पंडिता रमाबाई आणि ताराबाई यांच्यात पुष्कळच साम्य आहेः दोघींनीही शिक्षण क्षेत्रात मूलगामी कार्य केले. खाजगी जीवनात पति-सुखाची तोंडओळख होते न होते तोच त्याने कायम पाठ फिरवली. एकुलती कन्या तरुण असतानाच मरण पावली. दोघींनीही प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत आपले काम उभे केले, इ.इ. पण एका बाबतीत यांच्यात फरक आहे.आणि तो फार मोठा आहे. पंडिता धर्मनिष्ठ होत्या. त्या ख्रिस्ती झाल्या. प्रेम, सेवा या ख्रिस्त शिकवणुकीने त्या भारल्या होत्या. Faith, Hope and Charity (श्रद्धा, आशा, नि परोपकार) ही त्रिसूत्री मिशनच्यांचे ब्रीद आहे. तीमुळे आपण ईश्वराचे काम करीत आहोत अशी दृढश्रद्धा पंडिताबाईंना सहजच बळ देत होती. परंतु ताराबाईंनी मात्र बुद्धिवादाची कास धरलेली. देशातील आदिवासींमध्ये संपूर्ण क्रांती होणे हे पाच पंचवीस वर्षांत साध्य होणारे काम नाही हे त्या ओळखून होत्या. आपण जे काही करीत आहो ते समाजाचे काम आहे. शेवटच्या घटकेपर्यंत आपले कर्तव्य करत राहावे. आपण गेल्यावर त्याचे काय होईल याची चिंता करायची नाही.’ मनाची अशी ठाम बैठक त्यांनी बनविली होती. आपल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ‘मी बुद्धिप्रधान आहे. आपल्यासाठी त्याग, तपश्चर्या , सेवा, दया हे शब्द खर्ची घालू नयेत’, ‘मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. (मात्र) ‘आश्रमी बंधन मला पटत नाही बंधनातून केलेल्या गोष्टीत कृत्रिमपणा येतो. त्यागाची जाणीव राहते. करायचे ते सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे. आव्हान मिळाले की मला जोर चढतो, हा माझा स्वभाव आहे.’
या शेवटच्या वाक्यात ताराबाईंच्या जीवनाचे तसेच कार्याचे मर्म उमटले आहे. त्यांच्या जीवनाला बुद्धिप्रामाण्यवादाची बैठक होती. त्यांच्या जीवनातले कित्येक प्रसंग याची साक्ष आहेत. त्यांची कन्या प्रभा वारली त्यानंतरची गोष्ट. तिचे सामान आवरताना त्यांच्या शिष्येला तिच्या पेटीच्या तळाशी कुटुंब-नियोजनाची साधने सापडली. यावर त्या म्हणाल्या : ‘मला कल्पना होती , परंतु इतकी कल्पना नव्हती. तिचं फार काही चुकलं असं मला वाटत नाही; तेव्हाही वाटलं नाही.’ प्रभाच्या वियोगानंतर त्यांनी आपले आतिशय आवडते फळ आंबा हे खाणे सोडले. आपल्या दुःखाचा पाढा त्या कुणापुढे वाचत नसत. आठवणी उगाळत नसत. एकदा त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते श्री. कोसके यांनी हिय्या करून त्यांना विचारले, ‘ताई, तुम्ही कन्येसाठी आंबा खाणे सोडले ही गोष्ट भावनाधीन झाल्याचे लक्षण नाही का? तुम्ही तर प्रत्येक गोष्टीकडे रॅशनली पाहता, मग हे कसे? ताराबाईंनी उत्तर दिले नाही. कोसक्यांनी पुढे केलेल्या दोन फोडी मुकाट्याने घेतल्या. अठरा वर्षांनी त्यांनी आंब्याचा पुन्हा आस्वाद घेतला. त्याचे पती केव्ही यांच्या बाबतीतही त्यांचा असाच बुद्धिप्रधान दृष्टिकोण होता. केव्हींना त्या अखेरपर्यंत दरमहा पैसे पाठवत होत्या. परंतु ते ‘आता जगले काय आणि मेले काय, कुणालाही भारभूतच होणार’ असे उद्गार त्या काढू शकल्या.
१९४६ साली गांधीजींची पांचगणी येथे त्यांनी भेट घेतली. आपले बालशिक्षणविषयक विचार गांधीजींना पटले तर त्याला लोकमान्यता मिळायला वेळ लागणार नाही असे त्यांना वाटले होते. ही भेट दोन तास चालली. ताराबाईंनी मुद्दा असा मांडला की, कोणतीही शिक्षणपद्धती ही एका राष्ट्राच्या मालकीची होऊ शकत नाही. गांधींनी त्यांचे म्हणणे मान्य केले. ‘मॉन्टेसोरी पद्धत महाग आहे किंवा परदेशी आहे म्हणून नको असे नाही.मात्र ती आपल्याकडे उपयोगात आणताना तिला देशी परिस्थितीला अनुकूल स्वरूप दिले जावे असा गांधीजींचा आग्रह होता. तो अर्थातच ताराबाईंना मान्य होता. याच भेटीत ताराबाईंनी गांधीयींना सांगितले की आपण मागासलेल्या लोकांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणार आहोत.
बोर्डीचे ताराबाईंचे काम त्यांची सत्त्वपरीक्षा घेणारे ठरले. त्यांची वृत्ती, ‘न उल्हासे न संतापे अशी स्थितप्रज्ञ नसती तर तेथील पहिल्या अपयशाने त्याही खचल्या असत्या.‘त्याही म्हणण्याचे कारण असे की, त्यांचे एक जोमदार सहकारी श्री. भगवतीप्रसाद शेलत असेच हाय खाऊन वारले. दक्षिणामूर्ती येथील गिजुभाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, ‘मी खेड्यात नमुनेदार बालवाडी चालवून दाखवीन’ असा संकल्प करून शेलतभाई बोर्डीला आले होते. या कामात त्यांनी अपार कष्ट घेतले. स्वच्छ धोतर-सदरा घातलेले शांत, सौम्य चेहर्याचे शेलतभाई प्रभातफेरीला निघत. हातात झांजा घेऊन एखादे भजन आळवीत, रामधून म्हणत. पहिल्या दिवशी सारे गाव त्यांच्या मागे लोटले होते. त्यांच्याजवळ जणू एखादे अदृश्य अलगुज होते. आणि नंतर एक दिवस असा उजाडला की बालवाडीत फक्त एकं आदिवासी मूल आले. बालवाडीचा अलगुजवाला एकटा गावभर फिरला आणि आपला पोकळ पावा घेऊन एकटाच रिकाम्या हाताने परत आला. कोणी झोपाळ्याच्या लोभाने आले नाही की कोणी गरम पाण्याच्या आंघोळीच्या लालचीने हजर झाले नाही. बालवाडीतली छोटी जाजमे रिकामी पडली होती. खेळांची साधने हाताळायची वाट पाहात होती. अनुताईंसारखे शिक्षक रडकुंडीला येऊन कपाळाला हात लावून बसले होते.
हे अपेश शेलतभाईंना फार लागले. त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महिन्याभराच्या आत त्यांचे निधन झाले. अखेरपर्यंत त्यांचा बालवाडीचा ध्यास गेला नव्हता.
असे कितीतरी कटू अनुभव ताराबाईंनी पचवले. अकरा वर्षांच्या संस्थेच्या धडपडीत पंचवीस-तीस हजारांची खोट आली. ताराबाईंचे हे उपक्रम, त्यांतील प्रयोग राजमान्य नव्हते. मुलांचे खाणे, औषधे, तेल-साबण, कपडे या गोष्टी कुठल्याही नियमात बसणार्या नव्हत्या. राज्यसरकार, जिल्हाबोर्ड, ग्रामपंचायत तर सारे नियमाधीन होते.
ताराबाईंची तपश्चर्या वाया गेली नाही. त्यांचे ग्राम बालशिक्षा केंद्र गावातल्या सर्वांचेच, आणि सामाजिक जीवनाचेही केंद्र बनले. लोकांना आपल्या खाजगी कामातही संस्थेचा सल्ला घ्यावा इतका विश्वास संस्थेने संपादला. बोर्डीचे पाहून इतरत्रही बालवाड्या निघू लागल्या.
ताराबाई पंडिता रमाबाईंसारख्या रूढ अर्थाने धार्मिक नव्हत्या. परंतु त्या नास्तिक किंवा पूर्णपणे अश्रद्धही नव्हत्या. आपण केलेले काम, खर्ची घातलेले श्रम यांचा आणि मिळालेल्या यशाचा हिशेब मांडायला त्या तयार नव्हत्या. आपण एवढे केले आणि ज्यांच्यासाठी केले त्यांना कृतज्ञतेचा लवलेशही वाटत नाही याची खंत त्यांना नव्हती. त्या खचत नव्हत्या कारण हे देवाचे काम आहे अशी एक श्रद्धा त्यांना बळ देत होती. उघडच ध्येय हाच त्यांचा देव होता. आयुष्यातल्या आपत्तीतून जात असतानाच त्यांना हा बालशिक्षणाचामार्ग सापडला. आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाबद्दल त्यांनी कधी दैवाला दोष दिला नाही की ग्रहदशा मानली नाही. आपल्या दुःखाचा पाया करून त्यावर दुसर्याच्या दुःखपरिहाराचे कार्य उभे केले. भावना व बुद्धी यांचा त्या सतत मेळ घालत गेल्या.
प्रत्येक बाबतीत आपल्या बुद्धीला पटेल तेच करण्याचा त्याचा आग्रह असे. त्यातून बालशिक्षण क्षेत्रात अतिशय मौलिक आणि क्रांतिकारक कार्य त्यांच्या हातून झाले. मॉन्टेसोरी पद्धत परदेशातून आलेली. पण तिचे त्यांनी स्वदेशीकरण केले. पुढे तिला ग्रामीण पेहेराव चढवला आणि शेवटी ती आदिवासींकरिता राबवली. त्यांनी सतत प्रयोग केले. त्यातून अंगणवाडीची कल्पना उदयाला आली. कुरणशाळा किंवा इतर कल्पना या मूळच्या त्यांच्या नव्हत्या. त्यांनी स्थळकाळाचे भान कायम ठेवले होतते. मूळ परकीय कल्पना परिस्थितीनुसार इतक्या बदलत गेल्या की त्या नव्याने घडवल्या आहेत असे वाटावे. या प्रयोगशीलतेतून शिक्षणमहर्षीचे त्यांचे स्थान घडत गेले.
येन केन प्रकारेण समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत बालशिक्षण नेऊन भिडविण्याचे ताराबाईंचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी आंगणवाडी, कुरणशाळा आणि विकासवाडी असे विविध प्रकल्प राबवले. यातला शेवटचा प्रकल्प त्यांनी कोसबाड या ठिकाणी उभा केला.
कोसबाड बोर्डीपासून ५ मैल अंतरावर आदिवासींचे ठिकाण. तेथेत्यांनी विकासवाडी सुरू केली. कोसबाडच्या परिसरात आदिवासींचे एकूण आठ पाडे होते. त्या वस्त्यांमधून आदिवासींची सुमारे १०० मुले बालवाडीसाठी मिळू शकतील असा त्यांचा कयास होता. तेथे वीज, पाणी, रहदारीचे रस्ते, दळणवळणाची साधने असा सर्वांचाच अभाव होता. अशा ठिकाणी पाळणाघर, बालवाडी आणि प्राथमिक शाळा असे तीन विभाग असलेली साखळी शिक्षणसंस्था ताराबाईंनी उभी करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुरेशी पूर्वचौकशी करून पाहणी अहवाल बनविले. शासनाने यापूर्वी आदिवासींच्या विकासाचा प्रश्न हाती घेतलेला होता, नाही असे नाही. पण काका कालेलकरांच्या शब्दात सांगायचे तर ‘जी गोष्ट सरकारच्या हाती गेली ती चैतन्यरहित होऊन जाते….. ज्या प्रवृत्तीला सरकारचा हात लागतो त्या प्रवृत्तीची परिभाषा कायम राहिली तरी….. तिला भाडोत्री स्वरूप येते.
ताराबाईंनी आपली योजना सरकारपुढे मांडली. तिच्यात पाळणाघरापासून वसतिगृहापर्यंत प्रत्येक विभगासाठी स्वतंत्र इमारती, कार्यकर्त्यांसाठी निवासस्थाने यांचा अंतर्भाव होता. सर्व सरकारी सोपस्कार पार पडल्यानंतर केंद्र सरकारकडून योजना मंजूर झाली. एकूण खर्चाच्या १७% टक्के पैसे संस्थेने द्यायचे होते. तेवढेही पैसे संस्थेपाशी नव्हते. शेवटी तेही सरकारकडूनच पण कर्जाऊ रक्कम म्हणून घ्यायचे ठरले. कर्ज दरसाल ५ टक्के व्याजाने ३० वार्षिक हप्त्यात फेडायचे होते. काही रक्कम गांधी स्मारक फंडाकडून मिळणार होती. या सर्व उलाढाली चालू असताना ताराबाई पासष्टीला आलेल्या होत्या. हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन गेलेला होता. हितचिंतकांनी चोहोकडून मोडते घालून पाहिले. पण ताराबाईंनी हे आव्हान स्वीकारलेच, टेकडीवरची सुमारे १८ एकर जमीन ताराबाईंनी नूतन बालशिक्षण संघाच्या नावाने विकत घेतली. २० जून १९५६ रोजी एक झपाटलेली म्हातारी प्रचंडजबाबदारी अंगावर घेऊन डहाणू तालुक्यातल्या या जंगलात राहायला आली. १९५७ मध्ये बोर्डीच्या ग्राम-बाल-शिक्षा केंद्र या संस्थेचे स्थानांतर कोसबाडच्या टेकडीवर झाले.
ताराबाईंचे आपल्या अनुयायांना सांगणे असे की, ‘आपले काम सरकारच्या दृष्टीने एक चैन आहे. जे बालमंदिरांची फी देऊ शकतील अशाच थरातील बालकांसाठी आजवर बालशिक्षणाचे कार्य झाले आहे…. आपल्याला आदिवासींच्या भूमीत जाऊन बालवाडी चालवायची आहे. गरिबांची सेवा करून हे कार्य देशसेवेचे आहे हे दाखवायचे आहे.’ बालवर्ग’ हे कोणत्याही प्रगतिशील जनतेच्या जीवनाच्या पुनर्रचनेचे रामबाण साधन आहे असा त्यांचा दृढविश्वास होता. आणि त्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावायला त्या निघाल्या होत्या.
भारतात आदिवासींची लोकसंख्या ७ टक्के आहे. महाराष्ट्रात ४० लाख आदिवासी असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या ६ टक्के पडते. त्यापैकी एकट्या ठाणे जिल्ह्यात आठ लाख आदिवासी आहेत. त्यांच्यातले तीन सव्वा तीन लाख वारली जातीचे आहेत. ताराबाईंना दिसून आले की मुंबईपासून फक्त ८० मैलांवर असलेली वारली जमात सुधारलेल्या जगाच्या किमान काही शतके मागे आहे.
ढवळ्या (पांढरपेशा) माणसाबद्दल त्यांच्या मनात केवढी धास्ती! वारली मुले वाघाला काठीने हुसकून लावीत, पण पांढच्या कपड्यातल्या माणसाला पाहून धूम ठोकीत. त्यांचा स्वभाव भोसळट. वृत्तीत बंडखोरी नाही. व्यापारी, ठेकेदार, सावकार, दुकानदार, पोलिस, सरकारी अधिकारी – सान्यांनी त्यांना आजवर केवळ लुबाडले होते. मतलबाशिवाय कोणी आपल्यासाठी काही करील हे त्यांना पटणे अशक्यच. वारली लग्न पंचासमक्ष नक्की करतात. मग तरुण-तरुणी एकत्र राहतात. पुढे पैसे जमवून सवडीने केव्हातरी ‘लग्न’ हा विधी उरकतात. लग्नविधी म्हणजे गावजेवण घालणे. कधी कधी एवढी ऐपत यायला इतका वेळ लागतो की बापाचे आणि मुलाचे लग्न बरोबरच होते. विधुर माणसाचे लग्न दुसर्या स्त्रीशी होताना तिचे पूर्वी लग्न झालेले नसेल तर तिचे एकटीचेच लग्न होते. कारण याचे पूर्वी एकदा झालेले असते.
अशा वारली जमातीत ताराबाईंनी आपले काम ‘विकासवाडी या नावाने सुरू केले. नाव सोपे असले तरी काम किती अवघड असेल याची कल्पना आपण करू शकतो. वारल्यांचीमुले कायम अर्धपोटी. सतत अन्नाचा शोध घेत राहणे हा त्यांचा स्वभाव बनलेला. फळझाडांचा कोवळा पाला, वडाची फांदी हेही त्यांना गोड लागते.
ताराबाईंच्या दृष्टीने त्यांच्यात विकास घडवून आणायचा हा प्रश्न साधा नसून मानवी भू-भाग परत मिळवण्याचा आहे. जमीन लागवडीखाली आणण्याच्या योजना जशा आपण आखतो तशा आखून या मानवी भू-भागाला आपल्याला सुपीक बनविले पाहिजे. आणि या प्रयत्नांची सुरुवात मनाच्या प्रभातकाली – बालवयातच झाली पाहिजे.
पाळणाघरापासून सुरुवात झालेली, संस्थेत वाढणारी मुले शालेय जीवनक्रमात रुची घेत. त्यांची मानसिक बैठक आपोआप तयार होई. पण इतर मुलांच्या शाळेतल्या उपस्थितीसाठी काय करावे हा प्रश्न ताराबाईंना पडला. त्याचे तीन भाग पडले. (१) गुरे वळायला जाणार्या मुलांचा प्रश्न, (२) कमाईचा प्रश्न आणि (३) दिवसभर मजुरीसाठी बाहेर जाणार्या मोठ्या मुलांचा प्रश्न. यावर त्यांनी तीन स्वतंत्र उत्तरे शोधून काढली. ती म्हणजे (१) कुरणशाळा, (२) उद्योगालय, (३) रात्रशाळा.
कुरणशाळा, अंगणवाडी या उपक्रमांची नोंद शिक्षणक्षेत्रातील मौलिक संशोधन म्हणून पुढे करण्यात आली. शाळेनेच मुलांबरोबर जंगलात जावे, त्यांच्या अंगणातले झाड व्हावे, हा विचार अभिनव होता. उद्योगालयात त्या भागात उपयोगी सुतारकाम, लेथकाम हे व्यवसायशिक्षण सुरू केले. लाकडीवस्तू, खेळणी, रंगीत हॅण्डल्स, बालवाड्यांसाठी लाकडी साधने, छत्र्या इ.इ. उत्पादने सुरू केली. छापखाना काढला. काम आणि शिक्षण यांची सांगड घातली.
गांधीजी म्हणाले होते आदिवासींना गवत कसे खायचे ते शिकव. ताराबाईंना या म्हणण्याचा अर्थ आता कळू लागला होता. त्यांनी आदिवासींच्या शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणून तीन गोष्टी सांगितल्या आहेत. (१) आर्थिक परिस्थिती सुधारण्याची योजना, (२) विद्यार्थ्यांमध्ये जगाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहण्याची वृत्ती निर्माण करणे, आणि (३) हा आपला देश आहे याची जाणीव – नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे. मात्र ही उद्दिष्टे ठरविणे जेवढे सोपे तेवढे ती पुरी करणे सोपे नाही याची जाणीव जणू त्यांच्या जीवनकार्याने होते.
ताराबाईंचे सारे जीवन हेच एक आश्चर्य आहे. चाकोरीबाहेरचे आहे. त्या म्हणतात, ‘अमरावतीला असताना मी चारचौघींसारखीच सुखवस्तू होते. पुढे …. असे जीवन मी निवडले ते अगदी खाजगी कारणामुळे. प्रेरणेचा वगैरे इथे संबंध नाही. आयुष्यातल्या काही आपत्तीतून जाताना मी मार्ग शोधीत होते….. स्वार्थापोटीच म्हणा हवे तर, मी या बालशिक्षणाकडेवळले.
केव्ही नि ताराबाईंचा जीवनपट पाहताना टॉलस्टॉय पतिपत्नींची आठवण येते. गांधी कस्तुरबांची आठवण होते. ही तिन्ही जोडपी भिन्न स्वभावधर्म असणारी. एक जोडीदार सुखभोगी लोलुप जीवनाचे आकर्षण असणारा, दुसरा सुखत्यागी, परोपकारी, अन्त्योदयासाठी जीवन झोकून देणारा! टॉलस्टॉयने गृहत्याग केला शेवटी स्वतंत्र होऊन सन्मानाने मरणाला सामोरे जाण्यासाठी! गांधींनी कठोर हुकूमशहा बनून हिंदु पतिव्रता कस्तुरबांचा विरोध मोडून काढला. ताराबाईंनी आधुनिक स्वतंत्र, सुविद्य स्त्रीला शोभेशा रीतीने विवेकाने आपला जोडीदार सोडला. स्वतःचा जीवनमार्ग निवडला.
आणखी दोन गोष्टी ताराबाईंच्या जीवनपटात दिसतात. एक ही की, आपण स्वीकारलेले काम सत्कार्य आहे याची एकदा खात्री पटल्यावर प्रयत्नांची कसूर ठेवायची नाही. निश्चयाचे बळ हेच कार्यसिद्धीचे फळं समजायचे. दुसरी ही की, माणसे लहान-मोठी असे म्हणायचे नाही. तुमच्या इतकी निष्ठा, तुमच्या एवढे चातुर्य, तुमच्या सारखी चिकाटी सर्वामध्येच असेल असे नाही. मिळतील तसे, असतील त्या वकुबाचे सहकारी हाताशी घेऊन महान कार्ये उभी राहातात, उभी करता येतात. ताराबाईंच्या एक्यांशी वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यातून अशा कितीतरी गोष्टी, दृष्टी असेल तशा दिसतील.