मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे देशाचा विकास होईल ही कल्पना अमान्य असलेले बरेच लोक आहेत. भारताचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर ग्रामोद्योगाशिवाय, विकेंद्रीकरणाशिवाय गत्यंतर नाही असे ते मानतात. माजी अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी नुकतेच अशा अर्थाचे विधान केलेले वाचले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होतो तो तेथे राणाच्या लोकांचे राहणीमान सुधारल्यामुळे होतो. तेथल्या लोकांजवळ पैसे कितीही कमी जास्त असले तरी त्यामुळे फरक पडत नाही. राहणीमान सुधारण्याचा अर्थ सगळ्या लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण होऊन तद्देशवासीयांना एकमेकांच्या सुखोपभोगात भर घालणे. ही भर दोन प्रकारची असते. सर्वांना एकतर अधिक फावला वेळ मिळतो किंवा फावला वेळ घ्यावयाचा नाही असे ठरविल्यास त्या अवधीमध्ये अधिक उत्पादन केल्यामुळे उपभोगाचे प्रमाण वाढते. देशातील वस्त्रोत्पादनाचा विचार करू या, वस्त्रोत्पादनाची साधने जोवर मर्यादित होती, कापसाच्या, तागाच्या आणि लोकरीच्या उत्पादनावर आपण जोवर अवलंबून होतो तोवर आपल्याला सर्वांना पुरतील असे कपडे मिळणे शक्यच नव्हते.
हाताने सूत कातण्याची यंत्रे, हाताने विणण्याची साधनेच जोपर्यंत उपलब्ध होती तोपर्यंत आमचा शेतकरी हा लंगोटी लावणारा आणि खांद्यावर घोंगडे घेणाराच राहिला. आज कृत्रिम तंतूंच्या आणि कताईविणाईच्या स्वयंचलित यंत्रांच्या उपलब्धतेमुळे तितक्याच कालावधीत अनेक पटीने जास्त उत्पादन होत असल्यामुळेच केवळ आम्हाला पूर्वीपेक्षा पुष्कळ जास्त लोकांना अंगभर वस्त्र देता आले आहे. ही यंत्रसामुग्री एका छपराखाली ठेवल्याने किंवा विकेंद्रित रीतीने विखरून ठेवल्याने फरक पडण्याचे काहीच कारण नाही.
माणसाचे राहणीमान हे त्याच्या खिशात खुळखुळणा-या पैशांमुळे ठरतच नाही. खिशात पैसा खूप पण बाजारात कांदाच नाही अशी स्थिती झाल्यास त्याला कांदा-भाकर सुद्धा दुर्लभ होते. वस्तू महागतात आणि कितीही पैसे फेकले तरी सर्वांना त्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. कारखाने नफ्यात चालो की तोट्यात ते उत्पादनात भर घालत असतात आणि त्यामुळे तितक्या प्रमाणात उपभोक्त्याची ऐपत वाढवीत असतात. उपभोक्त्याच्या संपत्तीत भर घालत असतात. आणखी एक उदाहरण देतो. पूर्वी दिवसाला एक आगगाडी सुटत असेल तर त्याऐवजी दोन सुटू लागल्या की देशातल्या तितक्या (गाडीभर) लोकांची ऐपत वाढते, किंवा असे म्हणू या की तेवढ्यामुळे हज़ार दीड हजार लोक एकदम श्रीमंत होतात.
हेन्रीफोर्डने काय केले? त्याने अमेरिकेतल्या प्रत्येक माणसाच्या ठिकाणी मोटरगाडी घेण्याची ऐपत निर्माण केली. फोर्डचा कारखाना निघाला नसता आणि जुन्याच पद्धतीने आम्ही मोटारी तयार कॅरीत राहिलो असतो तर पुढची शेकडो वर्षे सर्व अमेरिकनांना गाडी घेण्याची ऐपत येती ना.
शिकार करून आणि कंदमुळे गोळा करून पोट भरण्याच्या अवस्थेतून माणूस बाहेर पडल्यानंतर त्याची प्रत्येक कृती आपले राहणीमान वाढविण्याच्या दिशेने झालेली आहे. ह्यानंतर राहणीमान वाढते न ठेवणे हे आमच्या मते अशक्यप्राय आहे. म्हणून विकेन्द्रित उत्पादनाचा आग्रह न धरता आता कोणत्याही मार्गाने उत्पादन आणि समान वितरण ह्यांचा आग्रह धरणे आम्हाला भाग आहे.
(२) निष्प्रभ शासक
जानेवारी महिना बाळासाहेबांनी खूपच गाजविला. महाराष्ट्रात त्यांनी जे करून दाखविले ते दुस-या एखाद्या राज्यात घडते तर तेथे राष्ट्रपति-राजवट आणायला हवी अशी
आरोळी त्यांनीच ठोकली असती.
बाळासाहेब ठाकरे हे आम्हा महाराष्ट्रवासीयांचे पारात्पर नेते. त्यांनी साक्षात् केंद्रीय गृहमंत्र्यांना आपल्याकडे यायला भाग पाडले, आपल्या नाकधुन्या काढायला लावल्या, (ते नजराणे घेऊन आणि लोटांगणे घालीत आले की काय तो तपशील मात्र कळला नाही.) ह्यामुळे आमचा ऊर भरून आला आहे. आमच्या बाळासाहेबांची महती किती आणि कशी वर्णन करावी असे आम्हाला झाले आहे! इतका श्रेष्ठपुरुषोत्तम गेल्या दहा हजार वर्षांत आढळला नाही; आणि पुढे भविष्यातही बहुतेक अशी कर्तबगारी कदाचित त्यांच्या संततीच्याच भाग्यात लिहिली असेल.
पाकिस्तानच्या ज्या कारवायांकरिता बाळासाहेबांनी आपली क्रिकेट-सामन्यांविरुद्ध आघाडी उघडली त्या कारवाया आमच्या देशात होऊ न देण्याचे काम आमच्या गृहमंत्र्यांचे आहे, आणि ते (गृहमंत्री) ते काम नीट पार पाडीत होते; पण त्या कार्याची प्रसिद्धी करण्यात आमचे वार्ता आणि प्रसिद्धिमंत्री कमी पडले. त्यांना स्वतः शिवसेना प्रमुखांची भेट घेऊन आपले काम चोख नसल्याबद्दल त्यांची माफी मागावी लागली असे ऐकिवात आले. गृहमंत्र्यांनी काम केले पण आम्ही ते आपल्यापर्यंत पोहचवू शकलो नाही, असे दिलगिरीयुक्त निवेदन त्यांनी केले आणि ह्यापुढे असे घडणार नाही याची खात्री पटवून देण्यासाठी की काय गृहमंत्र्यांचे आणि शिवसेनाप्रमुखांचे संयुक्त निवेदन (काही झाले तरी प्रसिद्धिमंत्री ना ते) त्यांनी स्वतः वाचून दाखविले.
आमचा देश लोकशाही मानणारा प्रजासत्ताक देश आहे. येथे बहुमताचे राज्य आहे. आपल्या संविधानाप्रमाणे कायद्याचे राज्य चालविण्यास तो बांधला आहे, याची जणु आम्हा सर्वांना बाळासाहेब आठवण करून देत होते. संपूर्ण देशाच्या मानाने संख्येने लहान असलेल्या शिवसेनेला दांडगाई आणि दंडेली करण्याची इतकी मोकळीक मिळते ह्याचा अर्थ बाळासाहेबांच्या प्रचारतंत्रापुढे आमचे शासन पूर्ण निष्प्रभ आहे एवढाच आहे.
अशा लोकशाही न मानणाच्या, दंडेलीवर चालणा-या राजकीय पक्षांना वठणीवर आणण्यासाठी आम्ही विवेकवाद्यांनी काय करायला पाहिजे हे सध्या तरी आम्हाला उमजेनासे झाले आहे. हतबुद्ध करणारी परिस्थिती आहे. आज आम्ही हतबुद्ध असलो तरी हताश नाही. हताश होऊन भागणारच नाही. आपण ह्या राज्यात राहू नये, कोठे दुसरीकडे राहावयाला जावे
ह्या युतीच्या छायेखालून लौकर बाहेर पडावे – इतका वैताग आम्हाला बाळासाहेबांच्या वक्तव्यांमुळे आला होता. आणखी काही उपाय आपणास सुचत असल्यास सत्वर लिहावे ही
आमची आमच्या वाचकांना विनंती आहे.