‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक स्वावलंबन मिळवितात तेव्हाच कौटुंबिक सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आपल्याला आकडो न आवडो, समाजामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मानाने व आदराने वागविले जाते. मारून मुटकून कुणी कुणाला मान देऊ शकत नाही किंवाआदराने बघणार नाहीं.
मिळवत्या स्त्रियांचे प्रमाण हे न मिळवत्या स्त्रियांच्या पेक्षा फारच कमी आहे. तेंदूपत्ता किंवा मोह गोळा करणार्या , धुणीभांडी करणाच्या किंवा अशाच प्रकारच्या सेवा उद्योगांमध्ये असलेल्या स्त्रियांची संख्या मिळवत्या स्त्रियामध्ये जास्त असली तरी त्या संपूर्ण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत असे म्हणता येणार नाही. पुरुषत्यांना एखाद्या दिवशी किंवा कित्येक आठवडे/महिने कामाशिवाय रहावयास भाग पाडतो. जर ह्याच स्त्रिया जास्त पैसे कमवत असत्या तर त्यांना कोणत्याही कारणासाठी विश्रांती घेण्यास त्यांनी विरोधच केला असता. संपूर्ण आर्थिक स्वावलंबी स्त्री स्वतःचे हित चांगल्या प्रकारे बघू शकते. आर्थिक पाठबळामुळे तिच्या शब्दांना धार येते. स्वतःच्या शारीरिक दुर्बलतेवरसुद्धा ती मात करू शकते.
काहीही प्रयत्न न कराता चैन करणे ही भोगवादी संस्कृती सार्वत्रिकपणे मान्यता मिळवत असल्यामुळे नोकरी करणार्याह स्त्रियाच ह्याला जबाबदार आहेत असे म्हणता येणार नाही. केवळ स्त्रियाच संगोपन करू शकतात हा पुरुषप्रधान समाजाने पसरविलेला समज आहे. बालकांना घडवून चांगले नागरिक निर्माण करणे व वृद्धांची सेवा करणे हे समाजोपगी कार्य असले तरी हा भार फक्त स्त्रियांनीच उचलला पाहिज हे तर्कसंगत वाटत नाही.
स्त्रियांमध्ये अनन्यगतिकत्व केवळ योनिशुचितेच्या प्रचलित कल्पनेमुळेच येते असे ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्या देशात काही आदिवासी समाजामध्ये योनिशुचित्वाला तेवढे महत्व दिले नव्हते. तरीसुद्धा त्या समाजातील स्त्रियांवर अन्याय होत होता. पाश्चिमात्य राष्ट्रांत ह्या कल्पना नसतानासुद्धा अजूनही स्त्रीमुक्ती आंदोलन प्रखरपणे चालविले जाते. पुरुषांच्या मगरमिठीतून सुटका मिळविण्यासाठी धडपड केलीजाते. एक पालक कुटुंबव्यवस्था, नाइलाजाने का होईना, मूळ धरू लागते. सगळे उपाय संपल्यानंतर नशीबाला दोष देणे एवढेच त्यांच्या हातात राहते. पण ही मनोवृत्ती केवळ स्त्रियांमध्येच आहे असे मानण्यास सबळ पुरावा नाही.
पन्नास टक्क्यांच्या जवळपास स्त्रियांची संख्या असूनसुद्धा सर्व जगातील स्त्रियांना आपल्या न्याय हक्कासाठी, समान वागणुकीसाठी अजूनही भांडावे लागते हीच मुळी ह्या समाजाची शोकांतिका आहे. संपूर्ण आर्थिक शक्ती लाभलेल्या स्त्रियांची संख्या जशी वाढत राहील तशी राजरोसपणे चाललेला पुरुषी अन्याय व अत्याचार कमी होण्याची शक्यता आहे. गुलामगिरी मनोवृत्तीत सुख मानणाच्या स्त्रियांची संख्यासुद्धा कमी होईल.