आम्हांला हल्ली सर्व गोष्टी कळत नाहीत हे खरें, आणि असेही पाहिजे तर म्हणू की काही गोष्टी कदाचित कधीही न कळण्यासारख्या असतील. पण त्यासंबंधीं अमुक प्रकारची श्रद्धा ठेवा असे तुम्ही कोण मला सांगणार?ज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतां ती आत्मवंचना कशावरून नाहीं?कितीही मोठा विद्वान् असला तरी त्याचे बाबतींत आत्मवंचना शक्य असते, आणि हे ज्याचे त्याला कधीही कळत नाहीं, हे सांगितलेल्या विद्वानांच्या उदाहरणावरून दिसते. तेव्हां श्रद्धा म्हणजे बेअकलीपणा आहे. तुमच्याजवळ पुरावा असल्यास पुढे आणा. आम्ही तो तपासून पाहूं आणि काय ते ठरवू. तेथपर्यंत नुसत्या गप्पांचा आमचेजवळ कांहीं उपयोग नाहीं. उद्या तुम्ही म्हणालात कीं चंद्रावर एक मनुष्य आहे, त्याला तीन मैल लांब दाढी आहे. आम्ही म्हणू पुरावा आणा, तेथपर्यंत तुमच्या म्हणण्याचा विचार करण्याचे कारण नाहीं.