आजचा सुधारकच्या जुलै ९८ च्या अंकात ‘अ’ च्या स्थानाविषयी काही उद्बोधक चर्चा ‘स्फुटलेख’ या शीर्षकाने केलेली आढळली. हा ‘शिक्षाशास्त्र (उच्चारणशास्त्र) व व्याकरणशास्त्र’ यांच्या अंतर्गत येणारा विषय, त्या दृष्टीने पुढील माहिती उपयोगी होण्याचा संभव वाटतो. अ आ च्या बाराखडीत “अं अः’ का येतात, तर ते अनुस्वार-विसर्गाची ओळख व्हावी म्हणून. ‘अं’ व ‘अ’ हे स्वरापुढे क्रमाने येणारे अनुस्वार व विसर्ग होत, (अं अः इत्यचःपरौ अनुस्वारविसग) अशी स्पष्ट नोंद व्याकरणशास्त्रात केलेली आहे. अनुस्वार व विसर्ग हे नेहमी स्वरापुढेच येतात, व्यंजनापुढे कधीही येत नाहीत. यास्तव मुलांना त्यांची ओळख व्हावी म्हणून सोयीसाठी स्वरांतला आदिस्वर ‘अ’ म्हणून त्याच्या साहाय्याने ही ओळख करून देण्यात येते.
अनुस्वार व परसवर्ण
अनुस्वार हा नाकातून उच्चारला जातो. (नासिका अनुस्वारस्य) संस्कृत भाषेच्या व्याकरणाप्रमाणे स्पष्ट अनुस्वार व अस्पष्ट अनुस्वार ही कोणतीही भानगड नाही. अनुस्वाराचा उच्चार स्पष्टच करावा लागतो. हा अनुस्वाराचा शुद्ध उच्चार फक्त है, श, ष आणि स ही व्यंजने पुढे असतानाच संभवतो. उदाहरणार्थ संहिता, संशय, संस्कार इत्यादी. सवयीमुळे अन्यत्र सर्वत्र परसवर्णाचे उच्चारण होते. जसे (अङ्कित, सङ्गम, कण्ठ). येथील परसवर्ण—उच्चारण म्हणजे अनुस्वाराचे उच्चारण पुढे येणा-या वर्णाच्या वर्गातील पाचव्या वर्णाने करणे. जसे अंकित मध्ये अनुस्वाराचा उच्चार पुढे क वर्गातल्या पाचव्या इ प्रमाणे होतो. अङ्कित. असेच इतर वर्गीय वर्णाच्या बाबतीत होते. याला परसवर्ण शब्दाने संबोधतात. पण लिपीत लिहिताना अनुस्वारयुक्त किंवा परसवर्णयुक्त या प्रमाणे लिहिण्याची मुभा आहे व ती व्याकरणशास्त्रास संमत आहे. जसे संगम–सङ्गम. हीच स्थळे तथाकथित साघात अनुस्वाराची होत.
अनुस्वाराचा उगम
संस्कृतात कुठल्याही पदाच्या शेवटी येणारा हलन्त ‘म’ पुढे कोणतेही व्यंजन आले असता अनुस्वाररूप धारण करतो. (मोऽनुस्वारः ८/२/३) लिपीत हा अनुस्वार शिरोबिंदूने (*) दाखविला जातो. पण हाच अनुस्वार पुढे ह श ष आणि स याहून भिन्न कोणतेही व्यंजन आल्यास पुढे येणा-या व्यंजनाच्या वर्गातल्या अनुनासिकवर्णाचे, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे (परसवर्ण) रूप धारण करतो. (अनुस्वारस्य ययि परसवर्णः ८-४-५८) पण हा परसवर्ण पदान्ती विकल्पाने होतो. (वा पदान्तस्य ८-४-५८) पद म्हणजे शब्दाचे अथवा धातूचे विभक्तिप्रत्ययान्त रूप. जसे ‘रामः’, ‘करोति’, मराठीत ‘रामाला’, ‘करतो’, ‘जातो’ इत्यादी. म्हणून पदमध्यभागी परसवर्ण नित्य असल्यामुळे अङ्ग, वङ्ग, कलिङ्ग, चक्षु असेच लिहावे, असे संस्कृत व्याकरणशास्त्र सांगते. तसेच प्रत्यय पुढे असतानाही भाषेत परसवर्ण नित्य होतो, जसे तन्मय, चिन्मय (प्रत्यये भाषायां नित्यम् वार्तिक) पुढे व्यंजन न आल्यास मात्र पदान्ती म् असेच लिहावे. अनुस्वार लिहू नये, असे संस्कृत व्याकरणशास्त्र सांगते. जसे रामम् लिहावे नुसते ‘राम’ लिहू नये.
अनुस्वारांचा उच्चार
अनुस्वाराचा उच्चार नाकातून होत असल्यामुळे तो अनुनासिक होय अशी समजूत बरोबर नाही. अनुनासिकाचा उच्चार हा मुख व नासिका या दोन स्थानांतून होत असतो. (मुखनासिकावचनोऽनुनासिकः – (१-१-८) ऊ ऋ ण न म ही व्यंजने अनुनासिक म्हणवली जातात. स्वरांचे उच्चारण अनुनासिक व अननुनासिक असे दोन प्रकारचे संभवते. तसेच य व ल (र नव्हे) या व्यंजनांच्या बाबतीतही आढळते. यँ, वें व लँ ही त्यांची सानुनासिक रूपे होत. स्वरांची अनुनासिक व अननुनासिक अशी दोन्ही उच्चारणे मराठीत प्रचलित आहेत. उदाहरणार्थ कोंकणस्थ मंडळी जे सानुनासिक उच्चारण करतात ते अनुस्वारयुक्त स्वरांचे नसते, तर ते अनुनासिक स्वरांचे होय. म्हणून त्यांच्या मराठीच्या लेखनात त्यांवर शिरोबिंदू देत नाहीत. स्वरांचे अनुनासिक उच्चारण दाखवण्याची पद्धत अर्धचन्द्रयुक्त शिरोबिंदू अशी आहे. पण तिचा वापर मराठीत होत नाही. तो हिंदीत आढळतो. कुँवारा, हँसी. हिंदीत अनुस्वारांचा उच्चार संस्कृत भाषेतील पद्धतीने सुरू असल्यामुळे ‘गंगेत घोडं न्हालं’ – हे मराठी वाक्य हिंदीभाषी ‘गंगेत घोडम् न्हालम्’ असे वाचतात.
अनुनासिक स्वर हा जसा मुख आणि नासिका या दोन्ही स्थानातून उच्चारला जातो तसेच अ म छु ण न ही अनुनासिक व्यंजनेही तशीच उच्चारली जाणे योग्य आहे. पण काळाच्या ओघात अद्यापि अ व ङ यांचे अनुनासिकत्व उच्चारातून स्पष्ट जाणवते. जसे चक्षु, वाङ्य. पण मराठीतच नव्हे तर संस्कृताच्या प्रचलित उच्चारपद्धतीतही ‘म’, ‘ण’ आणि ‘न’ यांचे अनुनासिक उच्चारण हरवल्यासारखे दिसते. त्यापैकी ण आणि न यांचे अनुनासिक उच्चारण पंजाबी बोलीत अथवा राजस्थानी बोलीत आपण आजही अनुभवू शकतो. एकेकाळी पाणिनिसंमत लौकिक संस्कृत भाषेत ते निश्चितच वापरात होते. पण आज वेदपाठातील वैदिक संस्कृत उच्चारणातही ते शिल्लक दिसत नाही.
हीच बाब अनुस्वार व परसवर्ण यांच्या उच्चाराबाबतीतही आहे. शुद्ध अनुस्वाराचा उच्चार आज जवळपास लुप्त आहे. वेदपाठातही तो वेगळ्या स्वरूपात यजुर्वेदातच आढळतो. सहिता (संहिता) मास (मांस) असा उच्चार करून तो दाखवला जातो. सध्या भाषेत शुद्ध अनुस्वाराचा उच्चार आवश्यक असणा-या स्थळी:- उदा. वंश, मांस, सिंह, हंस येथे परसवर्णसदृश उच्चाराचे एक विचित्र रूप वश मौंस, सिंव्ह, हौंस असे प्रचारात आहे. एवढेच नव्हे तर चक्षु चे उच्चारणही ‘चन्चू’ असे प्रचारात आले आहे. वस्तुतः परसवर्ण उच्चाराच्या पद्धतीत हे बसत नाही. अकारविल्हे रचना
वरील परिस्थिती लक्षात घेऊन आकारविल्हे कोशरचना अथवा सूचीरचना करताना प्रथम अ व नंतर अनुस्वाराचा शुद्ध उच्चार नियमानुसार जेथे संभवतो म्हणजे ‘अ’ च्या पुढे यथासंभव ह श ष स पुढे असणारे शब्द:- अंश, अंस वगैरे घेणे उचित होईल व पुढे जेथे जेथे वर्गवर्ण पुढे येतील तेथे तेथे परसवर्ण उच्चार ज्यात संभवतो असे शब्द अंक, अंग, वगैरे घेणे उचित होऊ शकेल. या पद्धतीचा वापर आपट्यांच्या प्रसिद्ध संस्कृत शब्दकोशात आहे. पण त्यात मुद्रणाची सोय लक्षात घेऊन जेथे परसवर्ण नियमाने संभवतो त्याही स्थळी अनुस्वारयुक्तच शब्दरूपे ठेवली आहेत. पण बंगालकडील वाचस्पत्य वा शब्दकल्पद्रुप यासारख्या संस्कृत शब्दकोषांत मात्र परसवर्णरूपे वापरून मूळ स्वरूप कायम ठेवले आहे.