तंत्रज्ञानाचा विकास
२१व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (Artificial Intelligence – AI) सर्वांत जास्त उत्सुकता दाखविली जात आहे. सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये ह्याची चर्चा होत असल्यामुळे हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, त्याचे परिणाम (व दुष्परिणाम) काय आहेत व विशेष करून त्याचा रोजगारावर नेमका काय परिणाम होणार आहे, हा एक जगभर चर्चिला जाणारा विषय ठरत आहे.
माणसाने आपल्यातील बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या दैनंदिन सोयी-सुविधांमध्ये फ्रीज, फॅन, मायक्रोवेव्ह, इत्यादी आले. ऐषारामी जीवनाला पूरक अशा मनोरंजन साधनांमध्ये रेडिओ, चित्रपट, टीव्ही, वॉकमन, व्हिसिआर, इत्यादी आले. संवाद साधण्यासाठींच्या यंत्रणांमध्ये टेलीफोन, स्मार्ट फोन आले. शेतकी अवजारांमध्ये ट्रॅक्टर, नांगरणी, पेरणीसाठीची अवजारे आणि कृषिक्षेत्रामध्ये शेतीपूरक बी-बियाणे, खत, कीटकनाशके इत्यादी मूलभूत गोष्टी आल्या. आरोग्यक्षेत्रामध्ये एक्स-रे मशीन्स, डायलॅसिस यंत्रणा, एमआरआय यंत्रणा, रोगप्रतिबंधक औषधे, लसीकरण, इत्यादी आले. जलद वाहतुकीच्या साधनांमध्ये कार्स, रेल्वे, विमान, जहाज, स्कूटर्स, बाइक आले. तर उत्पादनक्षेत्रामध्ये एनसी मशीन्स, सीएनसी मशीन्स, ऑटोमेशन इत्यादींनी मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. तंत्रज्ञानाची ही घोडदौड अशीच वाढत जाणारी आहे व त्यामुळे काळाच्या चक्राला उलटे फिरविणे अशक्य ठरते आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे हे उमगूनसुद्धा तो नाश रोखण्यासाठी पुन्हा एकदा आपण तंत्रज्ञानालाच शरण जात आहोत, अशी आजची परिस्थिती आहे.
यंत्रमानव
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनी, जपान, स्वीडन, स्वित्झर्लँड, अमेरिका, सिंगापूर इत्यादी विकसीत देशांमध्ये उत्पादनक्षेत्रात अकुशल कामांसाठी यंत्रमानव तंत्रज्ञानाचा (रोबोटिक्स) मोठ्या प्रमाणात वापर होत गेला. ह्या देशांची लोकसंख्या मुळातच कमी असल्यामुळे यंत्रमानवाच्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळाले. यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा; पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होते आहे. अभियांत्रिकी व प्रगत विज्ञान ह्यांमधील अतिविकसित तंत्रज्ञानाची फलश्रुती म्हणजे यंत्रमानव. वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी, कामाच्या स्वरूपानुसार प्रत्येक यंत्रमानवाची रचना करावी लागते. त्यामुळे यंत्रमानवाच्या क्षमतेवर व त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यावर मर्यादा पडतात.
वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळणाऱ्या बुद्धिमान यंत्रमानवासाठी कार्यप्रणालीची रचना करताना प्रत्येक क्षेत्रासाठी असलेल्या सर्व नियमांचा समावेश करावा लागतो. त्यापासून कुणालाही इजा होता कामा नये व कुठलेही मोडतोड वा नुकसान होता कामा नये, ह्याची काळजी घ्यावी लागते. आपल्या नित्य जीवनातील साध्या वाटणाऱ्या व्यवहारज्ञानाच्या कित्येक गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात नियमांची संख्या असते. शिवाय जगाचे व्यवहार अशाप्रकारे ठरावीक नैसर्गिक नियम किंवा नीतिनियमाने बंधित करणे फार अवघड असते. कारण, गतिमान असलेल्या ह्या जगामध्ये आजचे नियम उद्याच्या जगासाठी लागू होतीलच, ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे कार्यप्रणालीत समाविष्ट केलेल्या चौकटीवर मर्यादा येतात व बुद्धिमत्ता अकार्यक्षम ठरण्याची शक्यता असते.
कृत्रिम बुद्धिमत्ता
यंत्रमानवातील उणिवा हेरून माणसासारखी त्यांच्यात थोड्याफार प्रमाणात बुद्धिमत्ता असलेला यंत्रमानव बनवण्याच्या प्रयत्नात आजचे तंत्रज्ञ आहेत. तंत्रज्ञानातील पुढचा टप्पा गाठण्याचा हा प्रयत्न आहे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात शोधलेल्या इंटरनेट, आयसी (integrated Circuit) चिप्स, वेगवेगळे अॅप्स, सेन्सॉर्स, क्लाउड सर्वर्स इत्यादी तंत्रज्ञानामुळे व त्यासाठी लागणाऱ्या कार्यप्रणालींमुळे हे शक्य होत आहे, असे ह्या तंत्रज्ञाना वाटते आहे. असे प्रयोग होत असून काही बुद्धिमान यंत्रमानवांची प्राथमिक स्वरूपातील चाचणी घेतली जात आहे.
ह्यासाठी मुळात आधी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करावा लागेल. प्राथमिक स्वरूपातील बुद्धिमत्तेचा वापर काही प्रमाणात स्मार्ट फोन्स, टीव्ही, इंटरनेटची जोडणी असलेले संगणक इत्यादींसारख्या ठिकाणी केला जात आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. एखादी जाहिरात वा माहिती शोधल्यास तशाच प्रकारच्या इतर जाहिराती वा पूरक माहिती स्क्रीनवर दिसू लागतात. ही एका प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता असते. ह्यासाठी कुठला माणूस तेथे नेमलेला नसतो. आधार कार्ड व पॅन कार्ड ह्यांची आपसात जोडणी, अमेझॉन वा फ्लिपकार्टवरील विक्रीव्यवहार, गूगल-पे, फोन-पे, पे-टीएम, रुपी-पे ह्यासारखे आर्थिक व्यवहार, अशाप्रकारची बिनडोक कामे कार्यप्रणालीवरून सहज करता येऊ शकतात व मोठ्या प्रमाणात मानवी वेळ वाचू शकतो.
स्मार्ट फोन्सवरील गेम्ससुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे. फोनवरील मदतनीस ‘अलेक्सा’सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचेच फलित आहे. सरकारी व खासगी कागदपत्रे व आर्थिक व्यवहार डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने होण्यासाठी संगणकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे; परंतु हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे आहे असे तंत्रज्ञाना वाटते. एकाच प्रकारची पण बुद्धिकौशल्याची कामे कृत्रिम बुद्धिमत्ता हाताळू शकेल, पण निर्दिष्ट केलेल्या चौकटीबाहेर जाऊन ती काम करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात कार्यप्रणालीची रचना करताना विशिष्ट क्षेत्र, क्षेत्रासाठी आखून घेतलेली चौकट व क्षेत्रास लागू पडणारे सर्व नियम व नियमांची अचूक व्याख्या ह्यांना फार महत्त्व आहे.
ह्याप्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये मूलभूत नियमांच्या काही ठोकताळ्यांचा अतंर्भाव केला आहे. (ह्या ठोकताळ्यांची संख्याच जवळजवळ १० लाखांपेक्षा जास्त आहे!) कार्यप्रणालीला मिळणारी नवीन माहिती व तिच्याकडील ठोकताळ्यांच्या आधारावरून ती सुसंगत विचारप्रक्रिया करून दाखवेल, असे वैज्ञानिकांना वाटते. अशाप्रकारे ही कार्यप्रणाली नवीन माहितीचे संकलन व पृथक्करण करत स्वतःची क्षमता मानवाच्या मेंदूसारखे काम करण्यापर्यंत वाढवू शकेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला यंत्रमानव – बुद्धिमान यंत्रमानव – हा ह्या तंत्रज्ञानाचे अंतिम ध्येय असेल. ह्यात यंत्रमानवाचा तथाकथित मेंदू उपलब्ध माहितीवरून शिकत राहील व परिस्थितीनुसार बदल घडवत, निर्णय घेत पुढील कामे करीत राहील. गंमत अशी आहे की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत माणूस थांबणार नाही. त्यामुळे हळूहळू जसजसे तंत्रज्ञान उपलब्ध होत राहील तसतसे ह्या गोष्टी बाजारात येतील व त्यांचा प्रत्यक्ष परिणाम रोजगारावर होऊ शकेल, असे काही समाजशास्त्रज्ञांना वाटत आहे.
बुद्धिमान यंत्रमानव
काही वैज्ञानिकांनासुद्धा हा बुद्धिमान यंत्रमानव स्वप्नवतच वाटत आला आहे. बुद्धिमान यंत्रमानवासाठी उद्देश (purpose) व प्रेरणा (motivation) ह्या जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून घेता येईल. तहान लागल्यावर पाण्यासाठी, भूक लागल्यावर अन्नासाठी धडपडणे अशा अवस्थांचे सदृशीकरण (simulation) केल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव स्वयंप्रेरित वर्तन करू शकणार नाही. तहान, भूक ह्यासारख्या संवेदनांची जाणीव नसल्यामुळे संबंधित संप्रेरक उत्तेजित होणार नाहीत. अशा उत्तेजनाशिवाय शारीरिक वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. कुठल्याही प्राण्याचे वर्तन बाह्य परिस्थितीच्या उत्तेजनाचे फलित असते. इंद्रियाद्वारे ज्ञान व त्यानुसार वर्तन ह्या गोष्टी एकाच वेळी घडत असतात. बुद्धिमान यंत्रमानवामध्येसुद्धा बाह्य परिस्थितीची जाणीव व त्याप्रमाणे वर्तन करण्यास उद्युक्त करणारी यंत्रणा असावी लागते.
आजच्या यंत्रमानव-तंत्रज्ञानामध्ये एका कामासाठी अनेक यंत्रमानवांचा उपयोग करून सामूहिक प्रयत्नाने काम करण्यास वाव नाही. बुद्धिमान यंत्रमानवामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण करण्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी संभाषण व संभाषणासाठी भाषाज्ञानाची आवश्यकता आहे. संभाषण साधण्यासाठी काही तरी उद्देश असावा लागतो. संवेदना हे काम करू शकेल. पण प्रणयचेष्टा, गोंधळलेली मनःस्थिती, लाजणे ह्यांसारख्या संवेदनांचे सदृशीकरण करणे सोपे नाही व अशा प्रकारच्या संवदेनांची जाणीव असल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव परिपूर्ण असणार नाही.
परंतु, माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व यशामुळे ‘बुद्धिमान यंत्रमानव’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याचे दिवस लांब नाहीत, असे भविष्यवेत्त्यांना वाटत आहे. जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या, कार्यप्रणालीच्या मदतीविना स्वतःहून संवाद साधणाऱ्या चॅटजीपीटीसारख्या (chatGPT) स्वयंशिक्षित भाषायंत्रांचा विकास म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे पुढचे पाऊल मानले जात आहे. कदाचित पुढील एक-दोन दशकांत बुद्धिमान यंत्रमानव मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास पुढील कालखंडाला चौथ्या औद्योगिक क्रांतीचा कालखंड समजले जाईल.
तंत्रज्ञानावर मात
तरीही कष्टकरी, कामगारवर्ग अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर मात करीत गेली कित्येक वर्षे उभा आहे. उदाहरणार्थ, बैलगाडीऐवजी घोडागाडी, घोडागाडीऐवजी रिक्षा, स्कूटर, बाइक कार्स/टॅक्सी (व आता उबेर/ओला) इत्यादी रोजगार, नांगराऐवजी ट्रॅक्टर, रेडिओऐवजी टीव्ही, दुरुस्तीच्या क्षेत्रात, लँडलाइन फोन्सचा काळ संपल्यावर मोबाईलची विक्री व दुरुस्ती असा हा रोजगाराचा प्रवास आहे. त्यामुळे बुद्धिमान यंत्रमानवाला घाबरायचे कारण नाही. योग्य प्रकारचे प्रशिक्षण व कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे असल्यास ह्या स्वयंचलित व उच्च तंत्रज्ञानाचा बाऊ करण्यात अर्थ नाही. काहींना मात्र कामगारांची जागा संगणकीय कार्यप्रणाली (अल्गॉरिदम) व स्वयंचलित यंत्रे घेतील असे वाटत आहे. एक मात्र खरे की, पुढे येऊ घातलेल्या कालखंडात औद्योगिक व्यवस्थापनामध्ये बुद्धिमान यंत्रमानवामुळे शिक्षण, शेती,आरोग्यव्यवस्था, मिलिटरी ह्यांसारख्या क्षेत्रात फार मोठा बदल होणार आहे हे नक्की.
हे तंत्रज्ञान रोजगारावर फार मोठा परिणाम करू शकेल असे अनेकांना वाटत आहे; परंतु काही तज्ज्ञ मात्र इतिहासाचे दाखले देत, कोणतेही तंत्रज्ञान काही रोजगार कमी करतात व काही नवीन रोजगारांना जन्म देतात ह्यावर भर देत आहेत. हे ह्याअगोदरही घडले आहे व ह्यानंतरही घडणार आहे. त्यामुळे ही एक सामान्य प्रक्रिया आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
आरोग्यक्षेत्र
एक्स-रे वा एमआरआय स्कॅनिंग करून कर्करोग किंवा इतर अनेक रोगांच्या अचूक निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. स्मार्ट फोन वापरून मेंदू विकारांच्या निदानासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोगग्रस्तांचा ठावठिकाणा, त्यांचे वैद्यकीय पूर्वेतिहास, विकारांची नोंद अशा गोष्टींसाठी काही कार्यप्रणाली वापरण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. ठरावीक प्रश्नोत्तरातून माहिती मिळविण्याचे कामसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता बिनचूक करू शकते ह्यावर डॉक्टरांचा विश्वास आहे.
हॉस्पिटलमधील संगणक कार्यप्रणालीद्वारे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात रुग्णाची प्राथमिक माहिती घेऊन डॉक्टर व सर्जन्सपर्यंत पोचविल्यास रुग्णासाठी योग्य निर्णय आणि तेही वेळेत घेण्यासाठी मदत होते. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक वरदान ठरत आहे. काही ठिकाणी अतिशय क्लिष्ट अशा ऑपरेशनच्या वेळी यंत्रमानवाची मदतही घेतली जाते. परंतु, ही मदत डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून बुद्धिमान यंत्रमानवाच्या हातात स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरी दिल्याचे ऐकीवात नाही.
एक मात्र खरे की, कुठलाही संवेदनशील रुग्ण आपणहून बुद्धिमान यंत्रमानवाच्या हाती आपला जीव धोक्यात घालून उपचार करून घेणार नाही. त्यामुळे डॉक्टर्स, सर्जन्स, नर्सेस, वैद्यकीय यंत्रणा वापरणारे कर्मचारी, रुग्णांची शुश्रूषा करणारे कर्मचारी इत्यादींची हकालपट्टी करून यंत्रमानवाच्या हातात वैद्यकीय व्यवस्थापन देणे कदापि शक्य नाही. ह्या रोजगारांना तसा पर्याय नाही. वस्तूंची जाहिरात करणाऱ्या विक्री प्रतिनिधींची जागा बुद्धिमान यंत्रमानव घेऊ शकतील. मोठमोठ्या हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन, नियोजन, निर्णयप्रक्रिया, इत्यादींसाठी कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकेल. मात्र, वैद्यकीय उपचारासंबंधीच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांची हकालपट्टी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणार नाही, हे निश्चित.
शैक्षणिक क्षेत्र
कोविडकाळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला होता. मुळात तो एक आपात्कालीन उपाय होता. शिक्षक-शिक्षिकांना व विद्यार्थ्यांनासुद्धा ह्यात पूर्ण समाधान नव्हते. खरे पाहता, शाळा-कॉलेजमध्ये विषय समजून घेण्यासाठी काही मर्यादित प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ह्यापूर्वीही करण्यात येत होता. पण आपण शिकविलेला पाठ विद्यार्थ्यांना समजला आहे की नाही हे त्यांच्या देहबोलीवरून, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून व उपस्थित केलेल्या शंकांमधूनच शिक्षकांना कळत असते. नेमका त्याचाच अभाव ऑनलाइन क्लासेसमध्ये असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणासाठीचा वापर विपरीत परिणाम घडवू शकतो, असे काही शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते बुद्धिमान यंत्रमानव हाडाच्या शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. कारण, समोर असलेल्या विद्यार्थ्याचा कल बघून शिकविण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक बदल करतो. कितीही प्रयत्न करून यंत्रमानवाला हे जमेल की नाही, ह्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
फार फार तर शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी कनिष्ठ आर्थिक वर्गातील विद्यार्थ्यांना बुद्धिमान यंत्रमानव शिकवेल. परतुं, उच्च वर्गातील पालक मात्र आपल्या पाल्यांसाठी परस्पर संवादासाठी शिक्षकांनाच पसंत करतील. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या शिक्षकाला मरण नाही. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, हजेरी घेणे, स्कूल-कॉलेजचे व्यवस्थापन इत्यादी प्रकारची शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणबाह्य कामे यंत्रमानवांवर सोपविली जातील, परंतु प्रत्यक्ष शिक्षणासाठी मात्र शिक्षक/शिक्षिकाच असतील. त्यातही एका शिक्षकामागे कमीत कमी विद्यार्थ्यांची संख्या असल्यास उत्तम.
सेवाक्षेत्र
कॉल सेंटर्स : जागतिकीकरणानंतर ग्राहकांच्या तक्रारनिवारणासाठी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कॉल सेंटर्सची (सेवाकेंद्र) उभारणी करण्यात आली. ह्या सर्व सेवाकेंद्रांमध्ये थोड्या प्रशिक्षणानंतर मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करण्यात येते. आपल्या देशातील ह्या सेवाकेंद्रांबद्दल ‘न बोललेले बरे’ अशी अवस्था आहे. परंतु, इतर देशातील सेवाकेंद्रात वा इतर देशासाठी काम करणाऱ्या आपल्या देशातील सेवाकेंद्रात काम करणाऱ्यांना फोनवरून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी असते. मुळात फोन करणारे वैतागलेले असतात. कदाचित भावनेच्या भरात अद्धातद्धा बोलणारे असतात. त्यामुळे समोर न दिसणाऱ्या व्यक्तीच्या संभाषणामधून त्याची/तिची मनःस्थिती ओळखून डोके शांत ठेऊन तक्रार निवारण करण्याची कसरत त्यांना करावी लागते. जर त्यात थोडीशी चूक झाली तरी नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते. काम करणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर व वापरलेल्या प्रत्येक शब्दावर निगा ठेवली जाते. अशा केंद्रावर बुद्धिमान यंत्रमानवाला काम करण्यास सांगितल्यास समोरच्या न दिसणाऱ्या व्यक्तिच्या केवळ संभाषणावरून त्याची भावनिक मनःस्थिती ओळखणे यंत्रमानवाला न पेलणारे ठरू शकेल. कदाचित ह्या क्षेत्रातील रोजगारावरही हे तंत्रज्ञान निरुपयोगी ठरू शकेल.
इतर प्रकारच्या सेवा : पर्यटन, विक्री वा हॉटेल इत्यादी सेवा पुरविणाऱ्या व्यवसायांमध्येसुद्धा यंत्रमानवांचा उपयोग करून घेणे शक्य होणार नाही. कारण ह्यातही मानवी इंटरफेसला जास्त महत्त्व असते. ग्राहकाला पटवावे लागते, चांगली सेवा देण्याची हमी द्यावी लागते. नाराज ग्राहक आणखी चार ग्राहकांना नाउमेद करू शकतो. ग्राहकाने न्यायालयातत फिर्याद टाकल्यास कंपनीची बदनामी होऊ शकते. ह्या सर्व शक्यता लक्षात ठेऊन ग्राहकांशी वर्तन करावे लागते. यंत्रमानव कितीही बुद्धिमान असला तरी ह्या गोष्टी त्याला जमू शकतील, ह्याबद्दल तज्ज्ञांच्या मनात प्रचंड शंका आहेत.
त्यामुळे ह्या क्षेत्रातील रोजगारही कमी होण्याची शक्यता फारच कमी असेल.
कृषिक्षेत्र
शेतकी क्षेत्रातील अनेक घटकांना ऑटोमेशन करणे शक्य होणार नाही. आजचा शेतकरी हवामान अंदाज, टोळधाड वा पिकावरील रोगासाठी करावे लागणारे उपाय इत्यादीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतच आहे. त्यामुळे यंत्रमानवाचा वा बुद्धिमान यंत्रमानवाचा वापर ह्या क्षेत्रासाठी करून शेतीपद्धतीत बदल करणे जवळजवळ अशक्यातली गोष्ट ठरते.
चॅटजीपीटी वापरून अतिशय सुंदर, मुद्देसूद निबंध लिहिता येईल. एखादी कविता लिहिता येईल. परंतु शेतातील अगदी प्राथमिक स्वरूपाची कामे होऊ घातलेल्या यंत्रमानवाकडून करून घेण्यासाठी फार मोठ्या स्वरूपात तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. काम करण्यातील लवचिकपणा, अचानकपणे उद्भवणारी कामे, जागेची अडचण ह्यावर मात करणारे यंत्रमानव व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत ह्यामुळे शेतकरी कधीच ह्या भानगडीत पडणार नाही.
कृषिक्षेत्र नेहमीच कालानुसार नवीन तंत्रज्ञान वापरत विकसित झालेले क्षेत्र आहे. त्यामुळे कृषिउत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याचे पॅकेजिंग, वाहतूकव्यवस्था, बाजाराच्या ठिकाणी त्याची मांडणी इत्यादीसाठी कदाचित यंत्रमानवाचा उपयोग करून घेता येईल. ह्यामुळे कदाचित काही प्रमाणात रोजगार कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिलिटरी क्षेत्र :
आपल्याला आवडो न आवडो, प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे २० टक्के खर्च करून हजारो–लाखो सैनिकांना पोसत असते. युद्धसामग्रींची जमवाजमव वा उत्पादन करीत असते. युद्धाच्या खुमखुमीने पछाडलेले राष्ट्र शेजारच्या राष्ट्राशी सीमावाद उकरून वा अन्य कुठलेतरी कारण पुढे करून आक्रमण करते व आपल्या शौर्याचे प्रदर्शन करते. कदाचित संरक्षणक्षेत्र सामाजिक-आर्थिक (socio-economic) क्षेत्र म्हणून ओळखले जात असावे व त्यातून रोजगारनिर्मिती होत असावी.
काही तज्ज्ञांच्या मते मिलिटरीतील गुंतवणुकीचा फार मोठा हिस्सा अद्ययावत तंत्रज्ञानावर खर्च केला जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोण ह्या क्षेत्रातही आले असल्यास नवल नाही. स्वयंचलित ड्रोन्स, रणगाडे, पाणबुडी, लढाऊ विमाने इत्यादींमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झालेला असला तरी, कल्पनेपेक्षा प्रत्यक्षात तो फारच कमी आहे.
भविष्यकाळात मात्र हे बदलणार आहे. समुद्र वा हवेतील युद्धात योद्ध्यांची वाचण्याची शक्यता फारच कमी असल्यामुळे चालक नसलेली स्वयंचलित लढाऊ विमाने वापरण्यावर भर दिला जाईल. ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ह्या क्षेत्रात अनिवार्य ठरतो आहे. लढाऊ विमानात फायटर पायलटची गरज नसल्यास विमान जास्त हलके, जास्त वेगवान, जास्त दारूगोळा घेऊन जाणारे, जास्त लवचिक व कमी खर्चिक होऊ शकेल.
काही तज्ज्ञांच्या मते, ह्यानंतरच्या युद्धप्रसंगात युद्धाची पुढील दिशा सेनाधिकारी न ठरवता बुद्धिमान यंत्रमानव ठरवील. उपलब्ध माहिती व शत्रूंचे जास्तीत जास्त नुकसान करून मोहीम जिंकण्यासाठी लागणाऱ्या रणनीतीची आखणी माणसापेक्षा यंत्रमानव जास्त कुशलतेने करू शकेल. ह्या निर्णयप्रक्रियेमध्ये अत्यल्प प्रमाणात सेनापतींचा सहभागही असेल. परंतु जिवावर उदार होऊन लढण्यास सज्ज असलेला रणभूमीवरील सैनिक अशा यंत्रमानवाच्या आज्ञा स्वीकारतील का, हा एक अनुत्तरित प्रश्न राहणार आहे. मुळात सैनिक हा काही रोबोसारखा संवेदनाविहीन नसणार. त्याच्या शौर्य-धैर्याबरोबरच दया, करुणा ही गुणवैशिष्ट्येही त्याच्यात असणार. यंत्रमानव रक्त-मांस-हाडे असलेल्या मानवी सैनिकांची जागा घेऊ शकणार नाही. त्यामुळे भविष्यकाळात सैन्यावरील खर्च वाढत जाईल व सैन्यकपातीच्या गोष्टी फक्त बोलल्या जातील, प्रत्यक्षात सैन्यकपात होणार नाही, असे शक्य आहे.
इतर क्षेत्रातील स्थिती :
२००० नंतर वस्तूउत्पादनक्षेत्रात ऑटोमेशनची लाट आली. त्यामुळे जगभरातील सुमारे १७ लाख कामगार बेकार झाले. कदाचित तशीच परिस्थिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे होईल की काय, अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. ह्यावेळी कामगारापेक्षा व्हाइट कॉलर्सच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे, असा अंदाज केला जात आहे. परंतु ती भीती अनाठायी आहे, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. बेकार होणाऱ्या व्हाइट कॉलर्स व इतर कामगारांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सल्लागार, कॉम्प्युटर प्रोग्रामर्स, संशोधन विश्लेषक, कायदेतज्ज्ञांचे मदतनीस, वखारातील कर्मचारीवर्ग, शेअर बाजाराचे सल्लागार, ग्राफिक डिझायनर्स, पटकथा लेखक, चित्रपट व्यवसायातील दुय्यम कर्मचारी वर्ग, अनुवादक इत्यादी असण्याची शक्यता आहे. सामाजिक व स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते, कायदेतज्ज्ञ, थेरपिस्ट, घरेलू कामगार, बांधकाम व्यवसायातील कामगारवर्ग, मानवी संसाधनांशी निगडीत कर्मचारी वर्ग, सर्जनशील लेखक, कलाकार इत्यादींवर ह्या होऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम होणार नाही.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका अहवालानुसार ह्या तंत्रज्ञानामुळे साडे आठ कोटी लोक बेकार होतील असा अंदाज आहे. परंतु, त्याचवेळी सुमारे १० कोटी नवीन रोजगार ह्या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होतील असेही त्यात म्हटले आहे. हेही नसे थोडके!
Very informative Article
प्रभाकरजी, आपण आजच्या काळातिल अत्यंत सवेदनशिल विषयावर चर्चा केलेली आहे. मानवाच्या सुखसोयिंसाठी नवनव्या शोधांची आवश्यकता आहेच, पण अनेक शोधांचा उपयोग स्वार्थि मानवाने समाजाच्या उत्थानाऐवजी विध्वंसक शस्त्रास्त्रे निर्माण केला आहे. आज आपल्यासारख्या बहूल लोकसंख्या असलेल्या देशात कृत्रिम बुध्दिमत्तेच्या यंत्रमानव बनवण्याची आवश्यकता काय आहे? होय, वैद्यकीय क्षेत्रात ज्या गोष्टी मानवाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्यासाठी अद्ययावत यंत्रमानवाची गरज आहे. पण आपण कितीही म्हटले तरी कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे नोकय्रांच्या संधी कमी होण्याची शक्यता नाकरता येणार नाही.