अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१. अंताजीची बखर, ले. नंदा खरे. प्रकाशक – ग्रंथाली, किंमत रु. २५०/
-अनंतराव / नंदा खरे
कादंबरीकाराचे ‘नंदा खरे’ हे नाव आपल्या ओळखीचे आहे. वीसशे पन्नास (१९९३) आणि आधीच्या ज्ञाताच्या कुंपणावरून (१९९०) ह्या साहित्यकृतीं बद्दल विदर्भ साहित्य संघाचा ललित लेखनाबद्दलचा पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला आहे. ‘अंताजीची बखर’ ही त्यांचीच ताजी कादंबरी.
नंदा खरे यांची कैफियत अशी की, महाराष्ट्रात ऐतिहासिक कादंबरी लेखनाची लाट आलेली आहे. पण लाटांपुढे फेस धावतो असे काहीसे झाले आहे. सुमारे सत्तर वर्षांपूर्वी नाथमाधवांनी स्वराज्य माला आणि त्यांचे चेले हडप यांनी कादंबरीमय पेशावईंतून पूर्वगौरवाचे पोवाडे गायला सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्वकाळात हा सूर स्वागतार्ह होता. पण स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे लोटली तरी ‘स्वामी’कार रणजित देसाई, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दां. इत्यादींनी तोच सूर कायम ठेवला, इतकेच नाही तर सनईची तुतारी केली. अशा विभूतिपूजक, पूर्वगौरववादी कादंबरीकारांच्या प्रातिनिधिक नामावलीत खर्यां नी आठवणीने फ्रेजरला आणून बसविले आहे. फ्रेजर हा तर मूर्तिभंजक, दंभहारक, पाखंडी दृष्टीचा कादंबरीकार. फ्लॅशमन ह्या आपल्या मानसपुत्राद्वारे त्याने इतिहासातल्या बड्या बड्या प्रस्थांची महावस्त्रे उतरवून ठेवली आहेत. बोधवाद्यांच्या पंक्तीत फ्रेजरचे पान हे अर्पणपत्रिकेतील पताकास्थान आहे.
अर्पणकत्र्यातील दुसरे जोडनाम ‘अनंतराव खरे’ हे बखरीचे संपादक आहेत. ते सांगताहेत की, अंताजी हे ऐतिहासिक पुरुष आहेत. चिं. वि. जोश्यांच्या दत्तक वडिलांसारखे ते या खरे मंडळींचे एक दत्तक पितर आहेत. हा अंताजी पहिल्या बाजीरावाच्या काळी (इ. स. १७२६) जन्मलेला असून दुसर्याह बाजीरावांच्या काळी तिसर्यांकदा पुणे लुटले गेले (इ. स. १८०३) तेव्हा व त्या नंतर ही आत्मकथा लिहीत होता.
अंताजीच्या खरेपणाचा आभास उत्पन्न करण्याच्या या खटपटीशिवाय आणखी एक युक्ती बखरीचा खरेपणा वाटण्यासाठी लेखकाने योजली आहे. ती म्हणजे कादंबरीची भाषा. ती बखरीची जुनी प्राकृत भाषा आहे. मात्र संपादकाने साफसूफ करून सुगम करून घेतली आहे. संस्कृतशब्दग्रंथी आणि ओजोगुणपोषक पल्लेदार वाक्ये मुळातच असण्याची शक्यता कमी. कारण अंताजी सामान्य ब्राह्मण संस्कारांपासूनही मुक्त होता हे एक आणि त्याला शौर्य
आणि वीरश्रीचे मुळातच वावडे होते हे दुसरे. थोड्याशा खट्याळ आणि किंचित् खवचट दृष्टिकोणातून स्वकीयांची आणि ज्यांची चरित्रे पाहा जरा म्हणतात त्या पूर्वश्रींची थोडी निरामय थट्टा हे या लेखकाचे वैशिष्ट्य जसे अभूतपूर्व तसे दुसरे एक वैशिष्ट्यही आतापर्यंतची मराठी ऐतिहासिक कादंबरी पाहाता अद्वितीयच म्हटले पाहिजे. मराठेशाही म्हणजे पेशवाई या समजापायी नागपूरकर भोसल्यांची आजतागायत झालेली अबाळअंताजीच्या बखरीने दूर केली आहे. पेशवाईचा काळ स्थूलपणे १७०८ ते १८१८ असा ११० वर्षे धरला तर नागपूरची भोसलेशाहीही चांगली सव्वाशे वर्षे (१७२३ ते १८५३) टिकलेली. लेखकाने यातला फक्त १७ वर्षांचा (१७४० ते १७५७) कालखंड निवडून त्यावर प्रकाशझोत टाकला आहे. हा कालखंड अनेक दृष्टींनी मार्मिक आहे. आजही विद्यमान असलेली पूर्व विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः नागपूर की पुणे ही ईर्षा, तिचे मूळ यात आढळते. भोसल्यांच्या बंगालवरील दहा स्वाच्या यात येतात. १७५७ ची प्लासीची लढाई येते. आणखी एक गोष्ट दिसते. ती म्हणजे मराठ्यांचा नैतिक बदलौकिक जो झाला त्याचा वास्तविक आधारही यात दिसून येतो. नेभळट, कपटी, विलासमग्न देशी नबाब आणि धूर्त, साहसी आणि निश्चितार्थाकडे दृढपणे वाटचाल करणारे व्यापारी फिरंगी यांचे राजकारण. या सतरा वर्षांच्या लहानशा कालखंडात लेखकाला हे जे सर्व दिसले ते त्याने आपल्यापुढे ठेवले आहे. दृष्टिकोण मात्र आदर्शशून्य आणि धादान्तवादी!
मराठ्यांचा बदलौकिक पंजाब, बंगालपर्यंत दूरदूर गेलेला. मागच्या पिढ्यांपर्यंत पंजाबी आया आपल्या रडत्या लेकराला चूप कर. मराठा हौ हौ (भाऊ-भाऊसाहेब) आया’ असे म्हणून उगी करत म्हणे. बंगाली भद्र बाबूमोशायांनी मराठा बर्गीची (बारगीरांची) अशीच दहशत घेतलेली. असे सांगतात की मराठा इतिहासाचे थोर बंगाली अभ्यासक सर जदुनाथ सरकार कामानिमित्त महाराष्ट्रांत आले असता, त्यांच्या बायकोला भीती पडली होती की, हे बर्गी त्यांना मारून तर टाकणार नाहीत?
* * * * *
अन्ताजी म्हणजे अनंत रघुनाथ खरे हा नावाचाच ‘खरे नाही. तो स्वतःस असत्य म्हणून माहीत असलेले बोलणे स्वभावात नसलेला. म्हणजे सत्याश्रयी आहे. मात्र तो अश्रद्धआहे. विभूतिपूजक नाही. तो अभक्त आहे. त्याला ना पितृभक्ती-स्वामिभक्तीची भूल, ना देवभक्ती-देशभक्तीचे मोल. एकूणच दिव्यत्वाची त्याला ओढ नाही, चाड नाही. फ्रेजरच्या फ्लॅशमनची किड्या काजव्यांच्या नजरेने इतिहासाकडे पाहाणारी दृष्टी, तर अंताजीची दृष्टी बरीचशी ननैतिक, लौकिक.
पुण्याच्या पर्वतीवरून दिसणाच्या अनेक खेड्यांपैकी एक अंबिवडे. अंताजी तिथला. त्याचा वांडपणा वाढू लागला तसा बापाने पेशव्यांकडे चाकरीस नेला. चिमाजी अप्पांनी त्याची किंचित् पारख करून त्याला भोसल्यांकडे शिलेदार म्हणून पाठवला. सरदार मोठा होऊ लागला की त्याच्या सेनेत पेशवे हस्तक सोडीत, तसा हा सोडला. अंताजी वरकरणी शिलेदार पण आतून खबर्याप. कुठेही सहज स्वागत व्हावे असे त्याचे व्यक्तिमत्त्व. वय १४-१५ वर्षांचेच पण उंची भरपूर. वांडपणामुळे बांधा भरलेला, वर्ण फिरंग्यांत सहज मिसळेल इतका गौर. नेत्र घारे निळे. केश पिंगट. लेखकाला आपल्या मानसपुत्राला (मानस पितराला म्हणा हवं तर) हवे तसे व्यक्तिमत्त्व, हवी ती वृत्ती आणि व्यवसाय देण्याचे स्वातंत्र्य आहेच. नंतर पुढेमात्र स्थळाचे ऐक्य, काळाचे ऐक्य आणि कृतीची संगती ही संभाव्यतेच्या मर्यादेत राहूनच त्याला सांभाळावी लागते. लेखक यात पुरेपूर यशस्वी झाला आहे.
नागपूरला गेल्यानंतर पुढील १७ वर्षांत सर्व महत्त्वाच्या प्रसंगी अंताजी हजर असतो. सर्व नरवीर आणि मुत्सद्यांकडे त्याला सहज प्रवेश मिळतो. हे सारे तो दुहेरी, तिहेरी खबर्या(
आहे म्हणून.
अंताजीची वृत्ती खरी महत्त्वाची आहे. त्याने ‘निष्ठा राखली ती फक्त आत्मारामाशी (पान ३). त्याच्या मते, ‘आपला मतलब साधतो, ती नीती’ (पा. १७४). तो म्हणतो ‘आजुबाजूस घडणारे ते आपणांस अनुकूल करवून घेणे यांत गैर ते काय?’ (पा. २).‘खरे युद्धशास्त्र’ जाणणारयाने मरावे याचे त्याला आश्चर्य वाटते (१४). प्रसंग आहे बंगालमधील भोसल्यांच्या स्वारीचा. भोसल्यांचे सेनापती (बक्षी) भास्करराम कोल्हटकर दगाबाजीने मारले गेले. त्यावर अंताजीचे भाष्य असे.
‘जो मेला लढतांना, त्याचे युद्धशास्त्राचे ज्ञान कच्चे’ (१४). युद्ध हाती येत नाही हे उमजतां माघारे येणे ही शुद्ध रणनीती… थोरले रघुजी भोसले, रगेल, आडदांड, तडफदार; (पण) पळ काढणेस कधी लाजले नाहीत. उलटे (बक्षी) भास्करपंत कोल्हटकर. एक पळ काय तो लादला गेला…. दुसरेवेळी लोकलाजेस्तव घाऊक वीस सरदारांसकट मारले गेले (१५)
स्त्री हे मन रिझविण्याचे पात्र मानणाच्या अंताजीला बंगाल्यात हुगळी प्रांतात मथुरानाथ महाशयांची एकुलती कन्या पोडशी ‘पुरबी’ भेटते. उभयतांचे परस्परांवर मन जडलेले. पण तिला हे कळून चुकले की (हा) ‘सोबती ठाम आधार देणारा नव्हेच’ (९८).
अंताजीचे कामजीवन हा ऐतिहासिक नव्हे तर कादंबरीचा भाग. नागपुरी शिलेदार बनून गेल्या गेल्या १४-१५ वर्षांचा असताना त्याला राधा ही निपुण गुरू भेटते. सत्तरीतल्या एका पाणक्याची चाळिशीतली राधा त्याला उण्यापुच्या सहा महिन्यात स्त्रीस काय हवे हे ज्ञान शिकवते (४४). बंगाल्यात मुलुखगिरीचा कंटाळा आला असता कलावंतीण फुलवंतीने त्याला ठेवले. त्याच्या अटींवर. बंगालचा नबाब अलिवर्दीखान याची थोरली कन्या मेहेरुन्निसा बेगम, घसीटी बेगम म्हणून कुख्यात.‘तीस देखण्या पुरुषांचा नाद’ (१३९). याच्या ऐवजी तिनेच त्याला भोगले! अंताजीसारख्या राजबिंड्या पुरुषास मुलुखगिरीत आलेल्या या अनुभवांपेक्षा आणखी दोन दुसरे अनुभव आले ते लेखकाने अभ्यासपूर्वक वाचकांपुढे ठेवले आहेत. त्यांतला तपशील आणि चित्रणाचा जिवंतपणा वाखाणण्याजोगा आहे. वाचकाने तो मुळातूनच वाचला पाहिजे.
बंगाल आणि पूर्वभारत शक्तिपूजक प्रदेश आहे. दुर्गा हे शक्तीचे रूप. पण शाक्तांमध्ये दक्षिणाचारी आहेत तसे वामाचारीही–वामाचारी शाक्तांमध्ये पाच मकारांची चक्रपूजा प्रचलित होती. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा (लाह्या) आणि मैथुन अशी पाच मकारांची पूजा अंताजीला तो पुरबीच्या मागावर असताना अनपेक्षितपणे पाहायला मिळते. मराठ्यांच्याअत्याचारांची बळी झालेली पूरबी सूडाच्या भावनेने या चक्रपूजेत सामील होते. सामान्य बंगाली ‘कार्य होते ते आदिशक्तीकडोनच असे मानणारा, असा असल्यामुळे असहाय होऊन याअघोरी मार्गाकडे वळलेला अंताजीला दिसतो.
अंताजीचे पहिले धनी रामचंद्रपंत पंडित बंगालमधील स्वारीत दिवंगत होतात. त्यांचे बंगाली वैद्य त्यांच्या रिवाजाप्रमाणे पंतांच्या पत्नी सती जाणार हे जवळ जवळ गृहीत धरून तयारी करतात. त्यांचे स्वतःचे मत विचारायला अंताजीला उद्युक्त करतात. वहिनीसाहेबांचे त्राग्याचे उद्गार अंताजी गाफीलपणे भाषांतरित करतो. परिणामी वहिनीसाहेबांस बळे बळे सती जावे लागते. त्या समयी अंताजीच्या मनाची तगमग पाहाता त्याला पापाणहृदयी म्हणणे कठीण आहे. हा सर्व प्रसंग लेखकाच्या सतीप्रथेच्या अभ्यासाचा जसा द्योतक आहे तसा त्याच्या चित्रणसामथ्र्याचाही आहे.
अंताजीचे युद्धनीती, राजनीती या संबंधीचे भाष्य बोचरे आणि अंतर्मुख करणारे आहे. तो म्हणतो, ‘युद्धाचे प्रेम कोणासच नसते…. भयापासोन कोणीच मुक्त नाही….. नागपूरकर रघूजी बाबासाहेब भोसले तरी बंगाल्यात कां गेले? बंगाली जनतेस मुघली सुभेदार कष्टी करतो, या कारणे नव्हेतच नव्हेत… बंगाल कसे रसाळ पक्व फळ. तर तेथे जाऊन पैसे कमविणेच मोहिमेचे खरे फलित. आणि हे न समजणे इतके मूर्ख भास्करराम खासच नव्हेत (१९६०-६१). अंताजीच्या मते राजकारण जेवढे मोठे तेवढे भयाचे, लाजेचे, नीतीचे बंधन कमी. भास्कररामास होती जहागीरदार होणेची आंस. सदाशिवराव भाऊ (जणू) अब्दालीस संपवून पातशहा बनण्याची. क्लाईवास धनाची इच्छा, ‘नाना फडणविसास तर स्वामिभक्तीचे मिषाने राज्य हडपतानाही पाहिले…. सर्वात निर्भय निर्लज्ज इंद्र. कारण तो सर्वात थोर राजकारणाचा धनी!’ (१०५).
सती प्रकरणी स्वतःच्या भेकडपणास अंताजी बोल लावतो. त्यापेक्षा वहिनीसाहेबांचे त्राग्याचे बोलणे जसेच्या तसे सांगण्यात आपण केलेल्या वेंधळेपणाची खंत त्याला जी बोचते ती तो समर्पक शब्दात मांडतो.
‘मांडवगडास जागा दाखवितात. पावसाचा थेंब तसूभर उत्तरेस पडतो. चंबळा, यमुना, गंगा करीत पूर्व समुद्रास जातो. आणि तसूने दक्षिणेस पडतो. ‘नर्मदेवाटे पश्चिमेस जातो. वान्याच्या झुळुकीने सारा खंड पालटतो. माझे एका क्षुद्र वाक्याने मज काही जाहलें नाही. वहिनी मात्र जीवनाकडोन मृत्यूकडे लोटल्या गेल्या.’ (९०)
एवढे शहाणपणाचे बोल ऐकवणारा सहृदय अंताजी ‘स्त्रियांविषयी अनुचित आकर्षण असणारा आणि ‘अघोरी कृत्यांबद्दल घृणास्पद असे कुतूहल असणारा आहे हे संपादक अनंतराव खरे यांचे मत पटण्यास कठीण आहे. त्याच्या दृष्टिकोणाचा वेगळेपणा ग्राह्य होण्यासाठी त्याच्याबद्दल खरा-खोटा पूर्वग्रह होणे आवश्यक आहे काय?कादंबरीची भाषा मोठी सरस उतरली आहे. मुंगीस मुताचा पूर’ (४), ‘मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर(१६५), ‘ब्राह्मणाचे काम अन् सहा महिने थांब’ (१४८).‘घाईत घाई अन् म्हातारीसन्हाण येई (१२४) अशा ठसकेबाज म्हणी; वाक्प्रचारांचा अन्वर्थक उपयोग लेखकाच्या बखरवाङ्मयाच्या अभ्यासाचा निदर्शक आहे. त्यांचा भोसल्यांच्या इतिहासविपयक साधनांचा सांगोपांग अभ्यास तर पानोपानी दिसतो. बखरीशी संबद्ध घटनांचा कालपट परिश्रमाने सिद्ध केला तो घटनांच्या आकलनास उपकारक आहे. क्लाइव्ह आणि खंडीभर इंग्रज अधिकार्यां ची नावे, हुद्दे आणि तपशील कमी करता आले असते तर प्लासीची लढाई वाचकाला सुबोध झाली असती. एका अभिनव दृष्टीच्या लेखकाचे ह्या रोचक कलाकृतीबद्दल अभिनंदन.
Good novel should include in Marathi literature graduation course