मागच्या लेखांकात प्रा.म.ना. लोही ह्यांच्या सविस्तर पत्राचा मी उल्लेख केला होता. त्यांच्या लेखामधील महत्त्वाचा अंश घेऊन त्यावर मी माझे म्हणणे पुढे मांडणार आहे. मजकडे आलेले लेख किंवा पत्रे ही स्वतंत्रपणे लिहिलेली व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असल्यामुळे त्यात कोठे कोठे पुनरुक्ती आहे, तसेच त्यांच्या काही भागांचा संक्षेप करता येण्याजोगा आहे असे वाटल्यावरून त्यांच्या मुद्द्यांचा तेवढा परामर्श घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे हा वादविवाद नाही; मी कोठलाही पवित्रा घेतलेला नाही. म्हणून मला एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही आणि त्यामुळे तो माझ्या विवेचनातून गळला तर तो पुन्हा माझ्या लक्षात आणून द्यावयाला हरकत नाही. पण ह्या चर्चेला वादंगाचे वा वाग्युद्धाचे रूप येण्यापासून वाचवावे व तिच्या योगे स्त्रीमुक्तीच्या दिशेने आपले पाऊल पुढे पडावे एवढीच इच्छा आहे.
प्रा. लोही त्यांच्या म्हणतात की मोहनींनी मांडलेली स्त्रीमुक्तीची कल्पना ही इच्छाचिंतना- सारखी किंवा स्वप्नरंजनासारखी वाटते. त्यांचे वास्तवाकडून आदर्शाकडे जाण्याचे स्वप्न साकार होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत.
अगदी खरे आहे. आज तरी ते स्वप्नच आहे. पण म्हणूनच ते मांडणे भाग आहे. ते आजचे वास्तव असते तर ते मांडण्याची गरजच नव्हती. आजचे ते स्वप्न आता पहिल्याने आराखड्याच्या रूपात परिवर्तित करावयाचे आहे. मी वास्तुशिल्पी नाही, आणि मी ज्या घराचे स्वप्न पाहतो ते माझ्या एकट्याच्या मालकीचे नाही. त्या नव्या सोयिस्कर घरात आपणा सर्वांनाच राहावयाचे आहे. त्या सोयी प्रत्यक्षात कशा आणावयाच्या ते एकमेकांच्या सल्ल्याने ठरणार आहे.
प्रा. लोही पुढे म्हणतात : ‘मूल्यांची जाणीव आणि त्यांचा आविष्कार हा स्थलकालानुरूप भिन्न असतो; शिवाय तो संस्कृतीचा भाग असतो. पण मला हे पटत नाही. ‘शाश्वतमूल्ये’ कोणती आहेत व कोणती नाहीत ह्याविषयीची जाणीव समाजात किंवा संस्कृतीमध्ये फार क्वचित आढळते. सर्वसाधारण जनता बहुधा मेंढरांसारखी असते. तिला दूरचे दिसत नाही. ती खालमानेने चालत राहते. अशी मूल्यांची जाणीव संस्कृतीत असती तर आपल्याकडे अस्पृश्यता फोफावली नसती. सतीसारखी चाल निर्माण झाली नसती. असो.
पुढे त्यांनी उद्दालक आणि त्याचा मुलगा श्वेतकेतु ह्यांची कथा सांगून श्वेतकेतूने केलेल्या नियमाच्या मागे स्त्रीला अनेक पुरुषांच्या कामवासनेला बळी जावे लागू नये असा विचार असावा असे म्हटले आहे. मला ते मान्यच आहे. माझ्या स्त्रीमुक्तीच्या कल्पनेमध्ये स्वैराचार बसत नाही. इतकेच नव्हे तर स्त्रीपुरुषांच्या अकारण घडलेल्या नैमित्तिक (casual) संबंधांनी आपल्या एकूण समाजाच्या समस्यांमध्ये भर पडण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे पुरुषांचा बेजबाबदारपणा वाढण्याचा संभव अधिक असे मला वाटू लागले आहे. स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा पूर्ण अभाव, असे असत नाही; तर स्वातंत्र्य प्राप्त करणे म्हणजे इतरांनी घातलेली बंधने तोडून टाकून स्वेच्छेने बंधने स्वीकारणे होय. स्वातंत्र्य म्हणजे स्वयंनिर्णय होय असे मला सांगावयाचे आहे. गुलामीमध्ये स्वामीचे हित सांभाळावे लागते. स्वातंत्र्यामध्ये सर्वांचे हित पाहावे लागते, कारण समतेसोबतचे स्वातंत्र्य हे सर्वांचे असते. म्हणजेच अशा समतेसोबतच्या स्वातंत्र्यामध्ये कोणा एकाचे हित हे इतरांच्या हितापेक्षा श्रेष्ठ नसते. म्हणून बंधनांशिवाय स्वातंत्र्याची कल्पनाच करता येत नाही. सर्वांचे हित म्हणजे प्रत्येकाचा संयम, इतरांच्या अधिकाराची जाण, पुरुषाला स्त्रीच्या अधिकारांचीजाण नसेल तर ते त्याचे स्वातंत्र्य नव्हे, स्वामित्व आहे व ते मोडून काढलेच पाहिजे.
विवाहबन्धन हे बहुधा स्त्रीच्या दुःखाला कारणीभूत होते हे माझे मत सांगून प्रा. लोही म्हणतात की ‘ही धारणा एकांगी आहे. नाहीतर वेश्या ह्या सुखी स्त्रिया म्हणाव्या लागतील.’
वेश्या ही सुखी असू शकत नाही. कारण ती परतंत्र आहे. तिला नकार देण्याचा अधिकार नाही. आणि विवाहित स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे केवळ लैंगिक स्वातंत्र्य नव्हे. आणि लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वासनांना मोकाट सोडणे नव्हे. पतिव्रता आणि वेश्या ह्यांच्या मधली, जेथे स्त्री ही स्वतःची स्वामिनी आहे अशी, काही अवस्था आहे की! ती आपणाला कल्पनेने जाणून घेता येईल असा माझा विश्वास आहे.
स्त्री ही स्वामिनी आहे ह्याचा अर्थ असा नाही की पुरुष तिचा दास आहे. मुळीच नाही. उभयतांचे स्वातंत्र्य ही कविकल्पना नाही. पण ह्या मुद्द्यांचा विस्तार मी नंतर करीन.
प्रा. लोहींच्या शेवटच्या दोनतीन मुख्य मुद्द्यांचा उल्लेख करावयाचा राहिला आहेः
(१) स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य दिल्यामुळे लिंगपिसाट वृत्ती फोफावेल व समाजस्वास्थ्याला अभूतपूर्व धोका पोचेल असे ते म्हणतात.(२) महाराष्ट्रात वासनाकांडाची जी भयानक लाट उसळली आहे ती कामवासनेच्या दमनामुळे, असे मोहनींना वाटते काय असे ते विचारतात. ह्यावर उपाय काय, हाच आजचा यक्षप्रश्न आहे असे म्हणून वैचारिक प्रबोधन हाउपाय ते स्वतःच्या वतीने सुचवितात.(३) सध्याची सामाजिक स्थिती पाहता मोहनी ज्याला सनातनी हिंदु दृष्टिकोन म्हणतात तो अयोग्य नव्हे असे ते म्हणतात. आणि (४) मोहनींना अपेक्षित वातावरण कसे निर्माण करता येईल ह्याचा ऊहापोह मोहनींनी केला असता तर सामाजिक परिवर्तनाला नव्या दिशेने नेण्याचे श्रेय मोहनींना देता आले असते असे म्हणतात.
ह्यांपैकी पहिल्या मुद्द्यांबद्दल मी माझ्या मागच्या लेखात (ऑक्टोबर ९४ अंकात) काही सांगितले आहे. तसेच ह्या लेखातही त्याचा ऊहापोह झालाच आहे.
महाराष्ट्रातील वासनाकांड हे कामवासनेच्या दमनामुळे झालेले आहे असे मला वाटत नाही. ते पैशांसाठी झालेले आहे. पण त्यामध्ये स्त्रियांना जे भोगावे लागले ते मात्र आजच्या चुकीच्या नीतिकल्पनांमुळे वा चारित्र्यकल्पनांमुळे. त्या कल्पना जर निराळ्या असत्या तर कपटी पुरुषांना तरुण स्त्रियांना संकटात आणून वाममार्गाने पैसे मिळविताच आले नसते असे माझे मत आहे. त्या चारित्र्यकल्पना बदलविण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न चालविला आहे. दादा धर्माधिकारी, डॉ. राम मनोहर लोहिया ह्यांचे काम पुढे चालवीत आहे. लोकांचे मन ह्या, म्हणजे लैंगिक, बाबतींत अधिक उदार कसे होईल असे पाहत आहे. त्यासाठी लैंगिकस्वातंत्र्यात दोष नाही. विवाहबाह्य लैंगिक संबंधांमुळे स्त्रीच्या ठिकाणी कोणतेही लांच्छन यावयाला नको असे माझे मत का झाले आहे ते सांगत आहे. हा माझ्या परीने समाजपरिवर्तनाचा इलाजच मी करीत आहे.
सध्याची सामाजिक स्थिती व त्या स्थितीमुळे घडणारे स्त्रियांचे वर्तन ही दोनही स्वाभाविक आहेत व त्या कारणाने स्पृहणीय आहेत की ते दुष्टचक्र आहे व त्याचा भेद करणे आवश्यक आहे ते आधी ठरवू या. मी उत्तरपक्षाचा आहे. प्रा. लोहींच्या लेखावरून ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याचा स्पष्ट बोध होत नाही. पण एवढ्या माझ्या विवेचनानंतर ते माझ्या पक्षाचे झाले असतील अशी माझी खात्री आहे.
ठाण्याच्या उत्तरा सहस्रबुद्धे राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे एक पत्र नोव्हेंबर ९४ अंकात प्रकाशित झाले आहे. येथेही त्यांच्या पत्रातील एक परिच्छेद व त्यावर माझे स्पष्टीकरण हाच क्रम योजला आहे. त्यांनी स्त्रीपुरुषसंबंधांच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत
(अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधांचे स्वातंत्र्य असावे.
(ब) एकपतिपत्नीव्रत ही आदर्श व्यवस्था नव्हे – अर्थात्, बहुपतिक, बहुपत्नीक किंवा बहुपतिपत्नीक कुटुंबे असण्यास हरकत नसावी.
एकाच पतिपत्नीचे कुटुंब असून प्रसंगी त्या स्त्रीपुरुषांनी इतरही पुरुषस्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास हरकत नसावी, ही एक गोष्ट झाली. एकाच कुटुंबात, एका पुरुषाच्या अनेक स्त्रिया /एकाच स्त्रीचे अनेक पुरुष ह्यांनी एकत्र राहणे, ही वेगळीच गोष्ट झाली. मूळ लेखातून हे पुरेसे स्पष्ट होत नाही, असे वाटल्यामुळे ही पृच्छा. तत्त्वतः ह्या दोन्ही गोष्टींना विरोध असण्याचे कारण नाही.
भविष्यात उपरोल्लिखित (ब) पद्धतीची कुटुंबे अपवादानेच अस्तित्वात येतील, असे मोहनींना वाटते. परंतु एकदा स्त्रीपुरुषांचे लैंगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात आल्यावर, विवाह आणि कुटुंब ह्या संस्था आज आहेत त्या स्थितीत राहू शकणार नाहीत हे मान्य करावयाला हवे. विवाहसंस्था निरर्थक ठरेल; आणि कुटुंब असले, तर ते स्त्री व तिची मुले असे,आणि अर्थात् मातृसत्ताक, असेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
स्त्रीपुरुषांचे नैमित्तिक संबंध विशद करण्याची संधी मी ह्या परिच्छेदाच्या निमित्ताने घेतो, व येथे पुन्हा सांगतो की मला योनिशुचितेचे महत्त्व वाटत नसले तरी त्याचा अर्थ असा नव्हे की मला स्वैराचार हवा आहे. मला तो मुळीच नको आहे. अपरिचित स्त्रीपुरुषांनी संधी मिळताच आपणाला एकान्त कोठे मिळेल ते शोधावयाला लागावे अशी माझी स्त्रीमुक्तीची कल्पना नाही, हे मी पूर्वी स्पष्ट केलेच आहे. परंतु विवाहित स्त्रीपुरुषांनी सारासारविवेक करून परिस्थितिवशात् आपल्या वैध भागीदाराऐवजी दुसऱ्या कोणाशी रत होण्यास माझा तत्त्वतः विरोध नाही. माझा विरोध नाही असे मी म्हणत असलो तरी हे स्वातंत्र्य स्त्रीपुरुषांनी अतिशय तारतम्याने वापरावयाचे आहे. स्त्रीमुक्तीचे सर्व यश स्त्रीपुरुषांच्या तारतम्यावर अवलंबून आहे. Thus far and no further असे बंधन प्रत्येकाने कोठेतरी घालावेच लागणार हे मला येथे स्पष्टपणे सांगणे भाग आहे.
गेली अनेक शतके उच्चवर्णीयांनी एकीकडे ब्रह्मचर्याचे व दुसरीकडे पातिव्रत्याचे फाजील स्तोम माजविल्यामुळे स्त्रीपुरुषसंबंधांमधली स्वाभाविकता किंवा नैसर्गिकता, पार नष्ट होऊन गेली आहे. स्त्रीपुरुषांमधील एकमेकांविषयी वाटणारे प्रेम आणि शारीरिक आकर्षण ह्यामधली सीमारेषा अगदी पुसट होऊन गेलेली आहे; त्यामुळे पुष्कळ तरुणांची त्यामध्ये गल्लत होत आहे. माझ्या समजुतीप्रमाणे प्रेमामध्ये एकमेकांसाठी त्याग करण्याची तयारी अभिप्रेत आहे, ती शारीरिक आकर्षणामध्ये नाही.
लैंगिक सुख हेच सर्वस्व मानणे जसे चूक आहे तसेच स्त्रीपुरुषांच्या वाजवी लैंगिक गरजांकडे अजिबात दुर्लक्ष करणे हेही चूक आहे. आपणाला टोकाच्या कोणत्याच गोष्टी नकोत.
ब्रह्मचर्याच्या आणि पातिव्रत्याच्या कल्पनांचे महत्त्व कमी होऊ न देता सध्या विवाहाचे वय वाढवीत न्यावयाचे, उद्योगप्रधान समाजाच्या नावावर विभक्त कुटुंबपद्धतीचा पुरस्कार करावयाचा हा प्रकार चालू आहे. त्यामुळे पूर्वीची जी स्त्रीपुरुषसंबंधविषयक घडी होती ती मोडली आहे. इतकेच नव्हे तर वृत्तपत्रे व दूरचित्रण (केवळ ‘दूरदर्शन’ नव्हे) ह्यांना आपला माल खपविण्यासाठी एक सवंग साधन सापडले आहे. तरुण स्त्रीपुरुषांची स्वाभाविक कामप्रेरणा जोवर दडपली जाईल तोवर टी.व्ही. आणि चटोर वृत्तपत्रे ह्यांचे फावेल. कामविषयक जिज्ञासापूर्तीची व त्या प्रेरणेच्या समाजमान्य समाधानाची सोय उपलब्ध झाल्यानंतर टी.व्ही., सिनेमा व वृत्तपत्रे ह्यांच्यामधील चटोर विषयांविषयीचे तरुण पिढीचे आकर्षण कमी व्हावयालाच पाहिजे. तसे होत नाही तोपर्यंत आपण त्याविरुद्ध केलेल्या आरडाओरडीचा काही परिणाम होणार नाही.
उत्तरा सहस्रबुद्धे ह्यांनी एक बलात्काराच्या समस्येचा मुद्दा त्यांच्या पत्राच्या शेवटी मांडला आहे. तो अगोदर घेऊन बाकीचे नंतर घेतो. त्या म्हणतात की ‘समाज बलात्कारित स्त्रीकडे गुन्हेगार म्हणून पाहतो. समाजाची सहानुभूति वास्तविक स्त्रीकडे असायला हवी. समाजाचा हा दृष्टिकोन बदलणे ही मूलभूत गरज आहे. स्त्रीवरील अनेक बंधने केवळ ह्या एकाच भीतीपोटी निर्माण होतात. ही भीती नष्ट झाली पाहिजे…..’
ह्यावर मला असे म्हणावयाचे आहे की बलात्कारित स्त्रीचे आईवडील नव्हे तर ती स्वतःच स्वतःकडे आपण अपवित्र झालो, विटाळलो, आपली अब्रू कायमची गेली अशा दृष्टीने पाहते. बलात्कार हा तिच्या आयुष्यातला एक अपघात आहे! दुसर्या,ने मुद्दाम धक्का देऊन पाडल्यावर एखादे हाड मोडावे, कोठे खरचटावे ह्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व कोणीच द्यावयाची वास्तविक गरज नाही. तिने तर मुळीच द्यावयाचे नाही. ह्या अपघातामुळे शरीराला जखम झाली तर झाली, मनाला नको. पण हे साधायचे कसे?कारण जोवर योनिशुचितेचे महत्त्व तिच्या स्वतःच्या मनात वसत आहे, तोवर बलात्संभोगाकडे अपघात म्हणून तिला पाहताच येणार नाही. बलात्संभोग हा स्त्रीच्या मनाविरुद्ध केलेला संभोग असतो. सगळ्या विवाहित स्त्रियांना पुष्कळदाच अशा संभोगाला स्वीकारावे लागत असेल. पण अशा संभोगाची त्यांना भीती वाटत नाही; किंवा त्याची त्यांना त्यांचे पूर्ण आयुष्य झाकोळून टाकील अशी भीती वाटत नाही असे म्हणू या. अशा समागमाचा त्यांच्या मनाला ओरखडा पडत नाही कारण तेथे अब्रूचा, म्हणजेच योनिशुचितेचा किंवा पावित्र्याचा संबंध नसतो. म्हणून बलात्काराची भीती जर स्त्रियांच्या मनामधून काढून टाकावयाची असेल तर समागमाचा आणि पावित्र्याचा संबंधच सर्वांच्या मनातून दूर करावयाला हवा अशा निष्कर्षाला मी आलो आहे. हा माझा निष्कर्ष चुकीचा नाही ह्याचा पडताळा मला ह्या चर्चेतून घ्यावयाचा आहे.
पूर्वी आपल्या समाजामध्ये विटाळचांडाळाचे महत्त्व फार होते. काही व्यक्तींच्या स्पर्शामुळे इतरांना विटाळ होत असे. बसगाड्या किंवा आगगाड्यांमधून प्रवास केल्यानंतर स्नान करणे अत्यावश्यक असे. आज त्याचे प्राबल्य तेवढे राहिले नाही. अशा नको असलेल्या स्पर्शाचा आता पूर्वीसारखा त्रास कोणी करून घेताना दिसत नाही. बलात्संभोग हा तसाच एक नको असलेला स्पर्श आहे. पुरुषाच्या एका अवयवाने स्त्रीच्या विशिष्ट अवयवाला केलेला स्पर्श आहे ह्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही, असे त्याकडे आपण सारे पाहू या. तरच आपल्या मनातली त्याविषयीची भीती नष्ट होऊ शकेल असे मला वाटते. हिमालयामधल्या ज्या प्रदेशामध्ये बहुपतिपत्नीकत्व प्रचलित आहे तेथल्या स्त्रिया वेश्यावृत्ती सहजपणे स्वीकारतात. काही वर्षे ‘पेशा’ करून कोठल्याही लांच्छनाशिवाय आपापल्या कुटुंबात परत जातात, हे मी ह्या निमित्ताने येथे सांगतो.
‘स्त्रीपुरुषांचे लैंगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात आल्यावर विवाह आणि कुटुंब ह्या संस्था आज आहेत त्या स्थितीत राहू शकणार नाहीत’ हे उत्तरा सहस्रबुद्धे ह्यांचे म्हणणे बरोबर आहे. मात्र ‘विवाहसंस्था निरर्थक ठरेल व कुटुंब असेल तर ते स्त्री व तिची मुले असे, आणि अर्थात् मातृसत्ताक असेल’ हा त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध आपल्याला तपासून घ्यावा लागणार आहे.
स्त्रीपुरुषांचे लैंगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात आल्यावरसुद्धा स्त्रीपुरुषांना पूर्वीसारखेच विवाह करून पूर्वीसारख्याच कुटुंबाची रचना करण्याचे स्वातंत्र्य राहील. त्यामुळे सगळी कुटुंबरचना बदलेल असे मला वाटत नाही असे मी म्हटले. निदान सुरुवातीला तरी होणारे फरक मंदगतीने होतील, समाज काही काळ पूर्वीच्याच गतीने चालत राहील असा माझा अंदाज आहे. ही क्रान्ति एका रात्रीतून होण्याजोगी नाही. पण भविष्यामधले कुटुंब मातृसत्ताक राहील अथवा ते तसे राहावे असे मला वाटत नाही.
नव्या प्रकारचे कुटुंब रचण्याचा आपला हेतू काय ते येथे समजून घेतले पाहिजे. आपला हेतू सर्वत्र समानता आणण्याचा आहे. नवीन समाजरचनेत सर्वत्र समानता असेल, म्हणजे सर्व प्रौढ व्यक्तींना समानाधिकार असतील; आणि कोणालाही विशेषाधिकार (privileges) राहणार नाहीत.
आजची स्त्रीमुक्तीची चळवळ ही ‘आजवर पुरुषांनी विशेषाधिकार भोगले, आता ते स्त्रियांना उपभोगू द्या’ ह्या पायावर उभी केली जात आहे. त्यामुळे स्त्रीपुरुषांमध्ये विशेषाधिकारांची चढाओढ लागली आहे असे मला दिसते. आम्ही सर्वांनी ह्यापुढे गुण्यागोविंदाने, त्याचबरोबर जबाबदारीने एकमेकांबरोबर राहावयाचे आहे, ह्याचे भान आपणांस पुरेसे झालेले नाही. आजच्या कुटुंबामध्ये शांततेचा व परस्पर-स्वातंत्र्याचा बळी देऊन नवरेपणाचे, सासूपणाचे, नणंदपणाचे व असेच सारे विशेषाधिकार जोपासले जातआहेत. त्यामुळे त्या इतरांच्या विशेषाधिकारांचे ओझे झुगारून देण्यासाठी तरुण व विवाहित स्त्रीला स्वतःसाठी काही विशेषाधिकार प्राप्त करावेसे वाटत आहेत. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये गृहस्वामिनीला ते विशेषाधिकार प्राप्त होतील असा तिचा समज आहे. पण तेवढ्यासाठीच मला मातृसत्ताक पद्धती नको आहे.
लैंगिक स्वातन्त्र्याचा उभयतांचा अधिकार मान्य झाल्यावर एक फार मोठा विशेषाधिकार संपुष्टात येतो व समानतेचा पाया घातला जातो असे मला वाटते. प्रत्येकस्त्रीची निष्ठा एकावेळी एकाच पुरुषावर असणे जेव्हा आपण आवश्यक मानतो तेव्हा तो. म्हणजे पातिव्रत्य, हा पुरुषांचा विशेषाधिकार बनतो. प्रत्येक पुरुषाची, विवाहित किंवा अविवाहित, एकाच स्त्रीवर निष्ठा असणे हा पत्नीचा विशेषाधिकार होतो. कोणालाचआणि कोणतेही विशेषाधिकार विवाहसंस्थेमध्ये नकोत असे मला वाटत आहे.
कोणत्याही संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी अधिकारांची वाटणी करावी लागते हे जरी खरे असले तरी प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव पुरेशी असली तर त्या अधिकारांचा वापर कमीत कमी करण्याची गरज पडते. म्हणून विवाहसंस्थेमध्ये सर्वांचे अधिकार कोणालाच जाचक होऊ द्यावयाचे नसतील तर सर्वांना आपापली जबाबदारी नीट पार पाडावी लागेल. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये पुरुषांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाईल असे मला वाटत असल्यामुळे मला त्या पद्धतीचे कुटुंब नको आहे.
तर मग नवे कुटुंब कसे असायला हवे? आपल्याला काय वाटते?
मला अभिप्रेत असलेले बहुपतिपत्नीक कुटुंब कसे असेल ते सांगण्यापूर्वी आपली ह्याविषयीची काय कल्पना आहे ते समजून घ्यावयाला मला आवडेल.