कोणत्याही देशांतील बहुसंख्य लोकांची अशी पक्की खात्री असते की आपल्या देशातील विवाहसंस्था सोडून अन्य सर्व विवाहसंस्था अनैतिक आहेत, आणि जे लोक असे मानीत नाहीत त्यांना आपल्या स्वैर जीवनाचे समर्थन करावयाचे असते असे ते समजतात. भारतात विधवांचा पुनर्विवाह ही गोष्ट परंपरेने अत्यंत भयंकर मानली गेली आहे. कॅथलिक देशात घटस्फोट पाप मानला जातो, पण वैवाहिक दुर्वर्तन, निदान पुरुपांचे, काही प्रमाणात क्षम्य मानले जाते. अमेरिकेत घटस्फोट सुलभ आहे, पण विवाहबाह्य संबंध फार मोठा दोष मानतात. मुसलमानांना बहुपत्नीकत्व संमत आहे, पण आपण ते निंद्य समजतो. ही सर्व भिन्न मते अतिशय उत्कटपणे स्वीकारलेली असतात आणि त्यांचा भंग करणार्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाते. आपल्या देशातील रीती मानवी सौख्यास अन्य देशातील रीतीपेक्षा अधिक साधनीभूत आहेत हे दाखविण्याचा कसलाही प्रयत्नह्या सर्व देशांतील कोणीही करीत नाही.