आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा, पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते”. येथे डॉ. पंडितांनी धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम आणि संबंधित धर्माचे अनुयायी पाळत असलेल्या प्रथा, या दोन गोष्टींची गल्लत करून, इस्लामी धर्मशास्त्राच्या नियमामुळे मुसलमानांतील लैगिक आचरण मोकळे असल्याचे सूचित केले आहे. काही प्रथा या धर्माने घालून दिलेल्या नियमांतून उगम पावतात ही गोष्ट खरी आहे. परंतु मुसलमानांतील बहुपत्नीकत्वाची तथाकथित प्रथा ही धर्मामुळे निर्माण झालेली नाही. सर्वच पारंपारिक समाजात आणि सरंजामशाहीच्या मध्ययुगीन कालखंडात पुरुषप्रधान व्यवस्था निर्माणहोऊन, सर्वच जमातींत आणि संस्कृतींत, बहुपत्नीकत्वाची पद्धती निर्माण झाल्याचे दिसते. मध्य आशियातील टोळीप्रधान समाजात तर बायकांचे तांडे बाळगण्याची प्रथा
होती.
अशा या टोळीसमाजात उदय पावलेल्या इस्लामने लैंगिक आचरणासंबंधी अत्यंत कडक नियम करण्याचे केलले धाडस, खरोखरच आश्चर्यकारक होते. इस्लामने व्यभिचार, विवाहबाह्य संबंध आणि लैंगिकतेचे प्रदर्शन या बाबतीत अत्यंत कडक नियम केलेले होते. ज्या समाजात, आपल्या जनानखान्यात वाटेल तेवढ्या बायका ठेवण्याची रीत होती, आणि स्त्रियांचा उपभोग ही पुरुषांची “खास बाब मानली जात होती, अशा व्यवस्थेत एकपत्नीकत्वाची पद्धती रुजविण्याचा प्रयत्न इस्लामने केलेला होता. हे तत्कालीन समाजातील प्रथेच्या विरुद्ध आहे, हे ओळखून, अपवादात्मक सवलतीच्या स्वरूपात त्या प्रथांना मुरड घालण्याचा प्रकारही इस्लामने केलेला होता. बहुपत्नीकत्वाची प्रथा इस्लामप्रणीत नसून, तत्कालीन टोळीसमाजातील आणि नंतरच्या सरंजामी समाजातील पुरुषप्रधान लैंगिकतेचा परिणाम होता व आहे, याचा विसर इस्लामबद्दल लिहायला लागते की सर्वांनाच पडतो. बहुपत्नीकत्वाची प्रथा सर्वच धार्मिक जमातींत होती व आहे. ते काही इस्लामचे खास लक्षण नाही. परंतु आजकाल बहुपत्नीकत्व हे केवळ इस्लामच्या नावाने खपविले जाते. भारतात, मुसलमानेतर भारतीय नागरिकांसाठी एकपत्नीकत्वाचा कायदा असला तरी, प्रत्यक्षात अद्यापही भारतात सर्वात जास्त बहुपत्नीकत्वाचे प्रमाण आदिवासी जमातींमध्ये असून, हिंदूंमध्ये ते प्रमाण ५.८० आहे, तर मुसलमानांत ५.७० आहे. तसेच भारत सरकारच्या“कमिटी ऑन दि स्टेट ऑफ विमेन” च्या एका रिपोर्टानुसार “एक टक्क्याहून जास्त मुसलमानांना एकाहून जास्त बायका नाहीत.”
मुसलमान उलेमा, राज्यकर्ते आणि ब्रिटिशांच्या काळात झालेला पर्सनल लॉ किंवा मध्ययुगात “शरियतच्या नावाने बहुपत्नीकत्वाला दिलेली सर्रास मान्यता, यामुळे ही व्यवस्था निर्माण झालेली होती व आहे. परंतु मूळ इस्लामध्ये कुराणशरिफांत एकाचआयत” मध्ये चारपर्यंत बायका करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यासंबंधी इस्लामी धर्मपंडितांत वाद आहेत. मौलाना महंमद गनी आणि मौ. आझाद यांच्या मते, हा नियम नसून अपवाद आहे, तर पैगंबर पत्नी आयेशा यांनी दिलेल्या निर्णयानुसार फक्त युद्धातील अनाथ स्त्रियांना संरक्षण देण्यासाठीच एकापेक्षा जास्त विवाह करण्याचे अधिकार पुरुषाला आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे डॉ. पंडितांनी केलेले पुढील विधान विपर्यस्त आहे, “मुसलमान बालिकांच्या विशेषतः आफ्रिकी देशांत-स्त्रीशिश्निका काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेद्वारे स्त्रियांना लैंगिक आनंदापासून वंचित ठेवण्याचा उद्देश असतो. हा प्रकार मुसलमान बालिकांच्या बाबतीत घडतो, हे त्यांचे प्रतिपादन वास्तव परिस्थितीला धरून नाही. एक, कुराण किंवा हदीस मध्ये, जसा पुरुषांच्या बाबतीत ‘सुंता करण्याचा नियम आहे तो लैंगिकतेपेक्षाही, उष्ण कटिबंधातील वाळवंटी प्रदेशातील पाण्याची कमतरता आणि त्याअनुषंगाने आवश्यक असणारी स्वच्छता, यांच्याशी जास्त संबंधित आहे. विशेष म्हणजे, सुंता करण्याची पद्धत, ही इस्लामपूर्व काळापासून त्या प्रदेशांत चालत होती. तिचाच स्वीकार इस्लामने केलेला आहे. मुस्लिम बालिकांच्या बाबतीतली, आफ्रिकन टोळ्यांतली रूढी, इस्लामने अजिबात स्वीकारलेली नाही. याबाबतीत कुराणात किंवा हदीस मध्ये अप्रत्यक्ष किंवा दूरान्वयानेही कसलाही आदेश किंवा उल्लेख नाही. तेव्हा डॉ. पंडितांची मांडणी असा समज निर्माण करते की, स्त्रियांच्या बाबतीतली ही प्रथा इस्लामचा परिणाम आहे.
तसेच डॉ. पंडितांना इस्लाममधील “तात्पुरत्या पत्नीचा केलेला उल्लेख देखील वाचकांचा असा समज निर्माण करणारा आहे की, इस्लाममुळे बहुसंख्य मुसलमानांत तात्पुरत्या पत्नीची प्रथा (चंगळ?) सर्रास रूढ असावी. शिया पंथातील काही लोकांत “मुटा” पद्धतीचा, विशिष्ट काळापुरता करार करून, लग्न करण्याचा प्रकार प्रचलित आहे. सुन्नी मुसलमानांत त्याला अजिबात धार्मिक मान्यता नाही. ‘मुटा’ पद्धतीचा, तात्पुरत्या पत्नीचा प्रकार शिया पंथीयात असला तरी तो इस्लामच्या नावाने शिया पंथीयांनी प्रक्षिप्त केलेला प्रकार आहे