आजच्या सुधारक च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकाच्या मलपृष्ठावर पंडिता रमाबाईंचा एक उतारा छापला आहे. त्यात बाई म्हणतात, “हिंदूधर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणाच्या माझ्या पाश्चात्य मित्रांना मी विनंती करते की हिंदुतत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले रूप दिसून येईल”.
आग्रा येथील ज्या किल्ल्याच्या दर्शनाने हे विचार प्रेरित झाले आहेत त्याचा हिंदु धर्माशी किंवा तत्त्वज्ञानाशी अर्थाअर्थी काही संबंध नसला तरी विचार अगदी योग्य आहेत.
पण समजा एखाद्याने म्हटले की ख्रिस्ती धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळू नका. ख्रिस्ती बुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर – दरवाजे उघडून पाहा.* हे म्हणणेही योग्य होईल. आपण फार आतपर्यंत गेलो नाही तरी जिवंत जाळलेले पाखंडी, ज्यांच्यावर गुलामगिरी लादली गेली आणि ज्यांना पाशवी वागणूक देण्यात आली असे असंख्य आफ्रिकन लोक, व ज्यांची शिकार करण्यात आली अशा रेड इंडियन्सची आणिआस्ट्रेलियातील तद्देशीयांची प्रेते तेथे दिसतील..
मग बाई ह्या ख्रिस्ती स्मारकात चोर दरवाजाने कशा शिरल्या? कुणी ह्याचे स्पष्टीकरण करील काय?