यंदाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. तत्संबंधी काही माहिती आणि विचार:
विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन विरुद्ध माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प असा हा सामना आहे.
ज्या ट्रम्पनी निवडणूक हरल्यावर ६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या समर्थकांना ‘कॅपिटल हिल’वरील संसदभवनावर हल्ला करायला प्रोत्साहन दिले, ते हे ट्रम्प! त्यावेळी उपराष्ट्रपती पेन्स हे त्या संसदभवनात निवडणूक मतदानावर शिक्कामोर्तब करीत असताना भवनाबाहेर ट्रम्पचे बगलबच्चे पेन्सना चौकात फाशी देण्याची तयारी करीत होते. त्यांना चिथावणी देणारे तेच हे ट्रम्प!! ज्यांच्यावर अमेरिकेतील अनेक कोर्टातून खटले चालू असून नुकतेच न्यूयॉर्कमधील खटल्यात ज्युरीने एकमताने ज्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केले, तेपण हेच ट्रम्प!!!
येथे हेपण नमूद करायला हवे की बिल क्लिंटन हे डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी पण त्यांच्या अश्लील वागणुकीने व्हाईट हाऊसला कलंक लावला होता.
पक्ष अधिवेशने
अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असे दोनच प्रमुख राजकीय पक्ष आहेत.
येत्या दोन महिन्यांत राष्ट्राध्यक्षपदासाठी दोन्हीं पक्ष आपापले उमेदवार निवडतील. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस ह्ककयांची नावे आधीच नक्की झालेली आहेत. ऑगस्टमधील रिपब्लिकन अधिवेशनात डॉनल्ड ट्रम्प उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निवडतील. तीसएक वर्षांपूर्वी उमेदवारांसाठी मतदान, वाटाघाटी, अधिवेशनात होत असत. तसेच २०१९ सालापर्यंत राष्ट्रव्यापी प्राथमिक निवडणुकांतून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवार ठरवले जात. पण गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी आपण २०२४ निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. आणि ट्रम्प ह्यांच्या सल्लागारांनी महत्त्वाच्या राज्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणींकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून घेतले.
दोन पक्षांमधील विरोधी मतधारा
दोन्हीं पक्ष भांडवलशाही पुरस्कर्ते असले तरीही त्यांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. गंमत अशी की, एकोणिसाव्या शतकात कृष्णवर्णीय अमेरिकनांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी दक्षिण राज्यांविरुद्ध युद्ध पुकारणारे अब्राहम लिंकन रिपब्लिकन होते आणि त्यांना विरोध करणारे दक्षिण राज्यातील जमीनदार डेमोक्रॅटिक होते!
औद्योगिकक्रांतीनंतर ह्या दोन पक्षांच्या विचारसरणींत खांदेपालट होऊन डेमोक्रॅटिक पक्ष हा कामगारांचे हित जपण्यासाठी, तर रिपब्लिकन पक्ष धनको आणि कॉर्पोरेट अमेरिकन हितसंबंध जपण्यासाठी झटू लागले.
गेल्या शतकांतील काही ठळक टप्पे
१९२९ मध्ये अमेरिकेतील कोसळलेली अर्थव्यवस्था डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट ह्यांनी पुनर्जीवित केली.
सन १९३६ मध्ये रूझवेल्ट यांनी प्रत्येक कामगाराला घर, स्वैपाकघरात कोंबडी आणि गॅरेजमध्ये मोटारगाडी मिळवून देण्याचे वचन दिले. कामगार संघटनांमुळे ह्या तिन्हीं वचनांची पूर्तता झाली. त्यामुळेच “डिग्निटी ऑफ लेबर” वा श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांनी मध्यमवर्गीय आणि कामगारवर्गासाठी सामाजिक सुरक्षा (पेन्शन फंड) आणि आरोग्य विमा सुरू केला. आर्थिक मंदीमधून देश बाहेर काढण्यासाठी सरकारी योजना राबविल्या. ते लागोपाठ तीनदा निवडून आले. दरम्यान दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले होते. १९४५ मध्ये रूझवेल्ट निवर्तले आणि उपराष्ट्रपती ट्रूमन राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी जपानवर दोन अणुबॉम्ब टाकून युद्ध संपुष्टात आणले.
सामाजिक हित जपणाऱ्या योजनांचा खर्च पुरवण्यासाठी श्रीमंत वर्गाने जास्त कर भरावा असे डेमोक्रॅटिक पक्ष म्हणतो, तर रिपब्लिकन म्हणतात की समाजकल्याण श्रीमंतांच्या ऐच्छिक दानशूरतेवर सोपवावे.
१९८० च्या दशकात रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन दोनदा निवडून आले. त्यांनी सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध अमेरिकन “स्टार वॉर्स” संरक्षणव्यवस्था राबविण्यात पुढाकार घेतला. सोविएत युनियनकडून येणारी संभाव्य अस्त्रे वाटेतच निष्प्रभ करणारी प्रतिअस्त्रे निर्माण करण्यावर भर दिला. सोविएत युनियनला प्रत्युत्तरात्मक संरक्षणखर्चात पाडून मोडकळीस आणणे हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे म्हणा वा इतर कारणांमुळे गोर्बाचेव्ह तेथील राजकीय क्षितिजावर आले. राष्ट्राध्यक्ष रेगन आणि ब्रिटिश मार्गारेट थॅचर ह्यांनी गोर्बाचेव्ह ह्यांना पाठिंबा दिला. बर्लिन येथील प्रसिद्ध भाषणात रेगन ह्यांनी “गोर्बाचेव, बर्लिन भिंत तोडा” असे आवाहन केले. गोर्बाचेव्ह यांचे पेरिस्ट्रॉइका आणि ग्लासनॉस्ट धोरण, तसेच त्यांनी सोविएत युनियनचे केलेले विलीनीकरण जगजाहीर आहे. परंतु आईसलँडमधील रेयाविक येथील रेगन-गोर्बाचेव्ह शिखरपरिषदेत, अमेरिकेने नेटो विलीन केल्यास रशिया वॉर्सा करार रद्द करील, हा विचार मात्र रेगननी स्वीकारला नाही. तसे घडते तर पुढील घटनांमध्ये मूलभूत बदल घडला असता. रेगन आणि ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांनी गोर्बाचेव्ह ह्यांना वेळीच मदत केली असती तर येल्टसिन ह्या एका व्यसनी नेत्याकडे सत्ता गेली नसती, आणि येल्टसिन ह्यांच्या हस्ते पुतीन ह्यांचा झालेला भाग्योदय टळला असता. असो, ह्या जरतरच्या गोष्टी आहेत!
रेगन राजवटीआधी फक्त सेव्हिंग्ज आणि लोन बॅंकाच अमेरिकेत घरांसाठी कर्ज देऊ शकत. रेगन ह्यांनी ते क्षेत्र सर्व मोठ्या बॅंकाना खुले करून त्याबाबतीतले निर्बंध शिथिल केले. बॅंक ऑफ अमेरिका, सिटी बँक, वेल्स फार्गो आणि चेज मॅनहॅटन ह्या बड्या धेंडांनी, पात्रता न पाहता, घरकर्जे दिली. त्या कर्जांचे रोखे (tranches) विकताना इतका फुगवटा निर्माण झाला की मूळच्या तारणाच्या शेकडो पट खोटी किंमत (अक्षरशः कचरा) निर्माण होऊन शेवटी तो बुडबुडा फुटला आणि एक जागतिक संकट निर्माण झाले, तेव्हा सर्वांना कळले. पण तोवर अमेरिकेतील ह्या प्रमुख बॅंका इतक्या प्रचंड झाल्या होत्या की त्यांना वाचवण्याशिवाय पर्याय नव्हता. राष्ट्राध्यक्ष दुसरे बुश ह्यांना आणि नंतर ओबामा ह्यांना त्या बॅंकांना अब्जावधी डॉलर्सची मदत करावी लागली. एकाही बॅंकेचा एकही अधिकारी तुरुंगात गेला नाही!
रेगन ह्यांच्या आणखी एका आंतरराष्ट्रीय धोरणाचा परिणाम म्हणजे त्यांनी अफगाणिस्तानमधून रशियाला हाकलण्यासाठी तालिबानला केलेली मदत. तालिबानींनी न्यूयॉर्कवर केलेला हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या बुश ह्यांनी अफगाणिस्तानविरोधात पुकारलेले युद्ध, ते अर्धवट सोडून इराकवर सर्वनाशी युद्धसामुग्रीचे खोटे आरोप करून पुकारलेल्या युद्धांत पन्नास हजार अमेरिकन सैनिकांची आणि एक लाखाहून अधिक निरपराध इराकी नागरिकांची झालेली हत्या, ह्या गोष्टी सर्वश्रुत आहेत.
अमेरिकन परराष्ट्र धोरण आक्रमक आहे ही गोष्ट नवीन नाही. पण मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती बह्वंशी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष असताना निर्माण झाली असून त्याचे परिणाम डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्षांना भोगावे लागले आहेत.
राष्ट्राध्यक्षांचे मंत्रीमंडळ
राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये विख्यात विद्यापीठातील प्राध्यापक, मोठ्या कॉर्पोरेशन्समधील सीइओ ह्यांना घेण्याची प्रथा आहे. तसेच त्यांच्या सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये आजी आणि माजी सेनाधिकारी, सीआयएमधील अधिकारी आणि ज्येष्ठ सेनेटर असतात. राष्ट्राध्यक्ष क्वचितच महत्त्वाचे निर्णय एकतर्फी घेतात.
न्यूट गिंगरिचचे दग्धभू धोरण
सन १९८९ मध्ये रिपब्लिकन न्यूट गिंगरिच संसदेत सभापती झाले. त्यांनी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांची संसदेतील देवघेव संपुष्टात आणली. “टेक नो हॉस्टेजेस” म्हणजे विरोधी पक्षाशी कधीच तडजोड करायची नाही, हा तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाचा मंत्र झाला. तोपर्यंत दोन्हीं पक्षांची विचारधारणा वेगळी असली तरीही, across the aisle, किंवा संसदेतील मध्यपथ ओलांडून, दोन बाजूंकडून प्रतिपक्षाचे बोलणे ऐकून घेण्याची, वाटाघाटी करण्याची प्रथा होती; तिला गिंगरिचने मूठमाती दिली. कमीतकमी सरकार आणि तेही धनको आणि कॉर्पोरेट वर्गाच्या हितासाठी चालवायचे, डेमोक्रॅटिक पक्षाशी पूर्ण असहकार धोरण राबवायचे, ही भूमिका तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे. ह्याच संदर्भात २०१६ मध्ये ट्रम्प निवडून आले तेव्हा बराक ओबामा म्हणाले की “ही नवी सुरुवात नसून बदललेल्या रिपब्लिकन पक्षाची परिणती आहे.”
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्राधिकरणांत एक गोची आहे.
इलेक्टोरल कॉलेज
अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर जास्त लोकवस्ती आहे आणि त्यामानाने मध्यअमेरिकेत वस्ती कमी आहे. राष्ट्रीय निवडणुकांत मध्यअमेरिकेतील जनतेवर अन्याय होऊ नये म्हणून ‘इलेक्टोरल कॉलेज’ वा ‘निवडणूक प्रतिनिधी संघ’ निर्माण करण्यात आला. ह्या संघांत एकूण ५३८ प्रतिनिधी असून त्यातील साधारणपणे निम्मे मध्यअमेरिकेतील असतात. राष्ट्राध्यक्ष निवडणूक देशभरातून होते, पण केवळ अधिक मताधिक्यावर निवडणूक जिंकली जात नसून राष्ट्राध्यक्ष उमेदवाराला २७० प्रतिनिधी मते मिळवावी लागतात. तसे न झाल्यास मताधिक्य मिळूनही उमेदवार हरतो. अमेरिकेच्या इतिहासात तसे घडलेही आहे. ही प्रतिनिधी मतगणना, सेनेटर आणि कॉंग्रेस ह्यांच्या संयुक्त सभेसमोर होते, आणि अध्यक्षस्थानी उपराष्ट्रपती असतात. ६ जानेवारी २०२० रोजी अशी मोजणी चालू असताना ट्रम्प ह्यांच्या चिथावणीने निवडणूक नाकारणाऱ्या गुंडांनी कॅपिटलवर वा संसद भवनावर हल्ला केला.
पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील मुख्यतः नागरी मतदार उदारमतवादी तर मध्यअमेरिकेतील जनता सनातनी आहे. मध्यअमेरिकेतील जनता प्रामुख्याने शेतकी व्यवसाय, आणि ज्याला “रस्ट बेल्ट” म्हणतात त्या पोलाद, ऑटोमोबाईल कामगार, खाणकामगार अशा व्यवसायांतील आहे. ह्यांतील कामगारवर्ग काही वर्षांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने अथवा उदारमतवादी होता. परंतु १९७२ नंतर चीनमधील स्वस्त कामगार उपलब्ध झाल्यामुळे अमेरिकेतील उत्पादन नोकऱ्यांचे चीनमध्ये स्थलांतर झाले. मध्यअमेरिकेत बेकारी निर्माण झाली. ह्याची सुरुवात जरी निक्सन ह्या रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षाच्या कारकीर्दीत झाली, तरीही तिचे परिणाम डेमोक्रॅटिक पक्षाला भोगावे लागले. कारण त्यांची बांधिलकी कामगारकल्याणाशी असली तरी चीनला गेलेल्या नोकऱ्या ते परत आणू शकत नव्हते. हजारो डेमोक्रॅटिक कामगार मतदार रिपब्लिकन झाले.
अमेरिकेची अरेरावी
सन १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर चॅंग कै शेक ह्यांनी तैवानला पलायन केले. अमेरिकेने तैवानला ‘चीन’ म्हणून मान्यता देऊन आपला पित्त्या म्हणून तैवानला युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलवर जागा दिली!
रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन ह्यांनी किसिंजर ह्या सल्लागाराच्या हस्ते १९७२ मध्ये चीनला ‘चीन’ म्हणून मान्यता दिली, आणि चीन आपोआपच युनो सिक्युरिटी कौन्सिलचा सभासद झाला. किसिंजर-हेग ह्या जोडगोळीने अमेरिकन उद्योगपतींना चीनमधील स्वस्त कामगार वर्ग उपलब्ध करून दिला; आणि जागतिक इतिहासाला वेगळेच वळण लागले.
जगप्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणामुळे निक्सन ह्यांना राजिनामा द्यावा लागला.
ट्रम्प जानेवारी २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले
२०१५ साली डॉनल्ड ट्रम्प ह्यांनी मतदारांना नोकऱ्या मिळतील असे खोटेच आश्वासन दिले आणि प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन ह्यांनी विस्काॉन्सिनसारख्या राज्यात प्रचारच न केल्याने ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे मित्र रशियाचे अध्यक्ष पुतीन ह्यांनी अमेरिकन सोशल मीडियावर खोट्या सत्यकथांद्वारा (फॉल्स ट्रुथ्स) ट्रम्प ह्यांच्या बाजूने प्रचार केला होता.
सन २०१९ मध्ये कोविड जागतिक साथ सुरू होताच ट्रम्पने अमेरिकन फार्मास्युटिकल व्यवसायाला सक्रिय मदत करून जर्मन कोविड प्रतिबंधक लशीसारखीच अमेरिकन लस युद्धपातळीवर निर्माण करायला मदत केली. परंतु राष्ट्रीय लसीकरण राबवण्यात मात्र दिरंगाई केली. “गुदद्वारातून फ्लुओरेसंट प्रकाश आत टाकला तर कोविड बरा होतो” अशा प्रकारची आचरट विधाने ट्रम्पने केली!
मानवी कृत्यांनी पर्यावरण ऱ्हास होत आहे ह्याविषयी त्यांनीच शंका व्यक्त करून पॅरिसच्या पर्यावरणरक्षण करारातून अमेरिकेस बाहेर काढले. नेटोमधून अमेरिका बाहेर पडेल अशी धमकी दिली. ट्रम्प ह्यांनी मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा प्रयत्न केला, पण तो कोर्टाने हाणून पाडला.
ग्लास सीलिंग वा अदृश्य अडसर
एखाद्या आर्थिक वा सामाजिक संघटनेत कार्यकर्त्यांना वंश, जात, लिंग ह्यावरून उच्च पद मिळवण्यात जो अडथळा असू शकतो त्याला ‘ग्लास सीलिंग’ म्हणतात. अमेरिकेत २००८ पर्यंत एकही गौरेतर राष्ट्राध्यक्ष झाला नव्हता, आणि एकाही स्त्रीने ते पद भूषविले नव्हते. तो अडथळा बराक ओबामांनी मोडला. सन २०१६ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटनला राष्ट्राध्यक्ष पदासाठी नामांकन मिळाले, पण तेव्हा ट्रम्प निवडून आले. बायडन ह्यांनी २०१९ मध्ये कमला हॅरिस ह्यांना उपाध्यक्षपदासाठी निवडले तेव्हा त्यांच्या उतरत्या वयामुळे ते २०२१ ते २०२४ दरम्यान वारले तर कमला राष्ट्रपती होऊ शकते ही बाब लक्षात घेऊनही मतदारांनी बायडन ह्यांना निवडून दिले.
राष्ट्राध्यक्षांचे पितृऋण
राष्ट्राध्यक्ष बायडन ह्यांनी अक्षरशः शेकडो वेळा पितृऋण मान्य केले आहे. बायडन त्यांच्या उच्च-मध्यमवर्गीय वडिलांकडून चिकाटी, सचोटी, धैर्य आणि सामाजिक जबाबदारी शिकले. ते लहान असताना वडील त्यांना जर्मनी मधील ज्यू कॉन्सन्ट्रेशन कॅंप्स पाहायला घेऊन गेले होते. बायडन ह्यांनीपण आपल्या मुलांना ते दाखवले. “सामाजिक अन्याय होत असताना कधीही मान दुसरीकडे फिरवू नकोस”, हे बायडन ह्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवले.
ट्रम्प ह्यांचे वडील कुशल उद्योगपती होते. बंडखोर वृत्तीच्या ट्रम्पना त्यांच्या तेराव्या वर्षी न्यूयॉर्क मिलिटरी अकादमी ह्या खासगी शाळेत धाडण्यात आले. “कधीहि मॅनहॅटन मध्ये जाऊ नको, ते आपले काम नाही” हा वडिलांचा सल्ला त्यांनी मनावर घेतला नाही. पण “प्रत्येक खिळा, प्रत्येक फळी ह्यांचा हिशेब ठेव” हा सल्ला त्यांनी मानला. मॅनहॅटनमधील ट्रम्प टॉवर ह्या त्यांच्या मालकीच्या इमारतीवर काम करणाऱ्या आणि अटलांटिक सिटीमधील त्यांच्या कसीनोवर काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांचे पैसे त्यांनी बुडवले. प्रत्येक उद्योग वाटाघाटींत प्रतिपक्षाला हैराण करणे त्यांना चांगले जमते. डेमोक्रॅटिक हिलरी क्लिंटन ह्यांच्या विरोधात २०१६ मध्ये निवडून येताना त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खर्चाच्या निम्म्या खर्चात निवडणूक जिंकली!
ट्रम्प ह्यांच्या मुलीने एका ज्यूशी लग्न केले तेव्हा ते भयंकर चिडले होते. पण तोच जावई २९१६ पासून इस्राएल संबंधांत सल्लागार झाला आहे!
बायडन आणि ट्रम्प ह्यांच्या वयाचा मुद्दा
आता बायडन चार वर्षांनी अधिक वृद्ध झाल्याने ते पुढील चार वर्षे पुरी करू शकणार नाहीत, ही शक्यता नाकारता येत नाही. त्याच वेळी ट्रम्प ह्यांनी वंशभेद, लिंगभेद हे मुद्दे रिपब्लिकन आणि सनातनी मतदारांच्या मनात उपस्थित केले आहेत. जे मतदार अशा बाबतीत कुंपणावर बसून असतात ते ह्या वेळी ट्रम्पना मते देतील. ट्रम्प स्वतः सत्तरीच्या पुढे असले तरी बायडन ह्यांच्या मानाने त्यांची तब्येत ठणठणीत आहे.
सन १९६३-६४ निवडणुकीत जॉन्सन विरुद्ध गोल्डवॉटर हे तडफदार सनातनी ज्यूधर्मीय उभे होते. त्यांचा पराजय होण्यात त्यांच्या ज्यू धर्मापेक्षा “व्हिएटनाम वर जरूर तर अणुबॉम्ब टाकीन” ह्या त्यांच्या टोकाच्या वक्तव्यामुळे झाला. नंतर २००० सालच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक ॲल गोर ह्यांनी सेनेटर लीबरमन ह्या ज्यूईश नेत्याला उपराष्ट्रपती पदासाठी निवडले. टेलिव्हिजन पडद्यावर त्याची प्रतिमा छाप पाडणारी नव्हती. गोर ह्यांनी थोडक्याने निवडणूक गमावली, त्यामागे प्रभावी व्यक्तिमत्वाअभावी लीबरमन ह्यांचे ज्यू असणे नक्कीच नडले.
उपराष्ट्राध्यक्षपद
अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षपद हे एखाद्या वृक्षाच्या सावलीत लावलेले झाड जसे खुरटलेले राहते तसे असते. राष्ट्राध्यक्ष कृपा करतील तेवढ्याच वर्तुळात त्या व्यक्तीला काम करावे लागते. मात्र जर हे पद संसदेतील मुरब्बी सेनेटरला मिळाले तर तो ह्या पदाचा सत्तेची एक पायरी म्हणून उपयोग करू शकतो. रूझवेल्ट ह्यांचे उपराष्ट्रपती ट्रुमन, केनेडी यांचे उपाध्यक्ष जॉन्सन, आणि ओबामा ह्यांनी निवडलेले सेनेटर बायडन ह्यांनी हे दाखवून दिले आहे.
एरवी ट्रम्प ह्यांचे “होयबा” असलेले उपाध्यक्ष पेन्स ह्यांनी मात्र ट्रम्प ह्यांच्या मागणीला भीक न घालता ६ जानेवारी २०२१ रोजी संसद मतमोजणी नियमानुसार पुरी करून बायडन विजयी झाल्याचे जाहीर केले.
गतवर्षी झालेल्या प्राथमिक निवडणुकींमध्ये रिपब्लिकन निकी हेली ह्या भारतीय वंशाच्या उमेदवार त्यांच्या धैर्यामुळे आणि चिकाटीमुळे जनतेच्या डोळ्यांसमोर आल्या. त्या आधी साऊथ कॅरोलायना प्रांताच्या गव्हर्नर होत्या आणि २०१६-२०२० ह्या कारकीर्दीत ट्रम्प ह्यांनी त्यांना युनोमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. कमला हॅरिस ह्यांना प्रतिशह म्हणून हेली ह्यांना उपाध्यक्षपद नामांकन देण्याची शक्यता आहे.
कमला हॅरिस ह्यांना धडाडीचे व्यक्तिमत्व आहे. गेल्या चार वर्षांत उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. पण त्या कृष्णवर्णीय आणि स्त्री आहेत.
ट्रम्प धूर्तपणे हातात बायबल घेऊन टीव्ही पडद्यावर ख्रिश्चन धर्माच्या नावाखाली वर्णभेद, वंशभेद आणि धर्मभेद ह्यांची बीजे पेरत असतानाच “मेक्सिकन उपरे परत पाठवीन” अशा घोषणांतून कृष्णवर्णीय आणि मेक्सिकन अमेरिकन ह्यांची मते मिळवू पाहत आहेत.
इस्राएल : अमेरिकेच्या गळ्यातील लोढणे
ज्यूधर्मीय माणसांबद्दल गौरवर्णीय अमेरिकन माणसांच्या दोन टोकाच्या भावना आहेत. हिटलरने ज्यूंचे शिरकाण केले म्हणून त्यांच्याबद्दल एकीकडे सहानुभूती आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत ज्यूंच्या सिनेगॉगवर वा धर्ममंदिरांवर हल्लेपण होतात. शंभर वर्षांपूर्वी सगळ्यांना तुच्छ वाटणाऱ्या हॉलिवूडमध्ये ज्यूंनी प्रवेश केला आणि ते तेथील “मोगुल” बनले. तीच बाब पैसे कर्जाऊ देणाऱ्या बॅंकांबद्दल. आज ते बॅंकिंग क्षेत्रात आघाडीवर आहेत. हॉलिवूडमधील एक मोगुल, कॅटझनबर्ग यंदा बायडन ह्यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बायडन ह्यांना न्यूयॉर्कला एका दिवसांत २८ मिलिअन डॉलर, तर लॉस एंजेलिसला एका दिवसांत २७ मिलियन डॉलर्स देणग्या मिळाल्या. कॅटझनबर्ग ज्यूईश आहेत. राजकारणात दात्यांचे ऋण या ना त्या रूपात फेडावे लागते. बायडन हे तरुणपणी सेनेटमध्ये असल्यापासून इस्राएलचे पाठिराखे आहेत. परंतु नाही म्हटले तरी अशा मदतीचा परराष्ट्रधोरणांवर परिणाम होतोच.
इस्राएलच्या निर्मितीसाठी ब्रिटनने आणि अमेरिकेने पुढाकार घेऊन अमेरिकेने इस्राएलच्या रक्षणाची जबाबदारी उचलली आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने एका ज्यू माणसाचे जहाज परत युरोपला पाठवले. त्या कृत्याच्या परिमार्जनार्थ म्हणा, किंवा अमेरिकेत धनाढ्य ज्यूंची मोठी लॉबी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांना देणग्या देत असते म्हणून, किंवा ख्रिश्चन धर्म मुळात ज्यूडिओ ख्रिश्चन असल्याने, पण इस्राएलचे अस्तित्व जपणे, त्या देशाला शस्त्रास्त्रपुरवठा करीत राहणे, हे अमेरिकेचे धोरण इस्राएल निर्मितीपासून सातत्याने चालू आहे.
अमेरिकेला आणि इस्राएलला, इराण अण्वस्त्रधारी होणे घातक वाटते. इस्राएलचा नाश करणे हे इराणी अध्यक्ष अयातोला खोमेनी ह्यांचे घोषवाक्य असून हेजबोला, हमास, हूटी, अशा गटांकडून इराण इस्राएलवर हल्ले चढवीत असतो. अलीकडे तांबड्या समुद्रातून ये-जा करणाऱ्या मालवाहू बोटींवरसुद्धा येमेनमधून हल्ले होत आहेत. अगदी अलीकडे इराणने शेकडो अस्त्रे इस्राएलवर सोडली, पण अमेरिकन साह्याने इस्राएलने त्यातील ९९% अस्त्रे रोखली आणि प्रत्युत्तर म्हणून इराणमधील इस्फहानवर हल्ला केला. इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे इस्फहानवर झालेल्या इस्राएली हल्याला त्याने फक्त तोंडी धमकावणी दिली आहे. अमेरिका आणि इस्राएल ह्यांना इराणी अण्वस्त्रक्षमता रोखायची असली तरी त्या देशाशी युद्ध तिघांपैकी कोणालाच आत्ता नको आहे.
एकीकडे इस्राएली पंतप्रधान नेतान्याहू हे अधिकारावर नसले तर त्यांच्यावरील अनेक आरोपांखाली त्यांना तुरुंगात जायची पाळी येईल. तर दुसरीकडे अमेरिकेत बायडनना इस्राएल-हमास युद्ध थांबवता आले नाही तर निवडणुकीत त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे! अमेरिकेत ट्रम्प पराजित झाले तर त्यांच्यावर चाललेल्या अनेक खटल्यांमुळे त्यांना पण तुरुंगात जावे लागेल. दरम्यान ह्या सगळ्या राजकीय पेचात गाझा उध्वस्त होत असून हजारो निरपराध पॅलेस्टिनी नागरिक आणि त्यांची मुले प्राण गमावत आहेत.
बायडन यांच्यापुढील यक्षप्रश्न
२०२४ निवडणुकीत बायडन-हॅरिस तिकिटापुढे काही यक्षप्रश्न आहेत.
१. इस्राएल-हमास युद्धामुळे हजारो पॅलेस्टिनी मारले गेले आणि संबंध गाझा उध्वस्त झाला.
न्यूयॉर्क टाइम्सने ‘वेस्ट बँक’ ह्या पॅलेस्टिनी प्रांतात इस्राएलने बांधलेल्या अवैध इस्राएली वस्त्या, तेथे राहणाऱ्या जनतेवर वारंवार होणारे अन्याय ह्यांवर मे महिन्यात एक विस्तृत लेख प्रसिद्ध केला.
अमेरिकन विद्यापीठात शिकणाऱ्या तरुण पिढीला हमासने केलेला हल्ला जसा निषिद्ध वाटतो, तसेच त्यांना इस्राएलने चालवलेले ‘वेस्ट बँक’मधील अन्याय आणि गाझामधील हत्या आणि विध्वंस देखील निषेधार्ह वाटतात. त्यामुळे अनेक विद्यापीठांतून निदर्शने चालली आहेत. शस्त्रसंधी होऊन तेथे शांतता प्रस्थापित होईपर्यंत ही धुसफूस चालूच राहील. ह्याचा आगामी निवडणुकीत असा घातक परिणाम घडू शकतो की, तरुण पिढी बायडनला मत देण्याऐवजी, मत न देता घरीच बसेल.
२. रशियाने युक्रेनवर चालवलेली चढाई अजून चालू आहे. युक्रेनचा पराभव झाला तर रशियाचे पुतीन इतर सीमावर्ती देशांवर हल्ला करतील, अशी सकारण भीती नेटो राष्ट्रांना वाटत असल्याने युरोप आणि अमेरिका युक्रेनला शस्त्रे पुरवीत आहेत. परंतु, पुतीननी चिथावून जाऊन अण्वस्त्र वापर करू नये म्हणून हीच राष्ट्रे खबरदारी घेत असतात. ट्रम्प ह्यांनी वारंवार “पुतीन त्यांचा मित्र आहे आणि युक्रेन रशियाला देऊन टाकावा” असे म्हटले आहे. आपण निवडून आल्यास नेटोमधून बाहेर पडू, अशी धमकी २०१६ सालापासून ट्रम्प देत आले आहेत!
३. अनाहूत लॅटिन अमेरिकन आश्रयार्थींचा पूर. युरोपमधील अनेक देशांमध्ये सनातनी राजवटी येत आहेत, त्याचे मुख्य कारण मध्यपूर्वेतून युरोपमध्ये येणारे मुख्यतः मुस्लिम आश्रयार्थी हे आहे. अमेरिका आणि मेक्सिकोमधील सीमारेषा अवैध मार्गांनी ओलांडून दक्षिण अमेरिकेतून हजारो आश्रयार्थी टेक्सास आणि कॅलिफोर्निया प्रांतात येत आहेत. ती बायडन यांची डोकेदुखी झाली आहे. एकीकडे मानवतावादी दृष्टिकोनातून ते आश्रयार्थींना येऊ देऊ पाहतात, पण त्याचबरोबर अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि वैध मार्गाने इकडे आलेले दक्षिण अमेरिकन ह्यांना अशी भीती वाटते की ह्या आश्रयार्थी लोकांमुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल.
४. ट्रम्पच्या कारवाया : “अशा उपऱ्यांना सीमेवरूनच परत पाठवीन” अशी ट्रम्पने घोषणा केली आहे. (मुंबईत अवैध बांगलादेशींना ह्याच कारणामुळे विरोध होतो) ह्या कारणांमुळे कित्येक कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक नागरिक ट्रम्पना मते देतील. खरे तर ट्रम्प तोंडाला येईल ते बोलत असतात. इन्कम टॅक्स रद्द करून टॅरिफ वाढवेन, भारतीय विद्यार्थ्यांना ग्रीन कार्ड देईन, अश्या वावड्या ते उडवत असतात.
५. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने गतवर्षी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. एक होता सरकारी पातळीवर नागरिक हक्क संविधानाच्या विरुद्ध आणि दुसरा निर्णय होता स्त्रियांचे जननहक्क स्वातंत्र्य हिरावणारा. तत्त्वतः ह्या दोन्हीं निर्णयांविरुद्ध कृष्णवर्णीय आणि महिला ह्या दोन्हीं जनघटकांनी निदर्शने केली असली तरीही ती सगळी मते बायडन ह्यांना मिळतीलच असे नाही.
सनातनी विचारसरणीचा जागतिक विजय
जगातील अनेक देशांमध्ये गतवर्षी आणि ह्या वर्षी राष्ट्रीय निवडणुकांत सनातनी विचारसरणीचे पक्ष आणि नेते निवडून आले आहेत. ट्रम्प ह्यांच्यावर सध्या अनेक खटले चालू आहेत. त्यांनी एका ‘स्टॉर्मी डॅनिएल्स’ नावाच्या पॉर्न स्टारशी लैंगिक संबंध ठेवल्याची माहिती २०१५ साली नॅशनल एन्क्वायरर ह्या सनसनाटी साप्ताहिकाने छापू नये म्हणून ट्रम्पने कोहेन ह्या त्यांच्या वकिलाहस्ते तिला ‘हश-मनी’ दिला होता. आणि ही सर्व हकीकत त्यांनी नाकारली होती.
न्यूयॉर्क स्टेट ॲटर्नीने ट्रम्प ह्यांच्यावर लावलेल्या खटल्यात कोहेन एक महत्त्वाचा माफीचा साक्षीदार होते. खटल्याचा निर्णय नुकताच लागला. आणि ज्यूरी एकमताने ट्रम्प ‘फेलनी’ गुन्हेगार ठरले. जुलैमध्ये जज ट्रम्पना शिक्षा ठोठावील. पण त्यावर ट्रम्प लगेच अपील करतील. ट्रम्प ह्यांच्यावरील इतर खटल्यांप्रमाणेच आगामी निवडणुकांपूर्वी एकही खटला पुरा होणार नसल्याने आणि सर्व राज्यांतील रिपब्लिकन पक्ष संघटना ट्रम्पनी चातुर्याने वश करून घेतल्यामुळे नोव्हेंबरमधील निवडणुकीत बायडन विरुद्ध ट्रम्प अशीच लढत असेल.
ट्रम्पसारखी बदफैली, अनेक आर्थिक गैरव्यवहार करणारी, स्त्रियांबद्दल अर्वाच्य बोलणारी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष कशी होऊ शकते? ते निवडणूक हरल्यावरही, केवळ तेच नाही तर हजारो लोक, “ते निवडणूक हरलेच नाहीत” ह्या त्यांच्या दाव्यावर कसे विश्वास ठेवतात? आणि पुन्हा त्यांना निवडणुकीला उभे राहण्यासाठी इतके पाठबळ कसे मिळते? अमेरिकेसारख्या देशात हे कसे घडू शकते?
ते पाहण्याआधी, २०१९ सालच्या बायडन-ट्रम्प निवडणूक धामधुमीत पंतप्रधान मोदी ह्यूस्टनला आले होते, तेव्हाची एक घटना: ह्यूस्टनमध्ये पन्नास हजार, बव्हंशी भारतीय प्रेक्षकांसमोर मोदीजींनी ट्रम्प ह्यांचा हात हातात घेऊन घोषणा केली, “अबकी बार ट्रम्प सरकार!” त्यावेळी जमलेल्या भारतीयांनी टाळ्यांचा गजर केला होता.
मायक्रोसॉफ्ट आणि गूगल ह्यांचे सर्वोच्च अधिकारी भारतीय आहेत. पण त्यांच्यासकट मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी यंदाच्या निवडणुकांत फक्त प्रेक्षकांची भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. ह्याला कारण ट्रम्प ह्यांचे ‘मेगा’समर्थक. हे लोक हिटलरच्या ‘ब्राऊन शर्ट्स’सारखे कडवे सभ्य-असभ्य गुंड आहेत. ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना ह्याचे आश्चर्य वाटू नये.
ट्रम्प हे एक पाताळयंत्री व्यक्तिमत्व आहे. कोर्टात आरोपींचा ‘मग शॉट’ घेतला जातो. ट्रम्प ह्यांनी तो फोटो टीशर्टवर टाकून लक्षावधी डॉलर्स विक्री केली! स्टॉर्मी डॅनिएल्स खटला ट्रम्प ह्यांच्या विरुद्ध जाताच ट्रम्प हातात बायबल घेऊन त्यांच्या चाहत्यांपुढे उभे राहिले. “येशू ख्रिस्ताचे जसे लोकांनी हाल केले तसे हे डेमोक्रॅट्स माझे करत आहेत” असे ते म्हणताच आणखी लक्षावधी डॉलर्स त्यांच्या निवडणूक खजिन्यात जमा झाले!! ट्रम्प यांच्या वंशभेद, वर्णभेद, धर्मभेद ह्यांविषयीच्या एककल्ली मतांशी सहमत असणारे अमेरिकन जवळपास चाळीस टक्के आहेत! स्टॉर्मी डॅनिएल्स खटल्यात ट्रम्प ह्यांच्यावर ‘फेलनी’ आरोप सिद्ध होऊन ते एक ‘फेलन’ ठरले आहेत. पण पैसा, वकील आणि अपील, ह्यांत काळ घालवून ते निवडणुकीच्या आधी तुरुंगात जाणार नाहीत. निवडून आल्यावर, हुकूमशाही हक्क वापरून त्यांच्या “विरोधात असलेले केन्द्रीय ॲटर्नी जनरलपासून वार्ताहरांपर्यंत सगळ्यांना तुरुंगात धाडीन” अशी घोषणा ट्रम्प ह्यांनी केली आहे!
येथे एक विरोधाभास नोंदवायला हवा. अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकेन वर्गांत वंशभेद, गरीबी, विस्कळित कुटुंबे, ह्यांमुळे गुन्हेगारी जास्त आहे. ‘फेलनी’मुळे कित्येक माणसे तुरुंगवास भोगून येतात. दक्षिणेकडील रिपब्लिकन राज्यांत अशा फेलन्सचे मतदान हक्क हिरावून घेण्यात आले आहेत!
अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांची गरीबी
लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअरलाईनसाठी अन्न बनवणारी, विमानातील कार्ट्स धुऊन नवीन ट्रे त्यांत ठेवणारी कंपनी आहे. तेथील कामकरी बह्वंशी मेक्सिकन असून त्यांचे सरासरी वय ६० आहे. काही तर ७० च्या पुढे आहेत. कमी वेतनामुळे त्यांना सरकारी आरोग्य विमा उतरवता येत नाही.
एकंदरीत अमेरिकेत २३% ज्येष्ठ नागरिक गरीबीत आहेत. कॅनडात ही टक्केवारी १५%, इंग्लंडमध्ये १२%, तर फ्रान्समध्ये ४.५% आहे. ह्या लोकांच्या परिस्थितीत डेमोक्रॅटिक बायडन गेली चार वर्षे राष्ट्राध्यक्ष असूनही फरक पडलेला नाही. गरिबांना दर चार वर्षांनी दोन्ही पक्षांचे उमेदवार आश्वासने देतात. ट्रम्पपण यंदा तेच करतील. लॉटरी लावून बघावी तसे कित्येक गरीबवर्गीय यंदा ट्रम्पना मते देऊन बघण्याची शक्यता आहे.
बायडन ह्यांचा अपुरा प्रचार
गेल्या चार वर्षांत रीपब्लिकन हाऊस बहुमतात असूनसुद्धा बायडन ह्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत. पर्यावरणरक्षणासाठी सौर आणि वायू विद्युतशक्तीनिर्मितीत लक्षणीय वाढ त्यांनी घडवून आणली आहे. सन २०३५ नंतर गॅसोलीन इंधनावर चालणाऱ्या मोटारी बंद होतील. तसेच मध्य अमेरिकी राज्यांत सौरबॅटरी उद्योग, विद्युत वाहननिर्मिती, आणि कम्प्युटर चिपनिर्मिती ह्यांचे कारखाने सुरू केले आहेत. पण ह्या कार्याचा म्हणावा तितका गवगवा झालेला नाही. नाही म्हणायला, जानेवारी २०२४मध्ये संसद भवनात बायडन ह्यांनी अमेरिकन आणि जागतिक परिस्थिती, पर्यावरणरक्षण आणि जागतिक भवितव्य ह्यांवर फार प्रभावी भाषण दिले. आता अनेक अभिनेते, टीव्ही टॉक शो होस्ट, माजी सेनाप्रमुख, आणि क्लिंटन, ओबामा, ह्यांसारखे अमोघ वक्ते डेमोक्रॅटिक प्रचारांत मदत करीत आहेत.
गंभीर परिस्थिती
सुप्रीम कोर्टावरील तीन जजेस ट्रम्प ह्यांनी ते राष्ट्राध्यक्ष असताना नेमले होते. त्यामुळे सध्याच्या नऊ जजेसपैकी सहा सनातनी मतवादी आहेत. भारतीय सुप्रीम कोर्टात वयाची मर्यादा आहे, पण अमेरिकन सुप्रीम कोर्टाचे सदस्य तहहयात नेमणुकीचे असतात. त्यांच्या वागणुकीवर जवळजवळ काहीच अंकुश नसतो.
गेल्या वर्षात ह्या कोर्टाने स्रियांचे गर्भपात हक्क हिरावून घेतले, अल्पसंख्याकांचे नागरी हक्क कमी केले, आणि नुकतेच ऑटोमॅटिक बंदुकींवर ब्लॉक बसवायला (ह्या ब्लॉकमुळे सतत गोळीबार करता येतो) असलेली बंदी काढून टाकली. पण इटलीच्या नवीन पंतप्रधान बाईंप्रमाणे हजारो अमेरिकन स्त्रियाही गर्भपाताच्या विरोधात आहेत. सनातनी अमेरिकन माणसांना ‘सिव्हिल राईट्स’ नावाखाली अल्पसंख्याकांचे लाड चालले आहेत, असे वाटते आणि बलशाली ‘गन लॉबी’ला बंदुकांवर नियंत्रण नको आहे.
“राजा, वैऱ्याची रात्र आहे “
जोसेफ बायडन ३६ वर्षे संसदेत सेनेटर होते, नंतर आठ वर्षे ओबामा ह्यांचे उपाध्यक्ष आणि गेली चार वर्षे राष्ट्राध्यक्ष. अडखळत बोलणे त्यांनी प्रयत्नपूर्वक सुधारले आहे. पण आता त्यांचे वय ८१ आहे. बोलताना वाक्य विसरणे, चालताना किंचित दिशाभूल होणे, संदर्भ सोडून बोलणे किंवा फटकन् असंबद्ध वाक्य टाकणे, असे त्यांच्याकडून काहीवेळा होते. ट्रम्प असंबद्ध बोलण्यात प्रसिद्ध आहेत. किंबहुना ते तसे बोलले नाहीत तरच लोकांना आश्चर्य वाटते!
सेनेटर होण्यापूर्वी कमला हॅरिस कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल होत्या. गेल्या चार वर्षांत युरोपमधील अनेक महत्त्वाच्या बैठकींना बायडन ह्यांनी कमला हॅरिस ह्यांना पाठवले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बाबींवर बायडन सर्वांच्या सल्ल्याने चालत असतात. त्यामुळे त्यांच्या वार्धक्याचा फार बाऊ करण्याचे कारण नाही. परंतु बायडन ह्यांनी ‘राजकारण ही शक्यतेची कला आहे’ हे पक्के जाणले आहे. त्यांच्याकडून पर्यावरण, सामाजिक न्याय ह्यांबाबतीत अजून अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतील. मात्र इस्राएलबद्दल त्यांच्याकडून व ट्रम्पकडून धोरणांत बदल होण्याची शक्यता कमी आहे.
एका अर्थी आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही ‘लेसर ऑफ द ईव्हिल्स’ किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून, त्यांतल्या त्यांत कोण अमेरिकेपुढील आणि जागतिक परिस्थिती ह्यांना कमीतकमी धोकादायक आहे, ह्या मुद्द्यावर आहे. सर्व अडथळ्यांवर मात करून येत्या नोव्हेंबर निवडणुकीत बायडन-हॅरिस पुन्हा निवडून येतील अशी आशा करूया.
अतिशय समर्पक विवेचन. कमला हॅरिस निवडून येणे हे आंतरराष्ट्रीय शांतता व लोकशाहीच्या रक्षणासाठी एक महत्वाचे पाङल ठरणार आहे. अमेरिकेत ख-या अर्थाने लोकशाहीची पुनर्स्थापना होऊन मानवाधिकार, महिला सबलीकरण आणि वसुधैव कुटुंबिकम् साध्य होऊ शकेल. अमेरिकेचा विकासही अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक राहील. सा-या जगाला प्रगतीपथावर नेण्यात अमेरिकेला नेतृत्व मिळू शकेल.