आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ अंकात प्रसिद्ध झालेल्या “भक्ती हे मुल्य आहे काय?” या माझ्या लेखावर प्रा. बा. वि. ठोसर यांनी लिहिलेले एक चर्चात्मक टिपण याच अंकात अन्यत्र छापले आहे. हे टिपण लिहिल्याबद्दल मी प्रा. ठोसरांचा अतिशय आभारी आहे. कोणत्याही विषयातील सत्य त्याच्या साधकबाधक चर्चेशिवाय हाती लागत नाही ही गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून प्रा. ठोसरांच्या लेखाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
आपल्या लेखात प्रा. ठोसरांनी प्रथम कार्ल पॉपर या थोर तत्त्वज्ञाचे सार्थ (किंवा अर्थपूर्ण – meaningful) विधान आणि वैज्ञानिक विधान यासंबंधीचे मत उद्धृत केले आहे. या शतकाच्या तिसर्याा दशकात युरोपमध्ये व्हिएन्ना येथे ‘Logical Positivismकिंवा ‘Logical Empiricism’ (तार्किकीय अनुभववाद) या नावाचे एक तत्त्वज्ञान निर्माण झाले होते, आणि पुढील २५-३० वर्षे त्या तत्वज्ञानाचा आंग्लभाषी जगात खूपच बोलबाला होता. या तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे त्यात प्रतिपादलेला विधानांच्या सार्थतेचा (meaningfulness) सत्यापनीयता (verifiability) हा निकष. कोणतेही विधान जर सत्यापनीय असेल तर आणि तरच ते अर्थपूर्ण असू शकते असे हे मत होते. विधान सात्यापनीय आहे याचा अर्थ त्याची सत्यासत्यता इंद्रियानुभवाने ठरविता येते. अमुक अमुक अनुभव आल्यास दिलेले (given) विधान सत्य आहे असे आपण म्हणू शकलो तर ते विधान सत्यापनीय आहे, आणि फक्त अशीच विधाने अर्थपूर्ण असू शकतात. तार्किकीय अनुभववाद्यांचा कटाक्ष ज्यांना ते ‘metaphysical (अतिभौतिकीय) विधाने म्हणत त्यांच्याविरुद्ध होता. ही विधाने (उदा. ‘ईश्वर आहे) कोणते अनुभव आले असता सत्य मानता येतील हे सांगणे अशक्य आहे, आणि म्हणून ती निरर्थक आहेत असे त्यांचे मत होते. अतिभौतिकीय विधाने अर्थहीन असतील तर ती काहीच प्रतिपादत नाहीत असे होईल, आणि म्हणून ती सत्यही नाहीत आणि असत्यही नाहीत असे आपल्याला म्हणावे लागेल.
आता पॉपर यांचे मत असे होते की कोणतेही सार्विक विधान सत्यापनीय असू शकत नाही, कारण त्याला साधक किंवा अनुकूल असा कितीही अनुभव आला तरी पुढेमागे केव्हातंरी बाधक अनुभव येणारच नाही असे आपण म्हणू शकत नाही. उदा. सर्व कावळे काळे आहेत हे विधान घ्या. समजा आपल्याला लक्षावधी काळे कावळे दिसले, अणि एकही अन्य रंगाचा कावळा दिसला नाही. तरी तेवढ्याने ते विधान सत्य सिद्ध झाले असेआपण म्हणू शकत नाही. कारण उद्या अन्य रंगाचा कावळा आढळणारच नाही असे कोणीही म्हणू शकणार नाही. म्हणून सत्यापनीयवाद्यांच्या मतानुसार ते वाक्य निरर्थक ठरणार. सार्थ विधानाचा नमुनाच म्हणता येईल असे हे वाक्य सत्यापनीयतेच्या निकषानुसार निरर्थक ठरते ही गोष्ट अनुभववाद्यांचा तो निकष बरोबर नाही हे सिद्ध करण्यास पुरे आहे असे पॉपर यांचे मत होते.
परंतु कोणतेही सार्विक विधान सत्य म्हणून सिद्ध करणे अशक्य असले तरी ते असत्य ठरण्याकरिता एक बाधक उदाहरण पुरेसे होते. म्हणून पॉपर सत्यापनीयतेच्या निकषाऐवजी खंडनीयतेचा (falsifiability) निकष सुचवितात. मात्र हा निकष ते अर्थपूर्णतेचा निकष म्हणून सुचवीत नसून विधानांच्या वैज्ञानिकते चा निकष म्हणून ते सुचवितात. एखादे विधान वैज्ञानिक म्हणून विचारणीय मानले जाण्याकरिता त्याचे खंडन करणे शक्य असले पाहिजे असे ते सुचवितात. ज्याचे खंडन होऊ शकत नाही असे विधान म्हणजे ज्याला कोणताही अनुभव बाधक होत नाही असे विधान. असे विधान वैज्ञानिक मानता येणार नाही असे पॉपर यांचे मत होते.
सत्यापनीयता आणि खंडनीयता या कल्पना स्पष्ट केल्यानंतर आपण आता प्रा. ठोसरांच्या लेखाकडे वळू शकतो. लेखाच्या आरंभीच ते ब्रायन मॅगी यांनी लिहिलेल्या पॉपर या पुस्तकातून पॉपर यांचे पुढील वाक्य उद्धृत करतात.“ईश्वर आहे” हे विधान अर्थपूर्ण आहे, आणि ते सत्यही असू शकेल; पण ते असत्य आहे हे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे ते वैज्ञानिक विधान असू शकत नाही. नंतर ते म्हणतात की ‘पॉपरच्या मते ईश्वराचे अस्तित्व खरेही मानता येत नाही, आणि खोटे पण पाडता येत नाही. आता वर उद्धृत केलेले वाक्य पॉपरचे नाही, मॅगींचे आहे. त्यापूर्वी ‘पॉपर म्हणाले असते की अशी प्रस्तावना मॅगींनी जोडली आहे. त्यांचे हे म्हणणे बरोबर आहे असे आपण गृहीत धरू या. तसे केले तर ईश्वर आहे हे विधान खंडनीय नाही, त्यामुळे ते वैज्ञानिक विधान नाही हे मॅगींचे म्हणणे बरोबर दिसते. परंतु त्याच अवतरणात “ईश्वर आहे” हे विधान अर्थपूर्ण आहे, आणि ते सत्यही असू शकेल असे पॉपर म्हणतात. या वाक्याचा अर्थ काय करावयाचा?
‘ईश्वर आहे हे विधान अर्थपूर्ण आहे हे मला मान्यच आहे. ते अर्थहीन आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही. ‘ईश्वर आहे हे विधान सत्य आहे की नाही याचा तपास मी करतो यातच ते सार्थ आहे अशी कबुली गृहीत आहे. ते सार्थ आहे असे म्हणतांना पॉपर यांना बहुधा एवढेच अभिप्रेत असावे की ईश्वराची जी कल्पना सामान्यपणे केली जाते तिच्यात अंतर्गत व्याघात नाही. उदा. वंध्यापुत्राच्या कल्पनेत जसा स्पष्ट व्याघात आहे तसा व्याघात ईश्वरकल्पनेत नाही. या अर्थाने ईश्वर तार्किक दृष्ट्या (logically) शक्य आहे. याच अर्थाने नृसिंह, गजानन, दशानन इत्यादींच्या कल्पनाही व्याघातमुक्त आहेत, आणि म्हणून ते सर्व पदार्थ तार्किकदृष्ट्या शक्य आहेत. पण वरील पदार्थ तार्किक दृष्ट्या शक्य आहेत, म्हणून ते वास्तव आहेत हे मात्र निष्पन्न होत नाही. कारण तार्किकदृष्ट्या शक्य असलेला पदार्थ एखाद्या वस्तुस्थितीच्या विरुद्ध असेल, आणि तसे असेल तर तो वास्तव असू शकणार नाही. तार्किकदृष्ट्या शक्य असणार्याव वस्तूचे अस्तित्व खोटे पाडण्याचा हा उपाय आहे. हा उपाय उपलब्ध असताना ‘ईश्वर आहे हे विधान खोटे आहे असे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नाही असे पॉपर का म्हणतात हे सांगणे कठीण आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक असलेली अनेक कारणे आहेत, आणि ती यापूर्वी या मासिकात मी अनेक वेळा स्पष्ट केली आहेत. त्या कारणांचा संक्षेपाने उल्लेख करतो.
त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे. ‘ईश्वर’ या शब्दाने आपल्याला कोणत्या गुणांनी युक्त पदार्थ अभिप्रेत आहे ते ठरविले पाहिजे. ईश्वराच्या अनेक कल्पनाआहेत हे सुप्रसिद्ध आहे. एक कल्पना आहे जगत्कारणाची, जगाच्या निर्मात्याची. ईश्वर म्हणजे जगताचे कारण हे उत्तर सामान्यपणे दिले जाणारे पहिले उत्तर असते. दुसरी कल्पना आहे पूर्णतम पदार्थाची, the most perfect being ची. कल्पनेत सर्वशक्तिमत्त्व, सर्वज्ञता, आणि अमर्याद साधुत्व यांचा अंतर्भाव होतो. तिसरी कल्पना आहे प्रार्थनेने पावणाच्या पदार्थाची. आणखीही काही कल्पना आहेत.
आता या प्रत्येक वर्णनाच्या ईश्वराला बाधक अशी निर्णायक कारणे आहेत. (१) ईश्वर हे जगताचे कारण आहे असे कोणी म्हणाल्यास ‘ईश्वराचे कारण काय?’ हा प्रश्न तत्काळ सुचतो. प्रत्येक गोष्टीला कारण असले पाहिजे हे जर खरे असेल तर ईश्वराचेही कारण असले पाहिजे, आणि असे असेल तर आदिकारण सापडल्याचे समाधान नाहीसे होते. यावर कोणी म्हणेल की ईश्वराला कारण नाही, तो स्वयंभू किंवा अनादि आहे. तर जगतही स्वयंभू किंवा अनादि का असू शकत नाही असा प्रश्न त्याला विचारता येतो. (२) ईश्वर म्हणजे पूर्णतम पदार्थ, विशेषतः सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथा साधु पदार्थ. आता या तीन गुणांनी युक्त पदार्थात व्याघात नाही असे म्हणता येईल. परंतु एक अशी गोष्ट अस्तित्वात आहे की जी अशा ईश्वरकल्पनेच्या विरुद्ध आहे. ही गोष्ट म्हणजे जगात प्रचंड प्रमाणात असलेले अशुभ किंवा अशिव (evil). जगात अतोनात दुःख आहे आणि म्हणून जगाचा निर्माता किंवा नियंता असलेल्या पदार्थात वरील तिन्ही गुण असू शकत नाहीत. त्यापैकी निदान एक गुण त्यात नसावा. पण ज्यात वरील तीन गुणांपैकी एक देखील गैरहजर असेल त्या पदार्थाला ईश्वर म्हणणे अशक्य दिसते. (३) प्रार्थनांना पावणारा, भक्तीला प्रतिसाद देणारा ईश्वर असाही ईश्वर असण्याची शक्यता शून्यप्राय आहे; कारण प्रार्थनाआणि भक्ती निष्फळ होताना आपण प्रत्यही पाहतो.
याप्रमाणे ‘ईश्वर आहे हे विधान तार्किकदृष्ट्या शक्य असले तरी ते खोटे असण्याची अनेक निर्णायक कारणे आहेत. या कारणांनी ईश्वराच्या अस्तित्वाचे खंडन करणे शक्य आहे असे मला वाटते. त्यामुळे पॉपर त्या विधानाचे खंडण करता येत नाही असे का म्हणतात ते कळत नाही. कदाचित वैज्ञानिक खंडनाकरिता त्यांना वेगळ्या प्रकारचा पुरावा अभिप्रेत असेल. परंतु माझ्या समजुतीनुसार मी दिलेली कारणे खरोखरच निर्णायक आहेत, आणि म्हणून प्रा. ठोसरांनी उद्धृत केलेली माझी दोन्ही विधाने निर्दोष आहेत असे मी समजतो.
प्रा. ठोसरांनी आइन्स्टाइनची साक्ष काढली आहे. ते धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांचा ईश्वरावर विश्वास होता. पण त्यांना वैयक्तिक स्वरूपाचा (personal) ईश्वर मान्य नव्हता. ते स्पिनोझाचा ईश्वर मानीत’ असे प्रा. ठोसर म्हणतात. स्पिनोझाचा ईश्वर असा होता प्रा. ठोसरांना कदाचित पुरेसे माहीत नसेल. स्पिनोझाचा ईश्वर म्हणजे निसर्ग. ‘God or Nature’ असे त्याचे वर्णन तो करतो. ईश्वर हा निसर्गाहून वेगळा नाही. तो जगाचा कर्ता नाही. तो अनंत आहे, त्यांची ईहाही (will) अनंत आहे, आणि तो अनंत प्रकारची कृत्ये करतो. परंतु त्याची ईहा, त्याची कर्मे आणि आपल्याला परिचत असणारी ईहा आणि कमें ही पूर्णपणे भिन्न आहेत. तो निसर्गाचे कारण आहे, पण हा कारणसंबंध आपल्याला परिचित असलेला कारणकार्य संबंध नव्हे. आपल्याला परिचित असलेला कारणसंबंध हा कालिक संबंध आहे, त्यात कारण आधी घडते आणि कार्य नंतर घडते. परंतु स्पिनोझाच्या मते कारणकार्य संबंध हा अनुमानातील साधक वाक्ये (premises) आणि निष्कर्ष यांच्यातीलकालहीन, तार्किकीय संबंध आहे. उदा. यूक्लिडच्या भूमितीतील axioms आणि त्यावरून निष्पन्न होणारी प्रमेये यांच्यातील संबंध आणि कारणकार्य संबंध एकच आहे असे तो मानतो. असा ईश्वर आइन्स्टाइन मानीत असतील कदाचित ही कल्पना वैश्विक संज्ञेच्या स्वरूपाची आहे असे डॉ. ठोसर म्हणतात. परंतु स्पिनोझाच्या मते ईश्वर म्हणजे केवळ संज्ञाच नव्हे. तर अनंत अवकाशात विस्तारलेला निसर्गही. खरे सांगायचे तर स्पिनोझाचा ईश्वर आणि अन्य ईश्वरवाद्यांचा ईश्वर यांत एका नावाखेरीज अन्य काही समान नाही. त्यामुळे स्पिनोझाचा ईश्वर आहे असे मानले तरी त्यावरून ईश्वरवाद्यांचा ईश्वर आहे या मंताला काहीहीसाह्य होण्याची शक्यता नाही.
खरे म्हणजे ईश्वर आहे की नाही या वादात आइन्स्टाइनची साक्ष काढणे मुळातच चुकीचे आहे. आइन्स्टाइन थोर वैज्ञानिक होते, विसाव्या शतकातील ते सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक होते. म्हणून वैज्ञानिक क्षेत्रात त्यांच्या अधिकाराचा उपयोग करणे बरोबर होईल. परंतु ईश्वर हा काही विज्ञानाचा विषय नाही. आइन्स्टाइनच्या कोणत्याही संशोधनात ईश्वरकल्पनेचा संबंध येत नाही अशी माझी समजूत आहे. पण तसे असेल तर ईश्वराचे स्वरूप आणि त्याचे अस्तित्व या विषयांत त्यांच्या अधिकाराला आवाहन करणे अप्रस्तुत, गैरलागू आहे. ते धार्मिक वृत्तीचे होते हा त्यांच्या वैयक्तिक स्वभाववैशिष्ट्याचा भाग झाला. वैज्ञानिक असण्याकरिता ईश्वर मानला पाहिजे असे ते स्वतःही म्हणाले नसते.
लेखाच्या शेवटी प्रा. ठोसर म्हणतात की ‘विवेकवाद कितीही तर्ककठोर केला तरी सामान्य माणसांच्या यथार्थ भावनांना त्यात स्थान दिलेच पाहिजे.’ येथील ‘यथार्थ या शब्दाने त्यांना काय अभिप्रेत आहे हे मला माहीत नाही. परंतु विवेकवादात भावनांना स्थान आहेच. मात्र भावना हे नियामक तत्त्व असू शकत नाही. त्यांना विवेकाचे नियमन अवश्य आहे. काम, क्रोध, भय, मत्सर याच फक्त नव्हेत, तर करुणा आणि प्रेम या भावनाही अनिबंध सुटणे अनर्थकारक होईल हे कोणालाही मान्य व्हावे.
शेवटी मी विचारलेल्या ‘भक्ती हे मूल्य आहे काय? या प्रश्नासंबंधी स्पष्टीकरणात्मक दोन शब्द.‘मूल्य या शब्दाने मला अर्थातच स्वतोमूल्य किंवा intrinsic value, something desirable for its own sake अभिप्रेत होते. भक्तीला साधनमूल्य आहे की नाही हे मला अभिप्रेत नव्हते. अज्ञ लोकांच्या दृष्टीने भक्तीला कदाचित् थोडेबहुत साधनमूल्य असू शकेल. पण माझा प्रश्न होता साध्यमूल्याचा, स्वतोमूल्याचा. एका नसलेल्या, निदान संदेहास्पद असलेल्या, वस्तूबद्दल अनन्य आणि असीम निष्ठा बाळगणे ही एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. स्वतःच्या फसवणुकीवर आधारलेली ती भावना आहे. आत्मवंचना हे तिचे खरे स्वरूप आहे, आणि म्हणून ती स्वतो मूल्यहीन आहे असे मला म्हणावयाचे होते.