रोग्याचे कल्याण चिंतणार्याा खर्यार बैद्याने जसे पाहिजे तसले घाण काम करण्यास तयार असले पाहिजे तसे समाजहितचिंतक सुधारकाने पाहिजे त्या प्रकारचा विषय हाती घेण्यास सिद्ध असले पाहिजे. अमुक वस्तूचे किंवा अमुक अवयवाचे चारचौघात नाव घेणे किंवा त्याला स्पर्श करणे हा असभ्यतेचा किंवा अमंगलपणाचा प्रकार होय असे पाहिजे तर सामान्य लोकांनी मानावे. भिषग्वर्यांना तो निर्बध लागू करता येत नाही;आणि तसे न करणे जर प्रशस्त असेल तर सामाजिक सुधारकांना तरी तुम्ही अमुक प्रकारच्या विषयावर लिहिणे बरोबर नाही असे कसे म्हणता येईल? ज्या गोष्टीपासून लोकांना तोटा होत असेल ती त्यांना कितीही नाजूक किंवा अस्पृश्य वाटत असली तरी सुधारकाला तिचे उघडपणे दोषाविष्करण करणे भाग आहे.