कामव्यवहार आणि नीती यांचा परस्परसंबंध काय आहे?
सामान्यपणे असे मानले जाते की नीतीचे क्षेत्र मुख्यत: कामव्यवहाराचे आहे आणि या क्षेत्रात नीती म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कामव्यवहार विवाहांतर्गत होत राहणे म्हणजे नीती, आणि विवाहबाह्य कामव्यवहार म्हणजे अनीती अशी स्वच्छ समीकरणे याबाबतीत आहेत. एखादा पुरुष, त्यातही एखादी स्त्री, अनीतिमान आहे असे कोणी म्हणाले तर त्यांचे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहेत असे अनुमान काढले जाते, आणि ते बरोबर असते.
परंतु वस्तुत: नीतीचे क्षेत्र कामक्षेत्रापेक्षा कितीतरी व्यापक आहे. चोरी, दरवडे, खून, मारामाच्या, फसविणे, नफेखोरी, काळाबाजार, गरिबांना, अशक्तांना, निराधारांना लुबाडणे, त्यांच्या मेहनतीवर पैसे मिळविणे, वेठबिगारी हे सर्व अनीतीचे भयानक प्रकार आहेत. जीवनाचा असा कोणताही भाग नाही की जेथे अनीती संभवत नाही, किंवा तेथे ती मोठ्या प्रमाणात आढळत नाही. पण या गुन्हेगारी आचरणाला आपण अनीती म्हणत नाही. तो शब्द आपण फक्त विवाहबाह्य लैंगिक व्यवहारापुरता मर्यादित केला आहे. कामव्यवहाराच्या क्षेत्रातही जे खरे दुराचारी आणि गुन्हेगार, म्हणजे वेश्यागृहे चालविणारे दादा लोक, यांना आपण अनीतिमान म्हणत नाही. तो दोष प्रामुख्याने त्यात अडकलेल्या दुर्दैवी वेश्यांचाच आणि असलाच तर दुय्यम प्रमाणात त्यांच्याकडे जाणाच्या पुरुषांचा.
आपले सबंध जीवन कामप्रेरणेने किती व्यापलेले आणि पछाडलेले आहे याचे हे द्योतक आहे. आपला नीतिविचार या प्रेरणेपासून विभक्त करून तपासल्याशिवाय तो शुद्ध आणि प्रगल्भ होणे शक्य नाही.
– १
नीतिशास्त्राचे प्रश्न मुख्यत: दोन. (१) चांगले म्हणजे काय? आणि वाईट म्हणजे काय? आणि (२) आपले कर्तव्य काय? या प्रश्नांना उत्तरे दिल्याशिवाय नीतीअनीतीविषयी बोलणे व्यर्थ आहे.
‘चांगले’या शब्दाचा मला एकमेव अर्थ दिसतो तो म्हणजे सुखद. सुखाची ‘अनुकूलवदेनीयं सुखम्’ अशी सुटसुटीत आणि यथार्थ व्याख्या तर्कसंग्रहाने केली आहे.आपल्याला इष्ट वाटणारी कोणतीही गोष्ट सुखद असली पाहिजे. जिला आपण चांगली म्हणतो अशी कोणतीही गोष्ट घ्या. ती स्वतः सुखमय असेल, किंवा ती सुखाचे साधन असेल. शारीरिक सुखांपासून आत्यंतिक परमानंदापर्यंत सर्वच इष्ट गोष्टींचा सुखात अंतर्भाव होतो. वेदांत्यांचे परमसाध्य जे मोक्ष तेआनंदमय आहे हे प्रसिद्ध आहे. दुःख कोणालाही नको असते. माणसे उपासतापास करतात, शरीराला पीडा देतात, तेही त्यातून पुढे शाश्वत सुखाची प्राप्ती होणार आहे या विश्वासाने. जे केव्हाही, अंतीही सुखकारक नाही ते चांगले असू शकत नाही. सुख ही एकमेव गोष्ट आहे की जिची आपण केवळ स्वार्थ, म्हणजे केवळ सुखार्थ, इच्छा करतो.
“चांगले’ म्हणजे सुख असे प्रतिपादणाच्या मताला सुखवाद असे नाव असून त्याच्याविषयी विद्वानांतही खूप गैरसमज पसरलेले आहेत. अन्य मतांचे पुरस्कर्ते सुखवादाला भोगवाद असे हेटाळणीने संबोधतात. ते पशूना योग्य असे जीवन असून मनुष्यांनी स्वीकारण्यासारखे ते नाही असे ते प्रतिपादतात. प्रत्येकाने जास्तीत जास्त शारीरिक सुख मिळवीत राहावे असे हे मत असल्याचे ते सांगतात, आणि मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्याने त्यानुसार वागणे म्हणजे मनुष्यपण विसरणेच होय असे ते म्हणतात. . परंतु सुखवादाचे (यालाच उपयोगितावाद – Utilitarianism असेही म्हणतात) म्हणणे काय आहे हे न पाहिल्यामुळे, आणि त्यातही पूर्वग्रहांनी दृष्टी मंद झाल्यामुळे, विरोधक आपली विरोधी मते व्यक्त करतात. त्यांनी सुखवादाचे म्हणणे खरोखर काय आहे हे क्षणभर समजाऊन घेतले तर त्यांचा विरोध नाहीसा होईल अशी खात्री आहे.
सुखवाद किंवा उपयोगितावाद हे नीतिशास्त्रीय मत आहे, म्हणजे त्यांत मनुष्यांचे कर्तव्य काय आहे याचा विचार आहे, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. मनुष्याचे कर्तव्य म्हणजे केवळ स्वत:चे नव्हे, तर जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख (greatest lappiness of the greatest number) ज्याने निर्माण होईल असे कर्म, उपयोगितावाद म्हणजे केवळ स्वार्थपरायण मत असे म्हणणाच्या लोकांनी हे लक्षात घ्यावे. उपयोगितावादानुसार कोणाही मनुष्याचे कर्तव्य शक्य असेल ते सुख जास्तीत जास्त लोकांना ज्यायोगे मिळेल असे आचरण करणे. उपयोगितावादात नीतीचा विचारच नाही असे म्हणणाच्या लोकांनी ही उघड आणि प्रसिद्ध गोष्ट का नाकारावी हे सांगणे कठीण आहे.
टीकाकारांचा आणखी एक आक्षेप असा आहे की सुखाच्या अनेक परी आहेत. स्वादिष्ट भोजनाचे सुख जसे आहे तसेच कवितावाचनाचेही आहे, कलास्वादाचे सुख आहे तसेच ज्ञानोपासनेचेही आहे. या सगळ्या सुखांना एका दावणीत बांधणे बरोबर नव्हे. पण तीसर्व सुखेच, म्हणजे अनुकूलवेदनीय गोष्टीच आहेत ना? यावर असा प्रश्न विचारला जाईल की जरी वर उल्लेखलेली सर्व सुखे सुखेच असली तरी त्यांच्यात अनेक भेद आहेत, एवढेच नव्हे तर ते भेद फक्त मात्रात्मक, म्हणजे सौम्य-तीव्र किंवा कमीजास्तीचे नसून त्यांपैकी काही गुणात्मक म्हणजे श्रेष्ठकनिष्ठतेचे आहेत असे आपण समजतो. काव्यवाचनाचे आणि संगीत ऐकण्याचे सुख स्वादिष्ठ भोजनाच्या सुखाहून किंवा सोंगट्या खेळण्याच्या सुखाहून श्रेष्ठआहे. मग जास्तीत जास्त सुखाचा हिशोब करताना या गुणात्मक भिन्न सुखांची गणना कशी करायची? या प्रश्नाला दोन उत्तरे आहेत. एक म्हणजे वर उल्लेखलेली श्रेष्ठ सुखे बहुधा ती फक्त मनुष्यालाच मिळू शकणारी आहेत, पशूना नाही, या कारणामुळे त्यांना श्रेष्ठ समजत असतो. दुसरे म्हणजे ही तथाकथित ‘श्रेष्ठ’ सुखे अधिक सुखे उत्पन्न करणारी आहेत. उदा. ज्ञानोपासना करणार्याहला तिच्यातून जे सुख मिळते त्याशिवाय त्याचे ज्ञान, उदा. त्याच्या संशोधनाचे उपयोजन करणे शक्य असल्यामुळे अनेक पटींनी सुखनिष्पादक होऊ शकते. तीच गोष्ट संगीतकाराच्या गायनाचीही. अनेक लोक त्याच्या गाण्याने सुखी होतात म्हणून ते श्रेष्ठ सुख. तेव्हा सुखाची सुखोत्पादकता लक्षात घेऊन संभाव्य सुखाचे गणित करावे लागते. पण या बाबतीत दुसराही एक विचार आहे. ज्ञानोपासना किंवा कलोपासना किंवा कलास्वाद हे कितीही श्रेष्ठ प्रकारचे सुखप्रकार असले तरी शरीराच्या आद्य सुखांची पूर्ती झाल्यानंतरच त्यांच्याकडे लक्ष जाते. ‘पिपासितैः काव्यरसो न पीयते’ या कविवचनात हीच गोष्ट सांगितलीआहे. पाण्याची तहान भागल्यावरच काव्यरसाची मातब्बरी.
तेव्हा तथाकथित ‘श्रेष्ठ’ सुखांचा श्रेष्ठपणा त्यांचा एक विशिष्ट गुण आहे असे मानण्याचे कारण नाही.
याप्रमाणे नीती म्हणजे असे आचरण की ज्याने महत्तम सार्वजनिक सुखाची (greatest general happiness) निष्पत्ती होते हे ठरल्यानंतर आता आपण लैंगिक क्षेत्रातील नीती-अनीतीकडे वळू शकतो.
– २ –
आपले वर्तमान कुटुंब कितपत नीतिमान आहे याचा प्रथम विचार करू. म्हणजे आपण स्पष्ट केलेल्या अर्थानुसार त्यात सुखपरिपोष किती प्रमाणात होतो आणि सुखविघातक गोष्टी किती आहेत ते पाहू.
वर्तमान कुटुंबाविषयी लक्षात घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे ते पितृसत्ताक, म्हणजे पित्याच्या सत्तेवर संपूर्णपणे आधारलेले आहे. म्हणजेच ते पत्नीच्या दास्यावर आधारलेले आहे. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा अशी त्याची एका शब्दात ओळख करून देता येईल. स्त्रीचे
अबाधित पातिव्रत्य हा त्याचा मूळ आधार आहे. त्यात पुरुषाचा ‘बदफैलीपणा’ चालतो,’ पण पत्नीचे मात्र पूर्ण पातिव्रत्य आवश्यक असते. याचे प्रमुख कारण म्हणजे पत्नीला होणारी मुले आपलीच आहेत ही पुरुषाची खात्री होण्याकरिता तिच्यावरील बंधने आवश्यक असतात. पातिव्रत्य ही नीती आणि विवाहबाह्य संबंध ही अनीती ही कल्पनाही त्यातूनच निष्पन्न होते. या एका कारणामुळे कुटुंबातील अन्यही बाबतीत विषमता उद्भवते. उदा. नवरा बायकोला टाकू शकतो, हाकलून देऊ शकतो, पण ती मात्र एकदा विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यातून मुक्त होऊ शकत नाही. पुरुष अनेक लग्न करू शकतो, रखेल्या ठेवू शकतो, पण बायको मात्र परपुरुषाकडे डोळा उचलून पाहू शकत नाही. यातील काही बंधने सध्या काहीशी शिथिल झाली आहेत, पण नाममात्र. अजून कुटुंबाचा पाया पितृसत्ता हाच आहे. याचेच गोंडस वर्णन म्हणजे आमरण टिकणारे एकविवाही (monoganous) कुटुंब.
या कुटुंबात सुख किती असू शकेल? आणि दुःख किती? पूर्ण कुटुंबच स्त्रीच्या दास्यावर उभे असल्यामुळे तिचे दुःख आणि पुरुषाचे सुख असे मिश्र चित्र उभे राहते. जोपर्यंत बायको नवर्यातच्या म्हणण्याबाहेर नसते तोपर्यंत सारे गुण्यागोविंदाने चालते. पण तिने थोडाही विरोध केला की सारे ‘सुख ढासळते. अशा स्थितीत वर्तमान कुटुंबात एकंदरीने पाहता अर्धा भाग असंतुष्टच राहतो. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यास पुष्कळच जागा आहे हे मान्य करावे लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे पितृसत्ता काढून टाकावी लागेल.
– ३ –
परंतु विद्यमान कुटुंबाच्या पुरस्कर्त्यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात की विद्यमान कुटुंब हे आमरण एकनिष्ठ प्रेमाच्या आदर्शावर बेतलेले असून त्यामुळे सहजच आमरण टिकणारे एकनिष्ठ कुटुंब आपल्याला पाहावयास मिळते. हे कुटुंब अनेक दृष्टींनी मानवाच्या अन्य सर्व कुटुंबांहून श्रेष्ठ आहे. त्यातच परस्परांचे एकनिष्ठ प्रेम शक्य होते. अपत्यांच्या दृष्टीनेही हेच कुटुंब सर्वांत श्रेष्ठ आहे. त्यात मुलांना आई आणि बाप दोन्ही पालक मिळतात, आणि वास्तविक दोघांचीही त्याला गरज असते. एकटी आई किंवा एकटा बाप यांच्या कुटुंबात वाढलेली मुले अनेक दृष्टींनी खुरटलेली राहून जातात, आणि कित्येकांच्या जीवनांत मानसिक विकृतीही संभवतात. म्हणून कौटुंबिक व्यवस्थेत सुधारणा करताना या मूळ रचनेला धक्का पोचेल असे काही करणे अनिष्ट आहे.
परंतु एकनिष्ठ प्रेमाचे सध्याच्या कुटुंबात संवर्धन होते असे जे वर म्हटले आहे तो एक मोठा भ्रम आहे. हे कुटुंब अभंग राहते याचे कारण त्यातील एक भागीदार पूर्णपणे दुसर्या,च्या अधीन आहे. सध्याचे कुटुंब आमरण टिकते याचे कारण ते भग्न होण्याची शक्यताच नसते.
नवर्या.ने काहीही केले, मारझोड केली, अमानुष वागणूक दिली, संभाषण टाकून दिले, बाहेरख्यालीपणा केला तरी त्याचे कुटुंब सुरक्षित असते, कारण त्याची बायको लग्नानंतर त्याची केवळ मालमत्ता बनत असते. माहेरचाही संबंध सुटून ती असहाय निराधार हीन दीन अशी होते. या सर्व अत्याचारांवर पांघरूण घालून ते सहन करणे याखेरीज तिला गत्यंतर नसते. वर्तमान कुटुंबाचे स्थैर्य किती बेगडी असते याची प्रचीती स्त्रीमुक्तिवाल्या लोकांना होणाच्या विरोधात येते. जर आपली कुटुंबे एकनिष्ठ प्रेमाची मंदिरे असती तर स्त्रीमुक्तिवाद्यांना एवढा तीव्र विरोध होण्याचे कारण नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या कुटुंबाचे स्थैर्य दिखाऊ असते, आणि स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ती त्यातून सुटून जाईल याची पुरुषांना खात्री असते. तेव्हा आपली कुटुंबे एकनिष्ठ प्रेमाची आमरण टिकणारी मंदिरे आहेत हे म्हणणे आपण टाकून दिले पाहिजे, आणि त्या कुटुंबातच वैवाहिक निष्ठा शक्य होते ही त्याची भलावण खरी नव्हे हे कबूल केले पाहिजे. आपले कुटुंब नि:सीम प्रेमावर उभे आहे अशी ग्वाही देण्याचा प्रसंग आला तर किती पुरुष ती देऊ शकतील याबद्दल गंभीर शंका आहे.
जर एखाद्या कुटुंबात खरोखरच नि:सीम प्रेम असेल तर आपण त्याचे अभिनंदन करू, आणि ते दीर्घकाळ, आमरण टिकले याबद्दल त्याचे कौतुक करू. प्रश्न आहे तो ज्यात असे प्रेम नाही, किंवा राहिले नाही, अशा कुटुंबाचा. अशा कुटुंबांची बहुसंख्या आहे, आणि त्यांच्यावरच स्त्रीमुक्तिवाद्यांचा कटाक्ष आहे. पितृसत्तेपासून स्त्रीची सुटका केल्याशिवाय सुखवृद्धि होणार नाही हे उघड आहे. वर्तमान कुटुंबात सुख फक्त पुरुषाला आणि स्त्रीच्या नशीबी मात्र गुलामगिरी आणि तिच्यातून उद्भवणारे सुखहीन, हताश, मृतप्राय जिणे येते.
स्त्रीमुक्तीमुळे लैंगिक जीवन स्वैर होईल, कटुंबसंस्था नष्ट होईल अशी भीती ज्यांना वाटते त्यांना हे मान्य करावे लागते की आपल्या सध्याच्या कुटुंबाचा टिकाऊपणा हा स्त्रीवर सक्तीने लादलेला आहे. जर तो टिकाऊपणा खच्या प्रेमामुळे आणि उभयपक्षी असणार्या निष्ठेमुळे आलेला असेल, तर स्त्रीला पतीइतके स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ते प्रेम आणि ती निष्ठा एकाएकी नाहीशी होईल असे वाटण्याचे कारण काय?
– ४ –
एखादा जीवनप्रकार, एखादी संस्था, एखादी चाल चांगली, इष्ट, नीतिपोषक आहे की नाही हे ठरविण्याचा उपाय म्हणजे तिच्यात टाळता येण्यासारखे दु:ख आहे काय, असल्यास किती? तिच्यात सुखाच्या संधी आहेत काय आणि त्या सर्वांस उपलब्ध आहेत की नाहीत? इत्यादि प्रश्न विचारणे. तिच्यात जितके सुख (व्यक्तीला आणि समूहाला) मिळते त्यापेक्षा जास्त मिळणे शक्य आहे काय? असेल तर त्या प्रमाणात ती जीवनपद्धती सदोषआहे, अनीतिमय आहे असे म्हणता येईल.
स्पष्टच विचारायचे तर थोड्याबहुत स्वैर लैंगिक जीवनात वाईट, म्हणजे असुखकारक, काय आहे? या प्रश्नाचा काळजीपूर्वक, थंड डोक्याने विचार करू. स्वैर लैंगिक संबंधातील अनिष्ट’ गोष्टींपैकी एक मोठी भीती म्हणजे पुरुषाला आपली नसलेल्या मुलांचे पालनपोषण करावे लागेल ही. तत्त्वत: ही शक्यता खरी आहे. पण गंभीर विचार केल्यास ही गोष्ट क्वचितच घडेल असे म्हणावे लागेल. कारण लोकसंख्या आवरण्याच्या याकाळात एका कुटुंबाला फार तर एक मूल होणे क्षम्य आहे. ते लग्नानंतर (किंवा एकत्र राहू लागल्यानंतर) दोन तीन वर्षांत होणार. विवाहानंतर एवढ्या अल्प काळात स्त्रीचे लक्ष अन्य पुरुषाकडे आकृष्ट होईल अशी शक्यता कमी. नवरा पटेनासा झाल्यावर अन्य पुरुषाकडे लक्ष जाईल असे गृहीत धरण्यास हरकत नाही. त्यामुळे ज्या पितृत्वाच्या कारणावरून स्त्रीच्या पातिव्रत्यावर भर दिला जातो तो देण्याचे कारण फारसे राहणार नाही.
बाकी उभयपक्षांच्या संमतीने घडणाच्या विवाहबाह्य संबंधामुळे दु:खनिर्मिती होण्याची भीती नाहीच. झालीच तर सुखवृद्धीच होईल.
-५-
नव्या समतावादी नीतीमुळे हजारो वर्षे चालत आलेले एक भयानक पाप आणि अन्याय दूर होण्यास मदत होणार आहे. हा अन्याय म्हणजे ‘अनौरस संततीवर ओढवणारे अनाथ जीवन. वास्तविक विवाहबाह्य संबंधातून जन्मणाच्या मुलाचा कोणताच अपराध नसताना त्याच्या माथी जन्मभर एक अपमानास्पद शिक्का मारला जाऊन त्याला शापित, अनाथ जीवन जगावे लागते. त्या मुलाला जात नसते, धर्म नसतो, आई-बाप नसतात. लहानपणापासून निष्प्रेम, तिरस्कृत वागणूक त्यांना मिळते. हा प्रकार हजारो वर्षे चालला आहे. त्याबद्दल जबाबदार असलेले पुरुष नादान निघाल्यामुळे त्या निष्पाप मुलांच्या नशिबी आजन्म वनवास येतो. हा अन्याय यापुढे नाहीसा होण्याचा मोठा संभव निर्माण होणार आहे. बापाने जरी त्याला लाथाडले तरी पुढे येणाच्या स्वतंत्र समाजात आई त्याचे निर्भयपणे संगोपन करू शकेल, आणि एका अतिभयंकर अन्यायाचा अंत होऊ लागेल. नव्या नीतीमुळे समाजातील एका मोठ्या दु:खाचे आणि अन्यायाचे कारण नाहीसे होईल हे त्याचे एक मोठे समर्थन होय.