वैज्ञानिक व आस्तिकता यांविषयी गेल्या तीन महिन्यात ‘आजचा सुधारक’मध्ये वेगवेगळी मते मांडण्यात आली. ह्याच चर्चेचा धागा पकडून काही माहिती देत आहे. अत्याधुनिक ज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या व सर्व प्रकारचे ऐहिक सुख भोगत असलेल्या अमेरिकन वैज्ञानिकांना ईश्वर व अमरत्व (life after death) यांविषयी काय वाटते याबद्दलची एक चाचणी नुकतीच घेण्यात आली. ३ एप्रिल १९९७ च्या ‘नेचर’च्या अंकात याविषयीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. जॉर्जिया विद्यापीठाचे एड्वर्ड लार्सन व लॅरी विथम यांनी १९९६ मध्ये यथातथाच निवडलेल्या १००० वैज्ञानिकांची चाचणी घेण्यात आली. अशीच वैज्ञानिकांची चाचणी यापूर्वी १९१६ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व संशोधक जेम्स ल्यूबा यांनी घेतली होती. ऐंशी वर्षानंतर ल्यूबाने काढलेल्या निष्कर्षामध्ये काही बदल झालेले आहेत का याचा शोध ९६ च्या सर्वेक्षणामध्ये घेण्यात आला. ल्यूबाने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार साठ टक्के वैज्ञानिकांची ईश्वरावर श्रद्धा नव्हती. ही टक्केवारी हळूहळू विज्ञानाच्या प्रसारानुसार वाढत जाईल असे भाकित त्याने केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८०वर्षानंतरसुद्धा अजूनही ४० टक्के वैज्ञानिकांचा ईश्वर व मरणोत्तर जीवनावर विश्वास आहे असेआढळले. दोन्ही सर्वेक्षणानुसार जवळजवळ ४५ टक्के वैज्ञानिक नास्तिक होते व १५ टक्के अज्ञेयवादी होते. ल्यूबाच्या चाचणीप्रमाणेच १९९६ च्या चाचणीतील वैज्ञानिकांमध्ये ५० टक्के जीवशास्त्रज्ञ, २५ टक्के गणितज्ञ तर उरलेले भौतिकी/खगोल शास्त्राचे अभ्यासक होते.
ल्यूबा यांनी अनुसरलेली पद्धतच याही वेळी जास्तीत जास्त कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला होता.
आस्तिक, नास्तिक व अज्ञेयवादी यांच्या टक्केवारीत दोन्ही सर्वेक्षणांमध्ये जरी बदल झाला नसला तरी वैज्ञानिक विषयानुसार विभागणी केल्यावर टक्केवारीत फरक जाणवला. १९९६ च्या सर्वेक्षणानुसार गणितज्ञांचा ईश्वरावर विश्वास कमी होत चालला आहे (४४.६%). ल्यूबाच्या चाचणीमध्ये जीवशास्त्रज्ञांचा ईश्वरावर विश्वास न ठेवण्याकडे कल होता (६२.५%). आता ही जागा भौतिकी/खगोल शास्त्रज्ञांनी घेतली आहे (७७.९%). १९१६ मध्ये ईश्वर न मानणान्यांमध्ये ७३ टक्के वैज्ञानिकांना अमर होण्याची उत्कंठा होती. परंतु ८० वर्षानंतर या अमरत्वाच्या ध्यासाचा मागमूसही राहिला नाही. ल्यूबाच्या चाचणीत ईश्वर न मानणाच्या अनेक वैज्ञानिकांना आपले नाव अजरामर व्हावे, पुढच्या पिढीने आपले स्मरण करावे या उद्देशाने अमरत्वाची आशा बाळगली होती. परंतु १९९६ च्या सर्वेक्षणामध्ये ईश्वर व अमरत्व हे एकमेकांशी संबंधित आहेत ह्या तर्कशुद्ध विचाराला पुष्टी मिळाली. त्यामुळे ईश्वर न मानणारे परंतु अमरत्वाची स्वप्ने बाळगणारे अशी विसंगती या चाचणीत नव्हती.
जेम्स ल्यूबा यांनी ८० वर्षांपूर्वीच पुढील काळात जनतेच्या धार्मिक श्रद्धेत बदल दिसून येईल असे भाकित केले होते. एक नामवंत मानसशास्त्रज्ञ असूनसुद्धा ल्यूबाला जनतेच्या मनाचा ठाव किंवा विज्ञानाच्या प्रभावाचा नीटसा अंदाज येऊ शकला नाही असे आता आपण म्हणू शकतो.