स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला नाही. स्त्रियांवर असलेले गृहिणी, आई व मिळवती स्त्री ह्या तीन भूमिकांचे अवजड ओझे कसे कमी करता येईल ह्याचा विचार स्त्री-चळवळीने कोठेच सुरू केलेला नाही. ……. बलात्काराविरुद्ध चळवळ आहे ती बहुतांशी ‘गुन्हेगाराला शासन व्हावे ह्यासाठी आहे. बलात्काराने स्त्री भ्रष्ट होत नाही, आणि बलात्कार टाळण्यासाठी (द्यावे लागणारे) स्वातंत्र्याचे मोलही फार महाग आहे, ते देऊ नये, हेही स्पष्ट झालेले नाही. बलात्काराचे मुख्य कारण स्त्री ही पुरुषप्रधान समाजात पुरुषाची मालमत्ता आहे, संधी सापडताच ती चोरावी किंवा उचलून न्यावी असे पुरुषाला वाटत असते, हे होय. पुरुषाचा मालकीहक्क नष्ट केला तरच स्त्री स्वतंत्र होईल, हेही स्त्रियांना अजून बहुधा पटत नाही.