आजचा सुधारकचा मार्च १९९७ चा अंक हा या मासिकाच्या आयुष्याची सात वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. बुद्धिवादाने उद्बोधन या दृष्टीने चालविलेल्या मराठी मासिकाला सात वर्षे पूर्ण करता आली हीही एक उपलब्धी आहे. स्वच्छ व शुद्ध मुद्रण करण्याचा प्रयत्न, विज्ञापनांचा अस्वीकार, प्रायः नियमित प्रकाशन, पृष्ठसंख्या अल्प असली तरी विशिष्ट विचारांचा प्रचार व्हावा म्हणून दिला जाणारा भर – ही या मासिकाची वैशिष्ट्ये लक्षात राहण्यासारखी आहेत. ही सारी वैशिष्ट्ये स्वतःत दाखविणारा फेब्रुवारी १९९७ चा अंक नमुनेदार आहे. त्यात गेली सात वर्षे सामाजिक विचार आपल्या पद्धतीने चिकाटीने मांडणारे श्री दिवाकर मोहनी आहेत. समाजाचे दुर्बल घटक, स्त्रिया, प्रौढ, म्हातारे, विधुर, दुर्बलमनस्क यांच्या कामशांतीचा प्रश्न, अनैतिक संततीची सुव्यवस्था याविषयीची त्यांची व्यथा ते या वा त्या निमित्ताने सतत मांडत असतात. स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. ते समाजाने मान्य केले की समाजाला भेडसावणाच्या वरच्या समस्या पटापट सुटतील अशी त्यांची विलक्षण खात्री आहे. पूर्वी विवाहसंकल्पनेलाच त्यांचा विरोध होता. पण समान नागरी कायद्यावर लिहिताना त्याचे काही अनौचित्य त्यांना जाणवल्याचे दिसते. यात विवाह हा संस्कार समजू नये, तो करार असावा. पण त्याच्या नोंदणीची भानगड असूनये. तर साधी आपसात पत्रे लिहूनही विवाह झाल्याचे मान्य करता यावे अशी उदार व्यवस्था त्यांना अभिप्रेत आहे. त्यांच्या मते पुरुषासाठी लग्नाची २१ ही मर्यादाही बरोबर नाही. कारण त्यापूर्वीही पुरुषात कामशांतीची गरज उत्पन्न झाली असते. स्त्रियांना ही गरज केव्हा उत्पन्न होते हे त्यांनी लिहिले नाही. पण त्यांच्या सहभागाशिवाय हे कसे जुळणार याचा स्पष्ट उलगडा त्यांच्या लिखाणात नाही. स्त्रियांचे तथाकथित लैंगिक स्वातंत्र्य पुरुषांनी स्वैर वर्तन केल्याशिवाय कसे सिद्ध होणार हेही अद्याप त्यांनी उलगडून दाखवले नाही.
अभिनव श्वेतकेतु
महाभारतातल्याश्वेतकेतूने पुरुषलाभला की त्याच्याबरोबर मुक्त संचारार्थ निघणार्या् बाईला (ती श्वेतकेतूची आई होती!) आवरले.पुढे विवाहबंधन व कुटुंबसंस्था या जगात देश, काल, परिस्थिती यांच्यामुळे होणारे काही फरक धारण करीत रूढ झाल्या, असे महाभारतावरून कळते. पण विसाव्या शतकातला एक नवा श्वेतकेतू बाईवरची व पुरुषावरची ती बंधने काढून सर्व समाज प्रागैतिहासिक काळात घेऊन जावयास निघालेला आहे असे वाटू लागते. नर आणि मादी एवढेच दोघांचे नाते. अपत्यांची जबाबदारी सैल कुटुंब या शब्दाने अभिप्रेत असणार्याष नरमादींच्या कळपांची, समाजाची (?) किंवा शासनाची. घोषणा आपण सर्व जगाचा विचार करतो अशी. हिंदुत्ववादी तथाकथित हिंदूचाच विचार करतात म्हणून नाक मुरडायचे आणि उपाय मात्र मुख्यत्वे तथाकथित उच्चभ्रू असणाच्या किंवा जातिब्राह्मण असणार्या समाजाच्या स्वतःला जाणवणाच्या समस्यांविषयी. यामुळे या उपायांचा विविधस्तराच्या एकूण समाजावर काय परिणाम होईल, सध्या जोरात असणान्या एइस्च्या लागणीला स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य या शब्दाने शेवटी अभिप्रेत ठरणाच्या स्त्रीपुरुषांच्या स्वैर कामचाराचा कसा हातभार लागेल, याचा काहीही विचार त्यांच्या लिखाणात नाही, याचे आश्चर्य वाटते.‘करा’तल्या लहानशा ‘दिव्या’ने सर्व जगाचा अंधकार मिटविण्याची मोहिनी श्री दिवाकर मोहनी या लेखकावर पडलेली आहे. आजचा सुधारकत्यांचे विचार सातत्याने प्रकाशित करत असतो.
निंदाव्रताचे परिपालन
आजचा सुधारकच्या बहुधा प्रत्येक अंकात उपस्थित असणारे दुसरे मान्यवर लेखक आहेत प्रा. दि. य. देशपांडे. ते मासिकाचे मुख्य संपादक, तत्त्वज्ञान हा त्यांच्या आवडीचा अभ्यासविषय, पण त्यांची दोषदर्शी लेखनी अनेक विषयांवर लीलया चालत असते. त्यातही विशेष आवडीचे ‘नाना’ विषय आहेत श्रीकृष्ण, भगवद्गीता, धर्मविचार, कर्मसिद्धान्त, मनुस्मृतीतील स्त्रीविषयक व शूद्रविषयक विचार, ईश्वराची संकल्पना, श्रद्धेतील मूढता इत्यादि तथाकथित हिंदुसमाजाशी संबंधित विषय. तसे त्यांचे चिंतन ‘चिंता करतो विश्वाची’ या चालीवर आहे. पण ते इस्लाम, ख्रिस्ती, बौद्ध इत्यादि समाजांच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांच्या मते तथाकथित हिंदुविचारात जे गर्छ किंवा दुषणीय असेल तेवढेच वरचेवर काढून व्रणशोधक दृष्टीने ते हस्ते परहस्ते दाखवीत असतात. वस्तुतः त्यांचा अप्रीतिविषय असलेली मनुस्मृती गतार्थ झाली. हिंदुसमाजातील कोणाचेही जीवन तिच्या विचाराने नियंत्रित नाही. तिच्यातल्या स्त्रीशूद्रविषयक विचारापासून समाज किती तरीदूर आहे. सध्या नवी आंबेडकर-स्मृती म्हणून गौरविले जाणारे भारतीय संविधान या देशाने स्वीकारले आहे. पण आजचा सुधारकने घेतलेले मनुस्मृतीचे निंदाव्रत सुरू आहे, याची साक्ष फेब्रुवारीचा ९७ चा अंक देतो.
भारतीय श्रद्धेचे स्वरूप
प्रा. देशपांडे बहुधा सौम्य भाषेत लिहितात. पण त्यांचे पूर्वग्रह इतके बलिष्ठ आहेत की आपण दुसरी बाजू लक्षात घेतलेली नाही याचे त्यांचे भान सुटून जाते. धर्म-विचार म्हटला की पूजापाती, अंधविश्वास असा अर्थ घ्यायचा व हवी ती दूषणे द्यावयाची, किंवा स्त्री ही बंधनात जखडली आहे हे सांगण्यासाठी ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति’ हे वचन पुढे करावयाचे. मध्ये हे सर्व संदर्भ न पाहता सांगितले जाते, तसे करणे अन्याय्य आहे, याची काही जाणीव त्यांना झाल्यासारखे वाटत होते. त्यांनी तिकडचा मारा काही प्रमाणात कमी केला होता. पण आचार्याचे त्याकडे असलेले दुर्लक्ष इतर उपाचार्यांना पाहवले नाही. म्हणून पुन्हा मनुस्मृतींची संदर्भरहित दोषदृष्टीची उद्धरणे व त्यांचे हट्टी समर्थन सुरूझाले. उपयोगितावादाच्यासाहाय्याने नीतिविचार हा प्रा.देशपांडे यांचा आवडता विषय. पण बुद्धिवादाच्या कसोट्यांवर तो ठिसूळ आहे याचे दर्शन एकदा त्यांना झाले आहे. तो विचार प्रत्यक्ष व अनुमान यांच्या इतरांना लावण्यात येणार्याा कसोट्यांवर उतरणे संभवत नाही. फेब्रुवारी ९७ च्या अंकात ‘वैषम्यनैघृण्यनिरासप्रसंग’ या शीर्षकाने लिहीत असताना कर्मसिद्धान्त कसा चुकीचा आहे, श्रुतिस्मृतिविषयक श्रद्धेने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आपण कसे मागे पडलो, यावर प्रा. देशपांडे यांनी पुन्हा प्रकाश टाकला आहे. श्रद्धेच्या विषयी त्यांचे म्हणणे तपासून घेणेच योग्य ठरेल. भारतीय श्रद्धा हा शब्द ‘शास्त्र-गुरुवचनेषु विश्वासः’ (शास्त्रीय सिद्धान्त व गुरू यांच्या वचनावर विश्वास) या अर्थी वापरतात. प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणाचे विषय असणार्याश गोष्टीं- विषयी हे बोलणे कधीही नसते.‘शेकडो श्रुतिवचनांनी अग्नी अनुष्ण आहे हे सांगितले तरी ती श्रुतिवचने अनुभवविरोधी म्हणून अप्रमाण होत’ असा आशय ठामपणे सांगणारे शंकराचार्याचे वचन प्रसिद्ध आहे. ज्या क्षेत्रात ही प्रमाणे उपयोगाची नाहीत त्याविषयी श्रद्धेचा विचार शास्त्र व गुरू यांच्या वचनावर विश्वास या शब्दांत सांगितला जातो. श्रद्धा म्हणजे प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी एखादी गोष्ट असत्य ठरली असता आपल्या जुन्याच समजुतीला चिकटून राहणे असा अर्थ आपणच सांगायचा आणि भारतीय श्रद्धाविचारावर त्यांचे स्वरूप लक्षात न घेता टीका करावयाची हे अनुचित आहे.
तपासणीशिवाय दूषणे अनुचित
श्री शंकराचार्यांनी ‘उपपद्यते चाप्युपलभ्यते च’ असे म्हटले. हे विधान मूळ वेदान्तसूत्रातले आहे. उपपद्यते म्हणजे युक्तिवादाने सिद्ध होते. पण त्यासंबंधी इतर जाणकारांचीही अनुभवपूर्वक साक्ष आहे असे सांगण्यासाठी ते ‘उपलभ्यते’ म्हणजे त्यांची उदाहरणे, वचने देतात. तत्त्वज्ञान म्हणजे कोरडा कल्पनाविलास हे भारतीय दार्शनिक कधीही मान्य करत नाहीत. तो त्यांच्या अनुभूतीचा विषय आहे. शास्त्र म्हणते’ किंवा ‘असे श्रुतिवचन आहे एवढ्यावर समाधान माना असे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ सांगत नाहीत. आत्मप्रतीती (स्वतःचा अनुभव), शास्त्रप्रतीती (शास्त्रांनी वर्णनकेलेली अनुभूती) आणि ती अनुभूती घेण्यासाठी व्यक्तीची तयारी कोणत्या रीतीने करून घ्यावी लागते हे व्यक्तिसापेक्ष रीतीने समजावून सांगणाच्या मार्गोपदेशक गुरूची अनुभूती या तिन्ही एकरूप असल्या तरच तो अनुभव प्रमाण मानावा, अशी कसोटी भारतीय तत्त्वज्ञान सांगते. यासाठी मार्गदर्शक गुरू हा शास्त्रसिद्धान्त आणि आत्मिक अनुभूती या दोहोतही निष्णात (‘शास्त्रे पदे च निष्णातः’) असणे आवश्यक आहे असे मानले जाते. गुरूच्या बाबतीत शास्त्रपारंगतता ही वस्तुनिष्ठ कसोटी असल्यामुळे अभ्यासकांना स्वतःची फसवणूक टाळता येते, आणि आत्मानुभवाच्या जोरावर तो त्या दोघांचीही पारख करू शकतो. परंतु हा अनुभव येण्यासाठी जी साधने वापरावयाची त्यांचा वापर न करता आपले निष्कर्ष मनसोक्त घोषित करीत टवाळी करणे हे ज्ञानक्षेत्राच्या मर्यादिच्या विरुद्ध आहे. प्रयोगशाळेत जाऊन विशिष्ट उपकरणांनी विधिवत् प्रयोग केल्यानंतरच त्या प्रयोगजन्य अनुभवाचा खरेखोटेपणा तपासणे शक्य होते. नुसते रस्त्यावर उभे राहून हे असंभव आहे असा आक्रोश करणे हे कोणीही समंजसपणाचे लक्षण समजत नाही. याच न्यायाने आत्मिक अनुभवाच्या . क्षेत्राकडे न पाहणे हे सर्वथैव विसंगत व बुद्धिवादाच्या विरुद्ध आहे. तेव्हा अयोग्य आग्रह सोडून दुसरा विचार समजून घेतल्याशिवाय सामाजिक उद्बोधन करता येईल असे समजणे चुकीचे आहे.
भडक लेखनाचा नमुना
प्रस्तुत फेब्रुवारी ९७ च्या अंकाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रा. ह. चं. घोंगे यांचा लेख. प्रस्तुत लेखकाचे हिंदुत्वाच्या संदर्भातील आगळेवेगळे लेखन आजचा सुधारक मध्ये पूर्वी प्रसिद्ध झाले आहे. आता श्री हुसेनच्या चित्राच्या संदर्भातला हा लेख आहे. भडक भाषाशैली, बेदरकार विवेचन आणि बेछूट निष्कर्ष याचे इतके नमुनेदार लेखन दुर्मिळ आहे. याच्या तुलनेत प्रा. प्र. ब. कुळकर्णी, श्री. नंदा खरे प्रभृतींचे वेगळी अभिरुची किंवा वैविध्य दर्शविणारे, अनेकवार वाळवंटातल्या हिरवळीसारखे भासणारे लेखन डोळ्यांत भरत नाही.
सुधारणेचे पथ्य
विचारांची अप्रगल्भता, मतांचा हट्टाग्रह आणि आता त्याच्या भरीस आलेली हिडीस भाषा आणि ओंगळ अभिव्यक्ती या बाबी सुधारणेच्या विचाराला उपयोगी पडतात असा समज असल्यास आजचा सुधारक त्यावर भर देऊ शकतो. सामान्यपणे सुधारणेसाठी ज्याला सुधारावयाचे त्याच्या विषयी अत्यंत आत्मीयता आणि लेकराच्या मलमपट्टीसाठी आईत असणारी कोवळीक उपयोगी पडू शकते. या बाबी समाजसुधारक श्री गोपाळ गणेश आगरकर यांच्या लेखनात अनेकवार जाणवतात. त्यात दोषदर्शन जसे असते तशाच विधायक सूचनाही असतात. या नसताना समाजउद्बोधन होईल पण वेगळ्या अथनि, ‘उद्धोध न’ या अथनि. काळ लोकशाहीचा, भाषणस्वातंत्र्याचा व लेखनस्वातंत्र्याचा आहे. मर्यादा ज्याच्या त्याने ठरवायच्या असतात. समाजहित दुर्लक्षू नये एवढी अपेक्षा व्यक्त करणे इतकेच इतरांच्या हातात आहे.