ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, “तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस, परंतु या ९ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का?’ ईश्वरचंद्रानी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची कणव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवाविवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवणाच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला.
ही हकीगत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. आज ती आठवायचे कारण म्हणजे नुकतेच विधवाविवाह चळवळ हे पुस्तक हातांत पडले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे स.गं. मालशे आणि नंदा आपटे यांनी केलेल्या संशोधनावर आधारलेले हे पुस्तक त्याच विद्यापीठाच्या स्त्रीसंशोधन केंद्रातर्फे १९७८ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
१८०१ ते १९०० या शतकांमधील आणि तेही मुख्यत: मराठी व गुजराती समाजातील
विधवाविवाह चळवळीचे चित्र यामध्ये रेखाटले आहे. भारतामध्ये इंग्रज येण्यापूर्वीचा काळ म्हणजे मध्ययुगीनच होता असे म्हणायला हरकत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला, त्यांच्या
आगमनानंतर येथे नवविचारांचे वारे वाहू लागले आणि तोवर शास्त्रार्थाच्या चौकटीने गच्च बांधले गेलेले उच्चवर्णीय हिंदू, त्यांच्या संपर्कात आल्यावर थोडा वेगळा विचार करण्यास, आपल्या रूढी-समजुतींवर शंका घेण्यास धजावू लागले.
पुरुषसत्ताक समाजरचना आणि हुंड्याची प्रथा या दोन्हीमुळे हिंदूंना ‘कन्या नको’च असे. त्यामधून सती, जन्मत:च तिची हत्या करणे यासारख्या अमानुष रूढी उगम पावल्या. कठोर जातिबंधनामुळे आणि न्हातीधुती मुलगी, तिचे पाऊल वाकडे पडेल म्हणून लोकांना मुलींचे विवाह कसेही का होईना, लवकरच उरकावे लागत. शिवाय जातीबाहेर टाकले जाण्याची भीती असे. अशा परिस्थितीत अनेकदा अत्यंत विजोड असे जरठकुमारी विवाह केले जात. पाचसहा वर्षांची मुलगी आणि चाळीस वर्षांचा बिजवर तिजवर पुरुष असे विवाह अनेकदा होत. परिणामी मुलीला लहानपणीच वैधव्य येई. सहगमन आणि पुनर्विवाह या दोन्ही गोष्टी तिच्यासाठी वर्ल्स असल्यामुळे उभे लांबलचक आयुष्य कोणाची तरी हक्काची मोलकरीण म्हणूनच तिला कंठावे लागे. अशा रीतीने बालविवाहाच्या रूढीमधूनच बालविधवांची समस्या उद्भवली होती. पूर्वी फक्त उच्चवर्णीयांत असलेली ही चाल हळूहळू खालच्या वर्गामध्ये झिरपत गेली.
विधवांना अनाथ अवस्थेत काढाव्या लागणाच्या आयुष्यामुळे एकूण समाजातच अनाचार बोकाळले. बिचान्या विधवांना स्वत:ला तर माणसासारखे जगताच येत नसे. जन्मभर त्यांच्यावर सक्तीची कौमार्यावस्था लादली जाई. त्यांच्या तारुण्यसुलभ भावनांची कदर केली जात नसे. कोणा पुरुषाने तिच्याशी दुर्वर्तन केले, तरी त्याची शिक्षा तिलाच भोगावी लागे. याचा परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणावर भ्रूणहत्या, गर्भपात होत. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी यांनी विधवाविवाहाचा कायदा करण्याबाबत सरकारला जे पत्र लिहिले, त्यामध्ये ‘‘एकट्या पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत एक हजार लेकरे मारली जात असतील’ असे विश्वासाने म्हटले आहे. ज्या तरुण विधवांचे पाऊल वाकडे पडे, त्यांच्यापैकी काही स्त्रिया झाडपाल्याची औषधे घेऊन गर्भपात करवीत, तर काही पंढरपूर नाशिकसारख्या क्षेत्री जाऊन सुटका करवून घेत. काही धर्मातराला बळी पडत आणि ज्यांना यापैकी कोणताच मार्ग सापडत नसे त्या दुर्दैवी महिला एकतर आत्महत्या करीत किंवा क्वचित् कुंटणखान्याचा रस्ता सुधारीत. (लोकहितवादींनी आपल्या पत्रात, उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये ‘virtuous’ स्त्रिया शंभरामध्ये पाचही नसतील असे म्हटले आहे!) तरुण विधवेला यात्रेला घेऊन जाण्याचा प्रकार तर इतका रूढ होता की जवळच्यांना त्याचे खरे कारण समजले तरी ते त्याची वाच्यता करीत नसत, कारण उद्या असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो याची त्यांना चांगली कल्पना असे.
मग विधवांची इतकी शोचनीय अवस्था असताना समाज स्वस्थ कसा बसला होता?
सर्वज्ञाधारण लोक जरी रूढीचे झापड लावून चालणारे असले, तरी आपल्या लेकीबाळींचे दु:ख
पाहून द्रवणारे काही थोडे सहृदय तर असतीलच की नाही?याचे उत्तर तत्कालीन सामाजिक स्थितीमध्ये असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
बवंश समाज हा अत्यंत स्थितिप्रिय होता. सामाजिक रूढींच्या विरोधात जराही कोणी आवाज काढला की प्रायश्चित्त, आणि प्रायश्चित्त नाही तर जातीमधून हकालपट्टी. बहिष्कृत माणसाचा असा काही छळ करीत, की त्याला मरणच बरे वाटू लागावे. घरातला एखादा माणूस सुधारकी विचारांचा असला, तरी या शिक्षांच्या भीतीने इतर कुटुंबीय त्याचे पाय मागे ओढीत.
अशा परिस्थितीतही, काहींनी विधवाविवाह केले. सुरुवातीच्या काळातील मराठी व गुजराती समाजात जे काही विधवाविवाह झाले, त्यांची थोडक्यात वर्णने पुस्तकात दिली आहेत. ते बहुधा मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरांत लावले जात. तेही शक्य तेवढ्या गुप्तपणे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत. असे जे काही मोजके विवाह त्या काळात घडून आले, त्यांचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे झाले. एक विवाह सनातनी मंडळींनी सपशेल मोडून टाकला आणि वधूला घटस्फोट घेणे भाग पाडले (करमरकर – वेणूबाई, १८६९). एक विवाह सुखरूप पार पडला आणि वधूला ज्यांनी जबरदस्तीने कोंडून ठेवले होते, त्यांना सात महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड अशा शिक्षा झाल्या (लल्लूभाई मथुरादास – देवकुंवर, १८७२). यावर “या विवाहाच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली की पुनर्विवाहाच्या वेळी विधवावधूचे वय सोळा वर्षांहून अधिक असेल तर तिच्या इच्छेविरुद्ध नातेवाईक तिला कोणताही अटकाव करू शकत नाहीत’ असा अभिप्राय देऊन संशोधनकर्त्यांनी इंग्रज आमदानीवर विश्वास व्यक्त केला आहे. मोरोबा कान्होबा व सुमित्राबाई यांच्या १८७१ साली झालेल्या विवाहाचा मात्र करुण अंत झाला. आप्त कुटुंबीयांनी त्यांना वाळीत टाकले आणि नाइलाजाने लवकरच उभयतांना मृत्यूचा मार्ग कवटाळावा लागला.
प्रत्यक्ष विधवाविवाह करणार्या् व्यक्तींच्याशिवाय लहानमोठ्या संस्थाही अशा विवाहांस उपस्थित राहून, पुनर्विवाहितांशी अन्नोदक व्यवहार कायम ठेवून, अथवा तसा ठेवण्याचे जाहीर करून, कन्यादान वा पौरोहित्य करून, वधूवरांना आर्थिक मदत करून व लेखन, प्रश्नसंच पाठवणे इत्यादींद्वारे याबाबतीत जनजागृती करून या कार्यास हातभार लावीत होत्या. परंतु, सनातनी मंडळी काही तेवढ्या अवधीत स्वस्थ बसली होती असे नाही. तीही आपल्या परीने त्यांच्या कामात अडथळा आणीतच होती. त्यांनीही काही संस्था स्थापन केल्या होत्या. पांडुरंग शिवराम भावे, कृष्णशास्त्री साठे ही मंडळी त्यामध्ये, सुधारक पक्षामध्ये विष्णुशास्त्री पंडित, लोकहितवादी, विष्णु परशुराम रानडे, विष्णु मोरेश्वर भिडे, महादेव गोविंद रानडे, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळी होती. (इथे सुधारक पक्षाची यादी मोठी दिसत असली तरी सर्वसामान्य लोक प्रतिगामी विचारांचेच होते.) यांना गुजराती समाजामध्ये शेट माधवदास रघुनाथदासनावाचा एक समानधर्मा भेटला. त्याच्यामुळेच मुख्यत्वे, ही चळवळ गुजराती समाजामध्ये फोफावली.
त्या काळी कोणतीही रूढी नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे जनजागृतीपेक्षा, त्यासाठी शास्त्रवचन नसल्याचे सिद्ध करणे हाच असे. त्याला अनुसरून १८७० मध्ये विधवाविवाहाच्या सशास्त्रतेचा जो वाद झाला, त्याचे वर्णनही या पुस्तकात केले आहे. हा वाद एकूण नऊ दिवस चालला. परंतु समर्थक पक्षातील एकजण बहिष्काराच्या भीतीने फितूर झाल्यामुळे विधवाविवाह निषेधक पक्षाच्या बाजूने निकाल लागला आणि चळवळीचे पाऊल मागे पडले. सुधारकांना प्रचंड प्रायश्चित्त द्यावे लागले. लोकहितवादींना तर त्यापायी हजार रुपयांचा भूर्दंड बसला.
कालांतराने पुन्हा बालविवाहविरोधी आंदोलनाने जोर धरला. संमतिवयाचे बिल आले. त्यामध्ये बारा वर्षांच्या आतील पत्नीशी समागम केल्यास पतीला काळ्या पाण्याची वा १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुचवली होती. ही शिक्षा म्हणजे त्या बालवधूच्या वैधव्याचीच जणू तयारी होती. जनतेने त्याला निकराचा विरोध केला. बहुतेक देशभर प्रतिकूल सभा घेण्यात आल्या. शेवटी बिल पार्लमेंटकडे पाठवलेच गेले नाही. (पुढे विसाव्या शतकात ते संमत झाले.)
अशा परिस्थितीतून जात असता अनेक तथाकथित सुधारकांची मते बदलून गेली आणि त्यांनी गतानुगतिकत्व स्वीकारले. न्या. रानडे यांनी बत्तिसाव्या वर्षी अकरा वर्षांच्या कुमारिकेशी तर गुजरातेतील मानवधर्मसभेचे संस्थापक दुर्गाराम मेहता यांनी चाळिसाव्या वर्षी अकरा वर्षांच्या कुमारिकेशीच विवाह केला. लोकहितवादी, गुजराती सुधारका कवी नर्मद यांचे मतपरिवर्तन झाले.
दुस-यांना उपदेश करणारया व स्वत:वर वेळ आली की कच खाणाच्या सुधारकांची रेलचेल असतानाच्या त्या काळात, माधवदास रघुनाथदास, विष्णुशास्त्री पंडित आणि धोंडो केशव कर्वे हे तीन वीर मात्र सत्त्वाला जागणारे निघाले. काहीशा उतारवयात विधुरावस्था प्राप्त झाल्यावरही त्यांनी विवाह केला, आणि तो विधवांशीच केला. या तीन्ही विवाहांची साद्यंत हकीगत सांगून संशोधनकर्त्यांनी त्यांची ‘बोलले तसे चालले’ या शब्दांत भलावण केली आहे.
यापैकी माधवदास रघुनाथदास यांचा मुंबईत रेशमी कपड्याचा व्यापार होता. यापूर्वीही त्यांनी वीस विधवाविवाह स्वत:च्या घरी लावून दिले होते व त्यासाठी स्वत:जवळचे १०,००० रुपये खर्च केले होते. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी ५० ते ६० पुनर्विवाह लावले. गुजराती समाजाला त्यांच्यासारखे वाणी जातीतील सुधारक लाभले. वाण्यांवर जातीची बंधनेही कमी आणि स्थितीही अधिक सधन. त्यामुळे त्या समाजात विधवाविवाहाचा प्रसार अधिक सहजपणे झाला.
विष्णुशास्त्री पंडित १८६२ मध्ये ‘इंदुप्रकाश’ पत्रात काम करू लागले व त्या पत्रातून त्यांनी पुनर्विवाहाचा प्रचार सुरू केला. पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना त्यांच्याच पुढाकाराने झाली. तेच तिचे आधारस्तंभ होते. पूर्वीच्या पुनर्विवाहांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांना बहिष्कारसोसावा लागून आप्तजनांच्या स्नेहास मुकावे लागले होते. त्यांना अनेकदा अपयश आले तरी ते तत्त्वापासून हटले नाहीत. सत्तेचाळीसाव्या वर्षी एका विधवेशी विवाह करून त्यांनी तिच्या नावाने १,६०० रुपये ठेवले.
‘बोलले तसे चालले’ या मालिकेत प्रि. गोपाळ गणेश आगरकर यांचाही उल्लेख करायला हवा. त्यांच्या स्वत:वर जरी तशी वेळच आली नाही, तरी आपल्या सुधारक पत्रातून त्यांनी या दुष्ट पद्धतीच्या विरोधात नेहमीच कठोर शब्दांत ताशेरे ओढले. या चळवळीतील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेची दखल घेऊन त्यावर त्यांनी अभिप्राय दिलेला दिसतो.
भ्रूणहत्येसाठी ब्रिटिश आमदानीमध्ये खटले भरले जात. सुरतेजवळ राहणार्याा एका विजयालक्ष्मी नामक स्त्रीला गर्भपातासाठी आधी फाशीची, नंतर जन्मठेपेची व माफीचा अर्ज झाल्यावर ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाल्याची गोष्ट यामध्ये सांगितली आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने बरेच विचारमंथन घडून आले. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्रीपुरुष तुलना’ नामक पुस्तक लिहिले, तर जोतिराव फुले, पंढरपूरचे सबजज्ज रा.ब. लालशंकर उमियाशंकर यांनी बालहत्याप्रतिबंधक गृहे उघडली. पंडिता रमाबाईंचे शारदासदन हे जरी विधवांच्या उद्धारासाठी सुरू करण्यात आले असले, तरी नंतर ते धर्मातराचे केंद्र बनले व पालकांनी आपापल्या विधवा मुली त्यातून काढून घेतल्या.
विधवाविवाह चळवळ याप्रमाणे अनेक स्थित्यंतरांमधून जात असताना मुलींचे शिक्षण व त्यांची जागृती हेच त्यावरील अंतिम उत्तर असू शकते ही गोष्ट ज्या द्रष्ट्या व्यक्तीच्या लक्षात आली, ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी विधवांच्या व त्यानंतर एकंदर स्त्रियांच्याच शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी १८९९ साली पुण्यात एक संस्था काढली. १९०० मध्ये ती हिंगण्याला हलविण्यात आली. याशिवाय विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना, पुनर्विवाहितांचे कुटुंबमेळे, यासारखे अनेक प्रकल्प त्यांनी राबवले. ते लोकापवादाची अतिशय कदर करीत व त्यामुळे त्यांच्यावर भित्रेपणाचा आरोप होई. परंतु प्रत्यक्षात ते अंतिम सत्याकडे नजर ठेवून अतिशय धीमेपणाने वाटचाल करीत होते. आश्रम सुरू झाल्यापासून १५-१६ वर्षात महाराष्ट्रात जे ५५ पुनर्विवाह झाले, त्यांतील निम्म्या वधू आश्रमातून शिकून गेलेल्या होत्या.
पुस्तकाची रचना शोध-प्रबंधाप्रमाणे आहे. विवेचनाच्या अकरा प्रकरणानंतर ५ परिशिष्टे आहेत. लोकहितवादींनी सरकारला पाठवलेले मूळ पत्र, तसेच मराठी व गुजराती समाजातील विधवाविवाहांची यादी यांचा त्यामध्ये समावेश आहे. तत्कालीन अनेक पुस्तके, वृत्तपत्रे व इतर साहित्यातून माहिती गोळा करून एकेक प्रसंग जोडीत नेऊन चळवळीचे सलग चित्र निर्माण केले आहे. प्रत्येक घटनेचा समतोल वृत्तान्त दिला आहे आणि त्यावर साध्या पण मार्मिकभाषेत अभिप्राय व्यक्त केला आहे.
तसे पाहिले तर विधवाविवाहाच्या माध्यमातून तत्कालीन समाजाचेच एक चित्र डोळ्यांपुढे उभे राहते, आणि त्याचा इतिहास हा स्त्रीमुक्तीचाच इतिहास बनून आपल्यासमोर येतो. विधवांची त्या दुर्दशेतून सुटका व्हावी यासाठी कित्येकांना आपले नाव, प्रतिष्ठा, पैसा आणि क्वचित प्राणसुद्धा खर्ची घालावे लागले, हे पाहून मन स्तिमित होते. विधवाविवाहाला मान्यता मिळावी यासाठी झगडणारे सर्व पुरुषच होते ही आणखी एक गंमतीची गोष्ट. पंडिता रमाबाई ही एक ख्रिश्चन महिला सोडली, तर आणखी कुणीही नाही. अर्थात त्या काळात हेच स्वाभाविक म्हणावे लागेल. नाही म्हणायला एका ब्राह्मण विधवेने एलफिन्स्टन साहेबांना दै. टेलिग्राफ मधून पत्र लिहून (ऑगस्ट १८५५) विधवांची भीषण अवस्था कथन केली होती. (हे पत्र पुस्तकाच्या परिशिष्टात दिले आहे.)
या सर्वांची, विशेषत: शिक्षणाची परिणती म्हणून विधवाविवाह आज सर्रास रूढ झाल्याचे आपण पाहतो. परंतु त्याचा हा व्यापक व विवेचक इतिहास, पुढील वाटचालीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.