पत्रव्यवहार

प्रिय श्री. वि. रा. लिमये यांस
स.न.वि.वि.
आपण पाठविलेले कार्ड व पत्र मिळाले. आभारी आहे. ‘आजचा सुधारक’चा फेब्रुवारी १९९२ चा अंक मिळाला. संपूर्ण अंक वाचला.
मी लेखकाच्या मताशी सहमत नाही, कारण लेखक हा पुरुष असल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करतो. कोणतीही स्त्री लेखकाचे मत मान्य करणार नाही. संकोचामुळे तसे ती कदाचित व्यक्त करणार नाही. स्त्री-पुरुषांत शारीरिक, मानसिक, भावनिक कोणते फरक असतात हे किन्से रिपोर्टचा अभ्यास केल्यावर मला थोडेफार कळले, व मी या निर्णयाप्रत आलो आहे की निसर्गाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास आवश्यक असलेली भिन्न मानसिकता स्त्री व पुरुष यांना बहाल केलेली आहे. म्हणजेच समागम हे पुरुषाचे साध्य असते, परंतु स्त्रीला ते एक साधन असते. स्त्रीचे साध्य असते मातृत्व, प्रेम, स्थैर्य, आधार.

यासंबंधी मी “निरामय कामजीवन” या पुस्तकात लिहिले आहे. अनेक लेखांतही माझे विचार मांडले आहेत.

सध्या अजिबात वेळ मिळत नाही. वाचन, लेखन व रोजची व्यावसायिक व इतर कामे हातावेगळी करताना रात्रीचे दोन किंवा तीन वाजतात. बॅकलॉग राखणे टाळतो. एक ५०० पानांचे हस्तलिखित छापून पुस्तकरूपात तयार होत आहे, त्यासाठीही बराच वेळ जातो. वेळेअभावी मी ‘आजचा सुधारक’साठी लेख लिहू शकणार नाही हे कळविण्यास दिलगीर आहे.

आपले जुने पत्र शोधले, पण चटकन सापडले नाही. एक तारखेला पत्रांचा गठ्ठा फाईल करतो तेव्हा जरूर ते मिळेल, मग त्याची प्रत पाठवून देईन.

‘निरामय कामजीवन’ या माझ्या पुस्तकातील स्त्री-पुरुष हे प्रकरण आपण जरूर वाचावे. कामवृत्ती हे प्रकरणही वाचावे. या दोहोंत स्त्री- पुरुषांच्या लैंगिक भावनांविषयी लिहिले आहे. ‘स्त्री पुरुष तुलना’ ही कै. ताराबाई शिंदे यांनी लिहिलेली पुस्तिका (प्रथमावृत्ती १९८२ दुसरी आवृत्ती १९७५, वाचावी. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून विकत मिळू शकेल.
(पत्ता :- मु. म. ग्रं. संग्रहालच, नायगांव, मुंबई ४०००१४, किंमत ४ रु.)

छाया दातार यांचे ‘स्त्रीपुरुष’ हेदेखील एक वाचनीय पुस्तक आहे. ‘आजचा सुधारक’मध्ये लेख लिहिण्यापूर्वी लेखकाने केवळ तर्काला आव्हान न देता आजवरचे संशोधन व अस्तित्वात असलेले वाङ्मय वाचायला हवे होते. विज्ञान म्हणजे तर्क किंवा कॉमनसेन्स नव्हे.
श्री. देशपांडे यांना साभार पोच कळविली आहे. परंतु या विषयावर मला लिहावयाचे नसल्यामुळे मी त्यांना काहीच कळविलेले नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन कळायला काय हरकत आहे? आपणही आपले मत जरूर व्यक्त करावे.

आपला
विठ्ठल प्रभू

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.