स्वच्छता अभियान: गांधी, मोदी आणि लेनिन

जातिव्यवस्थेने व्यवसाय स्वातंत्र्य नाकारून प्रत्येक व्यवसायासाठी एक स्वतंत्र जात निर्माण केली. जिने जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जातीला ठरवून दिलेलेच काम केले पाहिजे असा दंडक घातला गेला. या व्यवस्थेनुसार सर्वात घाणेरडे काम, म्हणजे साफसफाईचे काम आणि तिन्ही वरच्या वर्णाच्या लोकांची सेवा करण्याचे काम शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींवर सोपवण्यात आले. अशा प्रकारे स्वच्छतेची जबाबदारी अतिशूद्रांवर ज्यांना आपण अस्पृश्य जाती म्हणतो त्यांच्यावर सोपवून सगळ्या वरच्या जातींचा समाज निर्धास्त झाला. त्यामुळे `स्वच्छता’ हे आपले काम नाही. थे अमुक, अमुक जातींचे आहे ही मानसिकता आजतागायत रूजली गेली आहे.
आजच्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या, भांडवली समाजातही ती फारशी बदललेली नाही. म्हणून या `साफसफाई’च्या कामात अडकलेले, किंवा परंपरेने अडकवलेले हीन समजल्या जाणाऱ्या जातींचे समूहच दिसून येतात. आधुनिक भाषेत ज्यांना आपण साफसफाई कामगार म्हणतो. `आरक्षणाला’ विरोध करणारे वरच्या जातींचे समूह या स्वरूपाच्या कामात आरक्षण मागत नाहीत. या कामातील `ओपन’ सीट कधी भरल्या जात नाहीत. भारतीय समाज सामाजिक क्रांतीपासून अजून किती तरी कोस दूर आहे याचे हे निर्देशक आहे आणि ज्याची कोणाला लाज वाटते अशी परिस्थिती दिसत नाही.
खरे तर समाजाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सार्वजनिक साफसफाईचे काम करणाऱ्या कामगारांना चांगली वागणूक मिळायला हवी पण परिस्थिती काय आहे? समाजात जे काम वाईट समजले जाते ते काम करणारे सामाजिकदृष्टया केवळ खालच्या दर्जाचेच नाहीत तर अस्पृश्य, बहिष्कृत असे आहेत. पण जे कुठलेही उत्पादक काम करीत नाहीत. केवळ धार्मिकदृष्टया त्यांना वरचा दर्जा बहाल केला आहे, ते ऐतखाऊ बांडगुळी-जातसमूह ओळखले जातात `स्वच्छते’मुळे. त्यांना स्वच्छता आवडते. ते कायम `स्वच्छ’ रहातात. पण ही स्वच्छता कोण करतं. त्यांच्या आंघोळीसाठी कोण पाणी भरतं? त्यांचे केस कापण्याचे काम कोण करतं? त्यांची बाग सुंदर कोण ठेवतं? यासाठी आजपर्यंत स्त्रिया आणि शूद्र जातीसमूहांचाच वापर केला गेला. आणि हे काम करणारे मात्र अशुद्ध, अस्वच्छ. आहे की नाही उपराटी प्रथा. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. आज मुंबई महानगरपालिकेत साफसफाई कामगाराला जे `घर’ देण्यात येते. ते जर त्यांचा एक मुलगा त्याच कामावर राहिला तरच त्याला ते मिळते. एकतर तुटपुंज्या पगारावर आणि घाणेरडी कामे `दारू न पिता’ करता येत नसल्यामुळे, शिवाय समाजात काहीही किंमत नसल्यामुळे, तो दारूडया बनतो. कायम कर्जबाजारी आणि सावकाराच्या विळख्यात सापडतो. त्यामुळे स्वत:च्या मालकीचे घर घेणे त्याला शक्य होत नाही. पर्यायाने घरासाठी परंपरा चालू रहाण्यासाठी त्याचा एक मुलगा त्याला कामावर ठेवावाच लागतो. आणि परंपरा चालू रहाते.
सफाई कामगारांच्या आरोग्य आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या रमेश हरळकरांची गोष्ट अशीच काळजाला चटका लावणारी आहे. अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार असणाऱ्या हरळकरांना कॉलेज सोडून केवळ `घर’ ताब्यात रहावे म्हणून वडिलांच्या नंतर हे काम करण्याची नामुष्की आली आणि त्यानंतर त्यांनी सफाई कामगारांच्या नरकतुल्य वास्तवाला समाजापुढे मांडण्याचे काम सातत्याने केले. जागतिक किर्ताचे छायाचित्रकार सुधाकर आलवे यांनी या कामगारांच्या दु:खावर, वेदनांवर आणि त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या वास्तवावर आधारीत अतिशय प्रभावी काळजाला हालवणारी अशी दाहक छायाचित्रांची एक भलीमोठी सीरीज `वर्कर’ या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित करून या कामगारांच्या अमानुष जगण्याला जागतिक पातळीवर वाचा फोडण्याचे काम केले आहे.
या संदर्भात डॉ. सुधीर पवार यांनी गटाराच्या भुयारात काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करून अतिशय धक्कादायक निष्कर्ष पुढे आणले आहेत. या व्यवसायजन्य आजारांचे स्वरूप इतके भीषण आहे की, त्यापुढे इतर कुठलेही रोग मामुली ठरतात. या भुयारातून जो वायू निर्माण होतो त्याच्या परिणामी या कामगारांची फुफ्फुसे निकामी होतात. त्यांचे केस लवकर पांढरे होऊन त्यांना अकालीच वृद्धत्व प्राप्त होते आणि या व्यवसायातील कामगार 50 वर्षांपेक्षा जास्त जगत नाहीत. या कामगारांच्या सुरक्षेसाठी काही करावे, काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे जीवन वाचवावे याचा प्रयत्न ना सरकार करते, ना त्यांच्या युनियन्स. कारण या कामगारांविषयी जातीपूर्वग्रहातून येणारी तुच्छतावृत्ती या सर्व पातळीवर दिसून येते.
उच्चजातीय भारतीय समाजाला या `स्वच्छतेची’ इतकी धास्ती आहे की हे `लोक नसतील’ तर मग आमच्या स्वच्छतेचे काय? इंग्लड, अमेरिकेत जाणारी ही उच्चजातीय मंडळी तेथे मात्र निमुटपणे सर्व प्रकारची `स्वच्छतेची’ कामे करताना दिसतात. कारण तेथील `कामगारांचे’ म्हणजे घरकामगारांचे, सफाई कामगारांचे पगार त्यांना परवडणारे नसतात. आपल्याकडे साध्या कारकून स्त्रिया, आपल्या मोलकरणीवर कायम तोंडसुख घेताना दिसतात. कारण त्यांचे श्रम स्वस्त आहेत आणि त्याला प्रतिष्ठा नाही. भारताची फाळणी होऊन जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पाकिस्तानात `साफसफाई’ची कामे करणारे जे हिंदू-दलित होते त्यांना काहीही त्रास झाला नाही. कारण हे `लोक’ जर भारतात निघून गेले असते तर मग साफसफाई कोण करणार? असा प्रश्न त्या समाजासमोर उभा राहिला होता. ज्या दलितांना भारतात सामील होण्याची इच्छा होती, त्यांनाही अटकाव झाला. शेवटी त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाडांना पाठवून या लोकांची सुटका केली. त्यामुळे या कामाची किती मोठी `धास्ती’ उच्चवर्णीय- वर्गीय समाजाला वाटते हे दिसून येते. त्यामुळे चमकदार छबी निर्माण करण्यासाठी अशा स्वच्छता मोहीमा आखणे आणि त्यासाठी समाजातील गोऱ्यागोमटया, नट-नटयांनी पुढाकार घेणे हे फक्त एका `इव्हेंट’पुरतेच मर्यादित राहते. ते रस्त्यावर फिरायला जातात तेव्हा त्यांना कचरा दिसू नये इतकीच त्यांची इच्छा असते. जोवर यासंदर्भातील मेंदूवरील जाती संस्काराची घनदाट पुटे साफ होत नाहीत तोपर्यंत असल्या मोहिमा आखल्या तरी फरक पडणारनाही. भारतात शोध लागू शकले नाहीत आणि भारत तंत्रज्ञानात मागे राहिला त्याला हीच मानसिकता कारणीभूत आहे. ज्यांनी ज्ञान मिळवायचे त्यांनी श्रम करायचे नाही, श्रमाकडे तुच्छतेने बघायचे आणि जे प्रत्यक्ष काम करतात त्यांना ज्ञान मिळवण्यावर बंदी-त्यामुळे दोघेही पांगळे आणि समाजही पांगळा राहीला. शहरामधून साठणाऱ्या कचऱ्याबद्दल नेहमी आवाज उठवणाऱ्या या वर्गाने सफाई कामगारांच्या जीवनात काही मूलभूत बदल करावेत त्यांची जगण्याची परिस्थिती सुधारावी यासाठी काही केल्याचे आढळत नाही. पण त्यांच्या नावाने खडे फोडायला मात्र हे आघाडीवर असतात.
या पार्श्वभूमीवर आपल्याला मोदींनी, गांधी जयंतीच्या मुहुर्तावर सुरू केलेल्या `स्वच्छता अभियाना’कडे पाहिले पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे स्वच्छतेकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा `जातीग्रस्त’ दृष्टीकोन पहाता असली स्वत:ची प्रतिमा उजळ करण्यासाठी आखलेली अभियाने अपयशी ठरणार यात शंका नाही. मात्र नरेंद्र मोदींनी आपली प्रतिमा स्वच्छ करण्याची जी मोहीम सुरू केली आहे त्यात ते यशस्वी होतील. ती मोहीम हाती घेतली ती गांधी जयंतीच्या दिवशी. आणि त्यांनी हातात झाडू घेतला तो साफसफाईचे काम करणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या वस्तीत, जेथे गांधीजी रहात आणि साफसफाईचे आणि-श्रम प्रतिष्ठेचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी- ते झाडू तर मारीतच पण संडासही साफ करीत असत. मोदींचा गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकण्याचा हा उद्योग म्हणजे एक मोठा `दांभिकपणा’ आहे. ज्या हिंदुत्ववादी धर्मांध विचारसरणीने गांधींसारख्या एका महानायकाला भारतातील `महाव्हीलन’ बनवले. त्याच विचारसरणीने प्रेरीत होऊन गोडसेने गांधींवर गोळया झाडल्या, त्यांची हत्या केली, त्याच विचारांचे पाईक गांधी नावाची जपमाळ ओढून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भारत ओळखला जातो बुद्ध आणि गांधींचा देश म्हणून. पण अमेरिकेतील भाषणात मोदींनी भारत ओळखला जातो तो साप-सपेरा आणि काळ्या जादूमुळे, असे सांगून आज आमच्या हातात `माऊस’ आला आहे आणि भारतीय हा `माऊस’ हलवून जगाला हालवीत आहे, असे सांगितले. एकीकडे काँग्रेसने 60 वर्षांत काही केले नाही म्हणायचे आणि दुसरीकडे आमच्या हातात `माऊस’ आला आहे. आम्ही प्रगती केली आहे, मंगळावर पोहोचलो आहोत, असे म्हणायचे. हे सगळे काय मोदीच्या सत्ताकाळात घडले आहे काय? असे मोदी म्हणतात त्याप्रमाणे आपला देश जसा साफ-सपेरा आणि काळ्या जादुचा आहे तसा चमत्काराचाही आहे. रामायण, महाभारत, सगळी पुराणे, किंबहुना एकंदर सनातनी वैदिक वाङमय चमत्कारावरच उभे आहे. उदा. कुठल्याही ऋषी-मुनींचा जन्म आईच्या उदरातून झालेला नाही. कारण एकदा आईच्या उदरातून म्हणजे स्त्रीपासून जन्म घेणे `पाप’ समजल्यावर हे महान लोक स्त्रीपासून कसे जन्माला येणार? वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा पण एक `चमत्कार’ आहे. आज घडीला आपल्या लोकशाहीने तो चमत्कार करून दाखवला आहे. एक नवा `भारत भाग्य विधाता’, देशी-विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि त्यांच्या बटीक बनलेल्या प्रसारमाध्यमांनी जन्माला घातला आहे. आणि त्याच्या डोक्यातून या अशा `स्वच्छता अभियाना’सारख्या भंकप योजना पुढे येत आहेत. त्या केवळ स्वत:ची प्रतिमा स्वच्छ करण्याच्या गरजेपोटी.
खरे तर महाराष्ट्राला आणि देशालाही आदर्शवत वाटेल अशी `स्वच्छता’ शिकवली ती `गाडगेबाबांनी.’ गाडगेबाबांच हे `स्वच्छता अभियान’ केवळ कचरा आणि घाण साफ करण्यापुरते नव्हते. तर ते समग्र स्वच्छता अभियान होते. ते जातिव्यवस्थाविरोधी होते. ते अंधश्रद्धाविरोधी होते. एक नितळ आणि शुद्ध माणुसकीच्या भावनेचा गाभा त्यात ओतप्रोत भरलेला होता. कुठलाही स्वार्थ आणि राजकारण त्यामागे नव्हते. गांधीजींनी स्वच्छतेचा मुद्दा जरी जातीय भेदभावाच्या भावनेशी आणि श्रमप्रतिष्ठेशी जोडला असला तरी त्यात गांधींचे `राजकारण’ होतेच. ब्रिटीशांच्या `फोडा आणि झोडा’ या नितीला जसे मुस्लिम बळी पडले, तसे दलित बळी पडू नयेत आणि स्वातंत्र्य लढयात आणखी गुंतागुंत होऊ नये याची त्यांना काळजी घ्यायची होती. शिवाय हिंदूधर्माच्या चौकटीतच `दलितांचं’ काही भलं करावं अशीही भूमिका होती. जातीअंताची किंवा दलित मुक्तीची ही भूमिका नव्हती. दलितांना माणुसकीने वागवावं ही एक दयावादी भूमिका होती. दलितांचा विश्वास मिळवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना हरिची लेकरं म्हणजे हरिजन म्हणणं, अशी भंपकबाजीपुढे येते.
गांधीजींना दलितांना गरीब बिचारी हरिची लेकरंच ठेवायच होतं. गांधीजींच्या प्रामाणिकपणावर संशय न घेताही ही त्यांची `चलाखी’ आपल्या लक्षात येते. त्यांच्या या दृष्टीकोनामुळे उच्च जात-वर्गाच्या मनात दया निर्माण होत असेल पण या जातवर्गाच्या प्रस्थापित व्यवस्थेतील हितसंबंधांना मात्र धोका निर्माण होत नव्हता. जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळे निर्माण होत होता. गांधीजींकडे दया होती, पण दलितांच्या हक्कांची लढाई नव्हती आणि या दयेलाही राजकारणाचे अस्तर होते. गोलमेज परिषदेमध्ये दलितांचा प्रतिनिधी मीच अशी जी गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डावलणारी भूमिका घेतली त्यात या राजकारणाचे प्रतिबिंब दिसून येते. `साफ-सफाईचे काम मला प्रिय आहे.’ `स्वच्छता हे ईश्वराचे दुसरे नाव आहे.’ अशी जी चमत्कृतीपूर्ण विधाने गांधीजी करत असत ज्यांना वास्तवात काही अर्थ नव्हता. कारण वास्तव हजार पटीने भीषण होते. या संदर्भात गांधीवादावर टीका करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे `शारीरिक परिश्रमाचे गुणगाण गाणे हे ऐषोआरामात जगणाऱ्या वर्गाचा (जातींचा) अनुराग असतो.’ स्वच्छतेचेही तसेच आहे.ज्यांना ती करायची नाही त्यांना तिचे गुणगाण गाणे हे `क्रांतिकारक’ वाटणारच. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर नरेंद्र मोदींना गांधींच्या `स्वच्छता’ मोहिमेचा साक्षात्कार झालेला आहे. हाही एक चमत्कार आहे. पण मोदींचे या साफ सफाईच्या कामाबद्दल आकलन आपण पाहिले की, त्यांची ही `चलाखी’ आपल्या लक्षात येते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका साफ-सफाई कामगारांच्या सभेत बोलतांना मोदींनी `सफाई कामगारांना हे काम करताना आपण जनतेची जी सेवा करीत आहोत त्याबद्दल `आध्यात्मिक’ आनंद मिळत असावा; नाही तर मग इतर कामे त्यांच्यासाठी असताना त्यांनी या कामासाठी स्वत:ला का वाहून घेतले असते असे विधान केले होते.’ यात जातिव्यवस्थेचा चलाख पद्धतीने बचाव केलेला दिसून येतो. कारण जातिव्यवस्थेनेच हे काम त्यांच्यावर `लादलेले’ आहे. त्यांनी ते आध्यात्मिक आनंदाने स्विकारलेले नाही. पण ही वस्तुस्थिती दडवून या समूहांनी असाच `आध्यात्मिक आनंद’ पिढयान् पिढया घेत रहावा हेच त्यांना सुचवायचे आहे. या संदर्भात थोर नाटककार बर्नाड शॉ यांचे एक वाक्य आठवते जे या `सवर्ण’ मानसिकतेवर झगझगित प्रकाश टाकणारे आहे. बर्नाड शॉ यांनी `गोऱ्या लोकांच्या काळ्या लोकांबद्दलच्या मानसिकतेबद्दल एके ठिकाणी म्हटले आहे ` ते (गोरे) काळ्या लोकांना `बूट पॉलिश’शिवाय दुसरी कुठलीही संधी ठेवत नाहीत आणि वर म्हणतात पहा त्यांना (काळया लोकांना) बुट पॉलिशशिवाय दुसरे काहीच येत नाही.’ जातिव्यवस्थेने दलित समूहांच्या बाबतीत हेच केले आहे. दलितांच्या गुणवत्तेचे प्रश्न जे उभे करतात ते वरील `गोऱ्या मानसिकते’चे लोक आहेत. म्हणे `नरकतुल्य काम करताना त्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो.’ या प्रश्नाचे असे आकलन असणारा माणूस आज भारतीय लोकशाहीच्या चमत्कारामुळे केवळ 31… मते मिळवून पंतप्रधान झाला आहे आणि तो गांधीजींच्या थाटात आपल्याला स्वच्छतेचा नवा `मंत्र’ देत आहे. एखाद्या सामान्य दर्जाच्या अभिनेत्याला अचानक काही कारणामुळे नाटकात-सिनेमात एखाद्या `महापुरूषाचे’ पात्र रंगविण्याची संधी मिळते, तेव्हा तो जसा त्या वेषात स्वत:ला महापुरूष समजू लागतो तसे आपल्या मोदीसाहेबांचे झाले आहे. ज्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या प्रश्नावर विकासाचा नारा देत मोदींनी सत्ता काबीज केली. त्यावर बोलायला मोदी कबूल नाहीत. त्यामुळे मग अशा `स्वच्छता अभियान’सारख्या चमकदार पण भोंगळ मोहीमा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सफाई कामगारांचे किंबहुना एकंदरीतच साफ-सफाईचे प्रश्न असे `जातीय’ आधारावर सडत ठेवून एका जातीचे जीवन पूर्णपणे नामशेष करणारे वास्तव मूलभूतरित्या जर बदलणार नसेल तर स्वच्छता मोहिमा, ज्यांनी कधी हाती झाडू घेतला नाही त्यांच्यासाठी एक `क्रांतिकारी गोष्ट ठरेल’ बाकीशून्यच वाटयाला येईल. यासाठी या कामाचे आधुनिकीकरण करणे हा एक मार्ग आहे. पण सफाई कामगारांचे पूर्ण पुनर्वसन करूनच ते अंमलात आले पाहिजे. नाही तर त्यांना आगीतून-फुफाटयात ढकलल्यासारखेच होईल. दुसरीकडे हे `काम सोडा’ अशा पद्धतीची मोहीम आखली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारवतनामुळे गावची गुलामी करणाऱ्या महार जातीला महार वतने सोडून शहराकडे येण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी पाळला. सफाई कामगारांना आता हेच सांगायची वेळ आली आहे.
कामगारवर्गाचे महान नेते कॉ. लेनिन यांचे एक सुप्रसिद्ध कार्टून आहे. लेनिन पृथ्वीवर झाडू घेऊन उभे आहेत आणि जगभरातील शोषक वर्गाला (राजे-रजवाडे, जमीनदार, धर्मगुरू, भांडवलदार इ.) पृथ्वीवरून झाडूने साफ करून पृथ्वी त्यांच्यापासून मुक्त करीत आहेत. आम्हाला अशा झाडूवाल्यांची गरज आहे. कारण अखेर `सर्व रस्ते अखेरीस लंडनला मिळतात’ अशा आशयाची एक म्हण आहे. त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या मुक्तीचा मार्ग हा अखेरीस – `समाजवादी क्रांती’च्या दिशेनेच जातो. तेथे अशा सोंगांना आणि थेरांना थारा नसतो. थोर हिंदी कवी गजानन माधव मुक्तीबोध यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे..
`जो है उससे बेहतर चाहिए।
सारी दुनिया साफ करने के लिए
एक मेहतर चाहिए।
कॉ. लेनिन यांच्या कार्टूनला साजेशी ओळ आहे. पृथ्वीतलावरून शोषक वर्गाचा पूर्ण नि:पात करणाऱ्या साफसफाईवाल्याची आपल्याला गरज आहे.

– ‘जीवनमार्ग’च्या सौजन्याने

kiranm.subhasht@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.