१ डिसेंबर, १९९८, खालील अटींचे पालन झाले नाही, तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार टाकेल:
१. पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे.
२. मुहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरवलेला असावा.
३. कुठच्याही त-हेने हुंडा न घेता/देता विवाह ठरलेला असावा. विवाहावर येणारा सगळा खर्च (उदा. हॉलचे भाडे, जेवणावळी, इत्यादी.) वधू–वर पक्षांनी समसमान वाटून घ्यावा. (रुखवत हा एक हुंड्याचाच प्रकार होय.)
४. विवाह लावण्यासाठी पुरोहित किंवा भटाच्या मध्यस्थीची गरज नाही. तेव्हा विवाह त्याच्या उपस्थितीशिवाय, म्हणजेच नोंदणी पद्धतीने करावा
५. लग्नात कुठच्याही प्रकारचे अनिष्ट/अन्याय्य धार्मिक विधी असू नयेत. उदा. वधूपित्याने जावयाचे पाय धुणे, वधूमातेने वरमातेचे हात धुणे, रुखवताची पंगत, होमहवन करणे, अक्षता म्हणून तांदूळ वा फुले उडवणे, प्रवेशद्वाराशी केळीचे खांब लावणे, नारळ ‘फोडणे’, आंब्याच्या पानांची/भातकोट्यांची तोरणे लावणे, विधींमध्ये आंब्याचे टाळे वा इतर झाडांच्या पानांचा वापर करणे, इत्यादी.
६. भोजनसमारंभात आग्रह करू नये. हल्ली आग्रहाचे प्रमाण कमी झाले असले तरी थोड्याफार प्रमाणात आग्रह होऊन अन्न फुकट जाते. रुखवताची पंगत मांडू नये.
७. पत्नीचे नाव बदलण्याचा कुठचाही नैतिक अधिकार पतीस नाही. स्त्री ही काही एखादी वस्तू किंवा पाळीव प्राणी नव्हे, की पुरुषाने आपल्या पसंतीप्रमाणे तिचे नाव ठेवावे. एखाद्या मुलास मुलीचे नाव अजिबातच आवडत नसेल तर त्याने तिच्याशी विवाह करू नये. तो मार्ग त्यास मोकळा आहे. एवढेच नव्हे तर वधूचे मधले नाव (वडिलांचे नाव) व आडनाव लग्नापूर्वीचेच राहिले पाहिजे. असे केल्याने स्त्रियांच्या सामाजिक दर्जात वाढ होईल. मुलांप्रमाणेच मुलींनाही ‘वंशाचा दिवा’ समजले जाईल. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, लोकसंख्यावाढीला आळा बसेल.
८. मुलीने लग्न झाल्यावर मंगळसूत्र घालू नये. पुरुषही लग्न झाल्याची खूण म्हणून कुठचाही दागिना घालत नाहीत (बोटात अंगठी घालणे बंधनकारक नसते). एखाद्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालण्यामागे ‘हा कुत्रा पाळलेला आहे, त्यास ठार मारू नका’ असे सुचवायचे असते. मंगळसूत्ररूपी सोनेरी पट्टाही “ही स्त्री ‘पाळलेली’ आहे, तिच्याकडे ‘त्या’ नजरेने बघू नका” असच जणू सुचवत असतो. स्त्रियांना मंगळसूत्राची एक दागिना म्हणून फारच आवड असेल, तर त्यांनी लग्नाच्या आधीपासूनच मंगळसूत्र घालायला सुरवात केली पाहिजे व लग्न झाल्यावरही घालत राहिले पाहिजे (पती निवर्तल्यावरही). वरील विवेचन कुंकू लावणे, बांगड्या घालणे, इत्यादी प्रथांनाही लागू पडते.
९. लग्नात कुठच्याही प्रकारची रोषणाई (दिवे, फुले, पताका, इत्यादी) असता कामा नये. तसेच वरात काढणे, फटाके वाजवणे, गुलाबाची वा इतर फुले वाटणे, इत्यादी प्रकार होता कामा नयेत.
१०. लग्न आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ, ग्रिटींग कार्डस्, मान-पान, देणी-घेणी ह्यांच्याशिवाय व्हावे.
११. निमंत्रणपत्रिका छापू नयेत, स्थानिक लोकांना तोंडी (दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष भेटून) व बाहेर गावच्या लोकांना पत्राने बोलावणे करता येईल. पत्रिका छापण्याचे टाळा व छपाईची भरपाई व कागद (जे आपण आयात करतो) व परिणामी झाडे वाचवा. (मी स्वदेशीचा पुरस्कार करतो, पण तो आर्थिक —- व्यापारी कारणांसाठी, धार्मिक —- सांस्कृतिक —- भावनिक कारणांसाठी नव्हे.)
सारांश, विवाह, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘सत्यशोधक’ पद्धतीने व्हावेत. म्हणजेच विवाह कमीत कमी खर्चात, कर्मकांड व अनिष्ट रूढींना फाटा देऊन आणि ‘न्याय्य’ पद्धतीने व्हावेत.
१२. सर्वांत महत्त्वाचे : भारताच्या लोकसंख्येचा प्र न फारच बिकट झालेला आहे. भारताची सर्वांत मोठी समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या होय. चीनमध्ये एकापेक्षा जास्त मूल होणे हा कायद्याने गुन्हा आहे. सिंगापूरमध्ये दोनाच्यावर मुले होणे हे बेकायदेशीर आहे. भारतात तसा कायदा व्हायला वेळ लागेल. किंबहुना तसा कायदा होणारही नाही. तेव्हा प्रत्येक भावी दांपत्याने, एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ देणार नाही अशी शपथ घेणे अत्यावश्यक आहे.
भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नानाविध हालअपेष्टा सहन केल्या —- बऱ्याच जणांनी कारावास भोगला, लाठ्यांचा मार सहन केला, कोणी छातीवर गोळ्या झेलल्या, कोणी फासावर गेले, तर काहींनी उपासतापास केले. त्यांनी एवढा त्याग केल्यावर कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला ह्यापैकी कुठचाही त्याग करण्याची गरज नाही. मिळालेले राजकीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आणि आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्याला फक्त एकच त्याग करायचाय —- एक —- दोनावरच थांबायचा! मुंज, भूमिपूजन, वास्तुशांत, सत्यनारायण, सत्यविनायक किंवा कुठच्याही प्रकारची पूजा, गणपतिदर्शन, होळी, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, मृत्यूनंतरचे दिवसवार, श्राद्ध, इत्यादी अर्थहीन, निव्वळ धार्मिक, अनावश्यक आणि/अथवा अंधश्रद्धेतून निर्माण होणाऱ्या विधींना उपस्थित राहण्याचा प्र नच उद्भवत नाही.
मुंज ह्या विधीवर बहिष्कार घालण्याची इतर कारणे :
१. मुंज हा विधी मुलाच्या शैक्षणिक जीवनाच्या सुरुवातीचे दर्शक म्हणून साजरा केला जात असला, तरी त्यावर एवढा खर्च करण्याची काही गरज नाही. जिथे उच्च शिक्षण घेणे हे अप्रूप राहिलेले नाही, तिथे प्राथमिक शिक्षणाची सुरुवात हे काही समारंभ करण्याचे निमित्त होऊ शकत नाही. शिवाय हल्ली मुलांचे शिक्षण तिसऱ्या वर्षीच सुरू होते. मुंज मात्र आठव्या वर्षीच करण्याची प्रथा आहे.
२. मुंजीचा संबंध जर शिक्षणाशी असेल, तर मुलींचीही मुंज व्हायला हवी होती. पण मुलींना मुंज करण्याचा धार्मिक अधिकार नाही. म्हणजेच ही प्रथा लिंगभेद करणारी आहे.
३. हिंदू धर्माप्रमाणे मुंज करण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्या तीन जातींना आहे. शूद्रांना मुंज करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच ही प्रथा जातिभेद करणारी आहे.
अर्थात इथे मुलींची किंवा शूद्रांची मुंज करावी, असे सुचवायचे नसून मुंज हा अनावश्यक विधीच बंद करावा असे सुचवायचे आहे.
खालील अटींचे पालन झाले नाही तर अभय वैद्य त्या मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेवर अंत्यविधीवर बहिष्कार टाकेल:
१. मृतदेहाचे नेत्रदान झालेले असावे.
२. मृतदेहाचे देहदान करावे असा आग्रह आहे. पण ते शक्य नसल्यास मृतदेह लाकडांनी न जाळता विद्युत्दाहिनीत/डीझेलदाहिनीत जाळावा. मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरांतून तशी सोय उपलब्ध आहे. मृतदेह लाकडांनी जाळणे ही एक अतिशय अनैतिक व हानिकारक प्रथा आहे. अनैतिक अशासाठी की एक माणूस मेला म्हणून आपण सजीव पण निष्पाप अशा एक किंवा जास्त झाडांचे प्राण घेत असतो. हे पाप मृतदेह पुरुन किंवा विद्युतदाहिनीत/डीझेलदाहिनीत जाळून सहज टाळण्यासारखे आहे. हानिकारक अशा-साठी की ह्या अनिष्ट प्रथेमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर हास होतो. एकीकडे मोठ्या प्रमाणावर जंगले तोडली जातात आणि दुसरीकडे हवा प्रदूषित होते.
३. घरी किंवा स्मशानात भटाला किंवा पुरोहिताला बोलावू नये. घरी व स्मशानात मृतदेहावर होणारे धार्मिक विधी, नंतरचे दिवस-वार, श्राद्ध इत्यादी विधी हे अज्ञानमूलक व अर्थशून्य आहेत. तेव्हा ते टाळावेत.
लग्न, मुंज व इतर धार्मिक विधी, तसेच अंत्यसंस्कारावर बहिष्कार घालण्याची किंवा त्यासंबंधी अटी घालण्याची कारणे अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, लोकसंख्या नियंत्रण, नैतिकता, मानवता, पर्यावरण संरक्षण, संपत्तीचा नाश किंवा अपव्यय टाळणे, काटकसर, जातिव्यवस्था-उच्चाटन व बुद्धिप्रमाण्यवाद ह्या तत्त्वांचा समावेश होतो.
अ-१, जीवन ज्योती, शिवाजी नगर, ‘बी’ केबिन, नौपाडा, ठाणे (प िचम) — ४०० ६०२