या मासिकाच्या जानेवारी ९७ च्या अंकात प्रा. बा. वि. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात कार्ल पॉपर हे विज्ञानाचे तत्त्वज्ञानी आणि जॉन एकल्स हे विख्यात मज्जाशास्त्रज्ञ या दोघांनी मिळून लिहिलेल्या The Self and its Brain ह्या पुस्तकाचा उल्लेख करून प्रा. ठोसर म्हणतात की हे पुस्तक जरी या दोघांनी मिळून लिहिले असले तरी त्यांच्या मनांत एक मोठा भेद आहे. तो म्हणजे पॉपर पूर्ण नास्तिक आहेत, तर एकल्स आस्तिक आहेत. नोबेल पारितोषिक विजेते एक थोर वैज्ञानिक आस्तिक आहेत हा चमत्कार कसा घडला असेल या प्रश्नाचा उलगडा करण्याकरिता प्रा. ठोसरांनी हा लेख लिहिला आहे. ‘विवेकवादाच्या पातळीवरून पॉपर व एकल्स यांमधील आस्तिकतेविषयीच्या मतभेदांवर काही चर्चा व विचार केला जावा अशी माझी अपेक्षा आहे’ असे प्रा. ठोसर म्हणतात. प्रस्तुत लेख तशी चर्चा करण्याकरिता लिहिला आहे.
प्रा. ठोसर विचारतात की ‘आता मुख्य प्रश्न हा आहे की प्रा. एकल्स, एक नामांकित, श्रेष्ठ दर्जाचे शास्त्रज्ञ, आस्तिकतेकडे कावळले?’ आणि ते म्हणतात की त्यांनी लिहिलेल्या The Human Mystery ‘या पुस्तकात या प्रश्नाचे उत्तर व स्पष्टीकरण मिळू शकते असे मला वाटते.’
मी The Human Mystery हे पुस्तक वाचलेले नाही. प्रा. ठोसरांचा लेख मात्र मी अनेकदा काळजीपूर्वक वाचला आहे. पण प्रा. ठोसर म्हणतात ते उत्तर व स्पष्टीकरण मला त्यात सापडले नाही असे मला खेदाने म्हणावे लागते.
प्रा. ठोसर म्हणतात की जर आपण एखाद्या वैज्ञानिकाला ‘तू आस्तिक की नास्तिक?’ हा प्रश्न विचारला तर तो म्हणेल की ‘माझे शास्त्रीय संशोधन आणि आस्तिकता यांचा काही संबंध नाही. माझी आस्तिकता हा माझा खाजगी धर्म स्वभावानुसार असू शकतो.’ ‘आणि हे योग्यचआहे’ अशी आपली संमती प्रा. ठोसर देतात.
पण मला हे पटत नाही. शास्त्रीय संशोधन आणि आस्तिकता या दोन गोष्टी परस्परांशी असंबद्ध अशा दोन हवाबंद कप्प्यांमध्ये ठेवता येत नाहीत असे मला वाटते. प्रत्यक्षात अनेक वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. ते त्या दोन गोष्टींची सांगड कशी घालतात हे गूढ आहे,कारण त्यांची सांगड घालणे अशक्य आहे असे मला वाटते.
सार्वत्रिक नियमिततावाद (Determinism) हे विज्ञानाचे एक पूर्वगृहीत आहे. जगातील यच्चयावत् घटना नियमाप्रमाणे घडतात, अनियमित असे काही घडत नाही असे विज्ञान मानते. सर्वशक्तिमान ईश्वर निसर्गक्रमात ढवळाढवळ करीत नाही हे मत आधुनिक विज्ञानाच्या आरंभापासूनस्वीकृत झाले आहे. म्हणून Theism च्या ऐवजी Deism चा स्वीकार प्रबोधनकाळात करण्यात आला. Deismचे प्रतिपादन असे आहे की ईश्वर आहे, परंतु जग निर्माण करून त्याचे नियम प्रस्थापित केल्यानंतर त्याने जगाकडे पाठ फिरविली आहे, आणि त्याला आपल्या नियमांप्रमाणे स्वतंत्रपणे मार्गक्रमण करण्यास मोकळीक दिली आहे. म्हणजे वैज्ञानिकाला ईश्वर मानायचा झाला तर तो Deistic असाच लागेल. म्हणजे मग नियमिततावाद अबाधित राहील. Theism अनुसार मात्र ईश्वर मधून मधून चमत्कार (miracles) घडवून आणतो आणि आपले अस्तित्व जाणवून देतो. चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचा भंग करणारी घटना, निसर्गनियमांचा भंगईश्वर करू शकतो अशी समजूत होती, आणि प्राचीन काळी घडलेले (?) चमत्कार ईश्वराचे अस्तित्व आणि सर्वशक्तिमत्त्व यांचे पुरावे मानले जात.
पण जर ईश्वराचे अस्तित्व निसर्गक्रमात कुठेही जाणवत नसेल, तर तो आहे आणि त्याने जग निर्माण केले हे तरी का मानायचे?या प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक युक्तिवाद करण्यात येतात. त्यापैकी Argument from Design (योजनाधारित युक्तिवाद) विशेष प्रसिद्ध आहे. जरी ईश्वराचे कर्तृत्व निसर्गनियमांचा भंग करून चमत्कार करण्याने व्यक्त होत नसेल तरी जगाचे अस्तित्व आणि त्यातील नियमांचे साम्राज्य हाच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वसाधु ईश्वराच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा आहे असे मानले जाते. त्यामुळे वैज्ञानिकांना आपले नियमिततावादाचे तत्त्व न सोडता ईश्वरावर विश्वास ठेवणे शक्य आहे असे समजतात. ते कितपत समर्थनीय आहे ते आता पाहू.
प्रथम जगाचा कर्ता किंवा निर्माता असला पाहिजे तो ईश्वर, या मताविषयी विचार करू.
जगाचा कर्ता असला पाहिजे हे तरी कशावरून खरे मानायचे?या ठिकाणी निर्माता म्हणजे काय या प्रश्नाचा अगोदर विचार करणे योग्य होईल. आपल्या भोवती जे निमति आपण पाहतो ते आधीच अस्तित्वात असलेल्या द्रव्याचे रूपांतर करतात. कुंभार मडकी तयार करतो, पण त्यांचे द्रव्य म्हणजे माती तो निर्माण करीत नाही. सुतार टेबले, खुर्त्या निर्माण करतो, पण त्याचे द्रव्य जे लाकूड ते त्याला वृक्षांच्या रूपाने आयतेच मिळते. ते तो निर्माण करीत नाही. गृहनिर्माणसंस्थाआपली सामग्री निसर्गातून घेतात आणि तिची वेगळी रचना फक्त करतात. ईश्वर या प्रकारचा निर्माता आहे असे ईश्वरवाद्यांचे म्हणणे नसणार, कारण उपलब्ध सामग्रीतून त्याने जग निर्मिले असेल तर ती सामग्री कोणी निर्मिली हा प्रश्न शिल्लकच राहतो. म्हणजे जर ईश्वर जगाचा निर्माता असेल तर त्याने जगाची निर्मिती शून्यातून केली असली पाहिजे असे म्हणावे लागेल. परंतु आता प्रश्न असा उद्भवतो की ही शून्यातून निर्मिती ही काय गोष्ट आहे?शून्यातून काहीही निर्माण होऊ शकत नाही हे म्हणणे सयुक्तिक दिसते. ईश्वर ते करू शकतो असे म्हणणे सोपे आहे, पण त्याची आपण कल्पना करू शकतो काय?ते आकलनीय आहे काय?शिवाय ईश्वर ते करू शकतो असे म्हणताना आपण ईश्वराची काय कल्पना करायची?तो अशरीरी आहे की शरीरी?एखादी गोष्ट शून्यातून निर्माण करायची म्हणजे केवळ तिची कल्पना मनात आणल्याबरोबर केवळ त्यानेच ती निर्माण होते असे असावे. पण ही गोष्ट आकलनीय आहे काय? ‘ईश्वर’ हा शब्द लहानपणापासून इतका कानावर पडला असतो की ईश्वर ही काय चीज आहे हा प्रश्न आपल्याला सुचत नाही. आपणअसे समजतो की ईश्वराला सर्व शक्य आहे. पण हा विचार आदिवासी अडाणी लोकांचा विचार झाला. खरे सांगायचे तर ईश्वराची कल्पना ही एक अनाकलनीय कल्पना आहे. आपले प्रश्न सोडविण्याकरिता तिचा उपयोग करणे म्हणजे अर्थहीन शब्द उच्चारणे होय, अमुक गोष्ट ईश्वराने केली असे म्हणणे म्हणजे ती गोष्ट कशी निर्माण झाली हे आपल्याला कळत नाही असे म्हणण्याहून वेगळे नाही.
जगाचा निर्माता असला पाहिजे, आणि तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु असला पाहिजे हे सिद्ध करण्याचा एक युक्तिवाद म्हणजे वर ज्याचा उल्लेख Argument from Design असा केला आहे तो. हा युक्तिवाद असा आहे की जगात फार मोठ्या प्रमाणावर व्यवस्था दिसते. सर्व घटना नियमानुसार घडतात एवढेच नव्हे तर ते नियमअतिशय स्थूलापासून अत्यंत सूक्ष्मापर्यंत परस्परांत चपखल बसणारे आहेत. शिवाय सर्वत्र प्रयोजनवादी (teleological) योजनाही आहे. एक साधे उदाहरण द्यायचे तर डोळा या इंद्रियाचे देता येईल. त्याची रचना इतकी सूक्ष्म आणि गुंतागुंतीची आहे की ती आपल्या कल्पनेपलीकडे आहे. पण अशी रचना आणि कार्यपद्धती पाहण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. आणि असेच अन्यत्र. ही सर्व व्यवस्था अचेतन पदार्थांच्या क्रियाप्रतिक्रियांतून निर्माण झाली असेल हे अशक्य आहे. तिच्या मुळाशी एखादे चेतन तत्त्वच असले पाहिजे. ते चेतन तत्त्व म्हणजे ईश्वर,
डेव्हिड ह्यूम नावाचा एक थोर तत्त्वज्ञ अठराव्या शतकात होऊन गेला. ह्याने आपल्या Dialogues concening Natural Religion या ग्रंथात या युक्तिवादाची चिकित्सा केली आहे. Natural Religion म्हणजे बुद्धीला पटणारा, केवल आविष्कृत (revealed) नव्हे, असा धर्म. अर्वाचीन तत्त्वज्ञानात जेव्हा केवळ श्रद्धेने गोष्टी स्वीकारणे असमर्थनीय आहे असे मत मांडले गेले तेव्हा धार्मिक तत्त्वे बुद्धीनेही (reason) सिद्ध करण्यासारखी आहेत असे मत पुढे आले. Argument from Design चे प्रतिपादन असे आहे की जगाच्या विद्यमान स्थितीवरून त्याच्या निर्मात्याचे स्वरूप काय असले पाहिजे ह्याचे अनुमान करता येते. हे अनुमान कार्यावरून (जग) कारणाचे (ईश्वर) स्वरूप निश्चित करणार्यान अनुमानाचे आहे. विद्यमान जग निर्माण करण्यास निर्मात्याला काय सामर्थ्य असले पाहिजे ते आपण जाणू शकतो असे हे अनुमान आहे. आता ह्यूम याचे म्हणणे असे आहे की जगाच्या निर्मात्याचा शोध करताना त्यात फक्त जगाच्या निर्मितीला अवश्य तेवढेच गुण आपण गृहीत धरले पाहिजेत. त्यापेक्षा जास्त गुण ईश्वराला देऊ करणे म्हणजे पुराव्याच्या बाहेर जाणे होईल. पण हे मान्य केले तर ईश्वराजवळ अपरिमित शक्ती, अपरिमित ज्ञान आणि असीम साधुत्व आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आपले जग सान्त आहे, अनन्त नाही, आणि त्याच्या निर्मितीकरिता अपरिमित सामथ्र्याची गरज नव्हती. असीम साधुत्वाविषयी तर अनुमान फारच शंकास्पद आहे. कारण ते जर अपरिमित शक्ती आणि अपरिमित ज्ञान या दोन गुणांसह निर्मात्यात असते तर हे जग सर्व बाबतींत आदर्श झाले असते. पण वस्तुतः त्यात अनेक भयानक दोष आहेत. त्यात अतोनात दुःख आहे, क्रौर्य आहे, दुष्टपणा आहे, अज्ञान आहे. त्याचा निर्माता असीम साधु, समर्थ आणि ज्ञानी असेल हे संभवत नाही. याप्रमाणे आस्तिकाला अपेक्षितअसणारा ईश्वर या युक्तिवादाने सिद्ध होण्यासारखा नाही असे म्हणणे भाग आहे.’
पण एकल्स म्हणतात की ‘I believe that there is Divine providence operating on and above the materialist happenings of Geological evolution’. त्याचे काय?
Providence म्हणजे protective care of god, ईश्वराची संरक्षक चिंता. हा प्रा. एकल्स यांनी मांडलेला ‘सर्वांत महत्त्वाचा विचार’ असे प्रा. ठोसर म्हणतात. त्याचे काय?हा विचार जर सत्य नसेल तर तो सर्वात महत्त्वाचा आहे असे म्हणता येईल काय?आणि तो सत्य नसावा असे आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून निष्पन्न होते असे वाटते. कोणाच्या रक्षणाकरिता डोळ्यात तेल घालून ईश्वर रात्रंदिवस झटतो?संबंध जीव-जातीच्या रक्षणाकरिता तो झटतो असे म्हणवत नाही. कारण प्राणिसृष्टीत सर्वत्र भयानक दुःख आणि संहार सर्वकाळी दिसतो.प्राणी एकमेकांवर उपजीविका करतात, त्यामुळे हत्या हा जगाचा नियमच आहे. ईश्वर सतत काळजीपूर्वक रक्षण करण्याकरिता झटत असता तर हे असे झाले नसते. टेनिसन म्हणतो त्याप्रमाणे निसर्ग’red in tooth and claw आहे. त्याचे दात आणि नखे रक्ताने माखलेली आहेत. मग प्रा. एकल्सना ईश्वराची संरक्षक काळजी कुठे दिसली?या प्रश्नाला मला प्रा. ठोसरांच्या लेखात उत्तर सापडले नाही. ते म्हणतात की The Human Mystery या ग्रंथात ते ‘स्वतःच्या विज्ञानक्षेत्राविषयी म्हणजे मानवी मनोव्यापार व मेंदू यांतील परस्परासंबंधांविषयी, माहिती देतात. माणसाचा सर्वांत उन्नत भाग म्हणजे त्याचा मेंदू, आणि त्यातही मज्जातंतूंचे अत्यंत गुंतागुंतीचे जाळे हाच त्यांच्या संशोधनाचा खास विषय. मानव आणि इतर प्राणी यांतील मुख्य भेद हा की मानवाजवळ स्वसंवेद्य मन (self-awareness) आहे. हे सारे खरे असेल. पण म्हणून त्यात ईश्वराची संरक्षक काळजी कोठे दिसते?
म्हणून प्रा. ठोसर एका ठिकाणी म्हणतात त्याप्रमाणे प्रा. एकल्स हे प्रथमपासूनच धार्मिक प्रवृत्तीचे असले पाहिजेत. त्यांच्या धार्मिक निष्कर्षांना त्यांच्या संशोधनातून समर्थन मिळाले असले पाहिजे असे प्रा. ठोसर म्हणतात. पण खरी गोष्ट अशी आहे की त्या संशोधनाचा धार्मिक निष्कर्षांशी काहीही संबंध नाही. काही माणसे मूळचीच श्रद्धावादी असतात, आणि त्यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास केला तरी त्यात त्यांना श्रद्धेला पोषक पुरावे सापडतात.
परंतु विज्ञान विवेकावर (reason वर) आधारलेले आहे. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे विवेकवादी वृत्ती. विवेकाचे एक लक्षण म्हणजे पुरेशा पुराव्याशिवाय कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून तर विज्ञान आणि आस्तिकता यांचे वाकडे आहे. यावर अनेक वैज्ञानिक आस्तिक होते आणि आहेत याकडे लक्ष वेधले जाते. पण त्यांची आस्तिकता त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा भाग नसतो. जर त्यांच्या संशोधनात आस्तिकता लुडबूड करू लागली तर ते संशोधन वैज्ञानिक होणार नाही. वैज्ञानिक आपल्या फावल्या वेळात श्रद्धेला खतपाणी पुरवीत असले तरी प्रयोगशाळेत त्यांना विवेकाची बंधने काटेकोरपणे पाळावीच लागतात. त्यांच्या विचारसरणीवर जगातल्या सर्व वैज्ञानिकांचा पहारा असतो.