रोम येथील व्हॅटिकनच्या सिस्टीन चॅपेलच्या छतावर Creation of Adam हे चित्र रखाटले आहे. मुळामध्ये शिल्पकार असूनही चित्रकार बनलेल्या मायकेल अँजेलोची ही भव्य कलाकृती आहे. या चित्रात निवृक्ष टेकडीवर पहुडलेल्या अॅडमने आपला डावा बाहू पुढे केलेला आहे. आकाशातून परमेश्वर देवदूतांसह अवतीर्ण होत आहे; त्याने अॅडममध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या उजव्या हाताची तर्जनी अॅडमच्या पुढे केलेल्या हाताच्या तर्जनीजवळ नेलेली आहे. या प्रख्यात भित्तिचित्रात बायबलप्रणीत संकल्पनेचे उत्कृष्ट भव्य दर्शन घडते. परमेश्वराने सर्व प्राणी आणि अर्थातच मनुष्य निर्माण केला आणि त्यात प्राण ओतला ही कल्पना अनेक धर्मामध्ये आढळते. हिंदू संकल्पनेत तर ८४ लक्ष योनींचा फेरा केल्यानंतर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणून मानवजन्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे; तेव्हा या जन्मात पुण्यसंचय करून जन्ममरणाच्या रहाटगाडग्यापासून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात येते.
मानवनिर्मितीच्या अशा संकल्पनांचा फोलपणा डार्विनने आपल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताद्वारे निदर्शनास आणला आहे; जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकी यांमध्ये झालेल्या अफाट प्रगतीमुळे मनुष्याच्या उत्पत्तीविषयीचे कुतूहल कमी झाले आणि त्याची जागा जीव कसे निर्माण झाले या प्रश्नाने घेतली आहे.
जीवसृष्टीसाठी आवश्यक बाबी
आजपर्यंत जीवसृष्टी केवळ पृथ्वीवरच आढळली आहे. अखिल ब्रह्मांडात आपण (पृथ्वीवरील मानव) एकाकी आहोत काय याचा विचार केल्यास असे आढळते की आपणास माहीत असलेले सर्व जीव कर्बाच्या संयुगावर आधारित आहेत; त्यांना मध्यम स्वरूपाचे तापमान (४०°-५०° से. पर्यंत) आणि पाणी हे आवश्यक आहेत. सूर्यकुलातील ग्रहांपैकी मंगळावर अशी परिस्थिती आहे असे वाटत होते; परंतु त्यावर उतरलेल्या अवकाशयानाला त्याच्या जवळपासच्या जमिनीत पाण्याचा अंश आढळला नाही की जीवाणू (bacteria) आढळले नाहीत. तथापि मंगळाच्या पृष्ठभागावर इतरत्र पाण्यामुळे होऊ शकणाच्या धुपेच्या खुणा आढळल्या आहेत; कदाचित् त्या प्रदेशात सजीव असू शकतील.
आपल्या आकाशगंगेत अब्जावधी तारे आहेत. ब्रह्मांडात अब्जावधी दीर्घिका (galaxics) आहेत. या परार्धावधी तान्यांमध्ये सूर्यासारखा तारा असण्याची संभाव्यता किती? त्या सूर्याभोवती ग्रह असण्याची संभाव्यता किती? पुन्हा ग्रहावर सजीवांचा उद्भवहोण्यासाठी लागणारी परिस्थिती आणि वातावरण असण्याची किती संभाव्यता आहे? त्या वातावरणात योग्य अभिक्रिया घडून येऊन जीवांना आवश्यक असलेले रेणू तयार होण्याची संभाव्यता किती? या सर्वांचे सांख्यिकीय गणन शास्त्रज्ञांनी केले असून त्यावरून ब्रह्मांडामध्ये मानवसदृश प्रगत प्राणी आढळण्याची संभाव्यता नगण्य आहे. तथापि ब्रह्मांडातील तान्यांची एकूण संख्या विचारात घेतली तर ब्रह्मांडात अशा प्राण्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही.
या विवेचनाला नवा संदर्भ आला आहे. मार्सी व बटलर तसेच मेयर क्वेलोझ यांनी एकूण तीन ग्रहांचा शोध लावला आहे. हे ग्रह सप्तर्षी, कन्या (Virgo) आणि उच्चैःश्रवा (Pegasus) या तारकासमूहामधल्या तार्यांशी निगडित आहेत. सूर्यकुलाबाहेर ग्रहांच्या अस्तित्वाचा पुरावा हा क्रांतिकारक शोध मानावा लागेल. त्यांपैकी एकाचे तापमान असे आहे की त्यावर पाणी असू शकते. या ग्रहांपैकी एखाद्यावर सजीव आढळतील काय?
सजीव आणि उष्मागतिकीचा दुसरा नियम:
सजीव कोणाला म्हणावे? चयापचय (metabolism), वाढ, पुनरुत्पादन, कोणत्या तरी स्वरूपातील प्रतिसाद्यता (responsively) आणि अनुकूलनक्षमता (adaptability) असलेला जटिल (complex) पदार्थ म्हणजे ‘सजीव’!सजीव प्राणी ज्या पेशींचे बनलेले असतात त्यांचा एक अवश्यमेव घटक म्हणजे DNA. हा जैवरेणू स्वतःच्या प्रती (copy) तयार करू शकतो. नोबेल-पुरस्कृत शास्त्रज्ञ क्रिक आणि वॉटसन यांनी DNA ची संरचना निश्चित केली आहे. तत्पूर्वी मिलर आणि त्याच्या सहकार्यांनी मिथेन, अमोनिया, हायड्रोजन व पाण्याचे बाष्प यांच्या मिश्रणातून विद्युत्स्फुल्लिग पाठवून अमायनो अम्ले तयार केली. या अमायनो अम्लांपासून शरीराला आवश्यक प्रथिने बनतात. अशा प्रकारे निर्जीव रासायनिक पदार्थापासून सजीव पदार्थ निष्पन्न होण्याच्या शृंखलेमधील अनेक दुवेसंपादित झाले आहेत.
नैसर्गिक प्रक्रियेच्या साह्याने निर्जीवापासून सजीवाची निर्मिती होण्याच्या संकल्पनेला एका महत्त्वाच्या आक्षेपाला तोंड द्यावे लागते. तो आक्षेप म्हणजे ऊष्मागतिकीचा (thermodynamics) दुसरा नियम. या नियमाचा अर्थ असा की सर्व नैसर्गिक प्रक्रियांची परिणती अधिकाधिक अव्यवस्था (disorder) निर्माण होण्यात होते. उदा. वाचनासाठी घेतलेली पुस्तके किंवा वापरण्यासाठी घेतलेल्या वस्तू तशाच राहू दिल्या तर अव्यवस्था उत्पन्न होते. ही नैसर्गिक प्रवृत्ती टाळण्यासाठी कोणीतरी पुस्तके अथवा वस्तू उचलून योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. उष्मागतिकीचा हा दुसरा नियम म्हणजे अनुभवाचीअभिव्यक्तीच होय. या नियमाला अपवाद आढळलेला नाही, यास्तव वैज्ञानिक या नियमाला सार्वत्रिक अथवा वैश्विक नियम मानतात.
या नियमाच्या पाश्र्वभूमीवर निसर्गातील अव्यवस्थेपासून सजीवांसारखी सुबद्ध, सुव्यवस्थित संरचना कशी निर्माण होऊ शकते असा प्रश्न पडतो. आदिम जीवांच्याउत्पत्तीनंतर उत्क्रांतीद्वारे ज्या भिन्न प्रजाति (species) निर्माण झाल्या, ज्याची परिणती अखेरीस पृथ्वीवर मानवाच्या आगमनाने झाली आहे, त्या प्रक्रियेमध्ये देखील सुव्यवस्था (order) वाढत जाते. भौतिकीमध्ये अव्यवस्थेचे मोजमाप ‘एंट्रॉपी’ या राशीच्या साह्याने करतात. अव्यवस्था जेवढी जास्त तेवढी एंट्रॉपी मोठी, सुव्यवस्था वाढली म्हणजे ‘एंट्रॉपी कमी होते.
सजीव ऋण एंट्रॉपी ग्रहण करतात :
जिवंत प्राण्यामध्ये सतत काही क्रिया चालू असतात, उदा. अन्न खाणे, पाणी पिणे, श्वासोच्छ्वास, अन्न पचवणे इत्यादि. याला चयापचय (metabolism) म्हणतात. सजीवाचा पूर्ण व्हास होणे म्हणजे मृत्यू. ह्या अवस्थेत एंट्रॉपी महत्तम होते. (वास्तविक पाहता प्राणी मृत झाला तरी एंट्रॉपी महत्तम होत नाही कारण मृत प्राण्यापासून वृक्षांना खत मिळते, त्यांचे अन्न मिळते). चयापचयाच्या क्रियेद्वारे सजीव पदार्थ सतत आपला व्हास अथवा मृत्यू टाळीत असतात. चयापचयामध्ये घेतलेले अन्न म्हणजे एक सुव्यवस्थित संरचना (ordered structure) आहे. पर्यावरणातून ही सुव्यवस्थिती अंतर्ग्रहण करून सजीव पदार्थ परिपूर्ण अव्यवस्था स्थिती टाळतात. दुसर्या शब्दांत म्हणजे सजीव पदार्थ सभोवतालून ऋण एंट्रॉपी (negative entropy) शोपून घेऊन स्वतःच्या जीवितक्रमापासून उत्पन्न होणार्या धन एंट्रॉपीला तोलून धरण्याचा प्रयत्न करीत असतात.
नवा दृष्टिकोण :
जेथे कोणत्याही प्रकारची सुव्यवस्था नाही अशा परिस्थितीमधून सजीवासारखी अतिशय सुव्यवस्थित संहती कशी निर्माण होऊ शकते? याचे उत्तर शोधण्याच्या दृष्टीने प्रिगोगीन आणि आयजेन यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. परिपूर्ण अव्यवस्था (total disorder) असलेल्या माध्यमामध्ये सतत यादृच्छिक फेरबदल (random fluctuations) होत असतात. वैज्ञानिकांनी अशा परिस्थितीचे निश्चयन केले आहे की त्या परिस्थितीत यादृच्छिक फेरबदलांमुळे सुव्यवस्थित संरचना उद्भवू शकते. अथवा योग्य परिस्थिती असली तर गोंधळामधून किंवा अव्यवस्थेतून नैसर्गिकरीत्या सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. नैसर्गिक क्रियांचा ज्याप्रमाणे हासाप्रत जाण्याचा कल असतो तद्वत विशिष्ट परिस्थितीत त्यांच्यात स्वसंघटनाची (self-organisation) प्रवृत्ती देखील असते. एवंच निर्जीवापासून सजीवांच्या निर्मितीची क्रिया वाटते तेवढी दुर्लभ नाही.
ईश्वराने मनुष्य निर्माण केला; त्याच्यासाठी इतर सर्व वस्तू निर्माण केल्या या भाबड्या समजुतीला विज्ञानाने केव्हाच छेद दिला आणि मनुष्याला निसर्गामधील इतर प्राण्यांच्याच पंक्तीत बसविले. ऊष्मागतिकीच्या सर्वंकष अशा दुसर्या नियमाच्या आधारे अंतिमतः ब्रह्मांडातील सर्व सुव्यवस्था नाहीशी होऊन परिपूर्ण अव्यवस्था (total disorder) निर्माण होईल असे नैराश्यपूर्ण भवितव्य वैज्ञानिकांनी वर्तविले आहे. नव्या संशोधनानेनैसर्गिक प्रक्रियांद्वारे अव्यवस्था वाढींच्या क्रियेबरोबरच सुव्यवस्था निर्मितीच्या शक्यतेकडे अंगुलिनिर्देश करून आशावाद निर्माण केला आहे.
नव्याने आढळलेल्या ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व सिद्ध झाले तर जीवनिर्मितीची क्रिया वाटते तेवढी विरळा नाही हे स्पष्ट होईल, तसेच अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवरचा मानव प्राणी एकाकी नाही याचा दिलासा मिळेल. ग्रहावर मानवापेक्षा प्रगत असे जीव असले तर, आणि त्यांच्याशी संपर्क साधता आला तर, आपली उत्क्रांती कशी होईल याविषयी काही अटकळ बांधता येईल.