शिक्षणातील स्वातंत्र्याला अनेक बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य. नंतर काय शिकावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात मताचे स्वातंत्र्य. शिकावे की न शिकावे ह्याचे स्वातंत्र्य बाल्यावस्थेत अंशतःच देता येईल. जे मूढमती नाहीत अशा सर्वांना लिहितावाचता आले पाहिजे. हे केवळ संधी दिल्याने कितपत साध्य होईल हे अनुभवानेच कळेल; परंतु केवळ संधी दिल्यानेच भागते असे दिसले तरी संधी मुलांवर लादाव्या लागतील; कारण बहुतेक मुले खेळणेच पसंत करतील आणि त्यात त्या संधी असणार नाहीत. त्यानंतरच्या जीवनात काय करायचे, उदा. विद्यापीठात जायचे की नाही, हे तरुण मुलांच्या आवडीवर सोपवावे. काहींना विद्यापीठात जावेसे वाटेल, काहींना वाटणार नाही. प्रवेशपरीक्षेच्या साह्याने निवड करण्याइतकीच हीही कसोटी यशस्वी होईल. परंतु एकदा विद्यापीठात गेल्यानंतर कोणालाही काम न करता तेथे राहू देता कामा नये. सध्या जी श्रीमंत तरुण मुले कॉलेजात जाऊन वेळ उधळतात ती निरुपयोगी जीवनाचे धडे घेतात आणि त्याच बरोबर इतरांना मार्गभ्रष्ट करतात. विद्यापीठात राहण्याची कसून काम करणे ही अनिवार्य अट केली गेली तर ज्यांना बौद्धिक व्यापारात रस नाही असे लोक विद्यापीठांकडे आकृष्ट होणार नाहीत.