विवाह हा समाजाला जडलेला एक रोग आहे, आणि त्याच्या परिणामी उत्पन्न होणारी विवाहसंस्था ही जुलमी राज्यकारभाराला पोषक होते हे माहीत असूनही राजकीय जुलमाविरुद्ध झगडणारे लोक तिकडे लक्ष देत नाहीत. राजकीय जुलमाच्या ज्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व बीजरूपाने कुटुंबसंस्थेत आढळतात.
अनियंत्रित सत्ता, सत्ताधान्याची प्रचंड शक्ती, शिक्षणाच्या व न्यायाच्या सबबीवर केलेले कायदे आणि शिक्षा, मृत्युदंडाचा अधिकार, इतकेच काय पण कर घेण्याची योजना, या सर्वांचे मूळ कुटुंबसंस्थेत सापडते, आणि झोटिंगशाहीत राहण्याचे शिक्षण प्रथम कुटुंबात मिळते, आणि सर्व प्रकारचा जुलूम विवाहसंस्थेत पाहायला मिळतो. तनुविक्रय, मर्जीविरुद्ध समागम, या गोष्टींमुळे वेश्यावृत्ति मात्र वाईट समजतात, आणि याच गोष्टी विवाहात असूनही त्या मात्र कायदेशीर, इतकेच नव्हे तर पवित्र समजायच्या! जुलूम याहून आणखी कसा असतो?कायदेशीर झाली तरी वेश्यावृत्तीच! धर्मात सोडलग्नाची सोय नसल्यामुळे मर्जीविरुद्ध समागम करावा लागतो, किंवा मर्जीविरुद्ध एकत्र राहावे लागते. अर्थात् काही जोडपी लग्नाशिवाय देखील एकत्र राहतात, परंतु त्यांत जर जन्मभर एकत्र राहण्याची सक्ती झाली, म्हणजे एकत्र न राहिल्यामुळे लोक नावे ठेवू लागले, तर त्यात आणि विवाहात काहीच फरक राहात नाही.