मी कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही सामील होणार नाही. मग त्या युद्धामागची कारणं मला कितीही पटणारी असोत.
लढाई ही एक अतिशय नीच आणि घृणास्पद कृती आहे असं मी मानतो. मानवजातीला लांच्छनास्पद अशा या कृतीवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. बँडच्या तालावर रांगेने चालण्यात धन्यता मानणाच्या माणसांविषयी माझ्या मनात चीड आहे. अशा माणसाला मेंदू अनवधानानं देण्यात आलेला असावा. नुसत्या पाठीच्या कण्यावरही त्याचं उत्तम भागू शकलं असतं. रणांगणावर हुकुमाची तामिली म्हणून देशभक्तीच्या नावाखाली जे काही शौर्य गाजवलं जातं, अमानुष हत्याकांड चालतं आणि एकूणच जो काही मूर्खपणा चाललेला असतो, त्याची मला अतिशय किळस येते! खरोखर, लढाईइतकं निंद्य आणि हीन कृत्य नसेल. अशा हलक्या कामात भाग घेण्यापेक्षा माझे तुकडे तुकडे झाले तरी बेहेत्तर.