अनेक वैचारिक प्रकाशनांप्रमाणेच ‘आजचा सुधारक’ मध्येही विज्ञान आणि ईश्वर यावर न संपणारी चर्चा चालू आहे. प्रा. एकल्स यांच्या आस्तिकतेविषयी “आ. सु.’ मध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेले प्रा. ठोसर आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे लेख, याच चर्चेचा भाग आहेत.
विज्ञान आणि ईश्वरासंबंधी आस्तिकता यात सामान्यतः तीन मतप्रवाह आढळतात. (१) बुद्धिप्रामाण्यावर आणि प्रयोगनिष्ठेवर आधारलेली व ईश्वराचे अस्तित्व न मानणारी प्रामाणिक वृत्ती, (२) विज्ञानासाठी विज्ञान अशी व्यावसायिक वृत्ती, परंतु विज्ञानाच्या पलीकडेही अगम्य असणारी शक्ती मानण्याची प्रवृत्ती, आणि (३) ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून वैज्ञानिक क्षेत्रात कार्य करणारी पोटार्थी वृत्ती. या तीनही प्रवृत्तींची माणसे चुकीने वैज्ञानिक म्हणूनच ओळखली जातात.
आता प्रश्न असा आहे की सच्चा वैज्ञानिक कोणास म्हणावे? आइनस्टाइनला ईश्वराविषयी आस्था होती, ओपेनहैमरला पहिल्या प्रायोगिक अणुस्फोटाच्या वेळी गीतेची आठवण झाली असे आस्तिक मंडळी आग्रहाने सांगतात. आइनस्टाइन आणि ओपेनहैमर हे अत्युच्च श्रेणीचे वैज्ञानिक होते आणि इतर कोणाही बुद्धिवंताप्रमाणेच त्यांनाही अध्यात्माच्या क्षेत्रातील प्रबल विचारधारांची जाण असणे अनपेक्षित नाही. परंतु म्हणून त्यांना श्रद्धाळू म्हणून पुराव्यादाखल उभे करणे हे निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. यहुदी म्हणून जन्मलेल्या आइनस्टाइनने आपला धर्म टाकून दिल्याचे जाहीर केले असते तरी त्याला जर्मनीत आपले काम करणे अशक्यच होते. म्हणून काही तो सनातनी यहुदी होता किंवा त्याची ‘यहोवा’वर श्रद्धा होती असे मानणे हा त्याच्या बुद्धिमत्तेचा अवमान ठरतो. प्रिन्स्टनला आइनस्टाइन कसा राहात असे, वागत असे त्याचे किस्से आइनस्टाइनच्या एका भाच्याकडून आम्ही ऐकले आहेत! (हे गृहस्थ, श्री. फ्रेड सॅम, हल्ली ७८ वर्षांचे आहेत).
सच्चा वैज्ञानिक त्याला प्रयोगाद्वारे मिळालेले ज्ञान, अथवा निसर्गातील कोणतीही वस्तू, घटना, त्यामागील कारण समजल्याखेरीज मान्य करीत नाही. उदाहरणार्थ, एक सच्चा शरीररचनाशास्त्रज्ञ एखाद्या हाडाचा आकार केवळ निसगनि उत्पन्न केला तसा आहे असे कधी मानूच शकणार नाही. ते हाड तसे का निर्माण झाले याविषयी तो जाणतो. तसेच एका विशिष्ट भूभागात विशिष्ट खनिजे केवळ निसर्गतःच असतात असे एखादा सच्चा भूगर्भशास्त्रज्ञ कधीच मानणार नाही, तर ती खनिजे विशिष्ट प्रदेशात का व कशी निर्माण झाली याचे सर्वेक्षण, विश्लेषणयाद्वारे ज्ञान मिळवितो. ही खरी वैज्ञानिकता.
याउलट विज्ञानक्षेत्रात कार्य करणारे, अगदी पीएच्. डी., डी. एस्सी. झालेले वैज्ञानिक हे खर्यात अर्थाने वैज्ञानिक या संज्ञेचे हक्कदार नसतात असे म्हणावे लागते. इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे विज्ञानशाखेतून शिकलेले, पदव्या मिळवून संशोधनाच्या अध्यापनाच्या पाट्या टाकीत राहणार्याे या मंडळींना वैज्ञानिक कसे म्हणावे? “का व कसे” हा वैचारिक निकष अशी मंडळी पाठ्यपुस्तकातून पाठ केलेल्या आपल्या ज्ञानाला कधी लावीत नाहीत! आमच्या परिचयाचे, अॅप्लाइड फिजिक्सचे पीएच.डी. असलेले एक प्राध्यापक आहेत. विहिरीवरच्या पंपाची मोटर व्यवस्थित चालत असली व जर विहिरीत अपुरे पाणी असल्यामुळे पंप पाणी ओढत नसेल, तर मोटर चालूच राहिली तर ती जळून जाते असे ते इतर सामान्य जनांसारखे प्रामाणिकपणे समजत होते! याबद्दल त्यांनी कधी विचारच केलेला नव्हता. मोटर वेगळ्या कारणांमुळे जळते हे समजण्यास त्यांना खूप वेळ लागला! शासनात वैज्ञानिक अधिकारी या पदावर असलेले बायोकेमिस्ट्रीचे पीएच्.डी. असणारे आमचे दुसरे एक मित्र आहेत. अनेक वर्षांपासून ते नद्यांच्या प्रदूषित पाण्याचे जैविक पृथक्करण करीत आहेत व एका महाराजांचे शिष्यही आहेत. महाराजांच्या पाद्यपूजेतून मिळणाच्या तीर्थाचे पृथक्करण करून पहा ही आमची सूचना ऐकल्यावर ते आमच्यावर जाम भडकले! बहुसंख्य वैज्ञानिक हे असेच असतात.
तिसर्या श्रेणीतील वैज्ञानिक तर चक्क शुचिर्भूत होऊन भाळी गंध वा भस्म लावल्याखेरीज प्रयोगशाळेत पाऊल ठेवीत नाहीत, प्रसंगविशेषी प्रयोगशाळेतील यंत्रांची यथासांग पूजा करतात, प्रसाद वाटतात. याच प्रकारात मोडणारे शल्यवैद्य (surgeons) मुहूर्त पाहूनच वैकल्पिक शल्यक्रिया (surgical operations) करतात. रामर नावाच्या लुच्च्या माणसाच्या, पाण्यापासून पेट्रोल निर्माण करण्याच्या शुद्ध थोतांडाबद्दल, मोठमोठ्या पदावरील वैज्ञानिक आपला वेळ देतात आणि पाण्यापासून पेट्रोल तयार होऊ शकते असे आपले मत वृत्तपत्रांना सांगतात. (वस्तुतः अशा प्रच्छन्न अंधश्रद्धेसाठी या वैज्ञानिकांना निलंबित करून विद्यापीठांनी त्यांच्या पदव्या रद्द करावयास हव्यात.) हे कसले वैज्ञानिक? हे तर वैज्ञानिकाचे कातडे पांघरलेले भोंदूच!
कोणताही सच्चा वैज्ञानिक, आत्मा-परमात्मा यांच्या मायावी जंजाळात अडकणारा आस्तिक” असूच शकत नाही. अगडबंब शब्द वापरून त्यावर केलेली तात्त्विक चर्चा ही सुद्धा बुद्धिभ्रंशाची निदर्शकच म्हटली पाहिजे. संपूर्णतः एरंडाचे गुर्हाळ!