आजचा सुधारक, जानेवारी १९९५ च्या अंकातील प्रा. रेगे व प्रा. देशपांडे ह्या दोघांचेही लेख वाचले. तुल्यबल युक्तिवादकांचे युक्तिवाद प्रयत्नपूर्वक समजून घेण्यात ‘बौद्धिक व्यायाम झाला व सात्त्विक करमणूकही झाली.
प्रा. रेगे यांचा अनुभव मला सहज समजला. कारण तोच अनुभव मीही घेतलेला आहे. प्रा. देशपांडे यांचा युक्तिवादही मला समजला. कारण स्वानुभव क्षणभर बाजूला सारून मी ही आस्तिकतेच्या विरोधात तोच युक्तिवाद करीन.
‘यो यच्छूद्धः स एव सः’ हे वचन आठवले. प्रा. रेग्यांचा श्रद्धाविषय ‘स्वाभाविक श्रद्धा आहे. प्रा. देशपांड्यांचा श्रद्धाविषय तर्कशुद्ध अश्रद्धा’ हा आहे. त्यामुळे ह्या दोघांचे एकमत होणारच कसे? वादातून तत्त्वबोध होण्याची शक्यताच दुरावली आहे. सामनाअनिर्णीतच राहणार!
प्रा. देशपांडे यांच्या लेखाचा मथळा ‘मी आस्तिक का नाही?’ असा आहे. पण त्यापेक्षा, ‘प्रा. रेगे आस्तिक असूच शकत नाहीत’ हा मथळा अधिक योग्य ठरला असता.
व्याघातांमुळे जी बाधित होत नाही, ती गोष्ट सार्थ भाषेच्या पलीकडे गेली आहे. जिला आपण निरर्थक म्हणतो अशी ती अक्षरशः आहे” हे प्रा. देशपांडे यांचे म्हणणे त्यांचीभूमिका स्पष्ट करते.
‘सार्थ भाषेच्या पलीकडे, म्हणजे जसे ‘निरर्थक तसेच ‘शब्दातीत’ही असू शकते.
हे शब्देविण संवादिजें” हा ज्ञानेश्वरांचा युक्तिवाद ‘निरर्थक आहे काय? तो ही ‘ एक युक्तिवाद आहेच.