नास्तिक्य, विवेक आणि मानवतावाद

विवेक-मानवता : विवेक आणि मानवतावादावर लिहताना प्रथम विनय म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या विचारांचा अहंकार न बाळगता समाजभान राखून इतरांचा आदर करणे गरजेचे असते. विनम्रता तुमच्या वर्तनात सहजगत्या आलेली असावी. चांगले संबंध निर्माण करणे, सद्भावनांना प्रेरित करणे, इतरांची मते सर्वंकषपणे विचारात घेणे आणि व्यक्त होताना किंवा प्रतिक्रिया देताना सांवादिक राहाणे हाच विवेकशील वर्तनाचा पाया असतो. तुम्ही धार्मिक, नास्तिक किंवा पुरोगामी कोणीही असा, तुम्ही तुमच्या विचारांचे वाहक असता.

मानवतावाद : मानवतावादावर लिहिताना दया, सहानुभूती ह्या मूल्यांचा आपण वापर करीत असतो; पण सहिष्णुता आणि वैचारिक मूल्यांचा आदरभाव असे प्राथमिक विचार मानववादाचा पाया असतो. मानवाच्या प्रतिष्ठा, क्षमता, गरजा ह्यासंबंधित कित्येक विषयांशी निगडीत असलेल्या मानसिक, भावनिक पातळीवर मानवतावाद जातो. मानवतावाद काही धार्मिक मूल्यांमधूनसुद्धा मांडला जातो. जसे, संतवचने, सुफी साहित्य, अभंग! काही ठिकाणी हा संकुचित धर्मसापेक्षसुद्धा असतो; पण म्हणून ह्याचे महत्त्व कमी होऊ शकत नाही. मानवतावादावर प्रखरपणे लिहिताना मानवी मूल्यांचा वापर केला जावा, हेच अपेक्षित असते. धर्म किंवा जातिव्यवस्थेवर आधारित मांडलेला मानवतावाद हा असमंजससुद्धा असू शकतो. 

नास्तिकता : नास्तिकतेचे काही सिद्धांत असतात. धार्मिक संकल्पनांचे खंडन करणे, तथ्य आणि तर्कांची सुसंगत मांडणी करणे ही नास्तिकतेची सुरुवातीची पायरी आहे. तर्कांची गुणवत्ता विज्ञानवादी म्हणजे सत्यता व अचूकतेच्या निकषांवर आधारित असावी. कोणत्याही चिकित्सेशिवाय, तसेच निकष न लावता मांडलेला तर्क अविवेकी असू शकतो, हीसुद्धा एकप्रकारची अंधश्रद्धा असू शकते, ह्याची शक्यता नाकारता येत नाही.

१. विज्ञान अचूकतेचा मापदंड आहे
२. विज्ञान सत्याचा मानदंड आहे
३. विज्ञान अचूकतेचे  मूल्यमापन आहे
४. विज्ञान सत्याचा शोध घेणारे मूल्य आहे

सत्याचा मापदंड अचूक मांडताना काही वेळा साक्ष हे प्रमाणसुद्धा पडताळून पहावे लागते.

नास्तिकता आणि विवेकवाद : नास्तिकता तुम्हाला स्वतंत्रपणे विचार करण्याचं स्वातंत्र्य देते. काही नास्तिक देव आणि धर्म ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाहीत; तर काही नास्तिक विज्ञानवादी असतात. विज्ञानाच्या मापदंडानुसार त्यांनी देव ही संकल्पना नाकारलेली असते. तर काहींनी वैचारिक प्रमाण मांडून देव, धर्म, निर्मिक ह्या संकल्पना नाकारलेल्या असतात. रॅशनल व्यक्ती विचारस्वातंत्र्य, विज्ञान, कार्यकारणभाव अशा सिद्धांतांचा वापर करून स्वतःच्या मूल्यावर सर्व संकल्पना खोडून काढत असते. रॅशनल विचारांमधूनच प्रखर मानवतेचा सिद्धांत मांडता येईल, ह्यावर मी ठाम आहे.

नास्तिक आणि समाजभान : काही नास्तिक व्यक्ती धर्मसंकल्पना नाकारत असल्या; तरीही त्यांनी मानवी भावविश्व, नातेसंबंध, मित्र (धार्मिकदेखील) ह्यांच्यासोबत सांवादिक असलेच पाहिजे. धार्मिक व्यक्तींचा किंवा समुदायाचा द्वेष तसेच वैचारिक कटुता निर्माण होईल असे वर्तन योग्य ठरणार नाही. धार्मिकता आणि नास्तिकता ह्यांच्यात सुसंवाद असावा. समाजस्वास्थ्य बाधित होईल असे वर्तन नसावे. धार्मिक व्यक्तींमध्ये नैतिकता किंवा मानवता नसतेच, अशी मते मांडणे तर्कसुसंगत नाही. काही धार्मिक व्यक्ती किंवा संत-महात्मे ह्यांनी धर्मानुषंगाने त्या-त्या काळात समाजस्वास्थ्य किंवा सद्वर्तनासाठी काही नैतिक मूल्यांची मांडणी करून धर्मसंकल्पना मांडली होती. कालपरत्वे त्यात बदल करण्याची भूमिका नास्तिक रॅशनल व्यक्ती घेऊ शकतात. हेच समाजभानाचे मापदंड मानता येईल.

काही व्यक्तींनी धर्मसंकल्पना नाकारली असली तरीसुद्धा, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती परंपरावादी असतात. नास्तिक तर्काच्या आधारे आपले विचार मांडत नसतील तर, ‘नास्तिक धर्मा’ची निर्मिती होईल, समूहनियम धर्मनियमांसारखेच मानले जातील आणि विशिष्ट अशा प्रेरणांचा सिद्धांत मांडण्यात येईल, अशी शंका निर्माण होते. ह्यासाठी त्यांना एकत्रीकरणातून संवाद राखणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे होणाऱ्या चर्चा निखळपणाने होतील. राजकीय-अराजकीय, सामाजिक आणि विज्ञानाच्या नवनवीन तर्कांवर बोलता येईल. त्यातून स्वभान निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात काही गैर नाही.

नास्तिक्य, विवेकवाद आणि मानवतावाद ह्यांची सुसंगत मांडणी करून एका उज्वल समाजाच्या बांधणीसाठी आपण प्रयत्नशील राहू, हीच ह्या लेखाकडून अपेक्षा.

सांगली



अभिप्राय 12

  • लेख खरच खूप छान झाला आहे.👌
    महत्वाचे म्हणजे नास्तिकत्व मांडताना धर्मद्वेष, उपहास करणे गरजेचेच नसते असे लेखावरून जाणवते. लेख शुद्धपणे Constructive विवेकवाद शिकवून जातो ही फार जमेची बाजू आहे.
    सलीम सर आपले लेख पुढे सुद्धा वाचता यावेत अशी मागणी मी करतो. आपली लेखमाला वाचण्यास उत्सुक आहे.
    -राज🙏

  • स्वतःला व आपल्याबरोबर इतर सर्वांना (मानवेतर प्राणीसुद्धा यात आले ) सुखी, आनंदी ठेवण्याचा इतका चांगला मार्ग दुसरा कोणता असू शकतो. लेखात म्हटल्याप्रमाणे विनयशील राहून तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, इतरांच्या मताचा आदर ही मुल्ये जोपासून चांगले जीवन सर्वांना जगता येईल.

  • सनातन धर्मात या सगळ्यांची मांडणी आहेच. सहजच सांगून ठेवायचं तर चार्वाक मत हे नास्तिक वादाचीच पाठराखण करते. सनातन धर्म सर्व विचार प्रवाहांचा आदर करतो. मात्र गेल्या हजारांहून अधिक वर्षांत सतत च्या परकीय आक्रमणांमुळे या सर्वांचीच गळचेपी करून जेत्यांचेच धर्म चांगले आणि सनातन धर्म तसा नाही असा विचार प्रवाह भारतात आलाय. तो विचार प्रवाह जर थांबला तर असले लेख छापून प्रतिसाद मागायची वेळ येणार नाही. यादृष्टीने भारतीय सामाजिक धार्मिक व्यवस्थेत आनुषंगिक बदल त्वरेने घडण्याची गरज आहे.

  • भारतीय सामाजिक धार्मिक व्यवस्थेत बदल त्वरेने घडण्याची गरज आहे. तुमच्या या विधानाशी सहमत आहे. बाकी चार्वाक नास्तिकवादाची सनातनी परंपरा तुम्ही मान्य केलीत, त्या बदल आभारी आहे. लेख लिहण्याचा उद्देश सफल झाला एवढेच म्हणता येईल.🙏

  • नास्तिक्य विवेक आणि मानवतावादाचे अभ्यासपूर्ण, विवेकपूर्ण आणि संतुलित विश्लेषण या लेखात केलेले दिसून येते. स्वतःला कट्टर नास्तिक म्हणवणाऱ्या लोकांना त्यांचे असे विचार हा पुढे चालून ‘नास्तिक’ धर्म होऊ शकतो हा अगदी योग्य असा संदेश या लेखातून मिळतो.

  • Excellent write up 👌🏽 👌🏽 👌🏽

  • लेख खूप छान तर्क, विवेकी मांडला आहे.
    यात चिकित्से शिवाय, कोणताही निकष ना लावता केलेला तर्क हा ही एक अंधश्रद्धा ठरवू शकतो हे खूप सटीक तसेच यातून आलेले नास्तिकता म्हणजे एक प्रकारचा नास्तिक धर्म निर्माण करण्याची सुरुवात होईल हे अगदी बोधक वाक्य. एकंदरीत नास्तिकता, तार्किकता, मानवता यातील अत्यंत पुसटसा भेद आणि त्यातील खोलपणा उत्तम मांडला आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.