एप्रिल १९९६ च्या आजचा सुधारक च्या अंकांत “हिंदुत्व : प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे’ हा श्री. घोंगे यांचा लेख आला आहे. त्याला हे उत्तर आहे.
प्रारंभी ‘‘हिन्दुत्व, अन्वेषण (उत्तरार्ध)” डिसेंबर १९९५ या त्यांच्या लेखातील अवतरणे असून त्या खाली मी फेब्रुवारी १९९६ मधील आजचा सुधारकमधील त्यांना विचारलेले प्रश्न आहेत. त्या खाली एप्रिल १९९६ च्या मासिकांतील श्री. घोंगे यांनी मला विचारलेले प्रश्न आहेत व त्यांना मी दिलेली उत्तरे आहेत.
आरंभीच फेब्रुवारी १९९६ मधील लेखात मी स्पष्टपणे लिहिले होते की, आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबाबत नसून त्यांत जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्याबद्दल आहेत.
१.“पुष्यमित्र शुंगाने लक्षावधि बौद्धांची कत्तल केली. बुद्धमूर्तीना शेंदराची पुटे चढवूनत्यांचा मारुती करून टाकला.”
मी लिहिले होते, “बोद्ध वाङ्मयामध्ये पुष्यमित्राने बौद्ध भिक्षुचा छळ केला असा उल्लेख आहे. पण त्या मताच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा मिळत नाही. आणि बौद्ध मूर्तीना शेंदराची पुटे चढवून त्याचा मारुती करून टाकला असे म्हटले नाही.” (आ. सु. एप्रिल, पान १९).
यावर श्री. घोंगे यांचे उत्तर असे –
त्यांनी घोषांचे उदाहरण दिले आहे. “सांचीस्तूपाची प्रवेशतोरणे आणि कठडे शृंग कालातील असता पुष्यमित्राला बुद्धघातकी का ठरवायचे?” असा प्रश्न उपस्थित करून, घोष स्तूपाचे सुंदरीकरण उत्तरशंगकालीन आहे, असा शोध घेऊन ते विचारतात : “In face of this evidence how can we reject clear literary evidences that Pushyamitra persecuted the Buddhists?”
आता या अवतरणातील (literary evidences) बौद्ध ग्रंथांतील आहेत आणि त्यांना इतर पुरावा नाही असे मी आधीच सांगितले आहे. घोष ह्यांनी स्तूपाचे सुंदरीकरण उत्तरशुगकालीन आहे असे मत दिले आहे. आणि अर्थातच श्री. घोंगे यांना ते मान्य आहे.
आता आपण हा उत्तरशुंगकाल काय आहे हे पाहू.
शुंग घराण्याने इ. स. पूर्व १८७ ते ७२ या काळात एकूण ११५ वर्षे राज्य केले. त्या पैकी पुष्यमित्र व अग्निमित्र यांनी अनुक्रमे ३६ व ८ असे एकून ४४ वर्षे राज्य केले. पुढील ७७ वर्षांत घराण्यातील ८ राजे गादीवर आले. त्या ७७ वर्षांत ८ राजे यावरून तो काल अशांततेचा
असला पाहिजे याची कल्पना यावी.
हे राजे दुर्बल आणि राज्यकारभाराविषयी उदासीन असल्यामुळे, सर्व सत्ता त्यांच्या मंत्र्याच्या हाती गेली. शेवटचा राजा देवभूति हा व्यसनी व दुराचारी असल्यामुळे त्याचा अंत वसुदेव कण्व याने दासीकन्येकरवी केला. आता सांची स्तूपाची प्रवेशतोरणे आणि कठडे हे शृंगकालाचे आरंभीचे आहे, की घोष म्हणतात तसे उत्तर कालातील आहे हे वाचकांनीच ठरवावे. आणि जो सांची स्तूपाचे सुंदरीकरण करतो तो भिक्षुचा छळ करेल काय हेही ठरवावे. २. शेंदराची पुटे चढवून बुद्धमूर्तीचा मारुती करून टाकला, या विषयी श्री घोंग्याचे उत्तर पहा.
(अंक एप्रिल, पा. १९), “पुष्यमित्र शुंगाच्या भिक्षुकत्तलीच्या घटनेत (याला काही आधार नसूनही ते तेच ते पुन्हा म्हणतात.) बुद्धमूर्तीचा मारुती केला ही घटना अंतर्भूत केल्यासारखी वाटते. इथे कालविपर्यासाचा लेखनप्रमाद घडून आला आहे हे मान्य.”
घोंग्यांना काल-विपर्यास झाल्याचा प्रमाद मान्य आहे..पण आजपासून २२०० वर्षापूर्वी शेंदराची पुटे चढवून केलेली मारुतीची मंदिरे होती काय या प्रश्नाचे काय?
३.“बंगाली जनतेवर भोसल्यांनी केलेल्या अत्याचाराच्या कथा इतिहासांत शोधून काढता येतात. बंगाली लोकांवर भोसल्यांनी केलेले अत्याचार अगदी अलिकडच्या काळातीलआहेत.’
भोसल्यांवरील आरोप अगदी स्पष्ट आहेत. यावर मी लिहिले :- “रघुजीच्या बंगालवरील स्वाध्या हा एक दीर्घकाळ चाललेल्या युद्धाचा भाग होता. तो केवळ लुटा-लुटीचा प्रकार नव्हता. या काळात छत्तिसगढ व ओरिसा हे दोन प्रांत भोसल्यांच्या प्रदेशात समाविष्ट झाले” (एप्रिल, पा. १९). यावर घोंग्यांनी हे मान्य करून उत्तर दिले ‘‘साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नात हिंसा, अत्याचार, जाळपोळ अपरिहार्य असते”.
त्यांनी माधवराव पेशवे यांनाही यात आणण्याचे प्रयत्न केले. पण रघुजीच्या बंगालवरील स्वारीचे वेळी माधवराव पेशवे नव्हते. तेव्हा त्यावर मला काही लिहावयाचे नाही. पेशवे-भोसले संबंध यावर घोंगे यांना काही लिहावयाचे असल्यास त्यांनी ते वेगळे लिहावे.
४.“१९७५ मध्ये हरिपंत फडक्यांच्या सैन्याने शृंगेरीचा मठ लुटला, या लुटीत बायांची अबू गेली, ब्राह्मणांची कत्तल झाली.”
मी लिहिले, ‘बायांची अब्रू गेली व ब्राह्मणांची कत्तल झाली याबाबत “मराठी लावणीत” किंवा इतरत्र काही ऐतिक पुरावा असल्यास तो अवश्य द्यावा.
यावर श्री घोंगे लिहितात, “पेशव्यांच्या काळांतील लूटमारीचे वर्णन प्रा. धोंड यांच्या ‘मराठी लावणी’ या ग्रंथातून उतरवून दिलेली आहेत. आम्ही स्रोत दिला असल्यामुळे त्याचे मूळ स्रोत सांगण्याचे उत्तरदायित्व प्रा. धोंड ह्यांच्यावर सोपवावे लागेल.”
लेखांतील विधाने घोंगे करणार, त्यांचे जवळ कांहीही ऐतिहासिक पुरावा नाही, आणि मूळ स्रोत सांगण्याचे उत्तरदायित्व मात्र प्रा. धोंड यांचे वर.
यावर काय लिहावे?
५.“मठ लुटण्याचे दुःख नाही कारण मठातील अमाप धन आचार्यांनी सर्वसामान्यांची पिळवणूक करूनच संग्रहित केले होते.”
मी लिहिले, “त्यावेळी उत्पन्नासाठी शंकराचार्यांना वर्षासने असत. आणि शिवाय कोणाचीही पिळवणूक करण्यास शंकराचार्य म्हणजे कोणी सरंजामी सरदार नव्हते. आणि त्यांना अमाप धनाची गरज नव्हती.”
ते पुढे लिहितात :-“धर्मपीठावरील सारे आचार्य सरंजामी सरदाराप्रमाणेच असतात. शंकराचार्यांची पाठ राखण्याची आचार्यांना गरज नसावी.” जी संस्था स्थापन होऊन आज १२ शे वर वर्षे झाली आहेत, (आद्य शंकराचार्यांचा जन्म इ. ७८० केरळ) तिची कार्यपद्धती घोंग्यांना
न आवडली तरी इतिहासाचा अभ्यासक या नात्याने त्या संस्थेची दखल घेणे म्हणजे पाठराखणी
परंतु घोंग्यांना यापेक्षाही काही वेगळेच म्हणावयाचे आहे, ते या प्रमाणे :
“पण आमच्या लेखात मठ आणि आचार्य यांचा जो निर्देश आला आहे, त्यात आम्हाला फक्त शंकराचार्यांचेच मठ आणि कार्य अभिप्रेत नसून हिंदुत्वाच्या प्रचाराचे उत्तरदायित्व ज्यांच्यावर आहे ते आचार्य मठाच्या बाहेर निघत नसतात, ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्या पलीकडचे बोलत नसतात, सामान्य मानवांच्या जीवनविषयक प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नसते,
असे ठामपणे सुचवायचे आहे.”
घोंगे यांची इथे अशी चूक झाली आहे की त्यांनी हे मला उद्देशून लिहिले आहे, पण ते लिहितात तो मठाधिपती मी नव्हे.
६.“शैव वैष्णवांनी एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ केली, एकमेकांची मंदिरे फोडली.”शैव वैष्णवांचे परस्परांशी पटत नव्हते हे खरे, पण त्यांनी परस्परांची मंदिरे फोडली याला पुरावा काय? (एप्रिल अंक, पा. २०) घोंगे म्हणतात, “शैव वैष्णवांनी परस्परांची मंदिरे फोडली, हे वाक्य मात्र लेखात अकल्पित आले आहे. लेखात हे वाक्य यावयास नको होते. या चुकीबद्दल खेद व्यक्त करतो.”
७. “चंद्रकोरीचे प्रतीक म्हणून शिंगाची शिरस्त्राणे आदिवासी वापरीत. तात्पर्य हेच की हिन्दु धर्म म्हणजे चंद्रपूजकांचा धर्म आणि हाच सिंधूच्या खोर्या्तील टोळ्यांचा धर्म असावा, कारण सिंधु संस्कृतीच्या उत्खननातून तिथे ज्या पवित्र मूर्तीचेठसे आढळले ती मूर्ती शृंगधारी असून …. .
मी त्यावर सिंधुसंस्कृती ही टोळ्यांची संस्कृती नसून ती इजिप्त-बॅबिलोनिया येथील संस्कृतीशी तुल्यबल होती असे लिहिले.
त्यानंतर तिथे व इतरत्र सापडलेल्या शिक्यांवरील आकृतीचे वर्णन केले. त्यात नेहमी आढळणारा प्राणी म्हणजे खांदा असलेला बैल. इतरही अनेक प्राणी व अमानवी प्राणी यावरही लिहिले. याशिवाय शृंगधारी असणे (म्हणजे प्रत्यक्षात त्या देवतेचे शिरावर शिंगे नसून शिंगाचा मुकुट आहे) तिचा संबंध चंद्रपूजेशीच असला पाहिजे असे नव्हे हे दाखविण्यासाठी मी क्रीट बेटातील मिनोअन (Minoan) संस्कृतीतील (इ. स. पू. २५०० ते १५००) एक आख्यायिका (legend) दिली होती आणि त्यावरून असा निष्कर्ष काढला होता की, बैलांची शिंगे व चंद्रकोर यांचा काहीही संबंध नाही, असल्यास तो वृषभाशी असावा.
तेव्हा घोंगे यांनी शिंगे म्हणजे चंद्रकोर हा आग्रह सोडून देऊन वृषभ याला मान्यता दिली, पण वृषभाचा आणि चंद्राचा संबंध मात्र कायम केला. ते म्हणतात “वृषभ हा सोमाचे प्रतीक हे लक्षात घ्यावे.’ आता आपणास शंकर आणि त्याचे वाहन नंदी माहीत असते. पण वृषभ म्हणजे सोमाचे प्रतीक ही अगदी नवीन माहिती आहे. आणि हा शोध त्यांनी हडप्पा सभ्यताऔर वैदिक साहित्य’ ह्या शोध निबंधावरून घेतला आहे. यांत यूनिकॉर्न समोर असणारे भांडेही सोमपूजेशी संबंधित आहे असे सांगून सिंधुसंस्कृतीतील लोक चंद्रपूजकच आहेत हे दाखविले आहे. हा शोध-निबंध सध्या लिखित स्वरूपात आहे. त्यामुळे त्याची वास्तवता श्री. घोंगे यांनाच माहीत आहे. सध्या आमचे ज्ञान इतपत आहे की सिंधु संस्कृतीतील लिपीही उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. त्यातील बरीच अक्षरे अजून वाचली गेली नाहीत व त्यामुळे जे विविध अंदाज केले जातात त्यावरून निश्चित असे काही कळत नाही. त्यामुळे वरील शोधनिबंधाबद्दल व त्यांच्या निष्कर्षाबाबत काहीही लिहिता येत नाही.
कोणत्याही प्रकारे सिंधुसंस्कृतीतील लोक म्हणजे चंद्रपूजकच असे सिद्ध करण्याकरिता घोंगे यांनी काहीही कमतरता ठेवली नाही, (एप्रिल, पान २९, परि. १).“त्यांची उच्च राशी वृषभ आहे”. म्हणजे चंद्राची वृषभाशी संबंध येतोच. वृषभ हे चंद्राचे प्रतीक ठरते’ असे सिद्ध करण्याकरिता त्यांनी राशींनाही वेठीला धरले. आता लोकमान्य टिळकांच्या मताप्रमाणेमहाभारतात मेषवृषभादि राशींचा कोठेच उल्लेख नाही ही कालनिर्णयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची (गोष्ट) आहे. कारण ग्रीक लोकांच्या सहवासाने (अलेक्झंडरच्या स्वारीनंतर) मेषवृषभादि राशी हिन्दुस्थानात आल्या (हल्लीच्या गीतेचा काळ-गीतारहस्य). तेव्हा हा राशीचा उल्लेख सिंधु संस्कृतीच्या अस्तानंतर कमीतकमी बारा वर्षानंतरचा आहे. तेव्हा बाराशे वर्षानंतरचा हा
आधार वृषभ म्हणजे सोमाचे प्रतीक’ याला कितपत साह्य होणार?
(एप्रिल २६, पान. २२) “सुमेरिया, बॅबिलोनिया या वाटेने चंद्रपूजेच्या प्रसाराचे लोण आशिया-मायनरने जी क्रीट संस्कृती समृद्ध केली त्या संस्कृतीत चंद्रपूजा अस्तित्वात नसावी असे समजायचे काय? भारतीय भूखंडावर राज्य करणार्याय यवन राजांच्या शिक्क्यावर चंद्र देवतेची चित्रे कोरली असून त्या ग्रीक देवता आहेत.”
अशोकाच्या मृत्यूनंतर (इ. स. पूर्व २३६) केवळ पन्नास वर्षांत मौर्य साम्राज्य ढासळले आणि बँक्ट्रियन ग्रीकांच्या भारतावर स्वाध्या सुरू झाल्यात व त्यांनी बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला. याच यवन राजांच्या शिक्क्यावर चंद्रदेवतेची चित्रे कोरली असून त्या ग्रीक चंद्र देवता आहेत असे श्री घोंगे म्हणतात. पण ही चित्रे (असल्यास) त्यांचा आणि क्रीट बेटातील संस्कृतीचा काहीही संबंध नाही. कारण क्रीट संस्कृतीचे नष्ट होणे आणि ग्रीक राजांच्या शिक्क्यांवरची चित्रे या मध्ये १३ शे वर्षांचे अंतर आहे.
(एप्रिल, पान नं. २० परिच्छेद ३)
१.“मिनोअन संस्कृती आशिया मायनरने संस्कारित केली आहे.”
२.“सुमेरिया बॅबिलोनिया या संस्कृती सैंधवी संस्कृतीशी जवळचे नाते सांगतात.”
३.“क्रीट संस्कृतीची जडण घडण बॉबिलोनियाच्या संस्काराने झाली आहे.”
वरील तीनही विधानावरून मिनोअन संस्कृती, आशिया मायनरची संस्कृती, सुमेरिया, बॅबिलोनिया आणि क्रीट या संस्कृतींचे फार जवळचे संबंध असावेत, असे दिसते. तेव्हा या विधानांच्या पुष्ट्यर्थ त्या विविध संस्कृतींची जवळीक कशी काय होती हे सांगणे घोंगे यांना क्रमप्राप्त ठरते. कारण त्याशिवाय या विधानांना अर्थ नाही. पण आता मुळात जी संस्कृती त्यांना टोळ्यांची वाटत होती ती इजिप्त सुमेरिया या संस्कृतीइतकीच प्राचीन ठरविण्यास ते निघालेआहेत. पण यामुळे चंद्रपूजक म्हणजे हिन्दु या त्यांच्या व्याख्येनुसार त्यांचेवर इजिप्त सुमेरिया इथेही चंद्रपूजाच होती हे सिद्ध करण्याचे दायित्व आले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या हिंदुत्व अन्वेषण’ (उतरार्ध) यांत यांपैकी एकाही संस्कृतीचा उल्लेख नव्हता.
(एप्रिल अंक, पान २०, परि. ३) –
शृंगधारी देवता चंद्र आहे हे मांडण्याचा आमचा अधिकार आहे. प्रमाणांनी तो चूक ठरविला जाऊ शकतो” असे ते म्हणतात.
याविषयी एक स्पष्टीकरण करणे आवश्यक ठरते ते हे की, चंद्राला हिन्दुधर्मात महत्त्वाचे स्थान आहे. याबाबत दुमत नाही. चंद्र म्हणजे सोम, त्याच्या नावाने आठवड्यातील एक बार सोमवार हा आहे.
चंद्रावर अनेक काव्यपंक्ती अनेक भाषेत लिहिल्या आहेत. त्यातील एक उत्कृष्ट काव्यरचना सुमारे २ हजार वर्षापूर्वी शूद्रक कवीने मृच्छकटिक नाटकाच्या प्रथम अंकाच्या अखेरीस चारुदत्त यांचे तोंडी घातली आहे. चंद्राचा प्रेमिकांशी अतूट संबंध आहे. चंद्रदर्शनानंतरच भाऊबीज साजरी होते. या वेळी बहिणी चंद्राची पूजा करतात. भाऊ नसलेल्या बहिणींचा तो कायमचा भाऊ आहे. आणि मुलांचाहि कायमचा मामा आहे. सूर्यांप्रमाणेच चंद्राला आपल्या जीवनांत महत्त्वाचे स्थान आहे.
पण चंद्रपूजक म्हणजेच हिन्दु हा आग्रह घोंगे दुराग्रहापर्यंत नेतात.
(आ. सु. डिसेंबर १९९५, पान २८७, परि. १) “तात्पर्य हिन्दु कोण?”या प्रश्नाचे ठोस उत्तर शैव व हिन्दु कोण नाहीत? याचे उत्तर वैष्णव, कारण वैष्णवांची परंपरा सूर्य परंपरा आहे.”
अशा रीतीने विसाव्या शतकाच्या अखेरीस अजून आपण शैव व वैष्णव झगडे लावणार.
मग पूर्व काळी शैव-वैष्णवांचे झगडे झाले हे सांगण्याचा घोंगे यांना काय अधिकार आहे? आणि घोंग्यांना सूर्याचा एवढा राग का? सोमवंशी कुंती हिला सूर्यापासूनच कर्ण झाला अशी कथा आहे. आणि हा कर्ण सूर्यपूजक होता. भारतात सोमवंशी राजे होते, तसेच सूर्यवंशीही होते. त्यांचे काय? आणि वैष्णवांची परंपरा सूर्यपरंपरा आहे, हे घोंग्यांना कोणी सांगितले?त्यांचा देव प्रारंभापासूनच वासुदेव आहे. (टिळकांच्या मते वासुदेवभक्ति श्रीकृष्णाच्या काळाइतकीच जुनी आहे.) आणि वैष्णवांचे दैवत विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण आहे, यांस उदाहरण देण्याची आवश्यकता आहे काय?
पण अखेरीस “हिन्दुधर्म हा चंद्रपूजकांचा धर्म म्हणून मान्य करण्यात परंपरेला कुठेही बाध येत नाही’ असे लिहूनही ते लिहितात :
(आ. सु. एप्रिल ९६, पा. २१) “रुद्रपूजा आणि चंद्रपूजा या दोन प्रमुख उपासनांच्या सोबत सूर्यपूजा, वृक्षपूजा, अग्निपूजा, पशुपूजा, मातृकापूजा अस्तित्वात नव्हत्या असे समजण्याचे कारण नाही. सैंघवी सभ्यतेतील अवशिष्ट यज्ञकुंडे ही उत्तरकालीन आहेत असा पुरातत्त्ववेत्त्यांचा शोध आहे.
यज्ञकुंडे उत्तरकालीन आहेत की नाही हा प्रश्न सोडला तरी ती आहेत असे घोंगे म्हणतात हे पुरेसे आहे. आणि सूर्यपूजा, अग्निपूजा आणि इतर वर दिलेल्या पूजा सिंधु संस्कृतीत होत्या हे लिहिल्यानंतरही हिन्दु धर्म म्हणजे चंद्रपूजकांचाच धर्म आहे या लिहिण्यास काय अर्थ उरतो?