एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या हिवाळ्याच्या सुरुवातीचा दिवस होता. आमच्या ‘अपार्टमेंट’च्या बाहेर वार्यावने पाने उडत होती. घरातल्या उबेत, सुरक्षिततेत बसायला बरे वाटत होते. शेजारच्या खोलीत आई स्वयंपाक करत होती. वडील लवकरच परतणार होते. आई माझ्याजवळ आली आणि आम्ही दोघे मावळत्या सूर्याच्या प्रकाशात बाहेर पाहायला लागलो.
“बाहेर भांडतायत माणसं, मारतायत एकमेकांना”, आई अटलँटिक समुद्राकडे हात दाखवत म्हणाली. मी निरखून पाहिले, म्हणालो, “माहीत आहे मला – मला दिसत आहेत ती.
आई जरा कडकपणे म्हणाली, “काही दिसत नाही आहे तुला. फार दूर आहेत ती.” माझ्या मनात आले, की इतक्या ठामपणे कसे सांगते आहे ती, की मला काही दिसत नाही आहे?डोळे बारीक करून पाहिल्यावर मला दिसत होती क्षितिजावर धक्काबुक्की करणारी, आणि तलवारींनी द्वंद्वयुद्ध खेळणारी माणसं – चित्रकथांच्या पुस्तकातल्यासारखी. पण माझी कल्पनाशक्तीच असावी ती. आईचे बरोबरच असावे.
एखादी व्यक्ती काहीतरी ‘फक्त कल्पनेनेच’ पाहाते आहे, हे कसे कळते आपल्याला? त्याच वर्षी एका रविवारी माझ्या वडिलांनी मला शून्याच्या स्थानमाहात्म्याबद्दल सांगितलेहोते. मोठमोठ्या संख्यांची दुष्ट भासणारी नावे सांगितली होती. सर्वांत मोठा आकडा’ नसतोच, हे सांगितले होते – “जो काय आकडा असेल त्यात ‘एक’ मिळवता येतोच”, असे म्हणाले होते ते. मला एकाएकी एक ते हजार सर्व आकडे लिहून काढायची इच्छा झाली. रद्दी कागद घेऊन मी सुरूही केले लिहायला, पण वेळ फार लागत होता. मी एखाददुसर्यार ‘शेकड्यात पोचलो, आणिआईने आंघोळीसाठी मला उठवले. मी गेलो तसे वडील लिहायला लागले. मी परतेपर्यंत ते नऊशेच्या आसपास होते. मी अत्यानंदात हजारी गाठली! मोठ्या आकड्याच्या ‘मोठेपणाने मी नेहमीच प्रभावित होत आलो आहे.
त्याच वर्षी मला ‘न्यूयॉर्क वर्ड फेअर’ या जत्रेलाही नेले होते. मला विज्ञान आणि उच्चतंत्रज्ञानाने परिपूर्ण जगाची ‘झलक’ तिथे दिसली. १९३९ सालातली माणसे कशी जगत होती हे भावी पिढ्यांना कळावे म्हणून एक ‘कालकुपी’ त्यावेळी जमिनीत पुरली गेली. त्यासुदूर भविष्यातले जग स्वच्छ, झुळझुळीत, गुळगुळीत असेल, आणि गरीब माणसांचा तेव्हा मागमूसही राहणार नाही, असे मला वाटले होते.
प्रदर्शनात एक ध्वनी पहा’ अशी गोंधळवणारी आज्ञा होती. एका कंपकाट्याला (ट्यूनिंग फॉर्क) झंकारवले की एका पडद्यावर ध्वनि ‘लहर’ रेषा उमटत होती.“उजेड ऐका’, अशी दुसरी आज्ञा होती. तिथे प्रकाशविद्युत्-घटकावर उजेड पाडला की रेडिओच्या खरखरीसारखा आवाज ऐकू येत होता. माझ्या माहितीबाहेरच्या खूपच गोष्टी होत्या, या जगात! पण आवाजाचे चित्र, उजेडाचाआवाज, कसे होत असेल हे?
माझे आईवडील वैज्ञानिक नव्हते. त्यांना गंधही नव्हता विज्ञानाचा. पण त्यांनी एकाच वेळी मला ‘संशयवाद’ ही दिला, आणि ‘आश्चर्य’ ही दिले. दोन एकमेकांसोबत अस्वस्थपणे जगणाच्या विचारसरणी माझ्या आईवडिलांनी मला दिल्या, आणि त्यांच्यातच विज्ञानाचा गाभा आहे. ते गरिबीच्या एकच पाऊल दूर होते. पण मी खगोलशास्त्रज्ञ होणार आहे असे ठरवल्यावर त्यांनी ‘बिनशर्त’ आधार दिला. खरे तर त्यांना (आणि मलाही) खगोलशास्त्रज्ञ काय करतात हे अगदी ढोबळपणेच माहीत होते. पण त्यांनी मला डॉक्टर किंवा वकील व्हायची सूचनासुद्धा दिली नाही.
खरे तर शाळेतल्या ‘स्फूर्तिदायी शिक्षकांबद्दल तुम्हाला सांगायला मला आवडले असते. पण आज मागे पाहताना मला तसे कोणीच आठवत नाही. ‘पीरियॉडिक टेबल’, तरफा आणि उतार, हरितद्रव्य आणि प्रकाशामुळे होणारे संश्लेषण, कोळशाचे प्रकार सान्यांची पाठांतरेच मला आठवतात. उत्तुंग झेपावणारी आश्चर्याची भावना नाही; रचना, व्यवस्था उत्क्रांत होत जातात हा दृष्टिकोण नाही; पूर्वीचे समज कसे चूक ठरले याचा उल्लेखही नाही. प्रयोगशाळांमध्येही ‘नेमून दिलेले उत्तर शोधणेच फक्त असायचे, आणि ते उत्तर मिळाले नाही तर गुणही मिळत नसत. स्वतःला रस असलेले विषय, स्वतः चुका करायची संधी, अशा गोष्टींबद्दल पूर्ण निरुत्साह असे. क्रमिक पुस्तकांच्या शेवटीशेवटी काही गमतीदार गोष्टी असायच्या, पण तिथपर्यंत पोचायच्या आतच वर्ष संपायचे. वेगवेगळ्या विषयांवर रंजक पुस्तके असायची, पण ग्रंथालयात. वर्गामध्ये त्यांना स्थान नसायचे.
उच्च माध्यमिक शाळेत वर्गमूळ काढायला शिकवायचे, तेही ‘आदरयुक्त’ भावनेने, जणूकाही ती पद्धत हा दैवी ज्ञानाचा प्रकार आहे. ‘बरोबर’ उत्तर काढा, कसे उत्तर निघते ते समजायची गरज नाही, अशी वृत्ती असायची. त्यातही नववी-दहावीत एक चांगले बीजगणिताचे शिक्षक होते, पण त्यांना मुलींना दमदाटी करून रडवण्यातच रस असायचा. सर्व शाळेतल्या काळात माझा विज्ञानातला रस टिकला तो केवळ विज्ञान आणि विज्ञानकथांची मासिके आणि पुस्तके स्वतः वाचूनच.
कॉलेजात मात्र ‘स्वप्नपूर्ती झाली. शिक्षकांना विज्ञान समजायचे, आणि समजावताही यायचे. शिकागो विद्यापीठ ही ‘मोठीच’ शिक्षणसंस्था आहे. मी एन्रिको फर्मीभोवती रचलेल्या भौतिकी-विभागात शिकलो. गणिती सूत्रांमधले सौंदर्य मला सुब्रह्मण्यम् चंद्रशेखरने दाखवून दिले. हॅरल्ड उरीसोबत मला रसायनशास्त्राबद्दल चर्चा करता आल्या. उन्हाळ्यांमध्ये मी इंडियाना विद्यापीठात एच. जे. मुलरचा ‘चेला’ असे. ग्रहांचे खगोलशास्त्र मी ‘एकमेवाद्वितीय’ ग्रहशास्त्री जी.पी. क्यूपरपाशी शिकलो.
क्यूपरकडून मी ‘लिफाफ्याच्या पाठीवरच्या गणिता’बद्दल शिकलो. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे एखादे उत्तर सुचले की हाती लागेल तो कागद (लिफाफ्याची ‘पाठ’) घ्यायची. आपले मूलभूत भौतिकीचे ज्ञान वापरून काही प्रश्नांबाबतची ढोबळ समीकरणे मांडायची. त्यांच्यात संभाव्य आकडे घालायचे. उत्तर जर तुमचा प्रश्न सोडवणारे आले, तर तपशिलात हेच पुन्हा करायचे नाहीतर वेगळे उत्तर शोधायचे. गरम सुरीने लोणी कापावे तसे हे तंत्र ‘मूर्खपणा’ कापून टाकते.
शिकागो विद्यापीठातच मी रॉबर्ट एम. हचिन्ज यांनी आखलेल्या एका ‘सामान्य अभ्यासक्रमातही शिकलो. इथे विज्ञान हे मानवी ज्ञानाच्या वस्त्रातला एक धागा म्हणून शिकवले जाई. इथे एखाद्या भावी भौतिकशास्त्राची प्लेटो, अॅरिस्टॉटल, बाख, शेक्स्पीयर, गिबन, मॅलिनॉवस्की, फ्रॉईड वगैरेंशी ओळख नसणे ‘अकल्पनीय’ समजले जाई. एका विज्ञानाच्या वर्गात टॉलेमीचा पृथ्वीकेंद्री सूर्यमालेचा दृष्टिकोण इतक्या प्रभावीपणे मांडला गेला, की बर्या च जणांचा कोपर्निकस-(सूर्यकेंद्री)-वरचा विश्वास डळमळला. हचिन्ज अभ्यासक्रमात शिक्षकांचे स्थान त्यांच्या संशोधनावर नव्हे, तर शिकवण्यानुसार जोखले जाई, भावी पिढीला ज्ञान आणि स्फूर्ती देण्याच्या क्षमतेवर ठरवले जाई. (आज विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या क्षमतेलाच वजन देतात.)
या उत्साही वातावरणात माझ्या शिक्षणातल्या बर्या.चशा त्रुटी मी भरून काढी शकलो. मला विश्वाची कोडी थोडीशीही उलगडणान्यांचा आनंदही “चक्षुर्वै सत्यम्” पाहता आला.
एकोणीसशे पन्नाशीतल्या माझ्या गुरूंबद्दल मी कृतज्ञ आहेच, आणि हा भाव त्यांच्यापैकी प्रत्येकाला कळवलाही आहेच. पण आज मागे पाहताना स्पष्टपणे जाणवते, की मूलभूत वृत्ती मी शालेय किंवा विद्यापीठीय शिक्षकांकडून शिकलो नाही. त्या शिकलो माझ्या आईवडलांकडून, त्या १९३४ सालात, त्यांना विज्ञानाचा गंधही नसताना.
(कार्ल सेगन (Carl Sagan) हा वैज्ञानिक आणि विज्ञानप्रसारक नुकताच वारला. त्याच्या “भूतबाधा झालेले विश्व'(The Demon – Haunted World) या शेवटच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा हा स्वैर अनुवाद.)