बंगलोरला येत असताना, नागपूर ते मद्रास या प्रवासात आजचा सुधारकचा मे १९९७ चा अंक वाचला. या अंकात श्री अविनाश भडकमकर नावाच्या सद्गृहस्थाचा ‘‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ या शीर्षकाचा लेख आहे. लेखकाचा आव तात्त्विक चर्चा करण्याचा असला, तरी त्यांचा खरा हेतु भारतीय जनता पार्टीला झोडपून काढण्याचा दिसून येतो. तत्त्वचिंतन कमी आणि पूर्वग्रह अधिक अशा लेखाला तात्त्विक म्हणावे किंवा नाही, असा प्रश्न कुणाच्या मनात उत्पन्न झाला, तर त्याला त्याबद्दल दोष देता येणार नाही. तथापि, श्री भडकमकर यांच्या या लेखाच्या संदर्भात,विशेषतः त्यांच्यासाठी आणि सामान्यतः सर्व तथाकथित सेक्युलरिस्टांसाठी मी काही मुद्दे प्रस्तुतकरीत आहे.
१) ‘सेक्युलर’ शब्दाचा ‘धर्मनिरपेक्ष’ हा अनुवाद भोंगळ आहे. तो आम्हाला मान्य नाही. ‘धर्म’ या संकल्पनेचा सम्यक् अर्थ न जाणण्याच्या अडाणीपणातून तो उद्भवला आहे.‘सेक्युलर’शब्दाचा खरा अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. सर्व सेक्युलरवाद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो रूढ करावयाला हवा होता. परंतु मग हिंदुत्ववाद्यांना झोडपता आले नसते. कारण ‘राज्य’ किंवा ‘शासन’। हे ऐहिक असते. असले पाहिजे, त्याचा पारलौकिकाशी संबंध नसतो, त्या बाबतीत ते निरपेक्ष असले पाहिजे, अशीच हिंदुत्ववाद्यांची भूमिका आहे. भाजपानेही राज्य ‘थिओक्रेटिक’ असले पाहिजे, असे कधी म्हटलेले नाही. श्री भडकमकरांना असे काही वचन आढळले असेल, तर ते त्यांनी दाखवावे.
२) आपल्या म्हणजे हिंदूंच्या परंपरेतही राज्य ऐहिक असावे, हीच मान्यता आहे. एखादा दुसरा अपवाद नसेल, असे नाही. परंतु त्यानेही सामान्य नियमच सिद्ध व्हावा, येथे राजा शंकराचार्य बनला नाही आणि शंकराचार्याला राजसिंहासनावर बसविण्यात आले नाही. पश्चिमेकडे पोप आणि राजा किंवा खलिफा आणि बादशहा ही दोन्ही पदे एका व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित झाली होती. तेव्हा तेथे सांप्रदायिक राज्य किंवा थिओक्रेटिक स्टेट अस्तित्वात होते. त्याच्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात सेक्युलर स्टेटची संकल्पना उदयाला आली. वस्तुतः सेक्युलर स्टेट ही निरर्थक पुनरुक्ती आहे. ‘स्टेट’आहे तर ते सेक्युलरच असले पाहिजे. कारण त्याचा संबंध इह-जगताशी असतो. पारलौकिकाशी नाही. पारलौकिक जीवन आणि ऐहिक जीवन याबाबतचा विचार करणार्या् संस्थांची कार्यक्षेत्रे भिन्न आहेत. ‘सेक्युलर स्टेट’ चा विचार हा हिंदू विचार आहे.
३) राज्य सेक्युलर असले म्हणजे त्या राज्यातील जनतेने ‘इहवादी’ जीवनदृष्टी स्वीकारली पाहिजे असे नाही. ‘इहवाद्यांचा’हा अनाठायी आग्रह आहे. या दृश्य जगताच्या पलीकडे काही नाही, मृत्यू झाला की सर्व संपले, ईश्वर वगैरे सब झूट आहे असे इहवाद्यांना मानावयाचे असेल, तर तसे त्यांनी खुशाल मानावे. परंतु सर्वांनी ते मानले पाहिजे, ते मानणार नाहीत तर त्यांचे राज्य ‘ऐहिक राहणार नाही, असे सांगणे ही वैचारिक भ्रांती आहे. बौद्धिक अहंकारही आहे. लोक आस्तिक किंवा नास्तिक असू शकतात. राज्याने ‘ऐहिक’ मर्यादा स्वीकारणे याचा अर्थ राज्यकर्ते नास्तिक असले पाहिजेत असा होत नाही. सध्या तरी जगात आस्तिकांची संख्या अधिक आहे. म्हणून आस्तिकांच्या लोकशाहीत नास्तिकांना आपल्या मताचा प्रचार करण्याची मोकळीक आहे. नास्तिकांच्या बहुसंख्येत हुकूमशाहीचा धोका आहे, गेल्या सत्तर वर्षांचा रशियाचा इतिहास याचे ढळढळीत उदाहरण आहे.‘इहवादी दृष्टिकोण म्हणजे नास्तिक दृष्टिकोण काय,’हे श्री भडकमकरांनी स्पष्ट करावयाला हवे.
४) “लोकशाहीमध्ये सामाजिक जीवन आणि कोणतेही सार्वजनिक क्षेत्र खर्याद अथनि ‘धर्मनिरपेक्ष’ नसेल तर मग शासनयंत्रणाही धर्मनिरपेक्ष राहू शकणार नाही” (पृ. ५०) हा भडकमकरांचा अभिप्राय चूक आहे. राजकीय जीवन म्हणजे संपूर्ण लोकजीवन होत नाही. मला
व्यक्तिशः आणि समूहशः गणपती मांडता आला पाहिजे; दसर्या.ला मिरवणूक काढता आली पाहिजे, रामलीला भरवता आली पाहिजे, संक्रांतीचे हळदीकुंकू करता आले पाहिजे, मोहरमचे ताबूत मिरवता आले पाहिजे, बुद्धवंदना म्हणता आली पाहिजे, शबद-कीर्तन ध्वनिवर्धकावरून प्रसारित करता आले पाहिजे. हे सार्वजनिक किंवा सामाजिक जीवनाचे आविष्कार आहेत. स्टेट ‘सेक्युलर’ असले, तरी त्याने या आविष्कारांना विरोध करण्याचे कारण नाही. हे आविष्कार सहकारी खर्चात नकोत, एवढे मान्य व्हावयाला अडचण नाही.
५) आपली राज्यघटना १९५० साली तयार झाली. त्या वेळी, त्या घटनेच्या प्रास्ताविकात (‘प्रि-अॅम्बल’) ‘सेक्युलर’ शब्द नव्हता आणिबाणीच्या कालखंडात श्रीमती इंदिरा गांधींनी तो घुसविला. भडकमकरांना माझा प्रश्न आहे की, १९५० ते १९७६ या २६ वर्षांच्या कालखंडात आपली घटना सेक्युलर होती की नाही?‘प्रि-अॅम्बल’ मध्ये तो शब्द घालून श्रीमती गांधींनी काय साधले?भडकमकरांकडून उत्तराची अपेक्षा आहे. प्रिअॅम्बलमध्ये घुसविण्यात आलेल्या ‘समाजवादी’ या शब्दाचा प्रश्न मी विचारीत नाही. कारण तो मुद्दा या चर्चेत प्रस्तुत नाही.
६) श्री भडकमकर पं. जवाहरलाल नेहरूंचे पक्षपाती दिसतात. नेहरू ‘स्युडो सेक्युलरिस्ट होते असे मी म्हटले तर त्यांना राग येईल. परंतु त्यांना ढोंगी सेक्युलरिस्ट का म्हणू नये?घटनेचे मार्गदर्शक तत्त्व सर्वांसाठी समान नागरी कायदा करण्याचे असताना, नेहरूंनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत केवळ हिंदूसाठीच ‘हिंदू कोड बिल’ का तयार केले?भडकमकर लिहितात, त्यांना (पं. नेहरूंना) असे वाटत होते की, निदान भारताचे ८५ टक्के नागरिक ‘एका नागरिक कायद्याखाली येत आहेत.’ माझा प्रश्न असा आहे की, ८५ टक्के का?शंभर टक्के का नाही?ज्या काळी ‘हिंदू कोड बिल’ तयार झाले त्या काळात समान नागरी कायद्याला विरोध करण्याची ना मुसलमानांची हिंमत होती ना खिस्त्यांची. तरी नेहरूंनी सर्वांसाठी एक कायदा कां केला नाही?कारण एकच आणि ते हे की, नेहरू संप्रदायविशेषांचा विचार करूनच राज्य करीत होते.
७) पं. नेहरूंचे हे वर्णन अपवादात्मक समजण्याचे कारण नाही. मी भडकमकरांचे लक्ष घटनेच्या ३० व्या कलमाकडे वेधू इच्छितो. या कलमान्वये भाषिक किंवा सांप्रदायिक (religions) अल्पसंख्यकांना आपल्या शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा व त्या चालविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आपल्या राज्यघटनेत असे कोणते कलम आहे की, जे अल्पसंख्यकांना शिक्षणसंस्था स्थापन करण्याला मनाई करते? मग या ३० व्या कलमांचे प्रयोजन काय?या कलमामुळे, ख्रिस्ती व मुसलमान यांच्या संस्थांना इतर संस्थांना लागू होणारे नियम लागू होत नाहीत हे काय पं. नेहरूंना कळले नाही?सांप्रदायिक अल्पसंख्यकांची विद्यालये, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, विज्ञान, गणित हेच तर विषय शिकवितात. हे विषय शिकविणे हा काय ‘रिलिजस् राइट’ आहे?मग नागपूच्या बिंझाणी महाविद्यालयाला, किंवा धरमपेठ विद्यालयाला सरकारी नियमांची जी बंधने आहेत, २८ व्या कलमाने त्यांना रिलिजस् इन्स्ट्रक्शन देण्यावर जी बंदी आहे, ती बंधने आणि बंदी नागपूरच्याच हिस्लॉप कॉलेजला का नाही?१९६७ साली, हिस्लॉप कॉलेजच्या व्यवस्थापकांनी प्राचार्यपदासाठी अर्ज मागविणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती.तीत फक्त खिस्त्यांनी अर्ज करावे असे नमूद केले होते. एकाही सेक्युलरिस्टांची ओरड तर सोडाच, पण साधी किरकीरही आमच्या कानावर आली नाही. धरमपेठ किंवा बिंझाणी महाविद्यालयाने फक्त ‘हिंदूंनी अर्ज करावे, अशी जाहिरात दिली असती, तर सारे सेक्युलरिस्ट रागाने केवढे नाचले असते ! सरकारी नियमांच्या बंधनातून सुटण्यासाठी रामकृष्ण मिशनसारख्या संस्थेला आपण हिंदू संस्था नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे लागले! हे खर्यास सेक्युलर स्टेटचे प्रतीक समजायचे की, स्युडो सेक्युलरिझमचे?
८) पं. नेहरूंचे एकदाचे जाऊ द्या. परंतु जे स्वतःला पुरोगामी आणि समाजवादी म्हणून मिरवितात, त्यांचे तरी वर्तन वेगळे आहे काय?विश्वनाथ प्रताप सिंह प्रधान मंत्री असताना, महाराष्ट्रातील पुरोगामी’ महिलांनी एक संमेलन आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटनाला वि. प्र. सिंह यावयाचे होते. या संमेलनात‘समान नागरी संहिता’ असावी असा ठराव आणावयाचे ठरले होते. पण सिंहांनी तिकडे डोळे वटारले, तर इकडच्या सर्व सिंहिणींची गाळण उडाली. आणि तो विषय त्यांनी बाजूला ठेवला. हा दांभिक सेक्युलरिझम् नव्हे तर आणखी काय आहे?या मंडळींचा सर्व पराक्रम हिंदूंना दूषणे देण्यात खर्च होतो. त्यांच्या अंतःकरणातील हिंदुद्वेष आणि हिंदु-द्रोह त्यांच्या लेखणीत आणि वाणीत वेळोवेळी प्रकट होत असतो. कारण असे करण्यात धोका नसतो. त्यांना पक्के ठाऊक असते की, हिंदू त्यांच्या आक्रस्ताळ्या आणि पक्षपाती मताची उपेक्षाच करणार. निरुपद्रवी उपेक्षा. परंतु त्यांचा सेक्युलरिझम म्हणजे हिंदुद्वेष, हे सत्य काही त्यामुळे लपून राहात नाही.
सारखाच एक रिलिजन असेल तर त्यास अन्य तीन रिलिजनांचा अंतर्भाव कसा?हिंदू कोड बिलही या सर्वांना लागू का?या ‘हिंदूत ख्रिस्ती व इस्लामीही समाविष्ट व्हावे, अशी आमची इच्छा आहे, आकांक्षा आहे. परंतु दुर्दैवाने हिंदू समाजातीलच दळभद्रे विचारवंत ‘हिंदू’चा अर्थ संकुचित करून, बाधा उत्पन्न करीत आहेत. वस्तुतः ‘धर्मात’ रिलिजनचा हिस्सा फक्त एक चतुर्थांश असतो.‘धर्माचा’ अधिकांश भाग ऐहिक आहे. जो पारमार्थिकपणा आहे, त्याच्या बाबतीत हिंदू पूर्ण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आहे.
११) तत्त्वचर्चेत वापरल्या जाणार्याू शब्दांचे नेमके अर्थ सांगितले गेले नाहीत, तर चर्चेला नेमकेपणा येत नाही. फ्रेंच लेखक वॉल्टेअर म्हणाला होता की, If you want to talk with me, please define your terms.” भडकमकरांनी वॉल्टेअरचा हा निर्देश ध्यानात घेतला असता तर कादाचित ‘धर्मनिरपेक्षतेला आव्हान’ असा मथळा आपल्या लेखाला त्यांनी दिला नसता. ‘ऐहिकतेला आव्हान’ असा मथळा त्यांना योग्य वाटला असता आणि ज्याचा केवळ ऐहिकाशी संबंध आहे अशा बाबतीत सांप्रदायिकता आणणाच्या आणि ती पोसणाच्या पं. नेहरूंसारख्या व्यक्तीचे गोडवे गाताना त्यांनी जरा थांबून विचार केला असता.