भाषेचे अभ्यासक भाषेच्या दोन उपयोगांमध्ये भेद करतात. एक निवेदक, आणि दुसरा भावनोद्दीपक. निवेदक उपयोगात लेखकाचा बोलणान्याचा उद्देश माहिती देणे, वस्तुस्थितीचे वर्णन करणे हा असतो, तर दुसन्यात वाचकाच्या/श्रोत्याच्या भावना उद्दीपित करणे आणि त्याला कोणत्यातरी कर्माला प्रवृत्त करणे हा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला ‘ब्राह्मण म्हणणे जवळपास विकारशून्य असू शकेल. पण त्याला ‘भट’ किंवा ‘भटुड’ म्हणणे त्याला क्रोधाविष्ट करण्यास पुरे होईल. सामान्यपणे भाषेत दोन्ही प्रकार कमी अधिक प्रमाणात एकत्र असतात; पण क्वचित भाषेचा उपयोग शुद्ध निवेदक किंवा शुद्ध भावनोद्दीपक टोकाजवळ जाऊ शकेल. शुद्ध निवेदक प्रकार निर्विकार असू शकेल, तर शुद्ध भावनोद्दीपक प्रकार जवळपास निर्विचार असू शकेल.
आज या विषयाची आठवण होण्याचे कारण जवळजवळ शुद्ध भावनोद्दीपक प्रकारचा एक लेख रुची मासिकाच्या ऑगस्ट अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्याचे शीर्षक ‘प्रस्थानत्रयी हाच आधार’ असे असून लेखक यशवंत साने नावाचे गृहस्थ आहेत. या लेखात मी वर उल्लेखलेली अतिशय दु:साध्य गोष्ट म्हणजे विचाराच्या आशयावाचून भावनोद्दीपन करणे – जवळपास साध्य झाली आहे.
औरंगाबाद येथे गेल्या मार्च महिन्यात संघपरिवाराच्या विचारवंतांची एक परिषद भरली होती. हेतू होता की राष्ट्र म्हणजे काय? हिंदू राष्ट्र म्हणजे काय? या प्रश्नाचा विचार करावा.
श्री. साने यांच्या दीर्घ लेखाचा सारांश लेखाच्या शेवटी स्वत: लेखकानेच दिला आहे. तो असा : ‘राष्ट्रवादाच्या पाश्चिमात्य संकल्पनेच्या मर्यादा व उणीवा मानवी हिताच्या विश्वबंधुत्वाच्या अंतिम ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्यात अयशस्वी ठरत आहेत. अशा वेळी भारतीय राष्ट्रवादाची वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय लक्षणे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. त्यांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाकडे दुर्लक्ष करता येत नाही.’
आता या सारांशावरून त्यातील प्रतिपादनाचे साधक युक्तिवाद लेखात सापडतील अशी वाचकाची अपेक्षा असणार, पण त्याची पूर्ण निराशा होते. राष्ट्रवादाची पाश्चिमात्य संकल्पना कोणती हे लेखकाने लेखात कोठेही सांगितलेले नाही. तसेच भारतीय राष्ट्रवाद म्हणजे काय हेही त्याने सांगितलेले नाही. फक्त ते एवढेच सांगतात की भारतीय राष्ट्रकल्पना वैदिक अध्यात्मवादाच्या ज्ञानपद्धतीवर आधारलेली आहे व प्रस्थानत्रयी म्हणजे वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता ही त्या राष्ट्राची आधारशिला आहे. (प्रस्थानत्रयीत तीनऐवजी चार गोष्टी कशाआल्या ते कळले नाही! असो.) परंतु वैदिक अध्यात्मवाद काय आहे, किंवा प्रस्थात्रयीवर भारतीय राष्ट्रवाद आधारलेला आहे म्हणजे काय याही प्रश्नावर त्यांनी मौन बाळगलेले आहे. सारांश जवळपास पूर्ण निर्विचार आणि भरपूर भावनोद्दीपक असे हे लिखाण आहे. त्यावरून एवढेच स्पष्टपणे कळते की लेखकाला पाश्चात्त्य राष्ट्रवादाविषयी अत्यंत अनादर आहे, आणि भारतीय संस्कृतीविषयी अपार आपुलकी आहे. परंतु पाश्चात्त्य संस्कृती किंवा राष्ट्रवाद यांच्या उणीवा किंवा दोष काय आहेत, किंवा भारतीय संस्कृतीचे विलक्षण गुण कोणते, त्यांचे स्वरूप काय आहे, हे मात्र ते सांगत नाहीत.
लेखाचा मुख्य विचार असणार्याा ‘भारतीय राष्ट्रवादाचा आधार प्रस्थानत्रयी हाच आहे या विधानाचा थोडा विचार करू. आमच्या माहितीप्रमाणे शंकराचार्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांना मिळून प्रस्थानत्रयी हे नाव दिले, आणि त्या सर्वांवर त्यांनी भाष्ये लिहिली. त्यांच्या मते या सर्व ग्रंथांचा निष्कर्ष एकच आहे – ब्रह्म सत्य आहे, जगत् मिथ्या आहेआणि जीव व ब्रह्म एकच आहेत. आता हे सांगणारी प्रस्थानत्रयी राष्ट्रवादाची आधारशिला कशी होऊ शकेल हे अगम्य आहे. राष्ट्रवाद ही प्रामुख्याने राजकीय-सामाजिक कल्पना आहे. तिचा संबंध वेदान्त तत्त्वज्ञानाशी अत्यंत दूरचा, नसल्यासारखाच आहे. परंतु श्री. साने ‘भारतीय राष्ट्रवादाची प्रस्थानत्रयी ही आधारशिला आहे’ एवढेच सांगतात, ती आधारशिला कशी याचा कसलाच उलगडा करीत नाहीत. तसेच ‘भारतीय राष्ट्रकल्पना वैदिक अध्यात्मज्ञानाच्या ज्ञानपद्धतीवर आधारलेली आहे’ हे आणखी एक अनाकलनीय वाक्य त्यांनी लिहिले आहे. परंतु त्याचा अर्थ ते विशद करीत नाहीत. अध्यात्मज्ञानाच्या ज्ञानपद्धतीशी राष्ट्रकल्पनेचा संबंध काय?
त्यांच्या या विचारशैलीमुळे आणि लेखनशैलीमुळे साने आठ-दहा ओळींची वाक्ये सहज लिहून जातात. एखाद्या झपाटलेल्या माणसासारखी स्तुतिवाचक आणि निंदावाचक विशेषणांची खैरात करीत निघतात, आणि अनेकदा आपण वाक्याची सुरवात कशी केली आहे हे विसरून त्याचा शेवट बेंगरूळ पद्धतीने करतात. उदा. पुढील वाक्य पाहा : ‘पण ज्या समाजाने ही उच्च तत्त्वे दहा हजार वर्षे जतन करून आपल्या दैनंदिन व्यवहारात, जीवनात राबविली त्या हिंदू समाजाचे ऋण मान्य करून त्यांना ह्या वैश्विक ज्ञानाचे जतन केल्याचे श्रेय देण्याच्या ऐवजी अनेक पक्षांची कडबोळी करून भौतिकवादी, चंगळवादी व भ्रष्टाचाराचे समर्थन करणारी मंडळी डोळ्यांवर कातडे पांघरणाच्या पोटार्थी विचारवंतांच्या आशीर्वादाने राजसत्तेवर बसलेलीआपण पाहतो आहोत. कधीकधी ते आधी जे म्हटलेले असते त्याच्या विरुद्ध विधानही करतात. उदा. ते म्हणतात : ‘संस्कृती म्हणजे जीवनाच्या, विश्वाच्या, अंतिम मूल्यांची जाणीव.’ जीवनाची अंतिम मूल्ये ठीक आहेत. पण विश्वाची अंतिम मूल्ये म्हणजे काय? ते पुढे म्हणतात की संस्कृतीच्या मूळ बीजधारणेशी प्रतारणा किंवा विसंगत भूमिका कधीही येऊच शकत नाही’, आणि पुढच्याच छेदकात ते म्हणतात की ‘सध्याचे विचारवंत ‘‘हा आमचा बाप नव्हे” अशाअप्रामाणिक व अशास्त्रीय भूमिकेला उराशी बाळगून ओरडत आहेत. जर संस्कृतीच्या मूळ बीजधारणेशी विसंगत भूमिका कधी येऊच शकत नसेल, तर संस्कृतीला कधी धोका पोचेल हे अशक्य होईल. त्यामुळे त्यांनी निर्धास्त व्हायला हवे. मग लोकांना भारतीय संस्कृतीच्या मूल्यांची आठवण करून देण्याची गरज का भासावी?
श्री साने म्हणतात : ‘आपल्या प्राचीन ऋषींनी आधुनिक वैज्ञानिकांच्या इंद्रियगोचर ज्ञानाला प्रमाण मानण्याचा तोकडा मार्ग त्याज्य मानला, आणि शाश्वत सत्य आणि गहन तत्त्वे समजण्यासाठी असंप्रज्ञात समाधी व प्रज्ञा यांची तंत्रे शोधून काढली, आणि अपरोक्ष ज्ञानाच्या अनुभवसिद्ध साधनाद्वारे आत्मिक ज्ञानावर त्यांनी विश्वास ठेवला. हेच ते श्रुती ज्ञान. आधुनिक वैज्ञानिकाची ज्ञानपद्धती प्राचीन भारतीय ऋषींच्या पुढे कधी होती? ती तर जेमतेम चारशे वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे. आणि अपरोक्ष ज्ञान कोणते ते न सांगता त्याची वारेमाप स्तुती कशाच्या आधारे साने करीत आहेत? त्यांना असंप्रज्ञात समाधि आणि अपरोक्ष ज्ञान झालेआहे असे समजावे काय?
हाइसेनबर्गच्या Principle of Uncertainty चा उल्लेख करून साने म्हणतात की ‘आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान अनिश्चिततेचे तत्त्व या संभ्रमावर घेऊन थकले आहे. सबंध विज्ञानाचा पॅराडिम (पाया) जो भौतिकवाद किंवा जडवस्तू होता, तो आज ढासळून, ‘चैतन्यशक्ती’ किंवा ‘consciousness’ म्हणजे ‘स्वसंवेद्यता’ या ज्ञानेश्वरांच्या संकल्पनेवर उतरला आहे. ही तर सान्यांची सिक्सरच म्हटली पाहिजे. कारण अनिश्चिततेचे तत्त्व हो। संभ्रम नाही; तो एक अत्यंत महत्त्वाचा शोध आहे; आणि त्याचे नाव जरी अनिश्चिततेचे तत्त्व असले तरी त्यात अनिश्चितता नाही. ‘paradigm’ या शब्दाचा उच्चारच नव्हे तर अर्थही त्यांना माहीत नाही. ‘पॅराडाइम’ म्हणजे example किंवा patterm असा Oxford Dictionary अर्थ देते. त्याचा पायाशी मुळीच संबंध नाही. आणि चैतन्य किंवा consciousness ह्या कल्पना जडाच्या जागी विज्ञानाने स्वीकारल्या आहेत हे सान्यांना कुणी सांगितले? आणि consciousness म्हणजे स्वसंवेद्यता हे ज्ञान त्यांनी कुठून पैदा केले? सान्यांचे म्हणणे ऐकल्यावर, आपल्या प्रयोगशाळांना टाळी ठोकून वैज्ञानिकांनी ज्ञानेश्वरी हाती घेतली आहे असा समज व्हायचा. वास्तवात विज्ञानाचा उद्योग पूर्वीप्रमाणेच अव्याहत चालू आहे.
साने प्राचीन भारतीयांची राष्ट्रकल्पना आणि पाश्चात्त्यांची राष्ट्रकल्पना असे शब्दप्रयोग करतात. पण प्राचीन भारतीयांना राष्ट्राची (nation) कल्पना असणेच मुळी अशक्य होते. कारण राष्ट्रकल्पना ही आधुनिक, अठराव्या-एकोणिसाव्या शतकात निर्माण झालेली कल्पना आहे. यापूर्वी सर्व जगात होत्या तशाच भारतातही अनेक साम्राज्ये आणि शेकडो राज्ये यांच्याच लढाया चालू होत्या. ‘राष्ट्र’ शब्द जुना आहे, पण त्याला केवळ राज्य किंवा साम्राज्य एवढाच अर्थ होता. भारताला राष्ट्राची (nation) कल्पना ब्रिटिशांमुळे सुचली. त्यावेळपर्यंत या खंडप्राय देशात शेकडो राज्ये होती. ब्रिटिशांनी हा सबंध देश पहिल्यांदा एका सत्तेखाली आणल्यामुळे त्यालाराष्ट्रकल्पना सुचली. त्यापूर्वी उत्तरेत आणि दक्षिणेत सतत स्वतंत्र राज्ये होती आणि त्यांची परस्परांशी युद्धे अव्याहत चालू होती. ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलाखाली आल्यानंतर येथील प्रजेला आपण सर्व एक लोकसमूह आहोत अशी जाणीव झाली, आणि समान शत्रु, समान संस्कृति यांच्यामुळे, भाषा एक नसूनही, लोकांना आपले एक राष्ट्र असल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे प्राचीन भारतीयांची अध्यात्मवादी राष्ट्रकल्पना वगैरे कल्पना केवळ स्वप्नरंजन आहे। असे स्पष्टपणे म्हणावे लागते.
औरंगाबादेला जमलेल्या विद्वानांना राष्ट्रवादाचा विचार करण्याची इतकी निकड का वाटली? वस्तुत: राष्ट्रवादाची पुष्कळ चर्चा गेल्या शंभरेक वर्षात उद्भवलेल्या आंतरराष्ट्रवादाच्या संदर्भात झाली आहे. राष्ट्रवादाची दोन प्रमुख रूपे आहेत, आत्मरक्षक आणि आक्रमक. त्यापैकीआत्मरक्षक राष्ट्रवादाचा उद्देश स्वत:चे रक्षण करणे हा असतो, तर आक्रमक राष्ट्रवादाचा उद्देशआपले इतरांवरील वर्चस्व शक्य तितके वाढविण्याचा असतो. राष्ट्रवादाची प्रवृत्ती सामान्यपणेआक्रमक प्रकाराकडे असते, आणि त्यातून अटळपणे युद्धे उद्भवतात. परदेशांवर स्वामित्व प्रस्थापित करण्याच्या प्रवृत्तीमुळे अधिकाधिक संहारक अस्त्रे बनविण्याची चढाओढ लागलेली असते. त्या चढाओढीतून शेवटी अणुबॉम्बची निर्मिती झाल्यानंतर मात्र मानवाचे डोळे उघडल्यासारखे दिसतात. कारण अणुयुद्ध म्हणजे प्रचंड संहार आणि शेवटी सर्वसंहार हे अनिवार्य दिसते. त्यामुळे राष्ट्रवादाचे आक्रमक रूप सर्वथा त्याज्य ठरले असून राष्ट्रवादाचे क्षेत्रआत्मरक्षणापलीकडे वाढू नये असे सामान्य मत बनले आहे.
अशा परिस्थितीत हिंदू राष्ट्रवाद्यांचा कडवा राष्ट्रवाद निर्मिण्याचा प्रयत्न साशंक करणारा आहे. खरोखर राष्ट्रवादाची खरी गरज पारतंत्र्याच्या काळात आणि शेजारी आक्रमक राष्ट्र असताना असते. त्यापैकी पारतंत्र्य संपलेले असल्यामुळे आक्रमक राष्ट्रवादाचे एक समर्थन नाहीसे झालेले आहे, आणि शेजारी राष्ट्रे दुर्बळ असल्यामुळे त्यांच्याकडूनही आक्रमणाचा धोका नाही. त्यामुळे भारताला आक्रमक राष्ट्रवादाची गरज खरोखर नाही. संरक्षक राष्ट्रवाद मात्र आवश्यक आहे. जिथे सर्व जगच राष्ट्रवादी आहे तिथे आपण राष्ट्रवाद सोडणे हे आत्मघातकी होणार आहे हे उघड आहे. मात्र संरक्षक राष्ट्रवादाच्या मर्यादा ओलांडून आक्रमक होणे अनर्थावह आहे, आणि त्याची गरजही नाही. आज जगात जगण्याचा मार्ग म्हणजे ‘जगा आणि जगू द्या’ ह्याच्याखेरीज अन्य नाही.
गरज पडल्यावर लढाऊ राष्ट्रवादाला उधाण येते हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने सामान्य परिस्थितीत आक्रमक राष्ट्रवादाला उत्तेजन न देणे यात शहाणपणा आहे.
आपण आणि इतर यांच्यातील विरोध प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे कोणताही समाज स्वाभाविकपणेच राष्ट्रवादी बनतो. त्याकरिता मनुष्याला राष्ट्रवादाची शिकवण द्यावी लागत नाही. त्याला शिकवण द्यावी लागते आंतरराष्ट्रवादाची, सहिष्णुतेची आणि इतरांना त्यांच्या वाटेने जाऊ देण्याच्या जरूरीची!