‘विवेक (reason) आणि ‘विवेकवाद’ (ratinalism) हे शब्द संदिग्ध असल्यामुळे त्यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले अर्थ सांगणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे शब्द व्यापक अर्थाने वापरले आहेत. त्यांनी एक बौद्धिक व्यापारच अभिप्रेत आहे असे नसून त्याखेरीज निरीक्षण आणि प्रयोग यांचाही त्यांच्या अर्थात अंतर्भाव आहे. हे लक्षात ठेवणे जरुर आहे कारण reason’ आणि ‘rationalism’ हे शब्द अनेकदा एका वेगळ्या आणि संकुचित अर्थाने वापरले जातात, आणि त्या अर्थी त्यांचा विरोध irrationalism’ (विवेकद्रोह) शी नसून अनुभववादाशी (empiricism) असतो. ते शब्द जेव्हा या अर्थाने वापरले जातात तेव्हा विवेकवाद निरीक्षण आणि प्रयोग यांच्याहून श्रेष्ठ आहे अशी प्रशंसा त्यातून व्यक्त होते. या अर्थी त्याला ‘बुद्धिवाद’ ‘intellectualism’ हा शब्द वापरणे उचित होईल. जेव्हा मी इथे ‘rationalism’ हा शब्द वापरतो तेव्हा, विज्ञान ज्याप्रमाणे प्रयोग आणि तर्क या दोन्हींचा वापर करते, त्याप्रमाणे मलाही अनुभववाद आणि बुद्धिवाद दोन्ही अभिप्रेत असतात. दुसरे असे की ‘विवेकवाद’ हा शब्द मी अशा वृत्तीचा व्यंजक म्हणून वापरतो की जी भावना आणि विकार यांच्याएवजी विवेकाला म्हणजे अनुभवआणि तर्क यांना आवाहन करून शक्य त्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते. विवेकवाद म्हणजे अशी वृत्ती की चिकित्सक युक्तिवाद ऐकण्यास आणि अनुभवाने शिकण्यास सदैव तयार असते.