प्रथमच सांगतो की, माझे एकुणच वाचन फार मर्यादित आहे आणि प्रतिपाद्य विषयाचे तर खूपच कमी आहे. तरी पण आगरकरांच्या चरित्रातून, लेखनातून उद्भवलेले काही विचार कुठेही, विशेषतः आगरकर विशेषांकात न आढळल्यामुळे हे टिपण. त्यानंतर काही आनुषंगिक विचार.
आगरकरांच्या विवेकवादाचे सूत्र पूर्वीच्या एखाद्या तत्त्वशाखेशी जोडायचे असल्यास ते चार्वाकमताशी जोडता येते. प्रत्यक्ष प्रमाणाने वा सार्वत्रिक अनुभवाने जाणवत असेल ते सत्य, बाकी सर्व असत्य, असे उभय विचारप्रणालीतील साम्य ढोबळमानाने सांगता येईल. जगाचे आदिकारण, मृत्यूनंतर काय, असले प्रश्न पुरेशा साधनांच्या अभावी गैरलागू ठरतात, असा अज्ञेयवाद दोघांनाही अभिप्रेत होता. मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन (‘सुधारणा आणि कलह’, आगरकर-वाङ्ममय, खंड १) हे मानवी जीवनाचे आगरकरप्रणीत इतिकर्तव्य चार्वाकमताशी जुळणारे आहे. चार्वाक आणि आगरकर यांच्यामधील हजारो वर्षांत कित्येक निरीश्वरवादी विचारवंत तत्त्वप्रणाली होऊन गेल्या पण त्यापैकी काही निरपवाद विवेकवादी नव्हत्या. बुद्धाने ईश्वर नाकारला पण निर्वाण, पुनर्जन्म आदि कल्पना अनुभवगम्य नसूनही मान्य केल्या. जोतीबा फुल्यांनी ईश्वराऐवजी निर्मीकाची कल्पना मांडली आणि त्याच्याशी संपर्क साधण्यास भिक्षुकांच्या मध्यस्थीची गरज नाही, असे सांगितले. आगरकरांनी मात्र कोणतीही तडजोड न करता बुद्धिप्रामाण्य आणि प्रेमकरुणादि सद्भावनाप्राबल्य याच बाबी केवळ मनुष्याच्या विचारआचारांना मार्गदर्शक मानल्या. अस्पृश्यता, विधवाविवाह निषेध, बालविवाह, स्त्री शिक्षणाभाव, पुरुषाचे स्त्रीवरील वर्चस्व इत्यादि समस्यांबद्दल त्यांनी प्रबल सहवेदनेतून पीडितांच्या बाजूने तळमळीने लिहिले. स्वतःच्या त्यागी, कष्टाच्या जीवनातून इहवादी कृतिशूरत्वाचा आदर्श घालून दिला.
असे असले तरी, आगरकरांच्या लेखनात चार्वाकमताची चर्चा नाही. चार्वाकाचा एकच उल्लेख आढळतो तो नगण्य आहे. आगरकरांच्या काळी चार्वाकविषयक आज उपलब्ध असलेले संशोधन झालेले नव्हते हे खरे, पण तरीही जोतीबा फुल्यांनी चार्वाकमताचा आद्य प्रवर्तक बृहस्पती याच्या वेदनिंदावचनाचा सन्मानपूर्वक उल्लेख केला असून चार्वाकाच्या एका लोकाचाही संदर्भ दिला आहे. (आ. ह. साळुंखेकृत आस्तिकशिरोमणी चार्वाक, पृ. १७९)
आगरकरांच्या प्रकाशित लेखनात खुद्द फुल्यांचाही ‘रेव्हरंड जोतीबा’ हा एकच (उपरोधिक) उल्लेख सापडतो. वास्तविक दोघांच्या मतांत काही प्रमाणात फरक असला तरी सर्वांगीण समाजसुधारणा हे दोघांचेही जीवितकार्य होते. जोतीबा फुले हे असामान्य धैर्यवान, कृतिशूर सुधारक होते. १८८२ साली टिळक-आगरकर यांच्यावर खटला झाला त्यावेळी जोतीबांनी श्रीरामशेठ उखणे यांचा दहा हजार रुपयांचा जामीन देववला. ते तुरुंगातून सुटले तेव्हा फुल्यांचे सहकारी यंदे व लोखंडे यांनी मुंबईत पेढे वाटले आणि त्यांचा सत्कार केला. नंतर पुण्यात फुल्यांनी त्यांची सत्कारसभा योजली. त्याबद्दल आगरकरांनी त्यांचे केसरीतून आभारही मानले. पुढे लोखंडे यांनी नापितांच्या सभेत ठराव मान्य करवला की, विधवांचे केशवपन करायला कोणीही जाऊ नये. त्याबद्दल आगरकरांनी त्यांचे सुधारकातून अभिनंदन केले. फुल्यांनी १८६३ मध्ये विधवांसाठी प्रसूतिगृह व त्यांच्या मुलांसाठी आश्रम काढला. १८६४ मध्ये पहिला पुनर्विवाह फुल्यांच्या उत्तेजनाने पार पडला. अशा सगळ्या कार्याचे काही ना काही प्रतिबिंब आगरकरांच्या लिखाणात पडायला हवे होते, असे वाटते. दोघांमध्ये परिचयच नव्हे, तर ‘समानशीलव्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दाट मैत्री, जवळीक असायला पाहिजे होती. पण प्रत्यक्ष तसे चित्र दिसत नाही. आगरकर-चरित्रातील ही कोडी कुणी सोडवेल का?
विवेकवादी विचारवंतांच्या सगळ्यांत घोर चिंतेची सध्या ही बाब आहे की, देवाधर्मावरील, धार्मिक कर्मकांडावरील, त्यात प्रार्थना, दर्शन, वारी, ह्या पासून पशुबळी, कुर्बानी, क्वचित नरबळीपर्यंतचे सर्व प्रकार आले. सर्वसामान्यांची श्रद्धा वाढती असून तिला भरपूर राजाश्रय तर आहेच पण जनमनावर कला, वक्तृत्व, लेखन, पद इत्यादी माध्यमांद्वारे प्रभाव असणारे बहुतेक वैचारिक नेते तिला खतपाणी घालत आहेत. डॉ. श्रीराम लागूंसारखे नेते प्रसंगानुसार ‘नास्तिकतेचा’ विचार आग्रहाने मांडतात, पण ते त्यांनी जीवितकार्य म्हणून स्वीकारलेले नाही. त्यांच्या एकूण कार्याचा विवेकवादप्रसार हा लहानसा भाग आहे. असे ख्यातनाम लोकही थोडे आहेत. सर्व प्रसिद्धिमाध्यमे अध्यात्म, देवभक्ती, यात्रा इत्यादींचा प्रसार व्याख्यानांची वृत्ते, लेख, गीते, अभंग इत्यादी मार्गानी करतात. बहुतेक वृत्तपत्रांत एका पानाचा एक कोपरा संतवाणी व तत्सम अध्यात्मासाठी राखून ठेवलेला असतो. तुकारामाच्या अभंगांपैकी ‘ तुका म्हणे सुख। पराचिया सुखें ‘ इत्यादि देवरहित, परोपकार शिकवणारा अभंग किंवा तसे कोणतेही, कोणाचेही वचन दूरदर्शनवरील संतवाणीत दाखवले गेलेले मी पाहिलेले नाही. सगळे विठ्ठलभक्तिपर, यात्रास्तुतिपर, नामस्मरणपर वगैरे.
क्वचित् ‘मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा’ हे वाक्य सांगितले/लिहिले जाते, पण त्याचा महत्त्वाचा दुसरा भाग ‘अन्य काहीही, देवदर्शन, यात्रा, नामस्मरण इत्यादि ईश्वरसेवा नव्हे’ हा सोयिस्करपणे विसरला जातो. ‘परित्राणाय साधूनाम्’, ‘परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ इत्यादि आश्वासक वचने तद्दन असत्य असण्याचा पदोपदी अनुभव येत असूनही ती जणू निर्लेप, पवित्र सत्य अशा स्वरूपात कीर्तनाव्याख्यानांतून मांडली जातात. भगवंताचे अधिष्ठानचं पाहा ना ! संभाजी संगमेश्वराला ‘भ. अ.’ करत असतानाचा गाफील राहिल्यामुळे, फितुरीमुळे पकडला गेला. पेशवे गणपतीचे निःसीम भक्त, पण एकाही कर्त्या पेशव्याला चाळिसावर आयुष्य विघ्नहर्त्याने दिले नाही. माधवरावाला तर वारंवार थेऊरदर्शन घेण्याची तसदी नको म्हणून जणू सत्ताविशीतच गणपतीने स्वतःत सामावून घेतले. उलट पुतण्याच्या खुनाबद्दल देहान्त प्रायश्चित्त जाहीर होऊनही त्याची कार्यवाही न झाल्यामुळे दीर्घायुषी झालेला राघोबा इंग्रजांना मिळण्यासाठी इत्यादि मोकळा राहिला. देवभक्त, तत्त्वज्ञ, वडीलभाऊ दाराचा छळ व हत्या करून गादीवर बसलेला औरंगजेब अनन्वित अत्याचार करत सत्याऐंशी वर्षे जगला. भगवंताचे अधिष्ठान दुष्ट, बेइमानी, धनवान अशांनाच फळताना दिसते.
विवेकवादाच्या प्रामाणिक आणि कृतिशील पुरस्कर्त्यांमध्ये देखील थोडी फार तडजोड स्वीकारण्याकडे काहींचा कल आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दाभोलकर यांनी पुणे ‘सकाळ’, १९ जून १९९६ ला प्रसिद्धिलेल्या लेखामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीची देवाधर्माबाबत तटस्थतेची भूमिका आहे’ असे प्रतिपादन केले. त्यावर ‘देव मानणे ही देखील अंधश्रद्धाच’ या मथळ्याखाली माझे पत्र सकाळ, ६ जुलै १९९६ रोजी प्रसिद्ध झाले. माझा पत्ता ‘सकाळ’ कार्यालयातून मिळवून पंधरा सोळा लोक काळे निषेधफलक घेऊन घरी आले. दोन तास धरणे धरून गेले. दुसरे उदाहरण.‘पुरोगामी’ नानासाहेब गोव्यांनी विवेकवादी कार्यक्रमांना किमान दोनदा मुरड घातल्याची हकीकत डॉ. बाबा आढाव यांनी दिली आहे (सुजन, द्वैमासिक, जानेवारी १९९१). त्यापैकी एक हकीकत अशी होती की, गंगागीर महाराजांच्या उत्सवाला, नामसप्ताहाला आढावांचा विरोध होता, पण नानासाहेब स्वतः त्यात सामील तर झालेच, वर अध्यक्ष देखील झाले.
तिसरे उदाहरण. ‘पुरोगामी’ किर्लोस्करचे. रामायणाच्या संहितेवर आधारलेला माझा ‘रामायणातील रामप्रतिमा’ हा लेख किर्लोस्करने प्रसिद्ध करण्यास नकार दिला (१९८१). तो नंतर अस्मितादर्श त्रैमासिकाने एमेजू ८२ च्या अंकात प्रसिद्ध केला. पुढे डॉ. आंबेडकरांचा रामकृष्णांची कोडी (Riddles) हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर ‘पुरोगामी विचारवंत दुर्गा भागवत यांचे त्यावर टीका करणारे चार लेख लोकसत्तेत प्रसिद्ध झाले. मी त्यांतील विसंगती, विपर्यास उघड करणारा लेख लोकसत्तेकडे प्रसिद्धीसाठी पाठवला. पत्ररूपाने प्रतिक्रियाही पाठवली. संपादक माधव गडकरी यांचं भेट झाली तेव्हा छापण्याची विनंती केली. शेवटी लेख वा पत्र प्रसिद्ध झाले नाहीत. अखेर दोन्ही लेख मिळून रामायण आणि बाबासाहेब या नावाने १४-५-८८ रोजी जळगावला अस्मितादर्श साहित्य-मेळाव्यात पुस्तिकारूपात प्रसिद्ध झाले. त्याच विषयावरील माझे नरसम्राट (१९८३) नाटक पुण्यात रंगभूमीवर आले, पण दुसऱ्या प्रयोगानंतर लोकक्षोभाच्या भीतीने बंद पडले.
वरील सर्व वस्तुस्थिती बहुतेकांना माहीत नसल्यामुळे इथे नमूद केली आहे. या सगळ्या बाबतीत काय करावे, हा प्रश्न आहे. पण प्रभावी रीतीने काय करता येईल ?