांनी मान्य केली.
दुसर्याा दिवशी कृष्णदासजींना घेऊन शिबिराच्या गावी गेलो. अगोदर ठरल्याप्रमाणे गावकरी, सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित मंडळींची सभा गावात बोलाविण्यात आली होती. कृष्णदासजींनी शिबिराची रूपरेषा समजावून सांगितली. त्यातील पहिलाच मुद्दा ऐकून गांवकरी मंडळी अवाक् झाली. मी देखील स्तंभित झालो. पहिलाच मुद्दा होता सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा. यावर बरीच चर्चा झाली. कृष्णदासजी आपला मुद्दा सोडीनात. एक तिढा निर्माण झाला. शेवटी सरपंच, मी आणि काही गावकरी मंडळींनी समजूत घातल्यानंतर सर्व जण अतिक्रमणे काढावयास तयार झाले. लगेच गावात फेरफटका मारून कुठली अतिक्रमणे काढावयाची आणि कुठले रस्ते रुंद करावयाचे ह्याची त्यांनी पाहणी केली आणि संबंधित गांवक-यांना कामी लावले. यांत लोकांनी देखील नंतर मनापासून सहकार्य केले. अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ते एकदमच रुंद झाले. गावाचे रूपच एकदम पालटून गेले. नव्वद टक्के लोकांनी स्वतः अतिक्रमणे काढली. दहा टक्के गणंग राहिले होते. गावाचे रूप पालटलेले पाहून या कडक सुपाच्या सुद्धा आपोआपच फुटल्या आणि त्यांनी देखील आपली अतिक्रमणे काढून टाकली. गावातील सर्व सार्वजनिक रस्ते एकदम रुंद झाले. गावाला एकदम नवीन स्वरूप प्राप्त झाले.
कृष्णदासजीनी मग आपला मोर्चा संडास तयार करण्याकडे वळविला. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही गांधी स्मारक निधीकडून अगोदरच संडासाच्या सीट्स मागवून ठेवल्या होत्या. गांधी स्मारक निधी ही संस्था संडासाच्या सिमेंटच्या सीट्स बनविते. घरमालकाने संडासाची जी जागा नियोजित केली होती तिच्यावर मजुरांकडून त्यांना ४ फूट लांब, ३ फूट रुंद आणि ३ फूट खोल या मापाचे दोन खड्डे तयार करून घेतले. आणि त्यावर दोन नळ्या असलेली सीमेंटची सीट बसविली. खड्डे खचून जाऊ नये म्हणून खड्ड्यांच्या भिंतीची पोकळी ठेवून विटांनी सैलशी जुडाई केली. हे खड्डे आलटून पालटून वापरावयाचे असतात. खड्डे कुठल्याही लाकडाच्या किंवा टिनाच्या आवरणाने झाकता येतात. एक खड्डा साधारणपणे पाच ते सहा महिन्यांत भरतो. नंतर तो माती टाकून झाकून टाकण्यात येतो. मग दुसरा खड्डा सुरू करण्यात येतो. दुसरा खड्डा संपेस्तोवर पहिल्या खड्ड्यांत उत्कृष्ट खत तयार होते. दुसरा खड्डा भरल्यानंतर पहिल्याप्रमाणेच क्रिया करण्यात येते. दहा दिवसांच्या शिबिरात असे ५०-६० हँड फ्लश संडास तयार झाले आणि बर्या्च मोठ्या प्रमाणात महिलावर्गाचा प्रश्न सुटला. घराच्या आवारांत अशीच मोकळी जागा पाहून कृष्णदासजींनी आणखी प्रत्येकी ३ फूट लांब, ३ फूट खोल आणि ९ इंच रुंद असे दोन खड्डे खणायला लावले. हे घरांतील लहान मुलांकरिता बाल संडास होते. दिवसभराच्या मुलांच्या वापरानंतर त्यावर राख टाकावी अशा सूचना त्यांनी घरमालकिणींना केल्या. राख ही अतिशय उत्कृष्ट जंतुनाशक आहे. हँडफ्लश संडासाप्रमाणेच बाल संडासाचे खड्डेही आलटून पालटून वापरावयाचे असतात. यामध्ये मोठ्या संडासाप्रमाणे खत तयार होते. असे बालसंडास मुलांना बालपणापासून वापरावयाची सवय लागली म्हणजे मोठेपणी आपोआपच संडास वापरण्याची सवय लागते. लहानपणी संडासात जावयाचेसंस्कार झाल्यामुळे मोठेपणी इकडे तिकडे बहिर्दिशेला जाणे प्रशस्त वाटत नाही.
आतापावेतो शिबिराचे ५-६ दिवस निघून गेले होते. त्यानंतर लगेचच एका सकाळी कृष्णदासजींनी कुठल्या कुठल्या घरातून सार्वजनिक रस्त्यांवर सांडपाणी वाहते व त्याचप्रमाणे कुठल्या सार्वजनिक विहिरीचे काठ फुटले आहेत त्याचे सर्वेक्षण केले. ज्या घरांतून रस्त्यावर सांडपाणी वाहात होते त्या मालकांना बोलावून, जेथून सांडपाणी वाहात होते तेथे तीन फूट लांब, तीन फूट रुंद आणि तीन फूट खोल असा खड्डा खणून घेतला. नंतर त्याचा पाऊण भाग मुरूम आणि बोल्डर यांनी भरून काढला व त्यावर बारीक रेतीचा एक थर दिला. एका मडक्याला चार पाच छिद्रे करून व त्यात नारळाच्या काथ्या भरून ते घरांतून जेथे पाणी वाहात होते तेथे ठेवून दिले. आणि शोष खड्डा तयार करून दिला. पाण्याचे खड्ड्यामध्ये शोषण होऊ लागल्याने रस्त्यावरचे सांडपाणी एकदम बंद झाले. ज्या ज्या ठिकाणी असे सांडपाणी वाहात होते त्या ठिकाणी असे शोष खड्डे तयार करण्यात आले. कुठल्याही तर्हेसची गटाराची योजना न करताना गावाचा सांडपाण्याचा प्रश्न सुटूनच गेला. त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक विहिरीचे ओटे जिथे जिथे नादुरुस्त होते तिथे तिथे ग्रामपंचायतींकडून त्यांची दुरुस्ती करून घेतली. आणि शोषखड्ड्यांप्रमाणे प्रत्येक विहिरीवर १५ फूट लांब ५ फूट रुंद आणि ३ फूट खोल असे खड्डे तयार करून शोष नाल्या तयार केल्या. शोषखड्याप्रमाणे त्या पाऊण भाग मुरूम, बोल्डर आणि रेतीने भरल्या. विहिरीचे सांडपाणी त्या शोष नालीत विहिरीभोवती बांधलेल्या ओट्यांवरून वळवून दिले. विहिरीभोवतीचे सांडपाणी बंद झाले. काही दिवसांत विहिरीभोवतीची दलदल सुकून गेली. विहिरीभोवतीचा परिसर एकदम स्वच्छ झाला. दहा दिवसांच्या शिबिरात शहा यांनी अतिक्रमणे काढून, रस्ते रुंद करून, ग्रामपंचायतीवर कुठलाही आर्थिक ताण पडू न देता सांडपाण्याची व्यवस्था लावून, गावांचा सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण कायापालट घडवून आणला. शिबिराच्या शेवटी श्री शहा जेव्हा परत जावयास निघाले त्यावेळी गावकरी आणि शहा दोघेही सद्गदित झाले.
श्री शहा यांच्या योजनेत रस्ते रुंद करणे किंवा सांडपाण्याची व्यवस्था लावणे या बाबी असल्या तरी एका बाबतीत त्यांची योजना अपूर्ण आहे. गावातील आणि घराघरांतील कचर्यााची विल्हेवाट याचा त्यांत अंतर्भाव नाही. खेड्यांतील रस्त्यांवर माणसांशिवाय गुराढोरांचाही राबता असतो. त्यामुळे कडबा, कुटार, शेण व कचरा रस्त्यावर पडतो. पुसदचे थोर सामाजिक कार्यकर्ते ना. दे. पांढरीपांडे उर्फ नॅडेप काका यांच्या तंत्राने शेणखत बनविले तर कचर्याोची विल्हेवाट लागते आणि तयार झालेले खत विकून ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळू शकते. पांढरीपांड्यांची पद्धत अभिनव आहे. ते साधारण दहा फूट लांब, तीन ते चार फूट रुंद आणि दोन ते तीन फूट टाके नुसत्या विटांवर विटा रचून तयार करतात. त्यात कचरा, पाला पाचोळा गोळा करून भरतात. शेण गोळा करून त्या कचर्याावर टाकतात. त्याचे आलटून पालटून थर करून ते चांगले तुडवितात. टाकी साधारण एक दोन महिन्यांत भरते. मग टाकी बंद करून टाकतात. ३ ते ४ महिन्यांत उत्तम खत तयार होते. या खताच्या बॅगा सुद्धा भरता येऊ शकतात. याप्रमाणे केल्यास गावांतील रस्ते साफ राहतील व खताच्या उत्पादनांतून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल.
कृष्णदासजींनी राबविली तशी मोहीम गावकरी उत्साहाने राबवून टाकतात. पण मग प्रश्नउरतो तो त्यांतून निर्माण झालेल्या संडास, शोषखड्डे इ. च्या वापराचा. गावक-यांना लागलेल्या सवयी बदलणे सहजासहजी शक्य होत नाही. अशा वेळी योजना विफल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता लोकांवर एक प्रकारचा दबाव कायम ठेवावा लागतो. असा दबाव फक्त सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्था, अथवा ज्या खेड्यांत योजना राबविली गेली असेल त्या गावांतील काही प्रभावशाली मंडळीच ठेवू शकतात. म्हणूनच अशी योजना, छात्र शक्ती, युवा शक्ती अथवा अशा तर्हेगचे काम करणार्याच सामाजिक संस्था या शेवटापर्यंत तडीस नेऊन खेड्यांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकतात. फक्त इच्छा, शक्ति आणि कळकळ हवी. असा प्रकल्प शहरांतील झोपडपट्टी म्हणजे ज्याला ‘slum’ म्हणतात, त्यामधेही राबविला जाऊ शकतो.
ज्यांचा ग्रामीण भागाशी फारसा संबंध नाही अशा लोकांकडून निश्चितच असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की आज तंत्रज्ञान आणि विज्ञान इतके प्रगत झाले असताना असल्या जुनाट कल्पना राबविण्याची काय आवश्यकता आहे?खरे सांगायचे तर ग्रामीण भागांची आर्थिक स्थिती आणि तेथील लोकांची क्रयशक्ती इतकी क्षीण झालेली आहे की त्यांना शहरातच वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान परवडू शकत नाही. अशा स्थितीत खेड्यातील लोकांसाठीअसे जुनाट तंत्रज्ञान वारण्याशिवाय दुसरा कोणता उपाय आहे?आपल्या देशात इतका ‘paradox’ – विरोधाभास आहे की एका बाजूला शास्त्रज्ञांनी अवकाशांत उपग्रह सोडण्याइतके आपल्या देशाचे तंत्रज्ञान प्रगत केले आहे तर, दुसर्या् बाजूला सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामीण जनतेला परवडू शकेल असे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही. जोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागांतील लोकांना परवडू शकत नाही अथवा जोपर्यंत ग्रामीण भागांतील लोकांना परवडू शकणारे तंत्रज्ञान आपण विकसित करू शकत नाही तोपर्यंत जुन्या कल्पना राबविण्यास काय हरकत आहे?निदान खेड्याचा परिसर तर स्वच्छ राहील. अन्यथा, ‘आपले शहर सुंदर शहर’, ‘आपले गाव सुंदर गाव’ ही घोषवाक्ये वांझच राहतील.
शेवटी; परवाच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या आपल्या देशाला भेट देऊन गेल्या. त्यांनी आपल्या देशाची राजधानी दिल्लीला चक्क ‘Dirty Delhi’ म्हटले. यावरून आपल्या देशातील लोकांना काही बोध घ्यावासा वाटला तर त्यांनी जरूर घ्यावा.